Wednesday, September 16, 2009

किस्से आणि कविता

किस्से आणि कविता
दि. ९ सप्टेंबर रोजी श्री गजानन भास्कर मराठे यांचा ‘किस्से व कविता’ हा कार्यक्रम झाला.
श्री मराठे, वय वर्षे ७९, मुंबई येथील BEST या उपक्रमातून सचिव या पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ सेवेत त्याना आलेले अनुभव व भेटलेली नाना प्रकारची माणसे यांवर आधारित त्यानी अनेक रंजक हकिगती व किस्से सांगितले.
एक किस्सा होता ते परदेश प्रवासाला गेले होते त्यावेळचा. प्रवाशांमध्ये एक स्त्री एका पुरुषाबरोबर आली होती परंतु तो तिचा पति नव्हता. पण तिला ओळखणारी एक स्त्री प्रवासी निघालीच आणि तिची फारच पंचाईत झाली.
श्री मराठे सेवानिवृत्तीनंतर बंगाली भाषा शिकले. त्यानी त्या भाषेच्या दोन परिक्षाही दिल्या. त्यासंबन्धी शाळेत जाणार्‍या त्यांच्या नातवांशी होणारे संवाद त्यानी सांगितले ते मजेशीर होते. त्यानी बंगाली भाषेची काही वैशिष्ट्येही सांगितली. बंगाली भाषा समृद्ध व कानाला गोड लागणारी आहे असे त्यानी आवर्जून सांगितले.
लग्नानंतर बरीच वर्षे ते चाळीत रहात होते. परंतु त्यांच्या पत्नीला चाळीत रहाण्याचा कंटाळा आला होता. त्यासंबंधी त्यानी आपली व्यथा ‘येउ कशी कशी मी नांदायला’ या धर्तीची कविता करून ती श्री. मराठे याना ऐकवली. कवितेत धमकी होती माहेरी जाण्याची आणि फ़्लॅट घेईपर्यंत परत न येण्याची. या कवितेला सर्वानी चांगली दाद दिली.
त्यांच्या नात्यातल्या दोन वृद्ध स्त्रियानी प्रथमच विमान प्रवास केला. विमान उशिरा सुटणे याची त्यानी एस.टीशी तुलना केली. हवाई सुंदरीशी झालेला त्यांचा संवाद व त्यानी तिला दिलेला संल्ला असे अनेक मजेशीर किस्से त्यानी सांगितले.
बेस्टमधील एका हरकामी कर्मचार्‍याची हकिगत पु.लंच्या ‘व्यक्ति आणि वल्ली’ यातील नारायण या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीची आठवण करून देणारी होती.
शिपाई म्हणून बेस्ट मध्ये सेवेला सुरुवात करुन पुढे शिक्षण घेउन व मेहेनतीने वरिष्ठ पदापर्यंत तो पोहोचला. पण त्याची एवढीच ओळख नव्हती. कुणाचे काही काम असले आणि त्या नारायणाला सांगितले की तो म्हणे ‘ काळजी नको. काम होईल ’ आणि लागेल त्या लटपटी खटपटी करून तो ते काम करुन देई. याचे कारण त्याचा जनसंपर्क दांडगा होता आणि नवीन संबंध जोडण्यात तो हुशार होता. पासपोर्ट कार्यालय, रुग्णालये, पोलीस खाते, शाळा, महाविद्यालये अशा अनेक ठिकाणी त्याने माणसे जोडली होती. आदबशीर, गोड व आर्जवी वाणी आणि काम होण्यासाठी पडतील ते कष्ट करण्याची तयारी त्यामुळे विशेषत: अधिकारी वर्गात तो लोकप्रिय होता. ही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा लक्षात रहाणारी ठरली.
एकंदरीत हा कार्यक्रम सोबती सभासदाना आगळे समाधान देउन गेला.

No comments: