Saturday, August 22, 2009

सभासदांचे विविध कार्यक्रम भाग - २
बुधवार दि. ५ ऑगस्ट २००९ रोजी सभासदानी आपले विविध कार्यक्रम सादर केले.
श्रीमती जयश्री तांबोळी यानी आचार्य अत्रे यांच्या विडंबन कविता सादर केल्या. श्रीमती विद्या पेठे यानी पु.ल. देशपांडे यांच्या घरच्या मैफलीत कानडी हेलातल्या मराठी बोलणार्‍या बाईची नक्कल ठसक्यात सादर केली. अर्थात हे पात्र पु.लं च्या लेखणीतून उतरल्यामुळे त्यात अधिकच रंगत आली.
सोबतीच्या अनेक कार्यक्रमात संगीताला नेहमीच प्राधान्य असते व सोबतीमध्ये सुस्वर आवाज लाभलेले अनेक सभासद आहेत. राखी पौर्णिमेवरचे एक गीत श्रीमती विद्या पेठे, श्रीमती नंदा देसाई व श्रीमती सुनिता क्षीरसागर यानी एकत्रितपणे गाउन बहार आणली. श्रावणात घननीळा, केतकीच्या बनी, अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, हृदयी जागा तू अनुरागा, राधा ही बावरी ही सदा बहार गाणी श्रीमती विद्या पेठे, नंदा देसाई व सुनिती क्षीरसागर यानी आपल्या सुमधुर आवाजात सादर केली. तबल्यावर श्री. मुकुंद पेठे व पेटीवर श्री. मधुकर देसाई साथीला होते.
श्री. विश्वास डोंगरे हे कीर्तनकारही आहेत. विठुरायानी नेहमी कंबरेवर हात का ठेवलेले असतात यावर पंढरीनाथ दप्तरदार यानी लिहिलेला अभंग सादर केला व आपल्या नेहमीच्या ढंगात दुसरी अनेक उदाहरणे देउन या विषयावर सुंदर विवेचन केले. या सर्वाचे सार म्हणजे अनन्य भक्तिभाव हेच आहे.
श्री सुरेश निमकर यानी ’ हास्यस्फोट ’ हा अनेक विनोदी किस्से व विनोद यानी ठासून भरलेला कार्यक्रम सादर केला. पुणेरी पाट्या, बायका यांवर आधारित अनेक विनोद सांगून त्यानी श्रोत्यांचे चांगले मनोरंजन केले.

No comments: