Tuesday, April 15, 2008

साद - प्रतिसाद

श्री. नारायण जुवेकर हे आमचे आणखी एक ज्येष्ठ सभासद. हेहि कित्येक वर्षांपासून कविता करीत आहेत व आम्हाला ऐकवीत आहेत. मी त्याना थट्टेने सोबतीचे ’राजकवि’ म्हणतों. त्यांची एक ताजी कविता देतो आहे. (लेखन दिनांक ०२-०४-०८)

साद-प्रतिसाद

काव्याच्या त्या मैफलीसाठी
कविवर्यांना निमंत्रिले ---
निर्विकार ते श्रोते बघुनी
कविवर सारे हादरले ॥ १ ॥

पहिल्या फेरित शृंगाराला
परोपरीने आळविले
परि श्रोत्यांनी मौनामधुनी
हिशेब सारे चुकवीले ॥ २ ॥

दुसऱ्या फेरित मग सर्वांनी
निसर्गकाव्ये रंगविली
निसर्ग हाका ऐकुनि श्रोते

हळुच दाविती करांगुलि ॥ ३ ॥

तिसऱ्या फेरित प्रत्येकाने
घोळुन म्हटली चारोळी ----
साद घालण्यासाठी कोणी
हळुच मारिली आरोळी ॥ ४ ॥
चवथ्या वेळी कविवर्यांनी
शेर मृत्यूचे सुनावले
श्रोत्यांनी मग गाढ झोपुनी
नाट्य त्यातले अनुभवले ॥ ५ ॥
शेवटचे ते शस्त्र म्हणॊनी
गझल शोधिले त्या कविंनी
वडे संपतिल या भीतीने
श्रोते उठले खुर्चितुनी ॥ ६ ॥
अशी पांगली मैफल सारी
कविही सारे बचावले
हात जोडुनी वदले सारे
’आज वड्यांनी वाचवले’ ॥ ७ ॥

4 comments:

कोहम said...

wah wah...pharach chaan

xetropulsar said...

हे हे. . . असं होतं खरं. . .इकडेही बऱ्याच कार्यक्रमांना जाण्यामागे 'खादाडी' हा एकच हेतू असतो. . .

मोरपीस said...

खरच, ’सोबती’ फ़ारच मस्त आहे.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

श्री. जुवेकर व सोबती तर्फे धन्यवाद. सोबतीवर लोभ ठेवा१