Wednesday, March 25, 2009

नाट्यदर्शन .

नाट्यदर्शन - संगीत ‘ कुलवधू ’

बुधवार दि. ४ मार्च २००९ रोजी सोबतीच्या साप्ताहिक सभेमध्ये ‘संगीत कुलवधू’ या नाटकावर आधारित कार्यक्रम झाला. श्री. मो.ग. रांगणेकर लिखित या नाटकाची मूळ संकल्पना कायम ठेवून केवळ दीड तासात बसेल अशी कार्यक्रम-सहिता तयार करणे, नाटकाचे कथानक आणि संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हे खरे तर आव्हानच होते. परंतु सोबतीचे एक ज्येष्ठ, व्यासंगी व कलाप्रेमी सभासद श्री. प्र.सी. साठे यानी त्या दृष्टिकोनातून नाटकाची पुनर्मांडणी करून श्रोत्यांची वाहवा मिळविली.

सोबतीचे सभासद श्रीमती विद्या पेठे आणि श्री. अरविंद वाकणकर यानी संगीताची बाजू उत्तम रीतीने संभाळलीच पण त्याचबरोबर आवश्यक तेथे अभिनय व संवादकौशल्यही दाखविले. पार्वतीची भूमिका सौ. स्नेहल वैशंपायन यानी नेटकेपणाने वठविली.

कथानकाला आवश्यक तेवढीच पात्रे घेतल्यामुळे निवेदनातून कथानक उलगडून दाखविणे खरोखरच अवघड होते. परंतु सोबतीच्या एक ज्येष्ठ व यशस्वी कलाकार सभासद श्रीमती सुनंदा गोखले यानी आपल्या सुस्पष्ट व लयबद्ध निवेदनशैलीतून नाट्यकथानक समर्पकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले.

सोबतीच्या रसिक सभासदांची या नाट्यदर्शनाला उत्स्फूर्त दाद मिळाली.

