Thursday, December 31, 2009

जगाच्या विविध देशातील ‘सोबती’ च्या ब्लॉग वाचकांना सोबती, ज्येष्ठ नागरिक संघटना, विले पार्ले, मुंबई यांचेकडून
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


----- प्र.के. फडणीस
------ म.ना. काळे
------ विश्वास डोंगरे
------ चंद्रकांत पतके

Wednesday, December 30, 2009

कुमारकोम् व अलप्पुर्हा (अलेप्पी )

केरळला भेट देणार्या प्रवाशांनी हाउसबोटीत राहाण्याचा अनुभव अवश्य घ्यावा . तुमच्या निवडीप्रमाणे, १,२ वा ३ शयनगृहे असलेली , वातानुकुलन असलेली वा नसलेली हाउसबोट तुम्ही घेऊ शकता. डेक , स्वयंपाकघर , वॉश बेसिन, टॉयलेट व बाथरूम, टी. व्ही., गळ टाकून मासे पकडणें याही सोयी असतात. बोटीला डिझेल एंजिन असते व वातानुकुलनाकरिता डिझेल जनरेटर असतो. आपल्या आवडीचें खाणें व केरळांत आल्यापासून ते केरळचा निरोप घेईपर्यंतचा सर्व प्रवास व त्याचा सर्व खर्च , इंटरनेट वर सु-निश्चित करता येतो.
कोचीच्या दक्षिणेला अंदाजे ८० ते १०० कि. मि. अंतरावर, वेंबानाड हे ३० ते ४० फुट खोल असलेले,प्रचंड मोठें व कृत्रिम सरोवर आहे . सरोवरांत बेटे आहेत. एका बाजूनें तीन नद्यांचें पाणी सरोवरात येतें व दुसरीकडून अतिरिक्त पाणी बॅक वॉटर्स द्वारा समुद्रांत वाहून जाते. वेंबानाडचा विस्तार जवळ जवळ १५०० वर्ग किलोमिटर आहे . बाहेरच्या बाजूला शेते व नारळीच्या बागा दिसतात. अनेक पाणपक्षी दिसतात. जगप्रसिद्ध Snake Boat Race ,दर ऑगस्टमध्ये, येथील एका भागांत होते. विजेत्या टीमला नेहरू ट्रॉफी दिली जाते. या सरोवराच्या किनार्यावर एका बाजूला कुमारकोम् वसलें आहे . वेगवेगळ्या कंपन्यांच्या हाउसबोटी येथे तरंगत उभ्या असतात. वेंबानाडच्या दुसर्या बाजूला अलप्पुर्हा आहे . आम्ही कोची-कालटी-गुरुवायूर-कुमारकोम्/अलप्पुर्हा-मुन्नार ह्या प्रवासाचें नियोजन इंटरनेटवर केले होतें. गुरुवायूरहुन कुमारकोम्ला टोयोटा इनोव्हानें दुपारी १ च्या सुमारास आलो. हाउसबोट ’सेंट मेरी ’उभीच होती. आम्ही बोटीवर आलो व बोट लगेच मार्गक्रमण करू लागली . सरोवरांत फारशा लाटा नसतात. बोट संथपणें जाते. पण कांही अनपेक्षित प्रसंग ओढवला तर बोटीवर लाइफ जॅकेट्स् व फ्लोट्स् असतात.
वेलकम् ड्रिंक म्हणून नारळपाणी देण्यांत आलें. नंतर सामिश भोजन झालें. योग्य वेळीं अल्पाहार , फलाहार (केळी, अननस) व चहा झाला. या सर्व वेळेंत, मार्गक्रमण चालूच होतें. मध्यंतरी , बोट अलप्पुर्हाजवळ , एका बेटाच्या कांठाला लागली. तेथे, चहा-कॉफी व कोल्ड ड्रिंक्सचे स्टॉल्स होते . ताजी मासळी विक्रीला होती पण फार महाग होती. उदा., टायगर प्रॉन्स् जे किलोत ४ ते ५ येतात, ९०० रुपये प्रतिकिलो होते. अर्ध्या तासाच्या मुक्कामानंतर परत मार्गस्थ झालो.
सुर्यास्ताच्या सुमारास एका निर्जन ठिकाणीं ,कांठाला लागून, बोटीने नांगर टाकला. बाजूला आणखी एक बोट होती. त्यावरील ठाण्याच्या एका युगुलाशी ओळख झाली. रात्रभर मुक्काम येथेच बोटीवर होणार होता. आम्ही गळानें कांही लहान लहान मासे पकडले व सोडून दिले. काळोख झाल्यानंतर किटकांचा त्रास टाळण्याकरिता , डेक सभोवतीचे सर्व पडदे खालीं सोडून डेक बंदिस्त केला गेला. रात्रीच्या जेवणांत मासे ( कारी मिन ), केरळी पराठा वगैरे पदार्थ होते.
रात्रभर शांत झोप झाल्यानंतर , पहाटेस जाग आली . बोटीचा क्र्यू ( पायलट ,स्वयंपाकी व हरकाम्या मदतनीस ) पडदे वर करणें, एंजिन रुम साफ करणें , न्याहरीची तयारी वगैरे कामांत व्यस्त होता. यथावकाश चहा आला .बोटीने नांगर उचलला व कुमारकोम्च्या दिशेला निघाली. आम्ही, सकाळीं ताडीची सोय करायला सांगितले होतें. त्याप्रमाणें बोट किनार्यावर एके ठिकाणीं लागली. जवळच ताडी मिळाली पण ती चांगल्या प्रतीची नव्हती ,म्हणून क्र्यू ला दिली. परत मार्गक्रमण. न्याहरी आली . आता आम्ही उतरण्याच्या तयारीला लागलो होतो. ९ च्या सुमारास, बोट नियोजित ठिकाणीं, कुमारकोमच्या किनार्याला लागली. आमच्याकरिता तीच टोयोटा इनोव्हा घेऊन, तोच ड्रायव्हर हजर होता. क्र्यू चा निरोप घेऊन आम्ही मुन्नारच्या मार्गाला लागलो.
... क्रमश: >>>> मुन्नार

हाउअसबोटीचा पायलट ....
डेकवर गप्पा टप्पा ....
डेकवरून न्याहाळणी ....
दुपारचें जेवण ....
कारी मिन (काळा मासा) ....
वॉश बेसिन ....
शयनगृह ...
टॉयलेट ----
---- व बाथरूम ...
स्वयंपाकघर ...
वेंबानाडच्या किनार्‍यावर ...
मासोळी गळाला लागली ...
निरोप ...












Sunday, December 27, 2009

चतुरस्र अभिनेता सुनील शेंडे - मुलाखत

नाटक, टी.व्ही. मालिका व चित्रपट य तिन्ही क्षेत्रातील एक यशस्वी अभिनेते श्री. सुनील शेंडे यांची सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद श्री. शंकरराव लिमये यानी मुलाखत घेतली.

श्री शेंडे उच्च विद्याविभूषित आहेत - M.Sc., D.B.M. शिवाय ते पार्लेकरही आहेत.

या व्यवसायात कसे आलात या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की अभिनयाचा वारसा त्यांच्या आई वडिलांकडून मिळाला. वयाच्या सहाव्या वर्षी त्यानी सोसायटीत झालेल्या नाटकात पहिली भूमिका केली. नंतर त्यानी गुरुदक्षिणा या नाटकात कृष्णाची भूमिका केली. अभिनयाचा त्यांचा प्रवास असा सुरु झाला.
हा व्यवसाय निवडताना प्रथम वडिलांचा विरोध होता कारण चंदेरी झगमगाटात अभिनेता वाहवत जाण्याचा धोका असतो. मात्र उच्च विद्याबिभूषित आपला हा मुलगा वाहवणार नाही याची खात्री पटल्यावर त्यांचा विरोध मावळला. श्री. शेंडे यांच्या मते या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नशिबाचा भागही महत्वाचा असतो. त्यात शिरल्यावर संघर्ष किंवा धडपड आवश्यक असते. मात्र ते म्हणाले ‘मला मिळालेले यश हे माझ्या अभिनय गुणांमुळे मिळाले. मी कुणाकडे काम मागायला गेलो नाही’.

‘शांती’ या मालिकेत त्यांची भूमिका महत्वाची होती व ती विशेष गाजली. ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ या नाटकात त्यानी प्रमुख भूमिका केली होती. इतर अनेक नाटकातही त्यानी प्रमुख भूमिका केल्या आहेत. त्यांची ‘सर्कस’ या मालिकेतील भूमिकाही महत्वाची होती.

त्यांचे अभिनय गुण पाहून त्याना काही हिंदी मालिका व चित्रपटातही भूमिका मिळाल्या. त्यांच्या मते जर मराठी अभिनेत्यानी अभ्यासपूर्वक हिंदीचे उच्चार सुधारले तर हिंदीतही मराठी अभिनेते यशस्वी होऊ शकतात.

ते पुढे म्हणाले की केवळ मनोरंजन करणार्‍या भूमिका स्वीकरण्यापेक्षा समाज प्रबोधन करणार्‍या किंवा काही संदेश देणार्‍या भूमिका स्वीकरण्याकडे त्यांचा कल असतो.

नाटक, टी.व्ही. मालिका व चित्रपट यांपैकी कोणते क्षेत्र त्याना आवडते या प्रश्नावर त्यानी नाटकाला प्राथमिकता दर्शविली. नोकरी, संसार व व्यवसायानिमित्त होणारे दौरे ही कसरत त्यानी कशी केली यावर ते म्हणाले की आई वडिलानी केलेल्या संस्कारानी त्याना व्यसने व अनिष्ट गोष्टींपासून दूर ठेवले.

त्यांच्या मते भूमिकांमध्ये विविधता असावी, ठराविक साच्याच्या नसाव्यात. या विचाराने त्यानी सकारात्मक व काही नकारात्मक भूमिकाही स्वीकारल्या पण त्याही विचारपूर्वक. प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करावा लागतो. मात्र ती यशस्वी होईलच याची नेहमीच खात्री नसते कारण या व्यवसायात अनेक प्रश्न गुंतलेले असतात. एकादे वेळी विपरीत अनुभवही येतात. काही वेळा अपरिहार्यपणे थोडीफार तडजोडही करावी लागते.

श्री. शेंडे यानी असेही सांगितले की ते कुटुंबवत्सल गृहस्थ आहेत व त्यामुळे ताण तणावांपासून मुक्त आहेत. ते पुढे म्हणाले की ते फाजील अपेक्षा ठेवीत नाहीत कारण अपेक्षा पुरी झाली नाही तर अपेक्षा भंगाचे दु:ख पदरी पडते.

त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास दीर्घ आहे. हिंदी/मराठी टीव्ही. मालिका, चित्रपट व नाटक मिळून २०० च्या वर त्यानी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या बहुतेक भूमिका भारदस्त व्यक्तिमत्वाच्या किंवा गंभीर स्वरुपाच्या असतात आणि त्यानी त्या विचारपूर्वक निवडलेल्या असतात.

या मुलाखतीचा शेवट त्यानी त्यांच्या ‘ आनंदाचा पाउस आता पडावा ’ या कवितेने केला.

Friday, December 25, 2009

गुरुवायूर

गुरुवायूर हे प्रसिद्ध तीर्थस्थळ कोचीन पासून सुमारे ९० किलोमिटर अंतरावर आहे. येथे श्री कृष्णाचें ( गुरुवायुरप्पन् ) देऊळ आहे . देवळांत प्रवेश करतांना , पुरुषांना ’मुंडू’ म्हणजे श्वेत लुंगी परिधान करावी लागते. कमरेच्या वरील भागांत कांही वस्त्र नसावें . खांद्यावर शर्ट ठेवला तर चालतो . महिलांना साडी अथवा ड्रेस चालतो. पाहिजे असल्यास मुंडू रु. १० भाड्यानें मिळते . रोज प्रचंड संख्येने , लोक दर्शनाला येतात. वरिष्ठ नागरिकांकरिता वेगळी रांग असते. शबरीमलयला जाणारे भक्त,
अय्याप्पाच्या दर्शनाला जाताना प्रथम येथे येतात . पाणी काढलेल्या जुन्या नारळाचा एक डोळा उघडून त्यांत तूप भरतात व वात लावतात. असे नारळ , कांही मोबदल्यांत तयार करून देणारे अनेक जण येथे दिसले. शबरीमलयच्या पायथ्याशी वात पेटवितात. या भक्तांचा वेष काळा असतो. कपाळावर जसें गंध लावतात तसे सर्व ठिकाणी बाहेरून गंध लावलेल्या , या भक्तांना शबरीमलयकडे नेणार्या मोटारी व बसेस् सहज ओळखू येतात. देवळांत सांजवेळेला वाती लावलेल्या हज्जारों दिव्यांची आरास दररोज करतात. हे सर्व दिवे लावण्याचे काम फक्त १० मिनिटांत करतात. या वेळेत फक्त देवळाचा सेवक वर्ग आवारांत असतो. संपूर्ण देऊळ याने उजळून निघते. फार विलोभनीय दृष्य असते. देवळाच्या आवाराबाहेर एक भव्य, कायम स्वरुपाचा मंडप आहे . नृत्याचा पहिला प्रयोग (अरंगेत्रम् ), बर्याच मुलींचे पालक येथे योजतात व त्याचें चित्रीकरण करून ठेवतात. दर्शनार्थींकरिता रहाण्याची ,चपला ठेवण्याची , टॉयलेट ब्लॉकची व कार-पार्किंगची शुल्क घेऊन सोय आहे.
देवळाचे ६४ हत्ती आहेत. कांही अंतरावर असलेल्या प्रचंड हत्तीशाळेंत त्यांचें वास्तव्य असते. प्रतीव्यक्ती व कॅमेरा ( स्थिर / चल ) वापरण्याकरिता शुल्क देऊन हे स्थळ १ ते १.५ तासांत पाहाता येते. त्यामुळे, तेथील रोजच्या प्रचंड खर्चाची – खाणे-पिणे, माहूत, साफसफाई , औषधोपचार , शिक्षण इत्यादि – कल्पना येते. या हत्तीशाळेतला देवळाचा प्रमुख हत्ती केशवन् – जीवनकाल १९०४ ते १९७६ – हा प्रख्यात होता व गजराज पदवीने सन्मानित होता. एकादशीच्या दिवशी उपवास करून , देवळाच्या दिशेने बसून व सोंड वर करून नमस्कार करीत त्याने प्राण सोडला. Taxi-dermi करून , त्याला मरणोत्तर जतन करून ठेवले आहे. त्याच्या प्रत्येक मृत्युदिनी हयात असलेले सर्व हत्ती त्याच्यापुढे रांकेत उभे रहातात व सद्याचा प्रमूख हत्ती - याचेही नांव केशवन् आहे –त्याला हार घालतो. केरळमधील या धर्म-स्थळावर लोकांची अतिशय श्रद्धा आहे .’पाताळंजना’ शीळेपासून कोरलेली गुरुवायूरप्पन्ची मूर्ती अद्वितीय आहे . ती सुमारे ५००० वर्षे इतकी जुनी आहे व या स्थानाला भूलोकीचें वैकुंठ असे समजतात.
एक आख्यायिका अशी – आदि शंकराचार्य आकाशमार्गे शृंगेरीला जात असता, गुरुवायूरवर असताना, तेथील भव्यतेला व भूतबळीच्या मिरवणुकीला पाहून हंसले व गुरुवायूरप्पन्ला प्रणिपात न करताच पुढे जाण्याच्या प्रयत्नांत असता, एकाएकी, देवळाच्या नैऋत्य भागांत कोसळले. सांवरून पहातात तर काय ! साक्षात गुरुवायुरप्पन् राजशाही थाटांत समोर उभे. आपल्या एकाएकी कोसळण्याचें कारण आचार्यांना क्षणार्धांत समजलें. त्यांनी देवाला साष्टांग नमस्कार घातला व तेथल्या तेथे गोविंद-अष्टकम् रचून स्तुती केली. आचार्य खाली पडताना मांडवाला एक भोक पडले. ते भोक , भक्त आस्थेने पहातात.
दुसरी आख्यायिका अशी – मंजुळा ही एक सत्शील दासी होती. ती रोज गुरुवायुरप्पनला हार घेउन जात असे. एके दिवशी तिला जायला उशीर झाला व देवळाचे दरवाजे बंद झाले. तिने, त्या दिवशी , हार एका वटवृक्षाखाली असलेल्या शिळेवरच ठेवला. दुसर्या दिवशीं जेव्हा देवावरलें निर्माल्य काढलें तेव्हा १ हार मात्र मूर्तीला चिकटून राहिला. तोच हार मंजुळाने आदल्या दिवशी वटवृक्षाखालील शिळेवर ठेवला होता. ही कथा सर्वांना कळल्यानंतरच , तो हार मूर्तीवरून खाली आला. या वटवृक्षाला नंतर मंजुळाळ असे नांव मिळालें. देवळाच्या उत्सवांत, येथुनच हत्तींची शर्यत सुरू करतात.
क्रमश: >>> कुमारकोम व अलेप्पी देवलाकडे

देवळासमोरील मंडपांत अरंगेत्रम् सुरू आहे

पुरातन वटवृक्ष मंजुळाळ

सचैल स्नान

हत्तीच हत्ती

हत्तीच्या पायांची निगा

टॅक्सिडर्मी करून जतन केलेला दिवंगत गजराज केशवन्

मुख्य प्रवेश द्वार

वातीच्या दिव्यांची (विलक्कू) आरास

गुरुवायुरप्पन् - एक कलापूर्ण प्रतिमा

गुरुवायूरच्या देवळाचा दर्शनी भाग










Monday, December 21, 2009

कवि सम्मेलन-सोबती सभासदांचे

दि. २ डिसेंबर रोजी सोबती सभासदांच्या स्वरचित कवितांचा कार्यक्रम झाला. अनेक सभासदानी त्यात उत्साहाने भाग घेतला. विविध प्रकारच्या कविता सादर केल्या गेल्या - काही गंभीर वळणाच्या, काही विचार प्रवर्तक तर एकादी कविता सभासदाना हसवूनही गेली. त्यातील काही निवडक कविता सोबतीच्या ब्लॉगवर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील. प्रथम प्रा. सी.भा. दातार यांची एक कविता.

