Saturday, June 26, 2010

ज्येष्ठ नागरिक भवन -






(हा रांगोळीने काढलेल्या चित्राचा फोटो आहे.)



ज्येष्ठ नागरिक भवन - उद्घाटन सोहळा

गेल्या तीस पस्तीस वर्षात ज्येष्ठ नागरिक संघटित होऊ लागले आणि महाराष्ट्रात लहान मोठ्या शहरात/गावात अनेक ज्येष्ठ नागरिक संघांची स्थापना झाली. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक संघांचा ‘फ़ेस्कॉम’ (FESCOM) या नावाने महासंघ स्थापन झाला. तसेच अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघांचा ‘आयस्कॉन’ (AISCON) हा महासंघ स्थापन झाला. या महासंघांतर्फे ज्येष्ठ नागरिक संघाना मार्गदर्शन मिळतेच. शिवाय त्यांच्या अनेक समस्या व मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न केले जातात. सध्या महाराष्ट्रातील १८०० ज्ये.ना. संघ फ़ेस्कॉमशी संल्लग्न आहेत. विशेष म्हणजे ८६ संघ फ़क्त महिलांचे आहेत तर ४३ संघांच्या अध्यक्ष महिला आहेत.

साहजिकच वरील महासंघांमध्ये समन्वय साधण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आवश्यक होते. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले. आयस्कॉन/फ़ेस्कॉम मध्ये गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले डॉ.शं.पां. किंजवडेकर व त्यांचे सहकारी यानी नवी मुंबई येथे मध्यवर्ती कार्यालयाची स्वतंत्र इमारत असावी या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. सुदैवाने नवी मुंबई, नेरूळ येथे सिड्कोने सवलतीच्या दराने एक प्लॉट उपलब्ध करून दिला. वरील पदाधिकार्‍यानी अथक परिश्रमाने इमारत फंड जमा करण्यास सुरुवात केली. अनेक ज्येष्ठ नागरिक संघ, वैयक्तिक देणगीदार यांच्या सहयोगाने देणग्या मिळून २००६ साली इमारतीचे बांधकाम सुरु झाले. परंतु महागाईमुळे जमविलेले फंड अपुरे पडू लागले व त्यामुळे इमारत बांधणीला आवश्यक गती येत नव्हती. सुदैवाने महाराष्ट्र शासनातील एक ज्येष्ठ मंत्री मा. गणेश नाईक यानी भरघोस मदतीचा हात दिल्याने इमारतीचे बहुतेक काम पुरे झाले. दिनांक ७ जून रोजी मा. गणेश नाईक यांच्या हस्ते ‘ज्येष्ठ नागरिक भवन’ या वास्तूचे दिमाखात उद्घाटन झाले आणि संबंधितांच्या प्रयत्नांना मूर्त स्वरुप आले.

या उद्घाटन समारंभाला सोबतीच्या वतीने श्री. मुकुंद पेठे, अध्यक्ष, श्री. विश्वास डोंगरे, कार्याध्यक्ष व श्री. म.ना. काळे, सभासद हे उपस्थित होते.

या ज्येष्ठ नागरिक भवनाला तळमजला अधिक वर दोन मजले आहेत. पहिल्या मजल्यावर सभागृह आहे.
या इमारतीत डेकेअर सेंटर, वाचनालय, संगणक विभाग, वैद्यकीय तपासणी व उपचार. फ़िजियो थेरापी अशा सुविधा प्रस्तावित आहेत.

ज्येष्ठ नागरिक भवनाच्या उद्घाटनाबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिक संघांचा समन्वय अधिक सुलभ होईल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होईल.

No comments: