Friday, May 28, 2010

अफलातून फोटोग्राफी









रॉबर्ट बेल्टेमन नावाच्या २५ वर्षे फोटोग्राफीमध्ये नाव कमावलेल्या माणसाने तेचतेच करत राहाण्याचा कंटाळा आल्यामुळे चालता व्यवसाय बंद केला. मग किर्लियन फोटोग्राफी नावाच्या एका जुन्याच फोटोपद्धतीमध्ये प्रयोग सुरू केले. या पद्धतीत कॅमेरा, लेन्स, कॉम्प्यूटर यातले काहीच वापरत नाहीत. ज्या वस्तूचा फोटो काढावयाचा ती फोटोग्राफिक प्लेटवर ठेवून तिच्यातून विद्युतप्रवाह सोडावयाचा व तिच्यातून बाहेर पडणार्‍या किरणोत्सर्गाचे फोटो प्लेटवर उमटवायचे असा हा वेगळा प्रकार असतो. या माणसाने हे काम खूप मोठ्या प्लेटवर करून पाहिले. हे काम फार वेळखाऊ असते. एक वर्षात त्याचे फक्त दोन फोटो तयार झाले. पत्नीने त्याला वेड्यातच काढले. पण त्याच्या फोटोतले अफलातून रंग प्रेक्षकाना भावले. अतिशय उच्च विद्द्युतदाब वापरून हे काम करावे लागते त्यामुळे ते धोकेबाजहि आहे. एका छोट्याशा, केसाएवढ्या काडीने हे चित्र बनवले जाते मात्र मिळणारे रंग वेगळेच असतात.
पस्तीस देशांमध्ये या माणसाचीं चित्रे प्रदर्शित झाली आहेत. या चित्रांतील अनोखे रंग आपणाला आवडतील.
नॅशनल जिओग्राफिक वरून

Tuesday, May 25, 2010

गगनभेदीकार अनिल थत्ते

दिनांक ५ मे रोजी सोबतीच्या सभासदाना एक मनोरंजक तितकाच राजकारण व पत्रकारिता यांच्यातील Inside Story आणि त्यामागील सुरस कथा सांगून चकित करणार्‍या कार्यक्रमाचा आनंद घेता आला.

वक्ते होते ‘गगनभेदी’ कार अनिल थत्ते. गगनभेदी हे साप्ताहिक त्यानी पंधरा वर्षे चालविले आणि ते वाचकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले. याचे कारण कोणतीही बातमी खोलात जाऊन सनसनाटी निर्माण करणारे लिखाण करण्यात त्यांचा हातखंडा होता.

पण गगनभेदी बंद केले तरी ते थोडेच स्वस्थ बसणार! उत्तम वक्तृत्वाची जोड मिळाल्यामुळे त्यानी राजकारण व पत्रकारिता यांच्या मागचे लोकाना फारसे माहीत नसणारे सत्य लोकांपुढे मांडण्यास त्यानी सुरुवात केली आणि श्रोत्यांचा त्याना उदंड प्रतिसाद मिळू लागला.

राजकारण हे वरवर चढाओढीचे वाटले तरी त्याच्यामागे विश्वास बसणार नाही अशा युत्या-प्रयुक्त्या, आर्थिक व्यवहार, स्वपक्षीय व प्रतिपक्ष यांच्याशी विधिनिषेध न बाळगता केलेल्या खेळी, वरवर निःपक्ष भासविणारे पत्रकार, स्तंभलेखक आणि संपादकांच्यामागे असलेली धनशक्ती, पैसे देऊन हवे तसे वृत्त छापून आणणे, महत्वाच्या राजकारण्यांचा प्रचार करण्यासाठी पळवाट काढून मोठे लेख छापणे अशा अनेक अपप्रवृत्तींवर त्यानी परखडपणे प्रकाश टाकला. उच्च विद्या बिभूषित डॉक्टर्सही जाहीरातींद्वारे व्यवसाय करीत आहेत त्यामागच्या क्लुप्त्याही त्यानी सांगितल्या.

अलिकडे स्वामी, बुवा व तथाकथित धार्मिक नेते यांचीही चलती आहे. त्यांची प्रवचने व इतर कार्यक्रम
धंदेवाईक पद्धतीने योजून लाखोंची कमाई करणारे व्यावसायिक आहेत असेही त्यानी सांगितले. तसेच ज्योतिषाचा धंदाही जोरात चालू आहेत. मार्केटिंग पद्धतीने एकाद्याला ज्योतिषी बनवून लाखो रुपये कमविणार्‍या लोकांचीही त्यानी उदाहरणे दिली. समाजात अनेक पातळींवर चालणारा भ्रष्टाचार, नीती-अनीती याचा विधिनिषेध न बाळगता केवळ सत्ता, संपत्ति कमावणे हा आजचा अनेकांचा धंदा झाला आहे.

त्यांचे भाषण ऐकून अनेक आश्चर्यकारक बाबी त्यानी श्रोत्यांसमोर मांडल्या ज्या कुणला फारशा माहित नव्हत्या. अशा अनेक गोष्टींचा त्यानी पर्दाफाश त्यानी केला व ‘दिसते तसे नसते’ हे अनेक उदाहरणानी स्पष्ट केले.

श्री. अनिल थत्ते यानी सोबतीकडून मानधन घेतले नाहीच पण सोबतीला १,१११ रुपयांची भरघोस देणगीही दिली.

Saturday, May 22, 2010

मराठी ब्लॉगर्स मेळावा




अलिकडे मराठी ब्लॉगर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. मराठी भाषेच्या दृष्टीने हे सुचिन्हच म्हणावे लागेल.

ब्लॉगर्सची वाढती संख्या व त्यावर लिखाण करणार्‍या ब्लॉगधारकानी एकत्र यावे या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी पुणे येथे एक मेळावा आयोजित केला गेला होता. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून कांचन कराई, रोहन चौधरी आणि महेन्द्र कुलकर्णी या ब्लॉगधारकानी मुंबई येथे असा मेळावा घेण्याची कल्पना मांडली व मराठी ब्लॉगधारकाना त्यासंबंधी आवाहन केले. त्याला उतम प्रतिसाद मिळाला.

रविवार दि. ९ मे रोजी दादर येठील दादर सार्वजनिक वाचनालयाच्या हॉलमध्ये हा मेळाव्वा संपन्न झाला. ८० च्या वर ब्लॉगधारक उपस्थित होते. त्यांत अनेक ब्लॉग चालविणार्‍या निवृत्त सनदी अधिकारी श्रीमती लीना मेहेंदळे ह्याही होत्या. सोबतीतर्फे श्री. म.ना. काळे. श्री. विश्वास डोंगरे व श्री. चंद्रकांत पतके उपस्थित होते. प्रत्येक ब्लॉगधारकाने आपण कशा तर्‍हेने ब्लॉगवर लिखाण करतो याची माहिती दिली व आपली मते व्यक्त केली. सोबतीतर्फे श्री. म.ना. काळे यानी सोबतीच्या ब्लॉगची पार्श्वभूमी, त्यावरील लिखाणाचे स्वरूप यासंबंधी माहिती दिली व मराठी ब्लॉगधारकांमध्ये संवाद निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली. एकंदरीत ब्लॉगधारकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या मेळाव्यातून ब्लॉगधारकाना बरीच नवीन माहिती मिळाली.

राजा शिवाजी डॉट कॉम या वेबसाईटचे संचालक श्री.मिलिंद वेर्लेकर यानी सांगितले की शिवाजी महाराज यांच्या व्यक्तित्वावर व कारकीर्दीवर वीस हजार पानांचे लिखाण पूर्ण झाले असून येत्या वर्षभरात ही वेबसाईत कार्यान्वित होईल व शिवरायाच्या कारकिर्दीवर व त्यांच्या व्यक्तित्वावर संपूर्ण प्रकाश पडेल व अनेक अज्ञात प्रसंग, व्यक्ती व हकिगती लोकाना ज्ञात होतील.

‘स्टार माझा’चे श्री. प्रसन्न जोशी यानी सांगितले की न्लॉगधारकानी अनेक नवनवीन विषय हाताळावेत व दुसर्‍या भाषांमधील वाड.मयही मराठीत आणण्याचा प्रयत्न करावा.

आयोजकानी मेळाव्याचे आयोजन व्यवस्थित केले होते. अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. त्यांच्या प्रयत्नाने मेळाव्याला प्रायोजक मिळाल्याने कुणावर आर्थिक बोजाहि पडला नाही.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कांचन कराई, रोहन चौधरी व महेन्द्र कुलकर्णी यानी अविश्रांत परिश्रम घेतले. यासाठी त्याना मनःपूर्वक धन्यवाद.

Wednesday, May 19, 2010

केवळ विनोद

In Good Humour & No Offence

केवळ विनोद


एका दुःखी नवर्‍याने मनातील दर्द कागदावर उतरवला :

साली इज ब्युटी, वाइफ़ इस ड्युटी
साली इस पेन्शन, वाइफ़ इज टेन्शन
साली इज कूल, वाइफ़ इज फ़ूल
साली इज टुटीफ़्रुटी, वाइफ़ इज किस्मत फ़ुटी
साली इज फ़्रेश केक, वाइफ़ इज अर्थक्वेक ॥॥

Tuesday, May 18, 2010

पैशाचा खेळ

ऑरिगामी ही कला काही अपरिचित राहिलेली नाही. पांढरा किंवा रंगीत कागद वापरून घड्या घालून अनेक कलाकॄति बनवलेल्या आपण पाहिल्या आहेत. पण चलनी नोटेचा यासाठी उपयोग केलेला तुम्ही कधी पाहिला नसेल. अमेरिकेतील चलनी नोटा सर्व किमतीसाठी सारख्याच आकाराच्या असतात. अमेरिकेत नोटा-नाण्यांचा वापर कमी व बहुतेक व्यवहार क्रेडिट कार्ड किंवा ऑन-लाइन पद्धतीने होतात त्यामुळे पैशाचा असा उपयोग करण्याचे कोणाला तरी सुचले असावे. या उत्कृष्ठ कलाकृतींचे फोटो एका परिचित व्यक्तीकडून मला मिळाले ते येथे देत आहे. आपणाला ते नक्कीच आवडतील.
















Monday, May 17, 2010

हृदयस्वास्थ्य आणि हृदयविकार

अचानक आणि अनाहूत हृदयविकाराचा झटका येण्याची भीति, वयोवृद्धाना - विशेषत: स्त्रीवर्गाला अधिक असते हे आपण सर्वानीच ध्यानात घ्यायला पाहिजे. अलिकडे अंजियोग्राफी, अँजियोप्लास्टी आणि बायपास सर्जरी हे शब्दप्रयोग आपण बरेच वेळा ऐकतो-करतो. पण हृदयविकारामध्ये हृदयाच्या स्नायूचा विकार वेगळा आणि हृदयाच्या झडपांचा विकार वेगळा.
हृदयाच्या स्नायूच्या विकारासंदर्भात याआधी उल्लेखिलेले तीनही शब्दप्रयोग वापरलेले असतात. हे तीनही शब्दप्रयोग हृदयाच्या स्नायूंच्या रक्तपुरवठ्याच्या संदर्भात वापरले जातात. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करण्यासाठी फक्त एक आणि एकच रोहिणी असते. त्या रोहिणीला आपण हृदय-रोहिणी म्हणू. इंग्रजीत कॉरोनरी आर्टरी म्हटले जाते. या हृदय-रोहिणीच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या शाखा हृदयाच्या स्नायूंना शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात. त्यात कमतरता निर्माण झाल्यास अगदी स्वाभाविकपणे हृदयस्पंदनात बिघाड जाणवू लागतो. स्वास्थ्यपूर्ण हृदयाच्या कार्यात हृदयाच्या स्नायूंचे जेव्हढे महत्व, तेव्हढेच महत्व हृदयाच्या झडपांच्या कार्याचे असते. म्हणून हृदय विकारासंदर्भात विचार करताना हृदयाच्या स्नायूंच्या विकाराराप्रमाणेच हृदयाच्या झडपांच्या विकारासंदर्भात पहावे लागते. हृदयविकाराच्या लक्षणांचा अभ्यास म्हणजे ह्र्द्स्पंदनाचा विचार जसे ई.सी.जी. चा प्रथम उपयोग होत असला तरी हृदयाच्या कार्यासंदर्भातील अभ्यास करताना, एलेक्ट्रोकार्डियोग्राम (ई.सी.जी.) बरोबर इकोकार्डियोग्रामद्वारे अभ्यास करावा लागतो. त्याद्वारे रक्तप्रवाह एकदिशा मार्गाने, हृदयाच्या एका कप्प्यातून दुसर्‍या कप्प्यामध्ये सुरळितपणे होतो किंवा नाही हे तपासून पाहिले जाते. इलेक्ट्रोकार्डियोग्राम प्रमाणेच हा इकोकार्डियोग्राम सुद्धा कोणत्याही प्रकारची इजा न करताच काढता येतो. हृद्रोगाच्या स्पष्ट रोगनिदानासाठी हे सर्व करण्याची नितांत आवश्यकता असते.

रुधिराभिसरणाबाबतची माहिती जगात सर्वप्रथम भारतीयांना होती हे सिद्ध करता येईल एवढा पुरावा उपलब्ध आहे. मात्र पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या आधारे पाहू गेले तर, ती माहिती ब्रिटिश शास्त्रज्ञ विल्यम हार्वे याने सर्वप्रथम सप्रयोग दाखवून दिली आहे असे नमूद केलेले दिसेल. इसवी सन १८५० च्या आधी अनेक शतके आयुर्वेदात चरक या आयुर्वेदाचार्यापासून ती माहिती ज्ञात होती. शुश्रुताच्या रक्तसंचार सिद्धांतामध्ये दिलेले वर्णन पुरेसे बोलके आहे.

चतु:प्रकोष्ठ हृदयम वामदक्षिण भागत: ।
तस्यार्धो दक्षिणौ कोष्ठौ गृहीत्वा शुद्ध शोणतम ॥
रस रसति इति रस: ।
अह: अह: गच्छति इति रस: ॥

हृ म्हणजे आहरण करणे, द म्हणजे देणे आणि य म्हणजे नियमन करणे ही बृहदारण्य उपनिषदात दिलेली हृदय या शब्दाची व्युत्पत्ति, रुधिराभिसरणाची कल्पना भारतात ख्रिस्तपूर्व अनेक शतके माहित असावी हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे.
खालीं दिलेल्या तीन आकृत्यांद्वारे चारही कप्प्यातून होणारा हृदयातील एकदिशा रक्तप्रवाह समजून घेण्यासारखा आहे.


Sunday, May 16, 2010

कविश्रेष्ठ विंदा करंदीकर - भावपूर्ण आदरांजली





अलिकडेच मराठी सारस्वताच्या नभोमंडळातून एक तेजस्वी तारा अंतर्धान पावला. गेली साठ पासष्ट वर्षे मराठी जगताला दिपवून टाकणारा त्यांचा प्रकाश अजूनही चमकतो आहे अणि वर्षानुवर्षे तो तसाच चमकत राहील. कविवर्य विंदा करंदीकर मराठी मनाला चटका लावून गेले. त्यांचे श्रेष्ठत्व वादातीत होते. त्यांचे स्मरण करुन आदरांजली वाहण्यासाठी सोबतीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सोबतीच्या ज्येष्ठ सभासद डॉ. गीता भागवत यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यानी विंदांच्या अनेक वाड.मयीन पैलूंची ओळख करून दिली. शिवाय पार्ल्यातील दोन साहित्यिका श्रीमती चारुशीला ओक व माधवी कुंटे यांचाही या आदरांजली कार्यक्रमात सहभाग होता. त्यानीही विंदांच्या साहित्यातील अनेक उतारे व कविता वाचून दाखविल्या.

विंदाना अनेक पुरस्कार मिळाले. त्यातील महत्वाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार त्यांच्या बहुविध वाड.मयीन कार्यासाठी मिळाला. विंदा केवळ श्रेष्ट कवीच नव्हते तर लघुनिबंध, समीक्षा, विविध ललित लेखन यातही त्यांनी लीलया संचार केला व या सार्‍याची पावती त्याना ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराच्या रूपाने मिळाली. ‘अष्टदर्शने हा त्यांचा ग्रंथ म्हणजे त्यांच्या सर्वसमावेशक प्रतिभेचा आगळा आविष्करच होता. प्रा. येवलेकर यानी विंदांच्या ‘अष्टदर्शने’ या ग्रंथाचे अनेक पैलू उलगडून दाखविले. त्यांचा हा ग्रंथ विशेषत्वाने गाजला. त्यात सात पाश्चिमात्य व एक भारतीय शास्त्रज्ञ व तत्ववेत्ते यांच्यावर अभंगरूपी भाष्य आहे. विशेष म्हणजे यातील एकमेव भारतीय तत्वज्ञ चार्वाक याच्या तत्वज्ञानासंबंधी भाष्य आहे व त्याच्यासंबंधी असलेले गैरसमज दूर करण्याचा त्यानी प्रयत्न केला आहे.

तत्वज्ञान, जीवनाचा अर्थ, जीवनाचे वास्तव ते परखडपणे मांडतात व त्यांच्या चपखल शब्दांनी रसिकांच्या मनाला ते थेट स्पर्श करतात. ‘उद्योग चिंता घालवी’, ‘स्वत:ला जिंकण्यासाठी युद्ध करावे लागते’, ‘एव्हढे लक्षात ठेवा’ हा सार्थ उपदेश, ‘सत्तेने जे मत्त जाहले’, अशा कवितांतून विंदांच्या वहुआयामी प्रतिभेचा आविष्कार प्रकर्षाने समोर येतो. ‘आम्ही द्रव्यदास’, ‘सगळे मिळून मरण्यात मौज आहे व जगण्यात ब्रह्मानंद आहे’ असा वास्तववाद ते मांडतात. ‘माझ्या मना बन दगड’ ही कविता तर सामाजिक, आर्थिक व्यवस्थेचा बळी पडणार्‍या अभागी माणसाच्या अगतिकतेवर केलेले परखड भाष्य आहे पण तोही एक दिवस बंड करुन उठेल असाही आशावाद त्यानी व्यक्त केला आहे. जीवनावर परखड भाष्य करणार्‍या विंदानी ‘झपताल’ ही भावपूर्ण कविताही लिहिली आणि कठीण परिस्थितीतही नेटका संसार करणार्‍या गृहीणीसंबंधी कृतज्ञ भावना ते या कवितेत व्यक्त करतात.

विंदांच्या काही कविता मिष्कीलही आहेत. ‘धोंड्या न्हावी’ ही त्यांच्या गावच्या न्हाव्यावरची कविता मिष्कील आहेच पण उपेक्षित, गरीबीचे जीवन जगणार्‍या माणसाच्या जीवनावरही भाष्य आहे. तसेच विनोदी ढंगाने लिहिलेल्या बालकविताही मुलाना हसवतात.

विंदा, मंगेश पाडगावकर व वसंत बापट यानी एकत्रितपणे कवितावाचनाचे जाहीर कार्यक्रम सुरु केले व त्यांना अफाट लोकप्रियता लाभली. विंदांच्या खणखणीत आवाजातली कविता ऐकणे हा एक आगळा अनुभव असे.

विंदा द्रव्यलोभापासून कोसो दूर होते. रहाणी अत्यंत साधी. मोठेपणाचे प्रदर्शन नाही. जरुरीपेक्षा अधिक पैशाची त्याना हाव नव्हती. म्हणून लाखो रुपयांच्या पुरस्कारांच्या रकमा त्यानी सामाजिक कार्य करणार्‍या संस्थाना सहजपणे देणग्या म्हणून दिल्या. गंमतीची गोष्ट अशी की कोकणी माणसाचा चिकूपणा त्यांच्यातही होता व त्यासंबंधी अनेक कथा प्रचलित आहेत. मार्क्सवादाचा पगडा त्यांच्यावर होता पण पोथीनिष्ट मार्क्सिस्ट ते कधीच नव्हते. पण त्यांच्या अनेक कवितेत सामाजिक, राजकीय व आर्थिक व्यवस्थेचे बळी ठरणार्‍या गोष्टींवर परखड भाष्य असे.

अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र या त्यांच्या ग्रंथामध्ये अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यविषयक तत्वज्ञान त्यानी उलगडून दाखविले आहे. ‘आकाशाचा अर्थ’ व ‘स्पर्शाची पालवी’ हे लघुनिबंध संग्रहही त्यांच्या बहुविध विचारांची साक्ष देतात.

‘देणार्‍याने देत जावे’ या त्यांच्या कवितेप्रमाणे मराठी मनाला ते भरभरून देत राहिले. त्यामुळे त्याना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाल्यावर प्रत्येक मराठी माणूस आनंदित झाला.

त्यानी मरणोत्तर नेत्रदान व देहदान करुन त्यांच्या त्यागी वृत्तीला भव्य उंचीवर नेऊन ठेवले. ते वाचिवीर नव्हते, कृतिवीर होते हेच खरे.

विंदांच्या एक विद्यार्थिनी श्रीमती सुनीता नागले यानी महाविद्यालयात विंदांच्या इंग्रजी शिकविण्यासंबंधी आठवणी सांगितल्या. धड्यातील पात्रे डोळ्यासमोर जिवंत करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. श्री गोविंद जोग यानी ‘माझ्या मना बन दगड’ ही कविता श्री. विश्वास डोंगरे यानी ‘फ़्राइडला कळलेले संक्रमण’ ही कविता सादर केली. श्रीमती भालेराव यानीही विंदांच्या काही कविता सादर केल्या.

सोबतीचे उपाध्यक्ष श्री. सुरेश निमकर यानी तंबी दुराइ यानी लोकसत्तेत लिहिलेल्या लेखाचे वाचन केले. विंदांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते व त्यांचा आत्मा बोलतो आहे अशा कल्पनेवर आधारलेल्या या लेखाने सार्‍याना भारावून टाकले. विंदांच्या स्नुषा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

असे होते विंदा. त्यांच्यासंबंधी लिहावे तेव्हडे थोडेच आहे. पण त्यानी ठेवलेला अमूल्य वाड.मयीन ठेवा सर्वांची वर्षानुवर्षे सोबत करील.

----- संकलक : म.ना. काळे

Thursday, May 13, 2010

हॉलंड मधील रस्ते नसलेले एक सुंदर गांव

हॉलंड मध्ये रस्ते नसलेले हे एक गांव अन त्याच्या कांही नितांत सुंदर प्रतिमा ...











Wednesday, May 12, 2010

ज्येष्ठ नागरिक आणि स्वयंशिस्त
--- डॉ. गीता भागवत


चार-पाच वर्षांपूर्वी माझ्या प्राध्यापक मुलानं मला माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून ‘मोबाइल फोन’ देउ केला तेव्हा मी त्याला कडाडून विरोध केला. पण शेवटी त्याच्या आग्रहाला बळी पडले नि ‘मोबाइल फोन’ स्वीकारला. फोन देतानाच मुलान मला तो कसा वापरायचा, त्याच्या मूलभूत प्राथमिक बाबी सविस्तर शिकून घ्यायला लावल्या. फोन स्विच ऑन-ऑफ करणं, फोन घेण-करण, फोन बुकमध्ये नांव-नंबर टाकणं-वगळण-शोधणं, तसच एसएमएस करणं-वाचणं, प्रोफाईल बदलणं, मिस्ड कॉल देणं-आलेले बघून प्रतिफोन करणं अशा सगळ्या गोष्टी मी जिद्दीने शिकले नि वापरतेही आहे. आता फोन घरी विसरले तर मला चुकल्या चुकल्यासारख वाटतं.

आपण ज्येष्ठ नागरिक पूर्वी मोबाईल वापरत नसतानाही महत्वाचे-निकडीचे व्यवहार पार पाडत होतो-वेळा पाळत होतो. मग आताच आपल्याला पदोपदी हा मोबाईल फोन का बरं लागतो? मोबाईल बाळगणं म्हणजे तरुणपणा-आधुनिकता-रुबाबदारपणा-प्रतिष्ठा असं समीकरण आपल्या मनात तयार झालं की काय? आपण मोबाईलचे भक्त-नव्हे गुलाम-झाल्यासारखं का बरं वागत असतो? खूप विचार करून, मुलाशी चर्चा करुन मी स्वत:साठी काही पथ्यं तयार केली आहेत नि ती निष्ठेनं पाळते आहे. तुम्हाला सांगू ती पथ्यं?

१) सार्वजनिक ठिकाणी - बँकेत, ग्रंथालयात, नाट्यगृहात, सिनेमागृहात, सभा-बैठकात-
आपला फोन व्हायब्रेशनवर किंवा सायलेंट मोडवर ठेवायचा.
२) शक्यतोवर एसएमएसचा वापर करायचा. सार्वजनिक ठिकाणी शेजारच्या व्यक्तीलाही कळू
न देता एसएमएस वाचता-करता येतो.
३) क्वचित तातडीने फोन घेण्याची-करण्याची गरज पडणार असेल तर सभेत -नाटकात
इतराना कमीत कमी त्रास होईल अशा जागी बसायचे, दरवाज्याजवळ, मागच्या रांगेत,
रांगेच्या कडेच्या खुर्चीवर - बसायचे.

ज्येष्ठहो, तुम्ही आणखीही काही पथ्यं सुचवलीत तर तीही पाळता येतील. पण मुळात अशी पथ्यं तुम्ही पण पाळाल? थोडं आत्मपरीक्षण कराव नि तरुणाना आपल्या वागणुकीनं आदर्श वस्तुपाठ घालून द्यावा असं नाही वाटत तुम्हाला ?


--डॉ. गीता भागवत

किती सुंदर रस्ते आहेत हे !