अभिनय क्षेत्रात स्त्रिया गेली अनेक वर्षे आघाडीवर आहेत. मात्र तबलावादनासारख्या क्षेत्रात एकादीच महिला पूर्वी आढळत असे. १९८७ साली अंधेरी येथील एका संस्थेत पं.झाकीर हुसेन यांच्या शिष्या कु. अनुराधा पाल यांच्या तबला वादनाचा कार्यक्रम झाला. त्या षोडषर्षीय युवतीने आपल्या तबला वादनाने सर्वाना मंत्रमुग्ध केले. सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद व संस्कृतचे व्यासंगी निवृत्त प्राध्यापक सी.भा. दातार यानी त्या तबला वादक युवतीचे कौतुक त्यांच्या खालील कवितेत शब्दरूप केले आहे.

नाही अबला, ही तर सबला

अबला कोणी वाजवी तबला, ऐकून तज्ञा खेद वाटला ।
कुणी उठावे काही करावे, नेम कशाचा काही न उरला ।।
हिरवा कुडता हिरवी ओढणी, कळी उमलती हिरव्या पानी ।
भुरभुरणार्‍या बटा आवरी, नाजुक तिच्या करांगुलीनी ।।
सुंदर खाशी सुबक ठेंगणी, वेल चवळीची तुस्स कोवळी ।
मंद मंदशी हसत लाजली, मऊ मेणाची जणू बाहुली ॥
परंतु जेव्हा तिने घेतला पुढ्यात डग्गा आणि तबला ।
चकित जाहले मन श्रोत्यांचे, कुणी म्हणावे हिजला अबला ।।
तबल्यावरती चाट उमलली, अन डग्ग्यावर थापही घुमली ।
तेव्हा कळले ही न बाहुली, तिची जात अन कुळी वेगळी ॥
सुरु जाहला मंद लेहरा, परि आक्रमक तिचा मोहरा ।
थक्कित झाल्या सार्‍या नजरा, तरी निरागस तिचा चेहरा ।।
डोळ्यांवरची झोप उडाली, अंग सावरुनि सभा बैसली ।
लयतालाच्या खेळामध्ये, अवघी मैफल पुरी रंगली ॥
बघता बघता वेग वाढला, लयतालाचा विलास फुलला ।
लवचिक अचपळ जरी ही चपला, आज मोदिते नभोमंडळा ॥
हिला पाहता वाटे पळभर, नागिणीची ही सतेज सळसळ ।
खळखळणारी सविता अवखळ, अग्निशिखा की उजळे उज्ज्वल ॥
कर कोमल परि बोल रोकडे, सहज वाजवी मुष्कील मुखडे ।
लीलावती ही जणु लीलया, हसत सोडवी गणिती कोडे ॥
भगिनीना संतोष जाहला, अन पुरुषांचा तोरा गळला ।
गुण न मानिती भेद कोठला, सत्याचा या प्रत्यय आला ॥
तांडव गिरिजेने मांडावे, तिचे त्यावरी वादन चाले ।
अबले हाती तबला मर्दन, पुरुषायित ते जणू वाटले ॥
बघता बघता कलाक सरला, तिच्या वादनी कसा न कळला ।
रोमांचक तो अनुभव विरळा, ठेव सुखाची देउन गेला ॥


------ कवि: प्रा. सी.भा. दातार

Friday, December 18, 2009

कालटी – श्री आद्य शङ्कराचार्यांचें जन्मस्थान

मी हल्लीच केरळ मधील कालटी, गुरुवायूर, कुमारकोम – अलापुरा ( अलेप्पी ) व मुन्नार या पर्यटण स्थलांची सहल केली. तेथील माहिती मी,थोडक्यांत क्रमश: देईन.
[१] कालटी ( Kaladi)
कालटी हे आदि शंकराचार्यांचे जन्मस्थान. शृंगेरी मठाच्या पुढाकाराने, या स्थानाचा अलीकडेच फार छान विकास केला गेला आहे. कालटी कोचिन एअरपोर्ट पासून, कारने अंदाजे अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. जवळून पूर्णा ( पेरियार ) नदी वाहाते. याच नदीत आदि शंकराचार्यांचा पाय मगरीने पकडला होता. शंकराचार्यांनी आईला सांगितले की तू जर मला संन्यास घेण्याची परवानगी दिलीस तरच माझी या मगरीपासून सुटका होईल. त्यांच्या आईच्या मनांत त्यांचे लवकरच लग्न करून द्यायचे होते.पण प्रसंग पाहून तिने तशी परवानगी दिली व शंकराचार्यांची आणि पर्यायाने हिंदु धर्माचीही धर्मसंकटातून सुटका झाली, कारण त्यावेळी हिंदु धर्माचा र्हास होत होता व बौद्ध धर्माचा झपाट्याने प्रसार होत होता. आचार्यांनी बौद्ध धर्मपंडितांचा वादांत पराभव करून हिंदु धर्माला मानाचे स्थान मिळवून दिले व बौद्ध धर्माची पिछेहाट सुरू झाली. पूर्णा नदींतले हे स्थान पहायला मिळते. आम्ही मनोभावे त्याचे दर्शन घेतले. कालटी म्हणजे पायाचा ठसा. या गांवाचे पूर्वीचे नांव सासालम् असे होते. नदीच्या काठावरील रामकृष्ण अद्वैत आश्रम पाहण्याजोगा आहे. आश्रमांतून होणारे पूर्णा नदीचे दृष्य नयनरम्य आहे. आश्रमांत चारही प्राचीन वेद सुरक्षित रित्या, एका कांचेच्या पेटीत जतन करून ठेवले आहेत. आदि शंकराचार्यांच्या आईची समाधी येथेच आहे. मठांत सतत धार्मिक ग्रंथांचे पठण चालू असते. भिंतींवर आदि शंकराचार्यांचा जीवनपट उलगडून दाखविणारीं चित्रें आहेत. मठाच्या जवळच श्रीकृष्णाचें देऊळ आहे. बाजूला ऋग्वेद पाठशाला आहे. गांवांत हिंदु धर्माचे शिक्षण देणारें संस्कृत विश्वविद्यालय आहे. व तसेच सातमजली मनोरॅसदृश शंकराचे देऊळ आहे. त्यांत, आदि शंकराचार्यांच्या पादुका आहेत. या देवळांत, आंतील चक्री जिन्याने वर जातांना, भित्ती शिल्पांद्वारें, शंकराचार्यांच्या जीवनांतील घटना पहायला मिळतात. अगदी वरच्या मजल्यावर, काळ्या दगडाचे शंकराचे भव्य लींग आहे.
सर्वच वास्तूंत फोटो घ्यायला मनाई आहे.
… क्रमश: > [२] गुरुवायूर …


आदि शंकराचार्यांचा पाय येथे सुसरीने पकडला होता.

रामकृष्ण अद्वैत आश्रम.

रामकृष्ण अद्वैत आश्रम.

श्रीकृष्ण मंदीर.

ऋग्वेद पाठशाळा.

संस्कृत विश्वविद्यालय.

शंकर मंदीर.