Monday, March 23, 2009

अबोल समाजसेवा - बोलक्या पत्रांद्वारे

चंद्रकांत परांजपे, सोबतीचे एक ७७ वर्षीय ज्येष्ठ सभासद. शिक्षण: द्विपदवीधर - बी.एस्सी व बी.ए. निर्वाहासाठी भारत सरकारच्या महालेखाकार (महाराष्ट्र - A.G's office) कार्यालयात एकूण ३८ वर्षे सेवा करून १९९० मध्ये ते निवॄत्त झाले.
मात्र त्यांची एवढीच ओळख नाही. शासनाच्या सेवेत असल्याने राजकारणाच्या विषयांपासून दूर राहून त्यानी एक आगळी
समाजसेवा केली, अजूनही करीत आहेत. ती म्हणजे पत्रव्यवहाराद्वारे अनेक सार्वजनिक हितांच्या बाबींवर संबंधितांशी पत्रव्यवहार करणे. आवश्यक तेथे त्यानी उच्चपदस्थांपर्यंत पाठपुरावाही केला. परिणामी अनेक लोकहिताचे निर्णय संबंधितानी घेतले, अनेक बाबीत सुधारणाही अंमलात आल्या. सर्व पत्रव्यवहार बहुतेक इंग्रजीत, स्वहस्ताक्षरात आणि स्वखर्चाने.
त्यांचे उल्लेखनीय कार्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे केंद्र शासनाकडून सेल्युलर जेल, अंदमान येथे प्रसारित केले गेलेले
पो्स्टाचे तिकिट. त्यासाठी त्यानी अनेक शासकीय स्तरांवर पत्रव्यवहार केला - अगदी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत. महत्प्रयासाने त्यात त्याना यश आले. विशेष म्हणजे त्यावेळी ते अंदमानमध्ये डेप्युटेशनवर होते व सदर तिकिटाच्या वितरणाचा सोहळा पहायला ते जातीने उपस्थित होते. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या ३००व्या राज्यारोहण समारंभ स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट रायगडावरून वितरित केले गेले. त्यामागे श्री. परांजपे यांचे प्रयत्न होते.
पत्रलेखनाद्वारे त्यानी अनेक सार्वजनिक हिताच्या बाबी साध्य करून घेतल्या. अशी लहानमोठी अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी काही उल्लेखनीय म्हणजे :
१) सन १९५७ मध्ये मुंबई विश्वविद्यालयाने शंभर वर्षे पूर्ण केली. पण त्याचे बोधचिन्ह बदलले गेले नव्हते. १९५४ पासु्न श्री. परांजपे यानी त्यासंबंधी पत्रव्यवहार केला व मुंबई विश्वविद्यालयाला ‘ शीलवृत्त फला विद्या ’ हे भारतीय बोधचिन्ह दिले गेले.
२) मुंबईतील ‘बेस्ट’ या वाह्तुकीचे अनेक मार्ग अक्षर विल्हेवारीने दाखविले जात. त्यांच्या सूचनेवरून ते क्रमांकात बदलले गेले.
३) अंदमानमध्ये असताना काही कारणाने रु. १०० व रु. १० च्या दरम्यान चलनी नोटा असाव्यात अशी त्याना कल्पना सुचली. त्यानुसार त्यानी संबंधित खात्याशी पत्रव्यवहार व प्रयत्न केले व त्यांची सुचना मान्य होऊन रु. २० व रु. ५० च्या चलनी नोटा चलनात जारी करण्यात आल्या.
४) रु.२० च्या वर देणे घेणे यासाठी रेव्हिन्यू स्टँप लावावे लागत. ही मर्यादा वाढवावी ही त्यांची सूचना २००४ मध्ये मान्य झाली.
त्यानी पत्रव्यवहाराद्वारे घेतलेल्या विषयांची यादी केली तर अनेक पाने भरतील. समाधानाची बाब म्हणजे त्यांच्या विधायक सूचनांना अनेक स्तरांवर दाद मिळाली व त्यातून सार्वजनिक हिताच्या अनेक बाबींवर निर्णय घेतले गेले.
या कार्यासाठी त्याना काही पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. ‘ निष्काम कर्मयोग ’ हे त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे. अविवाहित असल्याने त्याना स्वतःच्या संसाराचे पाश नाहीत पण अनेक नातेवाईकाना त्यांचा आधार आहे. त्यांच्या या निर्व्याज व सुस्वभावी वृत्तीमुळे सार्‍यांचा प्रेम व आदर त्यानी संपादन केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते निष्ठावंत स्वयंसेवक आहेत.
समाजासाठी काही करण्याची आवड असलेल्या सर्वानाच एकाद्या संस्थेतर्फे कार्य करण्याची संधी मिळतेच असे नाही.परंतु
शासनाच्या नोकरीतील बंधने पाळून पत्रव्यवहाराद्वारे अनेक सार्वजनिक हिताच्या बाबींवर अनुकूल निर्णय प्राप्त करून घेण्यात ते यशस्वी झाले. सेवानिवृत्तीला अठरा वर्षे झाल्यावरही त्यांचे हे पत्रव्यवहाराचे व्रत अखंड चालू आहे.
श्री. चंद्रकांत परांजपे यांची ही अबोल समाजसेवा आगळी आणि कौतुकास्पद म्हणावी लागेल.

Saturday, March 14, 2009

आनंद मेळावा सहल - २७ फेब्रुवारी २००९


सहलीतील महिला


सहलीतील सर्व सहभागी


बोटीची प्रतीक्षा


बोटसहल


सोबतीची आनंद मेळावा सहल
निसर्गाच्या संगतीत एक आनंददायी अनुभव

यंदाची आनंद मेळावा सहल २७ फ़ेब. २००९ रोजी कोलाड जवळील ‘ डॉक्टर्स फ़ार्म रिसॉर्ट या निसर्गरम्य ठिकाणी गेली होती. रिसॉर्टचे मालक डॉ. मिरजकर तेथे दिवसभर उपस्थित होते. विशेष म्हणजे सव्वीस सभासदांपैकी तेरा महिला सभासद होत्या. सोबतीच्या प्रत्येक सहलीत महिला सभासद मोठ्या संख्येने सामील होतात हे एक सोबतीचे वैशिष्ट्यच आहे.
रिसॉर्टवर पोहोचल्यावर चविष्ट गरमागरम नाश्ता व चहा/कॉफी यांचा आस्वाद घेऊन सारेजण ताजेतवाने झाले.
रिसॉर्टजवळ भरपूर पाणी असणारी दुथडी वाहणारी कुंडलिका नदी आहे व त्यामुळे रिसॉर्टला आगळी शोभा आली आहे. नदीत बोटींगची सोय असल्याने अनेकानी बोटींगचा अनुभव घेतला व काहीनी उत्स्फूर्तपणे गाणी व कविता म्हटल्या. रिसॉर्टमध्ये एक कृत्रीम धबधबा व पोहण्याचा तलाव आहे. काही उत्साही सभासदानी धबधब्याच्या धारेखाली बसण्याचा व पोहण्याचा आनंद घेतला. काही महिलानी झोपाळ्यावर बसून झोके घेण्याची मजा अनुभवली.

रिसॉर्टवर परत आल्यावर काही वेळ सभासदांच्या गप्पा झाल्या. त्यावेळी क्रिकेटची मॅचही चालू होती. नंतर रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊन सर्वानी थोडी विश्रांती घेतली.
नेहमीच्या प्रथेप्रमाणे सभासदांचे विविध कार्यक्रम झाले. कार्यकारिणी सदस्या श्रीमती सुनंदा गोखले यानी कार्यक्रमाचे संचालन केले व अनेक सभासदाना बोलते केले. या कार्यक्रमात अनेकांचे कलागुण दिसून आले. गोष्टी, कविता, गाणी, शब्दकोडी, आगळ्या अनुभवांचे कथन, नाट्यछटा, पथनाट्य, संगीत अशा विविध विषयांवर बहारदार कार्यक्रम झाले. गरमागरम कांदा भजी व चहा/कॉफी यांच्या आस्वादाने कार्यक्रमात अधिकच रंग भरला.प्रदूषणमुक्त वातावरण, रिसॉर्टजवळील मोठी वाहती नदी व निसर्गरम्य परिसर यामुळे साठ ते पंचाऐशी वयापर्यंतच्या सभासदानी निसर्गाच्या सान्निध्यात एक आननंददायी दिवस घालवून उल्हसित मनाने सारेजण रात्री पार्ल्याला परतले.

वरील फोटो सोबती सभासद श्री. पतके यांनी काढलेले आहेत.

Friday, March 06, 2009

वय झाले. जरा जपून

सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद श्री. गोविंद जोग यांची खालील कविता लहान असली तरी तिचा आशय मोठा आहे. नागरिक वयाने जरी ज्येष्ठ झाले तरी वाढत्या वयात शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य यांच्यासाठी काही गोष्टींची जपणूक आवश्यक ठरते. कसे ते श्री. जोगांच्या शब्दात वाचा.

ज्येष्ठत्वात जरुरीची जपणूक

खाताना तुम्ही हात आंवरा, चर्वणात पण उणिव नको ।
वाहनवापर कमीच ठेवा, चालण्यात परी कसर नको ॥
उगा ललाटी नकोत आंठ्या, सुहास्यवदना खीळ नको ।
जपुन वापरा शब्दशस्त्र तुम्ही, चिंतनात कधी खंड नको ॥
टीका करता संयम ठेवा, हाती सदा नवनिर्मिती घडो ।
उगा न गुंता विचारमंथनी, सत्कृतीचा ना विसर पडो ॥

कवी: गोविंद जोग