Friday, September 25, 2009

विद्यार्थी गौरव
सोबतीचा ‘ विद्यार्थी गौरव ’ हा एक महत्वाचा समारंभ दरवर्षी साजरा होतो. या वर्षी हा कार्यक्रम दि. १६ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. ‘ विद्यार्थी सहाय्य निधी ’ असा कायम स्वरूपी निधी सोबतीने निर्माण केला आहे व त्यावरील व्याजातून विद्यार्थी गौरव समारंभात विद्यार्थ्याना पारितोषिके दिली जातात. दर वर्षी अनेक सोबती सभासद व सोबतीचे हितचिंतक या निधीसाठी देणग्या देत असतात.
पारितोषिके देण्यासाठी विद्यार्थी निवडताना सामाजिक दृष्टी ठेवली जाते. पार्ल्यात काही अशा शाळा अहेत ज्यांमध्ये आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिकत असतात. त्याना आर्थिक मदत व्हावी, उत्तेजन मिळावे व त्यांचे कौतुक व्हावे हा यामागे हेतू असतो. विद्यार्थी निवडताना हा निकष प्रामुख्याने विचारात घेतला जातो.
या समारंभाचे अध्यक्षस्थान हेतुपूर्वक एका बुद्धिवान महाविद्यालयीन विद्यार्थिनी कुमारी अनुजा जोशी हिला देण्यात आले होते. दहावीपर्यंतच्या परीक्षांमध्ये पहिल्या तीन विद्यार्थी/विद्यार्थिनीना अध्यक्षांच्या हस्ते रोख पारितोषिके देण्यात आली. आपल्या पाल्यांचे कौतुक पहाण्यासाठी काही विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये पार्ल्यातील उत्कर्ष मंडळातील मूक कर्णबधीर शाळेतील एक विद्यार्थिनीही होती.
या समारंभात सोबती सभासदांच्या नातवंडांचेही कौतुक केले जाते. ठरलेल्या निकषांप्रमाणे ज्या नातवंडानी चांगले यश संपादन केले होते त्यानाही पारितोषिके देण्यात आली.
काही विद्यार्थी/विद्यार्थिनीनी कविता, गीते, नाट्यप्रवेश सादर केले व आपल्यातील कलागुणांचा परिचय करुन दिला.
समारंभाची अध्यक्श या नात्याने कुमारी अनुजा जोशी हिने पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व यापुढेही हे विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे तर इतर बाबतीतही चमकतील अशी आशा व्यक्त केली. तिने पुढे सांगितले की केवळ डॉक्टर, इंजिनीयर होण्याच्या मागे न लागता मुलानी मातृभाषा व इतर भाषांचाही अभ्यास करावा. शिवाय इतिहास व इतर अनेक कलांचा अभ्यासही त्यानी करावा. सध्याच्या काळात अशा कलानाही महत्व प्राप्त झाले आहे.
कॉफीपानाने समारंभाची सांगता झाली.

No comments: