Wednesday, April 30, 2008

विडंबन गीत


आमचे आणखी एक ज्येष्ठ सभासद श्री. प्र. गो. भिडे यांचे शब्दांशी खेळ सदैव चालू असतात. विडंबन कविता रचणे व हौसेने गाऊन दाखवणे हा त्यांचा एक षौक आहे. त्यांची एक इरसाल विडंबन कविता आज येथे ठेवत आहे. सोबती सभासदांच्यात आपल्या प्रतिसादांमुळे खूप उत्साह व आनंद आहे. माझेकडे कविता व इतर साहित्य जमा होते आहे. तेव्हा ब्लॉग पहात रहा.

मतदारास ....

विसरतील खास तुला, निवडणूक होतां
आश्वासन अन वचनेही देति जरी आता ॥ विसरतील ...

निर्वाचित झाल्यावर वृत्ति ती निराळी
आमिष, धनलोभांची पसरलीत जाळी
गुंतता तयात जीव, कोण तुझा त्राता ॥ १ ॥ विसरतील ...

आमदार, खासदार, इथुन तिथुन सारे
खुर्चीच्या मोहातच अडकले बिचारे
जाणतील दु:ख तुझे, व्यर्थचि या बाता ॥ २ ॥ विसरतील ...

अंतरिची व्यथा तुझ्या जाणवेल ज्याला
शोध त्यास सत्वर तूं, दवडिं ना क्षणाला
आणि तया दृष्टिआड करूं नकॊ नाथा ॥ ३ ॥ विसरतील खास तुला

Monday, April 28, 2008

सांच्याला कळवा!















मोलकरणीची समस्या हा खरे तर आमच्या पिढीपेक्षा आमच्या लेकीसुनांचा प्रष्न. या विषयावरचे एक गमतीदार गाणे सौ. सुनंदा गोखले या आमच्या एक सभासद मोठ्या ठसक्यात सादर करतात. ते आमच्या सभासदाना एवढे आवडते की ’सोबती’च्या सर्व सहलींमध्ये करमणुकीच्या कार्यक्रमात हटकून त्याचा समावेश असतो. कविता मुळात त्यांचा भाचा श्री. संजय बर्वे यांची आहे. त्यांच्या सोनचाफा या संग्रहातून त्यांच्या परवानगीने ती येथे देत आहे.

सूचना : कविता वाचण्यासाठी कवितेवर क्लिक करा.

Wednesday, April 23, 2008

रामनवमी

सूचना : कविता वाचण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा.
रामनवमी निमित्त एका कार्यक्रमात रामावर नवीन कविता रचण्याचे आवाहन होते. त्याला प्रतिसाद देताना रचलेली श्री. नारायण जुवेकर यांची कविता त्यांच्याच हस्ताक्षरात देत आहे. (कविता स्वत: टाइप करण्याचे टाळले आहे हे लक्षात येईलच.)

Sunday, April 20, 2008

त्यांचा जयजयकार

’सोबती’चे आणखी एक ज्येष्ठ सभासद श्री. र. पां. कणेकर. यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. वयपरत्वे आता त्यांची सोबती कार्यक्रमाना उपस्थिति नियमित नसते. ’सोबती’चा ब्लॉग सुरू केल्याचे त्यांच्याशी बोललो व कविता मागितली. त्यानी तत्परतेने पाठवून दिलेली कविता वाचकांसमोर ठेवत आहे.

त्यांचा जयजयकार
(समूहगान)

जखडुन होतो तेव्हां लढले
भारतभूचे वीर
दास्यशृंखला तोडायाला
नाही झालि कसूर ॥ करूया त्यांचा जयजयकार ॥१॥
स्वातंत्र्यास्तव लढा पेटला
अर्पण केले प्राण
त्या वीरांच्या बलिदानाने
स्वातंत्र्याची जाण ॥ करूया ..... ॥२॥
शत्रूचे कधि आले घाले
लढले प्राणपणाने
शौर्याला कधि नव्हती सीमा
गाजे जय-हिंदने ॥ करूया ..... ॥३॥
भारतभूच्या शूर जवाना
आम्हाला अभिमान
आहुति सर्वस्वाची करुनी
राष्ट्रासाठी प्राण ॥ करूया ..... ॥४॥
मित्रत्वाचा आव आणुनी
अतिरेकी घुसवले
उत्तर देणे विश्वासघाता
संगिनिने साधले ॥ करूया ..... ॥५॥
गनिमी कावा रचिला रिपुने
व्यापियला भूभाग
मुक्त कराया अपुली सीमा
लढले हिन्द जवान ॥ करूया ..... ॥६॥

Thursday, April 17, 2008

हत्तीच्या दातदुखीची नवलकथा


डॉ. सुभाष भागवत हे सोबतीचे एक मान्यवर सभासद आहेत. पशुवैद्यक विषयातील ते एक ख्यातनाम तज्ञ आहेत. ही नवलकथा त्यानी ’सोबती’च्या एका साप्ताहिक सभेत सांगितली व सर्व सभासद चक्रावूनच गेले. ही कथा वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. डॉ. भागवतांकडून ती आग्रहाने मिळवून त्यांच्याच शब्दात आपल्यासाठी देत आहे. ती आपणाला आवडेलच याची खात्री आहे.

ह्त्तीच्या दातदुखीची नवलकथा
मेळघाटच्या जंगलातील वन विभागाच्या पाळीव हत्तीला झालेली दातदुखी व त्यावरील यशस्वी उपचाराची ही नवलकथा आहे. जंगलामध्ये झाडाच्या बुंध्याशी टकरा घेत खेळणाऱ्या एका तरण्याबांड हत्तीने आपला एक सुळाच तोडून घेतला. तुटलेल्या सुळ्याच्या मध्यभागी असलेल्या पोकळीतून रक्ताची धार लागली. अशिक्षित माहुताने रक्त थांबवण्यासाठी एक लवचिक बारीक फांदी दाताच्या पोकळीत दाबून धरली. रक्त जवळजवळ थांबले. सेमाडोह गावच्या प्राण्यांच्या दवाखान्यात डॉक्टरने दाताच्या पोकळीत कापूस, गॉझ वगैरे भरून रक्तस्राव थांबवला. पण दाताच्या मुळाशी हिरडीला सूज येत राहिली. वेदनांनी हत्ती चिडचिडा बनला. एकाएकी त्याने गावातील सिपना नदीच्या पुलावर उभा असलेला एक ट्रक नदीत उलथून टाकला! आणखी आठ दिवसानी वेदना वाढून हत्तीने अमरावतीकडे येणारी एक एस्टी बसच दोन तास अडवून धरली. जणू सत्याग्रहच केला! वनसंरक्षक साहेबांनी मला हत्तीवर काहीतरी उपचार करा असे सांगितले. नाहीतर हत्तीला मारून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी मी अकोला येथे पंजाबराव कृषि विद्यापीठात पशुविकृतिशास्त्राचा विभागप्रमुख व प्राध्यापक होतो. सर्जरी विभागातील डॉ. मेहेसरे यांना बरोबर घेऊन मी निघालो. तेथे पोचल्यावर हत्तीच्या माहुताने मला विनविले की काही करून याला वेदनामुक्त करा. हत्ती सुजलेल्या जागी हातहि लावू देत नव्हता. आम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तोवर हत्तीने अचानक माहुतालाच सोंडेने उचलून उलटा केला! माहुताने त्याला कसेबसे शांत केले. आम्ही खरेतर घाबरलो. धीर करून जवळ जाऊन सुजेवर हात लावून पाहिले तो सर्व भाग मऊ पडला होता, म्हणजे गळू पिकले होते. डॉ. मेहेसरेंचे मत पडले की हत्तीला ट्रॅन्क्विलाइझर देऊन मग गळू कापावे. हत्तीच्या जाड कातडीमुळे गळू बाहेरून कापून ड्रेन करणे महाकठिण होते व नंतर जखम चिघळण्याची भीति होती. त्यामुळे दुसरा काय उपाय करता येईल याचा मी विचार करत होतो. एकदम एक मजेदार कल्पना मला सुचली. जवळच्या गॅरेजमधून स्कूटरच्या क्लचवायरच्या आतील लवचिक वायर आणवली. स्टोव्हवर उकळत्या पाण्यात ती निर्जंतुक केली. ती वायर दाताच्या पोकळीतून हिरडीपर्यंत घालून गळू फोडण्याचा माझा बेत डॉ. मेहेसरेना पटत नव्हता पण मी पडलो साहेब! माहूत हतीला गोंजारत होता व मी हळूहळू वायर आत ढकलत होतो. वायर दोन फूट आत गेली व अचानक हत्तीने मान हलवली! वायरचे टोक हिरडीला टोचून गळू फुटले! दाताच्या पोकळीतून रक्त व पू जोरात वाहू लागला. दोन लिटर घाण द्राव, कुजलेले कापसाचे बोळे व ड्रेसिंग गॉझ बाहेर वाहून आले. अगदी सहजपणे हत्ती हळूहळू वेदनामुक्त झाला.
आम्ही चहा पीत उभे होतो तेथे शेजारी उभा राहून माझ्या अंगावरून सोंड फिरवून हत्तीने जणू माझे आभार मानले. आम्ही अकोल्याला परत गेलो. त्यानंतर दहा बारा दिवस इतर औषधोपचार होऊन हत्ती पूर्ण बरा झाला असे मागाहून मला अकोल्याला कळले.
कोणतीहि आधुनिक उपकरणे हाताशी नसताना कल्पनाशक्ति व व्यावहारिक शहाणपण याच्या जोरावर मी हत्तीला वेदनामुक्त करू शकलॊ व त्याचा जीवहि वाचला याचे मला अतिशय समाधान वाटले.

Tuesday, April 15, 2008

साद - प्रतिसाद

श्री. नारायण जुवेकर हे आमचे आणखी एक ज्येष्ठ सभासद. हेहि कित्येक वर्षांपासून कविता करीत आहेत व आम्हाला ऐकवीत आहेत. मी त्याना थट्टेने सोबतीचे ’राजकवि’ म्हणतों. त्यांची एक ताजी कविता देतो आहे. (लेखन दिनांक ०२-०४-०८)

साद-प्रतिसाद

काव्याच्या त्या मैफलीसाठी
कविवर्यांना निमंत्रिले ---
निर्विकार ते श्रोते बघुनी
कविवर सारे हादरले ॥ १ ॥

पहिल्या फेरित शृंगाराला
परोपरीने आळविले
परि श्रोत्यांनी मौनामधुनी
हिशेब सारे चुकवीले ॥ २ ॥

दुसऱ्या फेरित मग सर्वांनी
निसर्गकाव्ये रंगविली
निसर्ग हाका ऐकुनि श्रोते

हळुच दाविती करांगुलि ॥ ३ ॥

तिसऱ्या फेरित प्रत्येकाने
घोळुन म्हटली चारोळी ----
साद घालण्यासाठी कोणी
हळुच मारिली आरोळी ॥ ४ ॥
चवथ्या वेळी कविवर्यांनी
शेर मृत्यूचे सुनावले
श्रोत्यांनी मग गाढ झोपुनी
नाट्य त्यातले अनुभवले ॥ ५ ॥
शेवटचे ते शस्त्र म्हणॊनी
गझल शोधिले त्या कविंनी
वडे संपतिल या भीतीने
श्रोते उठले खुर्चितुनी ॥ ६ ॥
अशी पांगली मैफल सारी
कविही सारे बचावले
हात जोडुनी वदले सारे
’आज वड्यांनी वाचवले’ ॥ ७ ॥

Sunday, April 13, 2008

मोतीबिंदु


’सोबती’ चे एक ज्येष्ठ सभासद श्री. कृष्णकुमार प्रधान यांच्या कविता सोबतीच्या सभांमध्ये वेळोवेळी ऐकावयास मिळतात. मोतीबिंदु ही ज्येष्ठ नागरिकांची समस्या. तिच्यावरही निकोप मनाने कविता करता येते हे आपणाला नक्की आवडेल.


मोतीबिंदु


एक बाहुली सोडुन जातां माझा डोळा होई व्याकुळ

नवी बाहुली करी तांबडा, रंग जरि तिचा घननीळ

निसर्गाची अनमोल देणगी, ती तर याला सोडुन गेली

नववधू जणू घरी आणली, ही तर प्लास्टिकची बाहुली

रडत, मुरडत घरी आली ती बाहुली जरी प्लास्टिकची

असेल बनली प्लास्टिकची तरि साथ देवो मज अखेरची.

कृष्ण्कुमार प्रधान.

Ph. - 26172731



Friday, April 04, 2008

अहो मला माझ्या बहिणीकडे पोंचवा!

सोबतीचे सभासद श्री. शंकर वासुदेव लिमये यानी साप्ताहिक सभेत सांगितलेली एक सत्य घटना (त्यांच्याच शब्दांत) -
दि. ७ मार्च २००८ ला ११-३० चे सुमारास आपले एक सभासद श्री. दि. म. संत यांचा मला फोन आला कीं वाकोला पोलीस स्टेशनवर ’आपले नाव वसंत दत्तात्रेय’ लिमये एवढेच सांगणारे ८२ वर्षांचे एक गृहस्थ एका रिक्षावाल्याने काल रात्रीपासून आणून सोडले आहेत. त्यांचा पत्ता पोलिसाना हवा आहे. ते तुमचे कोणी नातेवाईक आहेत का? मी म्हटले ’नाही, पण लिमये कुलवृत्तांतात पाह्तो.’ सुदैवाने पुस्तक मिळाले. पण ते २००१ सालचे! त्यात त्या नावाचे १०-१२ निघाले! काही मृत होते तर काही हयात पण कमी वयाचे. एक मात्र वय जुळणारे निघाले. त्यांची जी महिती मिळाली ती वाकोला पोलिस स्टेशनचे सब-इन्सपेक्टर विजय म्हामोणकर यांना फोन करून कळवली. ते गृहस्थ पुण्यात भास्करभुवन, शुक्रवार पेठ येथे राहतात व प्रभात टॉकीज येथे ऑपरेटर होते. योगायोग असा की माझे मामेभाऊ श्री. भिडे हे प्रभात टॉकीज मध्ये मॅनेजर आहेत. मी लगेच त्याना फोन केला. भिडे म्हणाले कीं त्यांची बहीण पुण्यात राहते तिला कळवतो. मी म्हटले की ही माहिती तूं म्हामुणकरांना स्वत:च कळव. श्री. लिमये पोलिस-स्टेशनवर पोचल्यापासून उपाशीच होते. काही खायला दिले तर म्हणत की माझी बहीण जेवल्याशिवाय मी कसा जेवू? ती अधू आहे. बहिणीचा पत्ता आठवत नव्हता. रिक्षात मरोळ येथे बसले व मला शुक्रवारात जायचे आहे असे म्हणत राहिले. २-३ तास फिरवल्यावर रिक्शावाल्याने वाकोला पोलिस-स्तेशनला आणले होते त्याला आता २४ तास झाले होते. म्हामुणकरांनी पुण्याला बंडगार्डन पोलिस स्टेशनला शुक्रवारात तपास करण्यास सांगितले तेव्हा घराला कुलूप दिसले व शेजाऱ्यांकडून कळले कीं पत्नी वारल्यापासून ते सैरभैर झाले आहेत व आता तेथे नसतात. मी फोनवरून लिमयांशी बोलण्याचा व त्यांची आठवण जागी करण्याचा प्रयत्न केला पण ’आपल्याला जायचे आहे ना?’ एवढेच ते बोलले! मग मी पुन्हा कुलवृत्तांतावरून इतर नातेवाइक पाहिले तर एक बहीण सावंतवाडीला, भाऊ व दुसरी बहीण अंधेरीला राहतात अशी माहिती दिली होती. मी तेथे तपास केला तर भाऊ केव्हाच वारले व बहीण जागा सोडून गेली असे कळले. तेव्हा डेड एन्ड आला. पोलिसांनी निराश्रित वृद्धांना आसरा देणाऱ्या वृद्धाश्रमांची माहिती मिळवून जरूर तर लिमयांना तेथे पाठवण्याची तयारी केली होती. तेवढ्यांत श्री. भिडे यांचेकडून कळले की सावंतवाडीची बहीण श्रीमती इंदु काळे आता मुंबईत खेरवाडी येथे राहते. ही माहिती मात्र वाकोला पोलिस-स्तेशनला पुरेशी झाली. श्रीमती काळे यांचा पत्ता शोधून त्यांना बोलावून घेऊन अखेर श्री. लिमये आजोबांना त्यांच्या स्वाधीन केले गेले. बहिण भेटेपर्यंत जेवणहि न सुचणाऱ्या थोरल्या भावाला ती भेटली व या करुण कहाणीचा शेवट गोड झाला.
कुलवृत्तांताचा असाहि एक उपयोग!

Thursday, April 03, 2008

’सोबती’ ची ओळख

मित्रानो, ’सोबती’ ही विलेपार्ले मुंबई येथील एक खूप जुनी ज्येष्ठ नागरिक संघटना आहे. मी तिचा एक सभासद आहे. आमचे पुष्कळसे सभासद कॉम्प्यूटर, ब्लॉग वगैरे गोष्टींशी अजून तरी अपरिचित आहेत. मात्र अनेकाना साहित्याची, काव्याची, तसेच इतर अनेक विषयांची उत्तम जाण व लेखनक्षमताही आहे. त्यांचे वतीने मी हा ब्लॉग सुरू करीत आहे. यावरील लिखाण बरेचसे इतर सभासदांचे असेल, काही थोडे माझेहि असेल. तुम्हाला आवडले तर जरूर कळवा. आमची दर सप्ताहाला सभा असते त्यावेळी मी तुमच्या प्रतिक्रिया सभेला सांगेन.