Thursday, January 21, 2010

पुल - साठवणीतल्या आठवणी

महाराष्ट्र सारस्वताचे आराध्य दैवत पु.ल. देशपांडे हे पूर्ण नांव न घेता पुल म्हटले की मराठी माणूस पुलकित होतो. त्यांच्या लेखणीचा संचार वाङमयाच्या प्रत्येक प्रांतात झाला. वाङमयाव्यतिरिक्त, संगीत, चित्रपट, नाटक यांतले त्यांचे योगदान अद्वितीय आहे. सोबत उत्तम अभिनय व वक्तृत्व यांचीही जोड मिळाल्याने मराठी समाज जीवनासाठी एक अमूल्य ठेवा ते ठेवून गेले. त्यामुळे त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंची गोडी पुनः पुन्हा चाखली तरी ती अवीटच असते. त्यांचे दातृत्व तर ‘ दाता भवती वानवा ’ असेच आहे.

या सार्‍याना उजाळा देण्यासाठी सोबतीच्या उत्साही सभासदानी ‘ पुल - एक साठवण ’ हा कार्यक्रम आयोजित केला व पुलंचे अनेक वाङमयीन पैलू सादर केले व सभाससाना काव्य, शास्त्र, विनोद यांचा आगळा आनंद दिला.

पुल एक उत्तम पेटी वादक होते. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी त्यांचे ध्वनिमुद्रित पेटीवादन ऐकवून कार्यक्रमाची वातावरण निर्मिती केली गेली. त्यानंतर त्यानी संगीतबद्ध केलेली अनेक ध्वनिमुद्रित चित्रपट गीतेही ऐकविण्यात आली. संगीतकार पुल ही आठवण ताजी झाली.

‘व्यक्ती आणि वल्ली’ या त्यांच्या पुस्तकातील ‘ अंतू बर्वा ’ हे शब्दचित्र सौ. रेखा चिटणीस यानी आवश्यक तेथे कोकणस्थ ब्राह्मणी ठसक्यात सादर केले.

नंतर पुलंच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातील एक प्रवेश सादर करण्यात आला. श्री. विजय पंतवैद्य, श्री. प्रभाकर देवधर, सौ. उषा देवधर, सौ. रेखा चिटणीस, सौ. ठोसर यानी हा प्रवेश उत्तम वठविला.

पुलंच्या ‘बटाट्याची चाळ’ मधील वजन कमी करण्यासाठी अनेक रहिवाश्यानी केलेल्या डाएट संबंधीच्या भन्नाट सूचनांवर आधारित विनोदी लेख ढंगदारपणे साद्रर करण्यात आला आणि ‘बटाट्याची चाळ’ मधील त्यांच्या एकपात्री प्रयोगाची आठवण ताजी झाली.

पुल दोन अर्थाने ‘कोट्याधीश’ होते - एक त्यानी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक देणग्या सामाजिक व शैक्षणिक संस्थाना दिल्या व त्याही कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर राहून. दुसरे म्हणजे त्यांची शाब्दिक कोट्या करण्याची अपूर्व हातोटी. श्री. विजय पंतवैद्य यानी पुलंच्या अनेक शाब्दिक कोट्या ऐकवून ‘कोट्याधीश’ पुलंची आठवण करून दिली.

पुलंचे अफाट कर्तृत्व मोजक्या वेळात उलगडून दाखविणे खरोखरच कठीण आहे. तरीही हा कार्यक्रम पुलंच्या आठवणीना उजाळा देउन गेला.

No comments: