Friday, December 17, 2010

प्लॅस्टीक मुक्त पार्ले

प्लॅस्टीक मुक्त पार्ले -
वरील बातमी काल-परवाच एका मराठी दैनिकांत वाचली आणि मला आपल्या म. ना . काळे यांची आठवण झाली . पार्ल्याच्या दक्षता समितीद्वारा त्यांचाही हातभार यास लागला होता . आता हे किती टिकेल हे पहावयाचे .

Tuesday, November 23, 2010

कै. शुभांगना बापट यांची एक कविता – सूर

सूर- - -
हरवले सूर माझे , कंठि ते येतील का ?

भावना माझ्या मनीच्या गायनी येतील का ?

भावनांचा कोंडमारा , साहवेना मम जिवा ,

प्राण अवघा कळवळूनी , दु:ख्ख हो माझ्या जिवा ,

सूर माझ्या अंतरीचे बोलते होतील का ?

* * * *

सूर आळवि भावनांचे , भाव-भक्तीने फुले ,

सूर माझा अडखळे का , भाव होती भुकेले ,

सांग देवा तूच आता , सूर कधि लागेल का ?

* * * *

म्हणुनि वाटे आज जावे , धुंद ऐशा मैफिलिला ,

ताल धरिते ह्रुदय माझे , मुक्त व्हावे सुस्वराला ,

सूर आणि ताल यांचे नृत्य ते रंगेल का ?

* * * * कवयत्री – कै. शुभांगना बापट .

“सोबती” ची सहल फ़ेब्रु . २००७ मध्ये म्हाळशेज जवळ एका फार्म-हाउस वर गेली होती.
फोटोत डावीकडून ७ व्या कै. शुभांगना बापट -


हंसरा झरा लुप्त झाला ( कै. शुभांगना बापट)

कै. शुभांगना बापट यांचा जन्म ६ सप्टेंबर १९२९ ला मुंबईत झाला . योगायोगाने त्यांचा मृत्युही सप्टेंबर मध्येच ( ९ सप्टेंबर , २०१०) वयाची ८१ वर्षे पूर्ण करून , विले – पारले येथे झाला . त्यांच्या विवाहाला १२ जून २०१० ला ६३ वर्षें पूर्ण झाली होती . त्यांनी आपले आयुष्य अत्यंत उत्साहाने , आनंदाने व इतरांना मदत करण्यांत व्यतीत केले . १९५६ सालीं , प्रथमच S.S.C. च्या परीक्षेला बाहेरून बसण्यास परवानगी मिळाली . ती संधी साधून , त्या S.S.C. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या . संगिताची आवड असल्यामुळे , त्यांनी गांधर्व संगीत विद्यालयाच्या संगीत विशारद पर्यंतच्या परीक्षा दिल्या होत्या . त्याप्रमाणेच , वर्धा राष्ट्रभाषेची कोविद परीक्षाही त्या प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झाल्या होत्या . सुगम संगितांत त्यांना रस होता व ते त्या शिकत होत्या . कविता करण्याचा छंदही त्यांनी जोपासला .
त्यांना नोकरी करण्याची अत्यंत उत्कट इच्छा होती पण त्यांच्या २ लहान मुलांचा नीट संभाळ व्हावा व त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने, त्याच्या यजमानांनी त्यास नकार दिला . घरचा व्याप सांभाळून संसार उत्तम रित्या कसा करावा हे त्यांच्याकडून शिकण्याजोगे होते .शिकण्याची आवड असल्यामुळे ,त्या स्वस्थ बसल्या नाहीत . आयुर्वेदाचे , स्वामी या गुरूंकडुन ७ वर्षे शिक्षण घेऊन , त्याचा उपयोग गरजूंकरिता त्यांनी विनामुल्य केला . पार्ल्यातील श्री. नविनभाई शहा व अहमदाबादचे एक शिक्षक यांच्याकडे अक्युप्रेशरचे ज्ञान त्यांनी प्राप्त केले व त्याचाही विनामुल्य उपयोग गरजूंकरिता केला . त्या स्वत: नियमित योगासने करीत . सामाजीक कार्याची गोडी असल्यामुळे , विले-पारले येथील लोकमान्य सेवा संघाचे टिळक मंदिर , विले-पारले महिला संघ , स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्र व सोबती (ज्येष्ट नागरिक संघ ) या संस्थांच्या त्या आजीव सक्रीय सभासद होत्या . सोबतीच्या कार्यकारी मंडळावर पहिली स्त्री सभासद म्हणून त्यांनी २ वर्षे काम केले . तसेच सोबतीच्या पहिल्या स्त्री उपाध्यक्ष म्हणूनही २ वर्षे काम पाहिले . सोबतीच्या गरजू सभासदांना त्या आयुर्वेदिक औषधे व अक्युप्रेशरचा उपचार विनामुल्य करीत आणि त्याने गुणही येई . स्पर्धांमध्ये सहभागी होणे त्यांना आवडे व त्यांत कांही बक्षिसेही त्यांना मिळाली होती . महाराष्ट्रांतील ज्येष्ट नागरिक संघांच्या महासंघाची दरवर्षी निरनिराळ्या ठिकाणीं अधिवेशने भरतात . त्यात त्यांनी , नाशिक , नागपुर , कोल्हापुर , अकोला , डोंबिवली , मुलुंड , चेंबुर इत्यादि ठिकाणी भाग घेतला होता . ( विशेष म्हणजे अकोला अधिवेशनांत “आनंद द्यावा – आनंद घ्यावा ” या विषयावर त्या छान बोलल्या होत्या . याच अधिवेशनांत , फेसकॉमचे अध्यक्ष मा .श्री . रमणभाई शहा यांनी श्री. बापट यांना फेसकॉमचे ’ देवानंद ’ ही पदवी बहाल केली होती .) फेसकॉमचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. राधाकृष्ण भट , कै . प्रभाकर गोरे , कै. Y. B. पाटील तसेच श्री. त्र्यंबकराव देशपांडे या अध्यक्षांशीही त्यांचा चांगला परिचय होता व बापटांच्या घरी येणे-जाणे असे . श्री. विनायकराव दाते ( सह-संपादक “मनोयुवा”) यांचेही बापटांकडे जाणे-येणे असे . अर्थांत या सर्वांचा पाहुणचार शुभांगना ताई आनंदाने करीत . महासंघाच्या सुरुवातीच्या काळांत , पुण्याचे कै . पु . शं . पतके “ कांचनकल्प “ या मासिकाचे संपादन करित असत . त्यात बापट बाई , “ घरगुती औषधे : आजी-बाईचा बटवा" हे सदर लिहीत असत हे पुष्कळांना माहित नसेल . अशा या हंसतमुखाने सर्वांचे स्वागत करणाऱ्या , गोड बोलण्याने छाप पाडणाऱ्या एक गुणवंत कार्यकर्त्या आपल्यातून निघून गेल्या आहेत व त्याचे फार दु:ख होते . जन्माला आलेला प्राणीमात्र हा केव्हातरी कायमचा जाणारच ही भावना हे दु:ख हलके करायला मदतीला येईल असे वाटते .
( … लेख सोबतीच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे .)

Wednesday, November 17, 2010

विनोद सम्राट "पुल"

विनोदसम्राट पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यांत घडलेले कांही मिश्किल प्रसंग सांगण्याचा हा एक अल्पसा प्रयास –
हौसेसाठी प्रवास करणाऱ्या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं ? असा प्रश्न पुलंना कुणीतरी विचारला .
पुल म्हणाले , “त्यात काय ? सफरचंद म्हणावं .”
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं ,”एअरहोस्टेसला आपण हवाई सुंदरी म्हणतो तर नर्सला दवाई सुंदरी का म्हणू नये ?”
आणि वाढणाऱ्याला वाढपी म्हणतो तर वैमानीकाला उडपी का म्हणू नये ?”
त्याच सुरात पुल खूप दारू पिणाऱ्याला पिताश्री म्हणतात …..
एकदा वसंतराव देशपांडे पुलंना म्हणाले , “ ही मुलगी (सुनिताबाई ) म्हणजे एक रत्न आहे .” ह्यावर पुल लगेच म्हणाले ,
“म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय.” आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित संवयीमुळे पुल एकदा आपल्या पत्नीला म्हणाले , “या घरात मी एकटाच देशपांडे आहे . तू मात्र ’उपदेश’ पांडे आहेस .
एकदा एका भोजन समारंभात पुलंच्या एका बाजूला ना. ग. गोरे तर दुसऱ्या बाजूला भुजंगराव कुलकर्णी बसले होते . पुल म्हणाले , “आफतच आहे . एकीकडे नाग तर दुसरीकडे भुजंग !!!”
एकदा पुलंना एक कूकरी सेट भेट म्हणून मिळाला . तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवित होत्या . सुनिताबाईंचा “सर्व कांही जपून ठेवण्याचा स्वभाव” माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली - “अगं , एवढा सुंदर सेट फुटू नये या भितीने तू तो कधी वापरणारच नाही का ?” त्यावर पुल पटकन म्हणाले , “हो तर ! ! सुनिता मला कधी ऑमलेट सुद्धा करून देत नाही … अंडी फुटतील म्हणून !!!”
एका संगीत कार्यक्रमात , सुधीर गाडगीळ माणिक वर्मा यांची मुलाखत घेत होते . प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून , पुल
ही मुलाखत ऐकत होते . हंसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत , गाडगीळांनी माणिक वर्मा यांना त्यांच्या पतीबद्दल
प्रश्न विचारला , “तुमची अ‍न त्यांची पहिली भेट नेमकी कुठे झाली होती ?” लग्नाला खूप वर्षे होऊनही , माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर द्यायची टाळाटाळ करीत होत्या . ते पाहून , पहिल्या रांगेतील पुल उत्स्फूर्तपणे मोठ्याने म्हणाले – “अरे सुधीर , सारखं सारखं त्यांच्या ’वर्मा’ वर नको रे बोट ठेवूस !”

Tuesday, November 16, 2010

गुऑंग झू येथे सुरू असलेले एशियन गेम्स-छायाचित्रे

आपण सद्ध्या चिन मद्ध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्सचा दैदिप्यमान उदघाटण सोहळा पाहिला असणार . त्यांतीलच कांही प्रतिमा पहा -




























Wednesday, September 29, 2010

ऑरोरा बोरिआलिस

ऑरोरा बोरिअलिस या निसर्गचमत्काराचे काही फोटो Yahoo News वर पहावयास मिळाले. ते सोबती वाचकांना खचित आवडतील असे वाटल्यामुळे येथे देत आहें.










Tuesday, September 28, 2010

मी सोबतींतील या मित्रद्वयाला कायमचा दुरावलो





मी पार्ले सोडून कांही वर्षांपूर्वी वसईला रहावयास गेलो खरा पण ( कै ) श्री. प्रभाकर भिडे यांच्याशी दूरध्वनि आणि ( कै ) श्री. मधुसूदन काळे यांच्याशी दूरध्वनि व संगणकाद्वारे सतत संपर्कांत राहिलो .
श्री. भिडे यांनी अलिकडे मोडी लिपी आत्मसात केली होती . कांही महिन्यांपूर्वी, मी त्याच्याकडे गेलो होतो तेव्हा मोडीच्या सरावाकरिता वापरलेली एक वही त्यांनी मला दिली . कांही दिवसांनी मी ती वाचून परत करायला गेलो तेव्हा ते खोकल्याने बेजार झाले होते व जास्त न बोलण्याचे त्यांच्यावर बंधन होते . मित्रांशी अखंड बोलण्यांत आनंद घेणाऱ्या भिड्यांना हे किती कष्टमय झाले असावे हे मी समजू शकलो व फारसे बोलणे झाले नाही . त्या पूर्वी त्यांनी एक लेख मला सोबती ब्लॉगमध्ये प्रसिद्धीस दिली , ती मी त्याच दिवशी प्रसिद्ध केली . वसईला आल्यापासून सोबतीच्या प्रत्येक सहलीची बातमी ते किंवा श्री. मधुसूदन काळे देत . आता हे दोघेही अतिदूरच्या सहलीला , परत न येण्याकरिता गेले आहेत . स्पष्टवक्तेपणामुळे भिड्यानी कदाचित कुणाला दुखविलेही असेल , पण त्यात वैयक्तिक आकस असण्याची शक्यता नाही . हा स्पष्टवक्तेपणा तत्वनिष्ठेपायी असे .
मृदुभाषी म. ना. काळे यांच्याशी दूरध्वनि लागला की बोलण्यात वेळ कसा जाई याचे भान रहात नसे . पार्ल्यात असताना , कांही वेळा मी नागरी दक्षता समितीत भाग घेत असे . तेथे काळे यांचे योगदान लक्षणीय होते . मी त्याच्या नवीन घरी गेलो तेव्हा त्यांचा संगणकांतला संग्रह त्यांनी मला आवर्जून दाखवला . जवळ जवळ रोजच माझ्याकडे आलेल्या छानशा इ-मेल्स मी त्यांना पाठवित असे . मध्यंतरी , मी कांही काळ परदेशांत होतो . तेथेच त्याच्या क्लेशदायी अंतिम प्रयाणाची बातमी कळली . त्यांच्या प्रयाणानंतर त्याचा संगणकावरील पत्ता काढून टाकणे मला क्लेशदायक वाटते .
या दोघांच्याही स्मृति माझ्याकडे दीर्घकाळ असतील .

Tuesday, September 21, 2010

एरी कॅनाल

दि. १५ सप्टेंबरच्या ’सोबती’च्या साप्ताहिक सभेत श्री. प्र. के. फडणीस यांचे ’एरी कॅनाल’ या विषयावर व्याख्यान झाले. अमेरिकेत असताना वाचलेले एका वेगळ्याच प्रकारच्या प्रकल्पावरील पुस्तक हा त्याचा आधार होता. फडणीस यांच्या www.pkphadnis.blogspot.com या ब्लॉगवर व्याख्यानाचा आधारभूत लेख वाचावयास मिळेल.
व्याख्यानापूर्वी ’सोबती’च्या तीन दिवंगत सभासदांना श्रद्धांजलि वाहण्यात आली. ब्लॉगचे सहसंचालक श्री. म. ना. काळे यांचा त्यांत समावेश होता.

Sunday, September 12, 2010

श्री. म. ना. काळे यांचे दु:खद निधन.




’सोबती’च्या वाचकांस कळवण्यास अतिशय खेद होतो कीं सोबतीचे ज्येष्ठ व उत्साही सभासद व या ब्लॉगचे सहसंचालक श्री. म. ना. काळे यांचे शनिवारी सकाळी सहा वाजतां निधन झाले. घरींच पडल्यामुळे त्यांच्या डोक्यावर मार बसला व मेंदूत रक्तस्राव झाला. लीलावती इस्पितळ व नंतर पार्ल्यातील गावडे इस्पितळात बरेच दिवस उपचार होऊनहि ते कोमातून बाहेर आलेच नाहीत.
’सोबती’त ते अनेक उपक्रमांमध्ये सहभागी असत. त्यांचा स्वभाव मृदु व अजातशत्रु होता. हा ब्लॉग मी सुरू केला व मग कार्यकारी मंडळाकडे सुपूर्द केला. तेव्हां त्यानी ते काम श्री. काळे यांचेकडे सोपवले. वयाची सत्तरी उलटेपर्यंत संगणकाशी काही संबंध न आलेल्या श्री. काळे यांनी त्यानंतर या क्षेत्रात प्रवेश केला होता. ब्लॉगवर मराठीतून लिहिण्यासाठी व इतर कामे करण्यासाठी माझेकडे अनेकवार येऊन त्यानी सर्व समजावून घेतले व मी दीर्घकाळ अमेरिकेत गेल्यावर त्यानी हा ब्लॉग हौसेने व इतर कामांतून वेळ काढून चालवला होता. कमीजास्त अडचण पडल्यास माझ्याशी अमेरिकेत संपर्क साधत असत. त्यांचे हे उत्तम काम आपण वाचकांनी पाहिलेले आहेच. त्यांच्या निधनाचे वृत्त या ब्लॉगवर लिहिण्याची वेळ माझ्यावर येईल असे वाटले नव्हते. ईश्वरेच्छा!
’सोबती’च्या दि. १५ सप्टेंबरच्या साप्ताहिक सभेत त्याना श्रद्धांजली वाहिली जाईल. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सर्व सहभागी आहोत.
प्र. के. फडणीस

Monday, August 16, 2010

डॉ. चंद्रकांत केळकर व सिनेसंगीत.

डॉ. चंद्रकांत केळकर हे ’सोबती’चे एक ज्येष्ठ सभासद आहेत. दंतवैद्यकाबरोबरच संगीत हाहि त्यांचा आवडीचा व अभ्यासाचा विषय आहे. (तसे इतरहि अनेक अभ्यासाचे विषय व कार्यक्षेत्रे आहेत. पार्ल्यातील अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यांत त्यांचा सहभाग असतो.) बालवयापासून असलेली सर्व प्रकारच्या संगीताची आवड व क्षमता पद्धतशीर अभ्यासाने जोपासतां आली नाही. मात्र त्याची क्षिति न बाळगतां स्वप्रज्ञेने ती आवड व कला त्यानी जोपासली. तबला व हार्मोनिअम या दोन्ही वाद्यांवर प्रभुत्व मिळवले. कॉलेजजीवनात संगीताचे कार्यक्रम बसवले. पुढे या क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी परिचय व स्नेह जमला. अनेक गायक/गायिकांना साथ केली. सिनेसंगीताचा विशेष शौक निर्माण झाला तो शंकर-जयकिशन या जोडीशी जमलेल्या स्नेहामुळे. श्रीनिवास खळे यांचेशीहि विशेष स्नेह जमला.
डॉ. केळकरांचा सिनेसंगीताचा खूप अभ्यास आहे. गाण्यातील वाद्यमेळाचा उपयोग व त्यातील सौंदर्यस्थळे ते बारकाईने उलगडून दाखवतात. अनेक वाद्यांच्या वापराच्या विशिष्ट जागा नेमक्या निदर्शनास आणतात. त्यांचा सिनेसंगीताच्या रेकॉर्डस व कॅसेट्सचा संग्रह विस्तृत आहे व ते त्याचा प्रेमाने सांभाळ करतात. रसिक मित्रांना निवडक गाणी ऐकवणे ही त्यांची आवड आहे.
दि. ४ ऑगस्टच्या सोबतीच्या साप्ताहिक सभेत त्यानी स्वत: निवडलेली हिंदी सिनेमांतील गाणी स्वत:च्या संग्रहातून पुनर्मुद्रित करून ’सोबती’ सभासदांना ऐकवलीं व त्यांतील सौंदर्यस्थळेहि उलगडून दाखवलीं. (गाण्यांच्या निवडीत, हल्लीच निधन पावलेले सोबती सभासद व त्यांचे मित्र श्री. प्र. गो. भिडे यांचाहि महत्वाचा सहभाग होता.) कार्यक्रम सोबतीच्या रसिक व चोखंदळ सभासदांना आवडला हे सांगणे नकोच!

Wednesday, August 11, 2010

’प्रेम सेवा शरण’

खानसाहेब अब्दुल करीम खान यांच्या ’प्रेम सेवा शरण’ या नाट्यगीताची व्हिडिओ YOUTUBE वर हल्लीच मला दिसली. संगीतप्रेमी सोबती सभासदांसाठी व इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी ती मी येथे देत आहे.

Wednesday, August 04, 2010

डॉ. गिरीश जाखोटिया एक यशस्वी व्यवस्थापन सल्लागार आणि प्रतिथयश लेखकही आहेत. दिनांक १४ जुलै रोजी सोबतीमध्ये त्यांचे विचारपरिप्लुत भाषण झाले व सर्व सभासदांकडून त्याचे उत्स्फूर्त स्वागतही झाले.

भाषणाच्या शेवटी त्यानी ‘आत्मा अडगळीत टाका आपला’ ही आपली स्वरचित कविता सादर केली. त्यांची ही कविता म्हणजे आपल्या देशातील सद्य परिस्थितीवरचे उपरोधिक भाष्यच म्हणावे लागेल. इतर लेखनाबरोबर कविता लेखनातही त्यांची लेखणी संचार करते.


‘आत्मा अडगळीत टाका आपला ’

करायचा असेल जर मोठा गफला, आत्मा अडगळीत टाका आपला !
करा मनाला पूर्ण हलाल, भेटतील जागोजागी दलाल.
बदलून टाका सत्य सारे, जमवून घ्या संधीचे वारे,
प्रत्येक गोष्ट विकत मिळते, असत्य सारे विकता येते !
षंढ होऊन करा सलाम, फायदे सारे घ्या तमाम.
संस्काराना मारा गोळी, भाजून घ्या आपली पोळी.
ओरबाडत रहा इथे, तिथे. चरत रहा जमेल तिथे.
व्हा लांडगे, घाबरवा सशाना, घाबरत रहा वाघाच्या मिशांना !
खुपसत रहा सुरे पाठीत, गाठा सावज जिभल्या चाटीत.
बनवा टोळ्या, लुटा जंगल, जाळा झोपड्या घडवून दंगल !
मिळतील बरेच बाबा, बापू, वापरा त्याना बना ढापू !
विका स्वप्ने, विका विचार, दुनिया गाते भ्रष्टाचार !
सौंदर्याचे दुकान थाटा, कमावण्याच्या हजार वाटा !
निरागसांच्या चोरा कल्पना, बुद्धीमतेच्या करा वल्गना !
असली गावे जरी भकास, तुमचा करा सदा विकास.
टाळूवरचे खा लोणी, भरत रहा छुप्या गोणी.
हलकट असू दे सारे नाद, विसरा सारे तात्विक वाद !
आत्मा असतो अमर सदा, वचन असले सतत वदा.
मूर्ख, हतबल बकरे गाठा, लज्जा सोडुनी सत्ता लाटा.
आयुष्य तुमचे बनवा छंदी, इतरांसाठी असू दे मंदी !
---- कामातुराणां न भयं, न लज्जा,
---- धनातुराणां न भयं, न लज्जा,
---- सत्तातुराणां न भयं, न लज्जा.

आत्मा अडगळीत टाका आपला, हाच विचार जातो जपला ! !

--- कवी: डॉ. गिरीश जाखोटिया
मोबाइल : 9820062116
email: jakhotiya_girish@yahoo.co.in

Saturday, July 24, 2010

डॉ.गिरीश जाखोटीया - व्यवसाय सल्लागार, चतुरस्र लेखक व वक्ता


श्री. सुरेश निमकर - वक्त्याचा परिचय करून देताना



डॉ. गिरीश जाखोटीया हे नावं ऐकल्याबरोबर एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते. ‘एका मारवाड्याची गोष्ट’, ‘वंश’ या गाजलेल्या कादंबर्‍यांचे लेखक डॉ.गिरीश जाखोटीया यांचे भाषण ऐकण्याचा अपूर्व योग दि. १४ जुलै २०१० च्या साप्ताहिक सभेत सोबती सभासदाना आला.
सोबतीचे उपाध्यक्ष श्री. सुरेश निमकर यांनी डॉ. जाखोटिया यांचा विस्तृत परिचर करून दिला व मग डॉ. जाखोटिया यांनी प्रसन्न मुद्रेने आपल्या भाषणास सुरवात केली. ओघवती भाषा, नर्मविनोदांची पखरण, विषयाचे सखोल ज्ञान व चिंतन यामुळे ‘वक्ता दशसहस्रेषु’ या सुभाषिताचा प्रत्यय आला. आपल्या भाषणात त्यानी अनेक विषयांचा परामर्ष घेतला.

लिखाणासंबंधी ते म्हणाले की ज्येष्ठानी आपल्या अनुभवांवर आधारित लिखाण करावे ज्यामुळे त्या लिखाणाला अधिक विश्वासार्हता येईल.
व्यवसाय करणार्‍यानी कुटुंबामध्ये समन्वय साधायला हवा. कुटुंबामध्ये जर चांगला समन्वय असेल तर व्यवसायामध्येही त्याचे प्रतिबिंब पडते. अहंकार हा व्यवसायाचा मोठा शत्रू आहे. अहंकार बाजूला ठेवून जर व्यवसाय केला तर संघर्षाचे प्रश्न उद्भवणार नाहीत. संघर्षाकडे चौफेर व सकारात्मक वृत्तीने पाहिजे तरच संघर्षातून संवाद निर्माण होईल.
मराठी मुले व्यवसायात मागे आहेत. परंतु आता परिस्थिती बदलत आहे.नवीन पिढी आता व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत व यशस्वीही होत आहे. मात्र त्यानी अधिक धाडशी व्हायला हवे. प्रसंग येता ज्याप्रमाणे परशुरामाने शस्त्र हाती धरले तसे इतर गोष्टींचा बाउ न करता मराठी मुलानी धाडसाने पावले टाकली पाहिजेत. व्यवसाय म्हटला की त्यातल्या युक्त्या व खुब्या आत्मसात करायला हव्यात. तरच ते इतरांशी स्पर्धा करून व्यवसायात यशस्वी होतील.
व्यवसाय म्हटला की त्यामध्ये अनेक माणसांचा सहयोग आवश्यक असतो. त्यासाठी एक नेटवर्क बनविणे आवश्यक असते ज्यायोगे परस्पर देवाण घेवाण सुलभ होते. शिवाय व्यावसायिकांमध्ये बेरकीपणा, अर्थात सकारात्मक, यायला हवा. व्यवसायात अहंकार, अस्मितेचा विचार बाजूला ठेवायला हवा. नीतीच्या घट्ट चौकटीमध्ये बसून चलणार नाही. लवचिकता, व्यवहार या गोष्टी महत्वाच्या आहेत. अप्रामाणिकपणा न करताही व्यावसायिकता अंगी बाणवली तर यश मिळू शकते.आज भाषा, संस्कृति यांची अस्मिता राखण्याची चर्चा होते. पण विश्वाला कवेत घ्यायचे असेल तर अस्मितेच्या मर्यादेत फारसे काही करता येणार नाही.
बाह्य मन व अंतर्मन याचा विचारही आवश्यक आहे. बाह्य मन कोणत्याही बाबतीत चटकन प्रतिक्रिया देते. पण अंतर्मन मजबूत असेल तर मनाला योग्य मार्गदर्शन मिळू शकते.
डॉ. जाखोटीया यानी कृष्णनीती्वर विशेष भर दिला.कृष्ण आवश्यक तेथे प्रेमाने वागत असे, प्रसंगी व्यावहारिक नीतीचा अवलंब करीत असे तर प्रसंगी कर्तव्यकठोरही होत असे. म्हणून तो महान पदाला पोहोचला. अशा कृष्णनीतीची आज आवश्यकता आहे. देवाच्या बाह्य दर्शनापेक्षा देवाला अंतर्मनामध्ये पाहिला तर जीवनात समाधान मिळते. त्यांच्या मते व्यवसायातील मानसिकता अंगी बाणणे आवश्यक आहे. ती असेल तर व्यवसायात यश निश्चित असते.
डॉ. जाखोटिया मूळचे राजस्थानी (त्यांच्या भाषेत मारवाडी) असले तरी त्यांच्या चार पिढ्या महाराष्ट्रात गेल्याने व त्यांची पत्नी मराठी असल्याने मराठी मानसिकता, मराठी भाषा व संस्कृति यांच्याशी ते पूर्णपणे एकरूप झाले आहेत. याचे प्रतिबिंब त्यानी
लिहिलेल्या पुस्तकांत पडले आहे. त्यांच्या ‘एका मारवाड्याची गोष्ट’ या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या अल्प काळामध्ये निघाल्या ही त्यांच्या लेखनशैलीची पावतीच म्हणावी लागेल. त्यांची ‘वंश’ ही कादंबरीही अशीच लोकप्रिय झाली आहे. अनेक प्रतिथयश कंपन्यांचे व्यग्र आणि यशस्वी व्यवसाय सल्लागा्र असूनही त्यानी लेखनाचा व्यासंगही जोपासला आहे व त्याना लेखक व वक्ता म्हणून मिळालेली लोकप्रियता स्पृहणीय आहे.
त्यांच्या भाषणाचे वैशिश्ट्य म्हणजे ते ज्या ‘मारवाडी’ समाजाचे आहेत त्या समाजावर आधारित विनोदही करतात. त्यांचे भाषण क्षणभरही कंटाळवाणे वाटत नाही. ते केवळ व्यवसायाबद्दल बोलत नाहीत तर मानवी प्रवृत्ती, आशा आकांक्षा , प्रत्येक समाजाची वैशिष्ट्ये व वैगुण्य यांचाही उहापोह ते भाषणात करतात.
त्यांच्या आणखी दोन कादंबर्‍या - एक मराठी व एक इंग्रजी येउ घातल्या आहेत व त्याही लोकप्रिय होतील यात शंका नाही.
जागतिक मंदी असूनही भारतावर तिचा फारसा परिणाम झाला नाही याचे कारण काय असा प्रश्न विचारला असतां त्यांच्या मते भारतीयांमध्ये असलेली बचतीची सवय व अमेरिकन लोकांच्या तुलनेत आपण फार कमी चंगळवादी व खर्चिक आहोत हे आहे.