Wednesday, December 16, 2009

मरणोत्तर अवयव दानामुळे हे शक्य होणार आहे …

हेन्‍री मोलेसन याला लहानपणापासुनच फिट्‍स्‍ येत असत. २८ वर्षाचा होइतो, याचा त्याला इतका त्रास होऊ लागला की त्यापासून सुटका मिळण्यासाठी, मेंदूची एक प्रायोगिक शस्त्रक्रिया करण्यास, त्याने अनुमती दिली. त्या शस्त्रक्रियेने, फिट्‍स्‍ची तिव्रता कमी झाली पण नवीन आठवणी जतन करण्याची क्रिया बंद झाली. त्याला गप्पा मारण्याची खूप आवड, पण १५ मिनिटांत तो त्याच त्याच गोष्टी परत परत सांगू लागला. आपण हे सांगितले आहे याचीच त्याला आठवण राहीना. पण यामुळेच ज्याच्यावर खूपच अभ्यास केला गेला असा तो रुग्ण ठरला. सुयोग व कमनशीब यांच्या संयोगामुळे, शास्त्रीय संशोधनातला मौल्यवान, उपयुक्त व उत्तम सहयोग देणारा असा तो दुवा ठरला.
कित्येक वर्षांपूर्वी, त्याने मरणोत्तर आपला मेंदू, संशोधनाकरिता दान करण्याचे ठरविले. गेल्या वर्षीं, सान्‍ दियेगो येथील शल्यज्ञ प्राध्यापक जॅकोपो अनेस, मोलेसनचा मेंदू काढून सान्‍ दियेगोला विमानाने परतले. मोलेसन, ८२ व्या वर्षी फुफ्फुसाच्या विकाराने मरण पावले. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी, अनेस व त्यांचे सहकारी यांनी मोलेसनच्या मेंदूचे काळजीपूर्वक विश्‍लेशण सुरू केले. मेंदूच्या २५०० भागांचे विश्‍लेशण होणार होते. कॉंप्युटरच्या सहाय्याने या प्रत्येक भागाचा होणारा अजस्र नकाशा हा Google च्या पृथ्वीच्या नकाशा सारखा असेल. यामुळे शास्त्रज्ञांना, आठवणीं कशा व कुठे तयार/जतन होतात व लागेल तेव्हा त्या कशा ’बाहेर’ काढल्या जातात याचें रहस्य उमजायला मदत होईल असा विश्वास आहे. ‍

Monday, December 14, 2009

पुन्हा एकदा पुणेरी पाट्या

१. पार्किंग इमारतीच्या मागील बाजूस पुढील लेनमधून डाव्या बाजूला.

२. सूचना: मुला-मुलीना (प्रेमी युगुलाना) इशारा :
गावदेवी मंदीराच्या परिसरात वेडेवाकडे
(अश्लील) चाळे करू नयेत. केल्यास पोकळ
बांबूचे फटके देण्यात येतील.

३. सूचना: रेन डान्स करताना पूर्ण कपडे घालणे आवश्यक आहे.
------- हुकूमावरून

४. मंदीराबाहेरची एक पाटी: गणपती चोरानी चोरून नेला आहे.

५. आजचे ताजे पदार्थ : भजी : रुपये ६.
मिसळ : रुपये १०.
-----मूळव्याधीचे औषध मिळेल.


६. बंगल्याबाहेर एक पाटी: बंगला रिकामा आहे. चोरण्यासरखे काहीही नाही.
विनाकारण कष्ट घेउ नयेत,

७. सूचना : येथे लघ्वी करू नये. लोक वरून पहातात.

८. श्रीनिवास अमृततुल्य चहा, स्नॅक्स ::
चहाची वेळ नसते. पण वेळेला चहा लागतोच.


-------संकलित

Saturday, December 12, 2009

हृदयविकार - निदान, चिकित्सा आणि उपाय


हृदयविकारासारख्या व्याधीवर शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती वापरुन माधवबाग ही संस्था बायपाससारख्या शस्त्रक्रिया टाळून हृदय अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्वाचे काम करीत आहे.

दिनांक १८ नोव्हेंबर रोजी ‘माधवबाग’चे डॉ. संतोष शिंदे यांचे या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान झाले. आवश्यक तेथे स्लाईड्ही दाखविण्यात आल्या. डॉ. शिंदे यानी हृदयाची रचना व कार्य याची माहिती देताना हृदयविकार हा शस्रक्रिया टाळूनही बरा करून रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो असे सांगितले. कै. वैद्य माधव साने यानी हृदयविकारावर आयुर्वेदावर आधारित असे अनेक वर्षे संशोधन करुन हा विकार आयुर्वेदीय चिकित्सा, प्राणायाम, व्यायाम याद्वारे काबूत ठेवणे शक्य होते व बायपाससारख्या खर्चिक शस्त्रक्रिया टाळून माणूस सामान्य जीवन जगू शकतो हे सिद्ध केले.

डॉ. शिंदे यानी योग्य आहार-विहार, नियमित व्यायाम, प्राणायाम, योगा व आयुर्वेदिक चिकित्सा यांच्या सहाय्याने हृदयविकार टाळता येतो किंवा झाल्यास त्याचा चांगल्या तर्‍हेने मुकाबला करता येतो असे सांगितले. उध्वर्तन. स्वेदन, धारा, पंचकर्म अशासारख्या अनेक उपायानी हृदय शुद्धीकरण क्रिया करुन हृदयाचे कार्य सुरळित होण्यास मदत होते.

माधवबाग अयुर्वेदिक क्लिनिकमध्ये आयुर्वेदिक उपचारानी हृदय अखंड विनातक्रार काम करील, या दृष्टीने उपचार करण्यात येतात. ज्याना अँजियोप्लास्टी/बायपासचा सल्ला दिला गेला असे अनेक रुग्ण माधवबाग आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये उपचार घेउन हृदय कार्यक्षम झाल्याने शस्त्रक्रिया टाळून नेहमीचे आरोग्यपूर्ण जीवन जगत आहेत असे त्यानी आग्रहाने सांगितले. डॉ. शिंदे यानी पुढे सांगितले की माधवबाग आयुर्वेदिक क्क्लिनिकतर्फे विविध प्रकारच्या शास्त्रशुद्ध आयुर्वेदीय उपचारांद्वारे हृदयरोग काबूत ठेवता येतो किंवा बरा करता येतो यासंबंधीचे संपूर्ण मार्गदर्शन व उपचार केले जातात.

हृदयरोग व त्यावरील माधवबागतर्फे केले जाणारे आयुर्वेदीय उपचार यांसंबंधीचे डॉ. शिंदे यांचे भाषण खचितच मार्गदर्शक ठरेल.

संपर्क : डॉ. रोहित साने - www.madhavbaug.org

Thursday, December 10, 2009

एकता

’एकता’ हे त्रैमासिक गेली ३१ वर्षे अमेरिकेतील मराठी भाषिक माणसे निष्ठेने चालवत आहेत हे आपल्यापैकी फारच थोड्याना माहिती असेल. अमेरिकेत मुलाकडे सध्या राहतो आहे. तेथे या त्रैमासिकाचे काही अंक पहावयास मिळाले. निरनिराळ्या प्रकारांचे ललित लेखन पहावयास मिळाले. त्याबरोबर उत्तम व नियमबद्ध शब्दकोडीं, समस्यापूर्तीच्या चढाओढी असेहि अनेक प्रकार नजरेला आले. ’एकता’चे अंक लोकमान्य सेवा संघा’च्या ग्रंथालयात व इतर कित्येक ग्रंथालयांतहि ठेवले जातात असे कळले.
ऑक्टोबर २००९ च्या अंकाचे मुखपृष्ठ अतिशय नावीन्यपूर्ण आहे. ते आपणाला पहावयास देतो आहे.


(मजकूर वाचण्यासाठी आवश्यक तर फोटोवर क्लिक करा)

श्री. अरविंद नारळे यांची ही सर्पबंध प्रकारची रचना श्री.अरुण जतकर व श्रीमती विद्युल्लेखा अकलूजकर यांनी स्वत: व श्री.नारळे यांचेकडून काही बदल, सुधारणा असे संस्कार करून त्याचेच मुखपृष्ठ बनवले आहे. दोन आडव्या व एका उभ्या ओळीत ’दीपावली शुभचिंतन’ ही अक्षरे स्पष्ट दिसत आहेत व सर्पबंध सर्पमुखापासून क्रमाने वाचत गेले की सर्व कविता उलगडत जाते. अभिनव कल्पनेबद्दल तिघांचेहि कौतुक करावे तेवढे थोडेच. आपल्याला आवडले तर ekatainfo@gmail.com वर ई-मेल पाठवून अवश्य कळवा.

Monday, December 07, 2009

srilanka





रम्य ही स्वर्गाहुनी लंका

वारंवार कानावर पडणारे हे गीत लंकेचे यथार्थ वर्णन करते. ‘लंकेत सोन्याच्या विटा’ असेही वर्णन तिचे केले जायचे. पण श्रीलंकेचे वर्णन सागरातील पाचूचे बेट असे करणेच सार्थ होईल. शिवाय भारताच्या टोकाशी जवळच असलेल्या लंकेला पौराणिक पार्श्वभूमीही आहे. अशा वैशिट्यपूर्ण श्रीलंकेला सोबतीच्या एक सभासद सौ. जयश्री तांबोळी यानी गेल्या सप्टेंबरमध्ये भेट दिली. त्या भेटीला त्यानी खालीलप्रमाणे शब्दरूप दिले आहे.

बर्‍याच वर्षांपासून भारताच्या टोकाशी असलेल्या मोदकाच्या आकाराच्या श्रीलंकेला भेट द्यायचा विचार होता. रावणाच्या सोन्याची लंका पहाण्याचा योग मात्र आला तो सप्टेंबर २००९ मध्ये. त्यापूर्वी राजकीय संघर्षामुळे वातावरण असुरक्षित होते. आता मात्र वातावरण निवळले असून मोठ्या प्रमाणावर जगभरातून अनेक पर्यटक श्रीलंकेला भेट देत आहेत.

आमचा प्रवास, तेथील निवास, स्थलदर्शन ही जबाबदारी सुप्रसिद्ध Cox & King या पर्यटन कंपनीने घेतली होती. श्रीलंकन एअरवेजच्या विमानाने पहाटे कोलंबोला पोहोचलो. विमानतळावर आमच्यासाठी गाडी तयार होती. कोलंबोहून कॅंन्डी शहराकडे जाताना Pinnavela Elephant Orphanage आहे. हे जगातील एकमेव हत्तींचे अनाथालय. तेथे हत्तीच्या लहान पिलाना मोठ्या बाटलीतून दूध पाजतात. हत्तीचे पिल्लू एका मिनीटात बाटली रिकामी करते. मोठ्या हत्तीना चारा, धान्य खावयास देतात. सकाळ, संध्याकाळ जवळच असलेल्या महाओया नदीमध्ये हत्तींची आंघोळ होते. हे अनाथालय सरकार चालवते.

कॅन्डी शहरात टेंपल ऑफ़ टूथ रेलिक पाहिले. गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर त्यांचे काही दात काढले गेले. चीन, जपान, श्रीलंका येथील बुद्ध स्तूपांत ते ठेवले कारण त्या दांतात दैवी शक्ती आहे असा समज आहे. आतमध्ये (चांदीच्या) मोठ्या चंबूत बुद्धाचा दांत ठेवला आहे. खोलीबाहेर मोठमोठे हस्तीदंत ठेवले आहेत. बुद्धाला कमळ अर्पण करतात. जवळच मोठे सरोवर आहे. रात्री तेथील प्रेक्षागृहात सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले. पूजा नृत्य, कोब्रा नृत्य, मयूर नृत्य, रावण नृत्य पाहिले. शेवटी पेटलेल्या कोळश्यांवरून काही कलाकार चालत गेले. तसेच चटईएवढ्या अग्निशय्येवरील करामतीला जोरदार टाळ्या मिळाल्या.

सिगीरीया हा सिंहाच्या आकाराचा पहाड आहे. या सिंहगिरीवर हजारो वर्षांपूर्वी कश्यप नावाच्या राजाने किल्ला बांधला. आता त्या किल्ल्यावर चढण्यासाठी लोखंडी अर्धवर्तुळाकार जिना केला आहे. काही पायर्‍या चढून गेल्यावर कातळाच्या खाचेत, दगडी भिंतीवर त्या काळात चितारलेली अप्सरांची रंगीत चित्रे आहेत. वरती जाताना गेरूच्या रंगाची गुळगुळीत मिरर वॉल आहे. सात-आठशे पायर्‍या चढून गेल्यावर राजवाडा आहे. पूर्वी तेथे १२८ खोल्या, मोठा स्विमिंग पूल, अँफी थिएटर होते. आता फक्त भिंतींचे अवशेष शिल्लक आहेत. पूर्वी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी मोठ्या अजस्र सिंहाचा पुतळा होता. त्याच्या जबड्यातून प्रवेश करीत. आता तेथे सिंह नाही. फक्त त्याच्या दोन्ही पायांचे पंजे शिल्लक आहेत. तेथून २० कि.मी. अंतरावर डांबुल्ला ही दगडात कोरलेली पांच लेणी आहेत. भिंतीवर, छतावर रंगीत चित्रे आहेत. पांचही लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या स्थितीतील दगडी मूर्ती आहेत. पायथ्याशी गोल्डन टेंपल नावाचे वस्तुसंग्रहालय आहे. प्रवेशदाराशी पिवळ्या प्लॅस्टरमधील प्रचंड बुद्ध्मूर्ती व समोर सोनेरी स्तूप आहे.

बुवारा एलिया ह्या हिलस्टेशनवर वर्षभर थंडी असते. नारळाच्या बागा, भातशेती, डोंगर, धबधबे. चहाचे मळे असे विपुल निसर्ग सौदर्य आहे. श्रीलंकेला पाचूचे बेट म्हणतात. तेथून अशोक वाटिका जवळ आहे. रावणाने अशोक वनात सीतेला ठेवले होते. तेथे सीतेचे मंदीर आहे. ज्या झाडाखाली सीता बसत असे त्या झाडांच्या फांद्यांना लोक वस्त्र बांधून पूजा करतात. हनुमानाचे भलेमोठे पाउल तेथे दाखवतात. रावणाने सीतेला पळविले तेव्हा तिचे अश्रू पडल्याने तेथे असंख्य धबधबे आहेत असे मानतात.

कोलंबो शहरात फ़ोर्ट भागात सरकारी कार्यालये आहेत. गंगा रामय्या टेंपल हे बुद्धाचे मंदीर आहे. फ़ोर्टच्या बाहेर पेट्टा ह्या बाजारपेठेत सर्व काही मिळते, सुती कपडे, मसाल्याचे पदार्थ इत्यादि. श्रीलंकेत रत्नपुरा भागात रत्नांच्या हजारो खाणी आहेत. कोलंबो, बेंटोटा, निगोंबो हे येथील बीच प्रसिद्ध आहेत. असा हा वैशिट्यपूर्ण डोळ्यांचे पारणे फेडणारा श्रीलंका देश.

संगीत kojagari





संगीत कोजागरी
संगीत कोजागरी

दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सोबतीने कोजागरी साजरी केली.

या निमित्त संगीताचा कार्यक्रम झाला. अनेक पारितोषिके व पुरस्कार यांच्या मानकरी गायिका श्रीमती हेमांगी पाकणीकर यानी हा कार्यक्रम सादर केला. त्या सोबतीचे कार्यवाह श्री अरविंद वाकणकर याच्या शिष्या आहेत.

प्रथम त्यानी संगीत सुवर्णतुला या नाटकातील एक प्रवेश सादर केला. त्यातील अनेक गाणी श्रोत्यांची वाहवा मिळवून गेली. नंतर त्यानी अनेक नाट्यगीते, भावगीते सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.

दुग्धपानानंतर कार्यक्रम समाप्त झाला.

Thursday, December 03, 2009

स्त्रियांचे आयुष्य पुरुषांपेक्षा अधिक का ?
जाणकारांना बरीच वर्षे माहित आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांचे आयुर्मान बहुतेक सर्वच देशांत जास्त असते. पण त्याचे कारण अलीकडेच समजले आहे.
पुरुषांतील विशिष्ट जनुकांमुळे, नर हा आकाराने मोठा असतो पण त्याचे आयुष्य स्त्रियांच्या मानाने कमी असते. ही जनुके नरांकडून त्यांच्या अपत्यांत जातात पण फक्त नर अपत्यांतच ती कार्यरत राहातात. जरी हे संशोधन उंदरांत केले गेले तरी शास्त्रज्ञांना वाटते की हे निष्कर्ष सर्व सस्तनांना लागू आहेत.
नर उंदराविना, दोन माद्यांतील प्रजननाकरिता लागणारे ’जिन्नस’ घेऊन १३ उंदरांची उत्पत्ती करण्यात आली. ती अशी – माद्यांच्या स्त्री-बिजांतील गुणसुत्रांत असा बदल करण्यात आला की त्या स्त्री-बिजांनी शुक्र-जंतूंप्रमाणे वागावे व प्रजनन करावे. ह्या बदल केलेल्या ’प्रजनन साहित्याचे’ तरूण उंदिर माद्यांच्या स्त्री-बिजांत रोपण करण्यात आले. अशा दोन माद्यांपासून (पण नराशिवाय ) निर्माण झालेल्या नर प्रजेचे आयुष्य, सर्वसाधारण नर-मादी संकरांतून निर्माण झालेल्या नर उंदरांपेक्षा सरासरी ५ टक्के जास्त आढळले ( १०४५ दिवस : ९९६ दिवस). हे नर उंदीर नेहमीच्या नर उंदरांपेक्षा वजनाने हलके व आकाराने लहान आढळले. तसेच त्यांत रोगप्रतिकारक शक्ति जास्त दिसून आली.
संशोधक टोमोहोरो कोनोंच्या ( संचालक, नोदाइ रिसर्च इन्स्टिट्युट , टोकियो ) मतें, याला Rgsgrf1 जनुक कारणीभूत आहे.
( T.O.I. च्या आधारे )

रम्य ही स्वर्गाहुन लंका

रम्य ही स्वर्गाहुनी लंका

वारंवार कानावर पडणारे हे गीत लंकेचे यथार्थ वर्णन करते. ‘लंकेत सोन्याच्या विटा’ असेही वर्णन तिचे केले जायचे. पण श्रीलंकेचे वर्णन सागरातील पाचूचे बेट असे करणेच सार्थ होईल. शिवाय भारताच्या टोकाशी जवळच असलेल्या लंकेला पौराणिक पार्श्वभूमीही आहे. अशा वैशिट्यपूर्ण श्रीलंकेला सोबतीच्या एक सभासद सौ. जयश्री तांबोळी यानी गेल्या सप्टेंबरमध्ये भेट दिली. त्या भेटीला त्यानी खालीलप्रमाणे शब्दरूप दिले आहे.

बर्‍याच वर्षांपासून भारताच्या टोकाशी असलेल्या मोदकाच्या आकाराच्या श्रीलंकेला भेट द्यायचा विचार होता. रावणाच्या सोन्याची लंका पहाण्याचा योग मात्र आला तो सप्टेंबर २००९ मध्ये. त्यापूर्वी राजकीय संघर्षामुळे वातावरण असुरक्षित होते. आता मात्र वातावरण निवळले असून मोठ्या प्रमाणावर जगभरातून अनेक पर्यटक श्रीलंकेला भेट देत आहेत.

आमचा प्रवास, तेथील निवास, स्थलदर्शन ही जबाबदारी सुप्रसिद्ध Cox & King या पर्यटन कंपनीने घेतली होती. श्रीलंकन एअरवेजच्या विमानाने पहाटे कोलंबोला पोहोचलो. विमानतळावर आमच्यासाठी गाडी तयार होती. कोलंबोहून कॅंन्डी शहराकडे जाताना Pinnavela Elephant Orphanage आहे. हे जगातील एकमेव हत्तींचे अनाथालय. तेथे हत्तीच्या लहान पिलाना मोठ्या बाटलीतून दूध पाजतात. हत्तीचे पिल्लू एका मिनीटात बाटली रिकामी करते. मोठ्या हत्तीना चारा, धान्य खावयास देतात. सकाळ, संध्याकाळ जवळच असलेल्या महाओया नदीमध्ये हत्तींची आंघोळ होते. हे अनाथालय सरकार चालवते.

कॅन्डी शहरात टेंपल ऑफ़ टूथ रेलिक पाहिले. गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर त्यांचे काही दात काढले गेले. चीन, जपान, श्रीलंका येथील बुद्ध स्तूपांत ते ठेवले कारण त्या दांतात दैवी शक्ती आहे असा समज आहे. आतमध्ये (चांदीच्या) मोठ्या चंबूत बुद्धाचा दांत ठेवला आहे. खोलीबाहेर मोठमोठे हस्तीदंत ठेवले आहेत. बुद्धाला कमळ अर्पण करतात. जवळच मोठे सरोवर आहे. रात्री तेथील प्रेक्षागृहात सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले. पूजा नृत्य, कोब्रा नृत्य, मयूर नृत्य, रावण नृत्य पाहिले. शेवटी पेटलेल्या कोळश्यांवरून काही कलाकार चालत गेले. तसेच चटईएवढ्या अग्निशय्येवरील करामतीला जोरदार टाळ्या मिळाल्या.

सिगीरीया हा सिंहाच्या आकाराचा पहाड आहे. या सिंहगिरीवर हजारो वर्षांपूर्वी कश्यप नावाच्या राजाने किल्ला बांधला. आता त्या किल्ल्यावर चढण्यासाठी लोखंडी अर्धवर्तुळाकार जिना केला आहे. काही पायर्‍या चढून गेल्यावर कातळाच्या खाचेत, दगडी भिंतीवर त्या काळात चितारलेली अप्सरांची रंगीत चित्रे आहेत. वरती जाताना गेरूच्या रंगाची गुळगुळीत मिरर वॉल आहे. सात-आठशे पायर्‍या चढून गेल्यावर राजवाडा आहे. पूर्वी तेथे १२८ खोल्या, मोठा स्विमिंग पूल, अँफी थिएटर होते. आता फक्त भिंतींचे अवशेष शिल्लक आहेत. पूर्वी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी मोठ्या अजस्र सिंहाचा पुतळा होता. त्याच्या जबड्यातून प्रवेश करीत. आता तेथे सिंह नाही. फक्त त्याच्या दोन्ही पायांचे पंजे शिल्लक आहेत. तेथून २० कि.मी. अंतरावर डांबुल्ला ही दगडात कोरलेली पांच लेणी आहेत. भिंतीवर, छतावर रंगीत चित्रे आहेत. पांचही लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या स्थितीतील दगडी मूर्ती आहेत. पायथ्याशी गोल्डन टेंपल नावाचे वस्तुसंग्रहालय आहे. प्रवेशदाराशी पिवळ्या प्लॅस्टरमधील प्रचंड बुद्ध्मूर्ती व समोर सोनेरी स्तूप आहे.

बुवारा एलिया ह्या हिलस्टेशनवर वर्षभर थंडी असते. नारळाच्या बागा, भातशेती, डोंगर, धबधबे. चहाचे मळे असे विपुल निसर्ग सौदर्य आहे. श्रीलंकेला पाचूचे बेट म्हणतात. तेथून अशोक वाटिका जवळ आहे. रावणाने अशोक वनात सीतेला ठेवले होते. तेथे सीतेचे मंदीर आहे. ज्या झाडाखाली सीता बसत असे त्या झाडांच्या फांद्यांना लोक वस्त्र बांधून पूजा करतात. हनुमानाचे भलेमोठे पाउल तेथे दाखवतात. रावणाने सीतेला पळविले तेव्हा तिचे अश्रू पडल्याने तेथे असंख्य धबधबे आहेत असे मानतात.

कोलंबो शहरात फ़ोर्ट भागात सरकारी कार्यालये आहेत. गंगा रामय्या टेंपल हे बुद्धाचे मंदीर आहे. फ़ोर्टच्या बाहेर पेट्टा ह्या बाजारपेठेत सर्व काही मिळते, सुती कपडे, मसाल्याचे पदार्थ इत्यादि. श्रीलंकेत रत्नपुरा भागात रत्नांच्या हजारो खाणी आहेत. कोलंबो, बेंटोटा, निगोंबो हे येथील बीच प्रसिद्ध आहेत. असा हा वैशिट्यपूर्ण डोळ्यांचे पारणे फेडणारा श्रीलंका देश.

---- लेखन: सौ. जयश्री तांबोळी

संगीत कोजागरी

संगीत कोजागरी

दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सोबतीने कोजागरी साजरी केली.

या निमित्त संगीताचा कार्यक्रम झाला. अनेक पारितोषिके व पुरस्कार यांच्या मानकरी गायिका श्रीमती हेमांगी पाकणीकर यानी हा कार्यक्रम सादर केला. त्या सोबतीचे कार्यवाह श्री अरविंद वाकणकर याच्या शिष्या आहेत.

प्रथम त्यानी संगीत सुवर्णतुला या नाटकातील एक प्रवेश सादर केला. त्यातील अनेक गाणी श्रोत्यांची वाहवा मिळवून गेली. नंतर त्यानी अनेक नाट्यगीते, भावगीते सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.

दुग्धपानानंतर कार्यक्रम समाप्त झाला.

Tuesday, December 01, 2009

नांवांत काय आहे ... काय नाही ...

बॉंबे मध्ये बॉंब नाही असें आता म्हणायला वाव नाही,
पण उपसागर (bay) मात्र नक्कीच नाही.
चर्चगेटला चर्चही नाही व दारही नाही. ते एक रेल्वे स्थानक आहे.
अंधेरीला अंधार नाही.
लालबाग लाल नाही व तेथे बगिचाही नाही.
किंग्ज सर्कलला राजा राहिल्याचें स्मरत नाही.
आणि व्हिक्टोरिया टर्मिनसला महाराणी व्हिक्टोरिया.
प्रिन्सेस स्ट्रीटला कोणतीही राजकन्या राहात नाही.
डुक्कर बाजारांत डुक्करांचा व्यापार होत नाही.
लोअर परळ हे परळपेक्षा खालच्या पातळीवर नाही.
नौदल सैनिकांचें अस्तित्व मरीन लाइंसला नाही.
महालक्ष्मीचे देऊळ हाजी अलीला आहे, महालक्ष्मीला नव्हे.
तीन-बत्ती हा तीन रस्त्यांचा नाका आहे व त्या नाक्यावर
तीन दिवे असलेला ’लॅंप-पोस्ट’ सुद्धा आहे.
ट्रॅम टर्मिनस किंग्ज सर्कलला होता, दादर टी.टी.ला नव्हे.
ब्रिच कॅंडीला मिठायांची दुकाने नाहित, इस्पितळ मात्र आहे.
सफेद पुलला घाणेरडे पाणी असते.
कोळसा स्ट्रीटला आजकाल कोळसे मिळत नाहीत.
लोहार चाळीत लोहारांचे अस्तित्व जाणवत नाही.
कुंभारवाड्यांत कुंभारांना जागा घेणे परवडत नाही.
लोखंडवाला कॉंप्लेक्स मध्ये लोखंडाचे मार्केट नाही.
नळबाजारांत नळ विकले जात नाहीत.
काळा चौकीला काळी (पोलिस) चौकी नाही.
हॅंगिंग गार्डन्स या टांगत्या बागा नाहीत.
मिरची गल्लीत मिरच्या विकायला नसतात.
अंजीर वाडीत अंजीरांची बाग शोधू नका.
तसेच सीताफळ वाडीत सीताफळांची.
फणसवाडीत कधी काळीं फणसांची झाडें असतील सुद्धा !
पण एवढे मात्र नक्की, बेसावध राहिलात तर ……
चोर बाजारात तुमचे खिसा-पाकिट साफ !
द साउंड ऑफ म्युझिक अधील वॉन ट्रॅप कुटुंबातील सात भावंडे – ४० वर्षांनंतर

द साउंड ऑफ म्युझिक हा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम संगीतप्रधान चित्रपट खूप जणांच्या लक्षांत असेल. १९६५ चा तो सर्वोत्तम चित्रपट. वॉन ट्रॅप कुटुंबातील ती खोडकर सात भावंडे आठवतात ? त्या चित्रपटांतील Julie Andrew ची अजरामर भूमिका विसरणे अवघडच. ४० वर्षांनंतर ही सर्व भावंडे परत एकदा भेटली होती.
नटी व गायिका Julie Andrew, १ ऑक्टोबरला ६९ वर्षांची झाली. त्यावेळी तिने मॅनहटनच्या रेडिओ सिटी म्युझिक हॉलमध्ये, एका संस्थेच्या मदतीकरिता एक खास कार्यक्रम केला. साउंड ऑफ म्युझिक मधील सुप्रसिद्ध “My Favorit Things” हे गीत ती त्या प्रसंगी गायिली. त्या वेळी सन्मानार्थ झालेला टाळ्यांचा कडकडाट तब्बल चार मिनिटे होत होता.
वेळोवेळी हे कुटुंब कसे दिसले ते पहा.

















Monday, November 30, 2009

संदीप उन्निकृष्णन – २६/११/२००८ चा हुतात्मा
“संदीपने नॅशनल सिक्युरिटि गार्ड ( N.S.G.) मध्ये जाण्याचे आम्हाला आजही दु:ख नाही,” संदीपचे आई – वडील धनलक्ष्मी व के. उन्निकृष्णन म्हणतात. २६/११ च्या प्रथम स्मृति दिनानिमित्त ते मुंबईत होते.
“संदीपला अंतीम कामगिरीवर पाठविणार्‍या N.S.G. कडून आम्हाला अधिक सह्रुदयतेची अपेक्षा होती. N.S.G. च्या मानेसर येथील स्मारकांत, संदीपच्या नांवांत चूक होती. नांवांतील कांही अक्षरे गळून खाली पडली होती. आम्ही दोघांनी ती गोळा केली. आता ती व्यवस्थित लावली आहेत असे कळते.”
संदीपच्या आई-वडिलांनी जणू कोणत्याही प्रसंगास सामोरे जाण्यास तयार असावे अशाच उद्देशाने तो त्यांच्याशी मृत्यु बद्दल उदासीनतेने बोले. म्हणे,”बंदुकीच्या प्रत्येक गोळीवर ती कोणाचा बळी घेणार त्याचें नांव लिहिलेले असते. पण मी जेव्हा मृत्युला सामोरा जाईन तेव्हा, आई , हजारो लोक तुझ्याबरोबर असतील.”
एकदा आई-वडिलांच्या सोबत तो जेव्हा खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमींत भेट देण्यास गेला तेव्हा, जेथे अकादमीत शिकून गेलेल्या व हौतात्म्य पत्करलेल्यांची नांवे जेथे कोरलेली असतात त्या ठिकाणी म्हणाला होता,”उद्या कदाचित माझेही नांव येथे असेल.” उन्निकृष्णन म्हणतात,”ते ऐकून आमच्या जिवाचा थरकांप झाला. पण आम्ही कधीही कल्पनासुद्धा केली नाही की हे उद्याचे सत्य असेल.”
संदीपला ज्या ठिकाणी वीर-मरण आले तेथे ते २६/११ च्या शुक्रवारी कांही वेळ स्तब्ध उभे राहिले.

Thursday, November 26, 2009

( सोबतीचे एक सभासद व कवी श्री. कृष्णकुमार प्रधान यांची एक रचना )
म्यान तलवार …
संपेल आयुष्य एकदाचें
तर सुटेल हे मन सांचे

आजवरी केली बंडखोरी
मांडिला दावा शरिराशी

शरीर पण हे इतुके हट्टी
मनाशी धरिली तयाने कट्टी

कधी घ्यावी मनाने उभारी
तर शरीर जणु त्याचा अरी

कधि शरिरावर येई शहारा
कभि तेरे यादने मारा

मन घाली देहा लगाम
हे पाप, तुझे इथे काय काम ?

असे दोघांचे चाले रणकंदन
परि होणार नाही विभाजन

Wednesday, November 25, 2009

पुरेशी झोप आणि हार्ट अटॅक ... काय संबंध ?

झोप व हार्ट अटॅक – रंजन दासचा मृत्यु कशामुळे ?
रंजन दास हा SAP या बहु-देशीय अग्रगण्य कंपनीचा भारतीय उपखंडातील सर्वांत तरूण – वय ४२ वर्षे- C.E.O. होता. अलिकडेच, त्याचा अकाली मृत्यु झाला. एका दिवशी, व्यायामशाळेतून तो परतला व massive हार्ट अटॅकने तो गेला. ती एक, विविध खेळांत भाग घेणारी, शरीर संपदा जपण्याकरिता प्रयत्नशील – मॅरॅथॉनमध्ये सुद्धा भाग घेणारी, अशी व्यक्ती होती. अशा प्रकारचे आयुष्य जगणार्‍या दासला ह्रुदयविकाराने मृत्यु का यावा ?कामाच्या ताणामुळे असे झाले असावे का ? त्याची उंची गाठलेल्या प्रत्येकाला हा ताण असतोच. ते कारण पटण्याजोगे नाही.
जी माहिती नंतर बाहेर आली त्यांत असे दिसले की दास फक्त ४ ते ५ तास झोप घेत असे. एका T.V. चॅनलला, कांही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतींत तो म्हणाला होता की त्याला जास्त झोपणे आवडले असते.फक्त ४ ते ५ तासांची झोप घेऊन, इतक्या वरच्या हुद्द्यावर करणार्‍या त्याला या गोष्टीचा मुळीच गर्व नव्हता.
ह्रुदय-विकार तज्ञांच्या मते, पुरेशा झोपेचा अभाव व ह्रुदय-विकार यांचा घनिष्ट संमंध आहे. यावर वेळोवेळी जे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत, त्यावरून असे दिसते की –
*** ५ तासांपेक्षा कमी झोप घेणार्‍यांत, ६ तासांपेक्षा जास्त झोपणार्‍यांच्या मानाने, अतीरक्तदाबाची शक्यता ३५० ते ५०० टक्क्यांनी वाढते. ( २००९ चा शोधनिबंध )
*** २५ ते ४९ वयांतील कमी झोप घेणार्‍यांत ,अतीरक्तदाबाची शक्यता दुप्पट होते. (२००६ चा शोधनिबंध )
*** ५ तासांपेक्षा कमी झोप घेणार्‍यांत अतीरक्तदाबाची शक्यता तिप्पटीने वाढते. (१९९९ चा शोधनिबंध )
*** झोपेअभावी, रक्तांत अती-संवेदनाशील अशा प्रथिनांचे (hs-cRP) प्रमाण वाढते. असे होणे हे हार्ट अटॅक येण्याची शक्यता दर्शविते
हे प्रमाण एकदा वाढले की नंतर जरी पुरेशी झोप घेतली, तरी हे प्रमाण वाढलेलेच रहाते.
*** केवळ एका रात्रिच्या निद्रानाशामुळे सुद्धा, शरिरांत, कांही विषारी द्रव्यांचे प्रमाण ( उदा. IL-6, TNF-alpha,cRP ) वाढते. त्यामुळे कर्करोग, सांधेदुखी व ह्रुदय-विकार असल्या विकारांची शक्यता बळावते. (२००४ चा शोधनिबंध )
*** ५ तासांपेक्षा कमी झोप घेणार्‍यांमध्ये ह्रुदय-विकाराची शक्यता ३१ टक्क्यांनी वाढते.
६ “ “ “ “ “ “ “ १८ “ “ (२००६ चा शोधनिबंध )
झोप २ अवस्थांत असते. पहिल्यांदा non-REM झोप येते. या झोपेत, पापण्यांची उघड-झांप होत नाही. या झोपेंत, पिट्युटरी ग्रंथीतून growth hormones स्रवतात. यामुळे शारिरीक थकवा व झीज भरून निघते. non-Rem नंतर जी झोप येते ती REM (rapid eye movement ) प्रकारची असते. यांत पापण्यांची जलद उघड-झाप होते. या झोपेने मानसिक स्वास्थ्य लाभते. संपूर्ण झोपेंत non-REM व REM या अवस्थांची ४ ते ५ आवर्तने होतात.
कमी झोप वगळता, रंजन दासने, योग्य आहार, प्रमाणांत व्यायाम, शरिराचे योग्य तितके वजन या सर्वांची काळजी घेतली. पण त्याने पुरेशी झोप – कमित कमी ७ तास – घेतली नाही व त्यानेच त्याचा बळी घेतला असावा.
(इ-मेलच्या आधारे )

Monday, November 23, 2009

मॅग्लेव्ह ट्रेन

कांही देशांत, विद्युत-चुंबकांचा वापर करून अतिशय जलद धांवणार्‍या म्हणजे मॅग्लेव्ह ट्रेनचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. जर्मनी, जपान व अमेरिका हे ते देश. मॅग्लेव्ह हे मॅग्नेटिक (चुंबकीय) लेव्हिटेशन (तरंगणे) चे संक्षिप्त रुप. ’गाइडवे’ मधे असलेल्या चुंबकीय क्षेत्र निर्माण करणार्‍या जाळ्या, धाव-मार्गावर असलेले चुंबक व ट्रेनच्या ’अंडर-कॅरेज’ला असणारे चुंबक यांत पाहिजे तेव्हा चुंबकीय क्षेत्र निर्माण करणे व त्यांत बदल करणे, सजातीय चुंबकांचे एकमेकांना दूर सारणे व विजातीय चुंबकांतील आकर्षण याचा उपयोग करून ट्रेन धावपट्टीवर १ ते १० सेंटीमिटर उंचीवर तरंगत ठेवता येते व घर्षणरहित अशा या प्रणालीत, अभुतपूर्व म्हणजे ५०० किलोमिटर प्रती तास, या गतीने पळविता येते. सुटल्यापासून पहिल्या २ मिनिटांतच ती ३०० किलोमिटरची गती गांठते.
जर्मनीत जवळ जवळ ३ दशकांपूर्वी या तंत्रज्ञानाचा उदय झाला.अतिशय किचकट व खर्चिक तंत्रज्ञान लागणारी व व्यापारी तत्वावर असलेली ३० किलोमिटर लांबीची मॅग्लेव्ह जगांत आज फक्त चीनमधील शांघायमधेच आहे व ती लॉंगियांग रोड स्टेशन ते पुडॉंग एअरपोर्ट पर्यंतचा पल्ला १० मिनिटांपेक्षाही कमी वेळांत गांठते. तिचा हॅंगझाउ पर्यंत १६० किलोमिटरचा विस्तार २०१० पर्यंत पूर्ण होईल.
पंख नाहित, तरंगत ठेवल्यामुळे घर्षणाचा अभाव व त्यामुळे ध्वनीप्रदुषण जवळ जवळ नाहीच, एंजीन नाही, पोल्युशन नाही, एग्झॉस्ट गॅस नाही. अशी ही ट्रेन … एक चमत्कारच !




टीकाकार म्हणतात की अतिशय खर्चिक अशा मॅग्लेव्हमधे गुंतवणुक करण्याचे कारणच काय? त्यांना त्यांतील thrill व्यतिरिक्त आणखी एका गोष्टीचा विसर पडतो. केवळ ’अ’ पासून ’ब’ पर्यंत जाता येणे एवढेच नव्हे तर ही भूतकाळांतून दैदिप्यमान भविष्याकडे मारलेली एक भरारीच आहे.
ज्या जर्मनींत या तंत्रज्ञानाचा उदय झाला तेथेसुद्धा, आपल्याकडे मॅग्लेव्ह असावी असे, त्याला लागणार्‍या अवाढव्य खर्चामुळे, वाटत नाही.
मी शांघाय पाहिले आहे. मला एक प्रश्न भेडसावतो. आपल्या मुंबईचे शांघाय केव्हा होणार? आणि त्याचे उत्तरही मला माहित आहे. शांघाय व मुंबई या शहरांचा सर्वच दृष्टीकोनांतून विचार करता, उत्तर निश्चित आहे व ते हे, “केव्हाच नाही।”
(सौजन्य गूगल )

Thursday, November 19, 2009

भू-गर्भातील ऊर्जा –

या ऊर्जेचा उगम भू-गर्भातील किरणोत्सर्गी खनिजांच्या विघटणांत आहे. पृथ्वीच्या पोटांत, भू-पृष्ठापासून खूपच खोल असलेल्या तप्त मॅग्मामधे ही ऊर्जा उष्णतेच्या रुपांत आहे. तंत्रज्ञान वापरून, एका ऊर्जेचे दुसर्या उर्जेत म्हणजे उष्णतेचे विजेत रुपांतर करता येते.
भू-गर्भीय ऊर्जेकरिता ज्या अती खोल विहिरी खणतात, त्यांतून, कार्बन-डाय-ऑक्साइड, हैड्रोजन सल्फाइड, मिथेन व अमोनिया असे “ ग्रीन-हाउस ” वायू निघतात. परंतू यांचे प्रमाण, दगडी कोळसा, c.n.g वगैरेच्या ज्वलनांतून जी विद्युत निर्मिती करतात, त्या मानाने कमीच असते. म्हणूनच global warming च्या संदर्भात, या ऊर्जा स्रोताला महत्वाचे स्थान आहे.
आज, भू-गर्भीय ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्याची प्रमूख केंद्रे अमेरिकेंतील The Geyzers या भागांत आहेत. तसेच एल साल्वादोर, केनिया, फिलिपाइन्स, आइसलंड व कोस्टा रिका येथेही कांही प्रमाणांत वीज निर्मिती होते.
भू-पृष्ठावर ठिकठिकाणी tectonic plates आहेत. पुष्कळदा याच भागांत भू-कंप होत असतात. तेथे अति ऊष्ण तपमानाचे भाग, भूपृष्ठापासून फार खोल नसतात. आजची बरीचशी भू-गर्भ ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याची केंद्रे, याच भागांत आहेत.
या तंत्रज्ञानाचा नमुना दाखविणारी छोटी निर्मिती केंद्रें (pilot plants ), जर्मनी व फ्रांस येथे आहेत. स्वित्झर्लंड येथील केंद्र, तेथे भू-कंप झाल्यामुळे बंद करावे लागले.
जागतिक मागणीच्या फक्त ०.३ % इतकीच विजेची निर्मिती या ऊर्जास्रोतापासून होते आहे. यांतील उष्णता जरी अनिर्बंध उपलब्ध असली
तरी भू-पृष्ठाखाली कित्येक मैल ड्रिलींग करणे व उष्णतेचे विजेत रुपांतर करायचें संयंत्र यांतील तंत्रज्ञानांत लक्षणीय सुधारणा करून ते
स्वस्त करता आले तरच, अखंड व मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचा एक मार्ग भविष्यांत उपलब्ध असेल म्हणून याचे महत्व.


क्राफ्ला (आइसलंड ) येथील जिओथर्मल पॉवर प्लॅंट

Google आधारित...