
श्री. सुरेश निमकर - वक्त्याचा परिचय करून देताना

डॉ. गिरीश जाखोटीया हे नावं ऐकल्याबरोबर एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते. ‘एका मारवाड्याची गोष्ट’, ‘वंश’ या गाजलेल्या कादंबर्यांचे लेखक डॉ.गिरीश जाखोटीया यांचे भाषण ऐकण्याचा अपूर्व योग दि. १४ जुलै २०१० च्या साप्ताहिक सभेत सोबती सभासदाना आला.
सोबतीचे उपाध्यक्ष श्री. सुरेश निमकर यांनी डॉ. जाखोटिया यांचा विस्तृत परिचर करून दिला व मग डॉ. जाखोटिया यांनी प्रसन्न मुद्रेने आपल्या भाषणास सुरवात केली. ओघवती भाषा, नर्मविनोदांची पखरण, विषयाचे सखोल ज्ञान व चिंतन यामुळे ‘वक्ता दशसहस्रेषु’ या सुभाषिताचा प्रत्यय आला. आपल्या भाषणात त्यानी अनेक विषयांचा परामर्ष घेतला.
लिखाणासंबंधी ते म्हणाले की ज्येष्ठानी आपल्या अनुभवांवर आधारित लिखाण करावे ज्यामुळे त्या लिखाणाला अधिक विश्वासार्हता येईल.
व्यवसाय करणार्यानी कुटुंबामध्ये समन्वय साधायला हवा. कुटुंबामध्ये जर चांगला समन्वय असेल तर व्यवसायामध्येही त्याचे प्रतिबिंब पडते. अहंकार हा व्यवसायाचा मोठा शत्रू आहे. अहंकार बाजूला ठेवून जर व्यवसाय केला तर संघर्षाचे प्रश्न उद्भवणार नाहीत. संघर्षाकडे चौफेर व सकारात्मक वृत्तीने पाहिजे तरच संघर्षातून संवाद निर्माण होईल.
मराठी मुले व्यवसायात मागे आहेत. परंतु आता परिस्थिती बदलत आहे.नवीन पिढी आता व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत व यशस्वीही होत आहे. मात्र त्यानी अधिक धाडशी व्हायला हवे. प्रसंग येता ज्याप्रमाणे परशुरामाने शस्त्र हाती धरले तसे इतर गोष्टींचा बाउ न करता मराठी मुलानी धाडसाने पावले टाकली पाहिजेत. व्यवसाय म्हटला की त्यातल्या युक्त्या व खुब्या आत्मसात करायला हव्यात. तरच ते इतरांशी स्पर्धा करून व्यवसायात यशस्वी होतील.
व्यवसाय म्हटला की त्यामध्ये अनेक माणसांचा सहयोग आवश्यक असतो. त्यासाठी एक नेटवर्क बनविणे आवश्यक असते ज्यायोगे परस्पर देवाण घेवाण सुलभ होते. शिवाय व्यावसायिकांमध्ये बेरकीपणा, अर्थात सकारात्मक, यायला हवा. व्यवसायात अहंकार, अस्मितेचा विचार बाजूला ठेवायला हवा. नीतीच्या घट्ट चौकटीमध्ये बसून चलणार नाही. लवचिकता, व्यवहार या गोष्टी महत्वाच्या आहेत. अप्रामाणिकपणा न करताही व्यावसायिकता अंगी बाणवली तर यश मिळू शकते.आज भाषा, संस्कृति यांची अस्मिता राखण्याची चर्चा होते. पण विश्वाला कवेत घ्यायचे असेल तर अस्मितेच्या मर्यादेत फारसे काही करता येणार नाही.
बाह्य मन व अंतर्मन याचा विचारही आवश्यक आहे. बाह्य मन कोणत्याही बाबतीत चटकन प्रतिक्रिया देते. पण अंतर्मन मजबूत असेल तर मनाला योग्य मार्गदर्शन मिळू शकते.
डॉ. जाखोटीया यानी कृष्णनीती्वर विशेष भर दिला.कृष्ण आवश्यक तेथे प्रेमाने वागत असे, प्रसंगी व्यावहारिक नीतीचा अवलंब करीत असे तर प्रसंगी कर्तव्यकठोरही होत असे. म्हणून तो महान पदाला पोहोचला. अशा कृष्णनीतीची आज आवश्यकता आहे. देवाच्या बाह्य दर्शनापेक्षा देवाला अंतर्मनामध्ये पाहिला तर जीवनात समाधान मिळते. त्यांच्या मते व्यवसायातील मानसिकता अंगी बाणणे आवश्यक आहे. ती असेल तर व्यवसायात यश निश्चित असते.
डॉ. जाखोटिया मूळचे राजस्थानी (त्यांच्या भाषेत मारवाडी) असले तरी त्यांच्या चार पिढ्या महाराष्ट्रात गेल्याने व त्यांची पत्नी मराठी असल्याने मराठी मानसिकता, मराठी भाषा व संस्कृति यांच्याशी ते पूर्णपणे एकरूप झाले आहेत. याचे प्रतिबिंब त्यानी
लिहिलेल्या पुस्तकांत पडले आहे. त्यांच्या ‘एका मारवाड्याची गोष्ट’ या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या अल्प काळामध्ये निघाल्या ही त्यांच्या लेखनशैलीची पावतीच म्हणावी लागेल. त्यांची ‘वंश’ ही कादंबरीही अशीच लोकप्रिय झाली आहे. अनेक प्रतिथयश कंपन्यांचे व्यग्र आणि यशस्वी व्यवसाय सल्लागा्र असूनही त्यानी लेखनाचा व्यासंगही जोपासला आहे व त्याना लेखक व वक्ता म्हणून मिळालेली लोकप्रियता स्पृहणीय आहे.
त्यांच्या भाषणाचे वैशिश्ट्य म्हणजे ते ज्या ‘मारवाडी’ समाजाचे आहेत त्या समाजावर आधारित विनोदही करतात. त्यांचे भाषण क्षणभरही कंटाळवाणे वाटत नाही. ते केवळ व्यवसायाबद्दल बोलत नाहीत तर मानवी प्रवृत्ती, आशा आकांक्षा , प्रत्येक समाजाची वैशिष्ट्ये व वैगुण्य यांचाही उहापोह ते भाषणात करतात.
त्यांच्या आणखी दोन कादंबर्या - एक मराठी व एक इंग्रजी येउ घातल्या आहेत व त्याही लोकप्रिय होतील यात शंका नाही.
जागतिक मंदी असूनही भारतावर तिचा फारसा परिणाम झाला नाही याचे कारण काय असा प्रश्न विचारला असतां त्यांच्या मते भारतीयांमध्ये असलेली बचतीची सवय व अमेरिकन लोकांच्या तुलनेत आपण फार कमी चंगळवादी व खर्चिक आहोत हे आहे.