Tuesday, July 20, 2010

सोबतीचा वर्धापन दिन सोहळा










दर वर्षीप्रमाणे सोबतीचा ३१वा वर्धापन दिन समारंभ दिनांक १० जून २०१० रोजी उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याचा प्रथम भाग या आधी दिनांक २ जून रोजी संपन्न झाला होता.

सुरुवातीला प्रार्थना व सोबतीचे शीर्षक गीत सोबतीच्या सभासदानी संगीताच्या साथीने सादर केले.

सोबतीचे अध्यक्ष श्री. मुकुंद पेठे यानी समारंभाचे प्रमुख पाहुणे पार्ल्याचे सुपरिचित रहिवासी ऍड्व्होकेट पराग अळवणी यांचा परिचय करुन दिला व यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची माहिती करुन दिली.

कार्यवाह श्रीमती शीला निमकर यानी गेल्या वर्षातील सोबतीच्या घडामोडींचा आढावा घेतला व सोबतीचे अनेक उपक्रम यांची माहिती दिली. त्यानंतर सोबतीच्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार हा महत्वाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

ज्या सभासदाना सहस्रचंद्रदर्शनाचा लाभ झाला, ज्यानी वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली व ज्यांच्या विवाहाला पन्नास वर्षे पूर्ण झाली अशांचा गुलाब पुष्प, श्रीफळ व भेटवस्तु देउन प्रमुख पाहुणे श्री. पराग अळवणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभानिमित्त श्री. र.पां. मेढेकर व श्री. शंकर लिमये यानी आपले विचार व्यक्त केले.

त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. पराग अळवणी यांचे भाषण झाले.

ज्येष्ठांचा सत्कार करण्याची संधी दिल्याबद्दल त्यानी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले ‘शिक्षण, नोकरीधंदा, संसार यातून माणूस निवृत्त होतो व नंतर त्याच्या आयुष्याच्या ‘सेकड इनिंग’ची सुरुवात होते. आरोग्य, विरंगुळा, आर्थिक नियोजन अशा गोष्टीना त्याला सामोरे जावे लागते.जर सेवानिवृत्तीपूर्वी या गोष्टींचे नियोजन केले तर ‘सेकंड इनिंग’ मधील उर्वरित आयुष्य समाधानाचे जाते.’

‘सोबतीची कार्यालयीन जागा नाही व त्यासाठीचे सोबतीचे प्रयत्न अपुरे पडले. परंतु ज्येष्ठ नागरिकांनी शासन व महानगरपालिका यांच्याशी सतत संपर्कात राहून, पाठपुरावा केल्यास ही समस्या सोडविता येणे शक्य आहे. सोबतीच्या यासाठीच्या प्रयत्नात योग्य ते सहकार्य व मार्गदर्शन मी देईन’ असे त्यानी आग्रहाने सांगितले.

त्यानंतर सोबतीचे ज्येष्ठ सभासद प्रा. येवलेकर यांच्या हस्ते भाग्यशाली सोडत काढण्यात आली व तीन यशस्वी क्रमांकाना बक्षिसे देण्यात आली.

सोबतीचे कार्याध्यक्ष श्री. विश्वास डोंगरे यानी प्रमुख पाहुणे, कार्यकारिणीचे पदाधिकारी, अनेक ज्येष्ठ नागरिक, लोकमान्य सेवा संघ व ज्यानी हा समारंभ यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले.

शेवटी चविष्ट उपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

सोबतीचा ३१वा वर्धापन दिन

दर वर्षीप्रमाणे सोबतीचा ३१वा वर्धापन दिन दिनांक २ जून व १०जून रोजी साजरा झाला.

दिनांक २ जून रोजी कॅन्सरपीडीतांसाठी तन मन धनाने कार्य करणारे श्री. गोपाळ केशव तथा काका जोगळेकर व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नांतून साकारलेल्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम आयोजित केला होता. काका जोगळेकर यांची कहाणी म्हणजे निर्धार, मनोबल व सामाजिक जाणीव याचे मूर्तीमंत उदाहरण. या निमित्ताने त्यांचा परिचय करुन देणे उचित ठरेल.

कॅन्सर या रोगाच्या नावाचा उच्चारही माणसाला भीतीदायक वाटतो. पण काका जोगळेकरानी कॅन्सरला धैर्याने तोंड दिले. इतकेच नवे तर त्याच्याशी झगडून त्यानी कॅन्सरला दूर केले. एवढ्य़ावरच न थांबता कॅन्सरपीडीतानी आनंदी जीवन कसे जगावे याचा आदर्श घालून दिलाच पण अनेक कॅन्सरपीडीताना मानसिक व प्रसंगी आर्थिक आधारही दिला व त्याचा फायदा अनेक कॅन्सरपीडीताना होत आहे.

काकानी दोन ठिकाणी नोकरी केली. गायन वादनाचे क्लासही घेतले. दुर्दैवानॆ त्याना रेक्टमचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि टाटा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या वर शस्त्रक्रियाही झाली. २८ वेळा रेडीएशन व २४ वेळा केमो थेरापीची ट्रिट्मेंट घेतली. मनोबल व निग्रह यांच्या आधाराने अखेर त्यानी कॅन्सरवर विजय मिळविला.

या अनुभवातून कॅन्सरपीडीताना मानसिक आणि यथाशक्ति आर्थिक आधार देणे हेच त्यांच्या उर्वरित आयुष्याचे ध्येय ठरले व त्यानुसार त्यांची वाटचाल चालू आहे. त्यांच्या या धीरोदात व समाजसेवी वृत्तीमुळे त्याना अनेक सेवाभावी कार्यकर्ते मिळाले व त्यांच्या मिशनला त्यांचा हातभार लागला. गायन, वादन हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. अत्यंत अल्प फीमध्ये ते मतिमंद व शारीरिक व्यंग असलेल्या मुलाना ते गायन, वादन शिकवू लागले.

१५ ऑगस्ट २०० रोजी त्यानी ` We Can Give' हा वाद्यवृंद स्थापन केला. १५ दिवसांतून एकदा टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पेशंटसाठी भजन आणि सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करतात. असे कार्यक्रम त्यानी अनेक संस्थांमध्ये सादर केले आहेत.

काही महिन्यांपूर्वी ‘Crusade Against Cancer' या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्या हस्ते काकांचा सत्कार झाला व ‘Times of India' मध्ये त्यांची मुलाखतही प्रसिद्ध झाली.

काकांचा हा अतुलनीय सेवाभाव पाहून सोबतीने त्यांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम ठेवला. त्यात अनेक गाणी सादर झाली. एक अपंग व अंध मुलगी हिने अनेक बहारदार गाणी सादर केली. त्याबद्दल सर्वानी तिचे कौतुक केले. सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद श्री. र.पां मेढेकर यानी उत्स्फूरर्तपणे सदर अंध व अपंग मुलीला रुपये एक हजार बक्षीस दिले. विशेष म्हणजे काकांच्या काही सहकारी ज्येष्ठ नागरिकानीही गाणी सादर केली.

काकांच्या या सेवाभावी कार्याला यथाशक्ती हातभार लागावा या भावनेने अनेक सोबती सभासदानी काकांच्या संस्थेला उत्स्फूर्तपणे देणग्या दिल्या व एकूण वीस हजारांची भरघोस देणगी सोबती सभासदांतर्फे त्याना देण्यात आली. काकांच्या या सामाजिक उपक्रमाला सोबती सभासदांचा मिळालेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे.

Friday, July 16, 2010

नवी दिल्ली येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ

नवी दिल्ली येथे नवीन ’इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ काही दिवसांपूर्वी चालू झाला. त्याच्या निरनिराळ्या विभागांचे हे वापर सुरू होण्यापूर्वीचे फोटो माझेकडे Internet वरून आले. फोटो पाहून हा विमानतळ खरेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला आहे अशी खात्री पटेल. (फोटोवर क्लिक केले तर फोटो मोठा व जास्त चांगला दिसेल.)