Sunday, January 31, 2010

शब्द माझे सोबती

मी एक सोबती . १४ वर्षे सभासद . नांव प्रभाकर भिडे . वय वर्षे ७७ . भारतीय रेल्वेतून सेवानिवृत्त . ३३ वर्ष सेवेनंतर . शिक्षण बी . ए . स्पेशल ( अर्थशास्त्र ) . ही डिग्री नाममात्र . कारण कोणत्याच विषयांत प्राविण्य नाही . पण सर्व प्रांतात लुडबूड . एक १३ वर्षाच्या मुलाप्रमाणे . केवळ कुतूहला पोटी . त्याचाच एक भाग , शब्दांच्या प्रांतातला . तो म्हणजेच = " शब्द माझे सोबती ."
ऐका तर आणि पहा , पसंतीस उतरते का !
शब्द जरी क्वचित प्रसंगी "एकाक्षरी " आढळले तरी बहुतांशी दोन किंवा अधिक अक्षरांनी बनतात . स्वर आणि व्यंजनानी युक्त .
आई हा एकच शब्द फक्त स्वरांनी ( अ -> अ: ) बनतो . तो सुरांच्या प्रांतातला म्हणजेच देवत्व पावलेला आहे . इंग्रजीत एक म्हण आहे - " Because God could not be everywhere , He created mothers ." मी एक गंमत म्हणून " अ पासून अ: " पर्यंतच्या स्वरांना सुरांचा किंवा देवांचा प्रांत समजतो . " क वर्गापासून प- वर्गातल्या म " या व्यंजनापर्यंतच्या प्रांतास " मानवांचा प्रांत " असे म्हणतो तर " य पासून ज्ञ " पर्यंतच्या मिश्र व्यंजनांच्या प्रांतास - राक्षसांचा प्रांत असे संबोधतो - या संबंधी पुढे कधीतरी बोलू .
सध्या सुरुवात म्हणून मराठी व इंग्रजी भाषेतील कांही शब्दांकडे आपण पाहणार आहोत .
" आई आणि माता "
’ पुत्राचे सहस्र अपराध - माता काय मानी तयाचा खेद ’ ही काव्यपंक्ती तिच्या क्षमाशीलतेची द्योतक - जसे असणे फक्त परमेश्वरालाच शक्य आहे .
वास्तविक ’ माता ’ शब्दा ऐवजी ’आई ’ हा शब्द हवा होता असे मला वाटतें . कारण मुलाला चांगले घडविण्याची ताकद ज्या शब्दाने व्यक्त होते तो माता हा शब्द - अत्यंत मृदू अनुनासिक " म " व अत्यंत कठोर व्यंजन ’त’ पासून बनतो . जो आपल्या मुलाला - प्रेम आणि शिस्त - दोन्ही प्रकारे - उत्तम पुरुष बनण्यास मदत करतो . उदाहरण म्हणजे " जिजामाता ."
आपण जर पिता , बाप , बाबा , डॅडी - तात तसेच काका , आत्या , मामा , नाना , नानी वगैरे इतर नात्यासंबंधीच्या शब्दांकडे पहाल तर आपल्यालाही - मृदू व कठोर व्यंजनांनी ते का बनले आहेत ते सहज लक्षांत येईल .
आता थोडे इंग्रजी भाषेतील नातेसंबंध दाखविणार्‍या शब्दांकडे बघू –
Mother हे सर्व शब्दांच्या शेवटी
Father ther किंवा er आढळतो
Brother मग आणखी एक नाते जे
Sister SON या शब्दाने दाखवले
Daughter जाते . त्याला निराळे दाखवून
एवढे महत्व का दिले असावे ?
मुलगा SON म्हणून निराळे महत्व देण्याचे वास्तविक काहिही कारण नसताना पुढेही हेच चालू राहते.
अध्यक्ष , प्राध्यापक , लेखक , गायक – पुरुष . तर याच जर स्त्रिया असतील तर – पुढे आ कार लावला जातो . इंग्रजीत सुद्धा poetess असे रूप केले जाते . वास्तविक हे शब्द मूलत: व्यवसाय विषयक आहेत . ते स्त्री वा पुरुष या करिता एकच ठेवण्यास प्रत्यवाय नसावा .
आता अशाच एका शब्दाचे पाहू या .
Chairman जर स्त्री असेल तर आपण तिला chair woman म्हणत नाही . म्हणून काही त्याकरिता दोघानाही chair – person म्हणण्याचे कारण नाही . वास्तविक chairman म्हणजे अध्यक्षस्थानावर – chair वर – विराजमान झालेली माणूसरूपी व्यक्ती . ही व्यक्ती पुरुष वा स्त्री असेल तरी अधिकार व जबाबदारी सारखीच , मग chair – person म्हणण्याचा अट्टाहास कशासाठी ? नसावा . कारण या शब्दात पुन्हा पुरुष वाचक son हा शब्द आहेच . मगाशी – नाते विषयक शब्द पाहताना , मुलाला son या नांवाने दिलेले महत्व आपण पाहिलेच आहे –
इत्यलम *

’स्त्री आणि पुरुष ’ – श्रेष्ठ कोण ?
इंग्रजी या वैश्विक भाषेत त्या करिता woman आणि man हे शब्द वापरले जातात व सर्वनामानी ह्यांचा उल्लेख she आणि he असा करितात . सहजच आढळते ते हे की woman आणि she या दोन्ही स्त्रीवाचक शब्दांपेक्षा – man आणि he हे दोन्ही शब्द अक्षर संख्येत छोटे आहेत .
म्हणून वादांत न पडता ज्या व्यक्तीचे कार्य व कर्तबगारी मोठी ती व्यक्ती मोठी असे समजावे .
शब्दांचा शोध –
आम्हाला आमच्या लहानपणी भाषा हा विषय शिकविताना आमचे मास्तर ( या शब्दाविषयी पुढे कधीतरी बोलू ) सांगत , ज्ञान मिळविण्याकरिता क्रियापदाला – प्रश्न विचारत जाणे आवश्यक आहे – जसे ’ कोण , कसा , कुठे , किती , केव्हा , कधी वगैरे प्रश्नार्थवाचक सर्वनामांचा उपयोग करून .
इंग्रजीत हेच काम who , what , which , when , where वगैरे शब्दांनी साधता येते .
गमतीची गोष्ट ही की – मराठीतील प्रश्नार्थवाचक सर्वनामे ’क’ ने सुरवात करतात तर इंग्रजीतील हीच सर्वनामे w ने सुरु होतात . अपवाद केवळ how चा – पण त्यातही शेवटी w आहेच .
गमतीची दुसरी गोष्ट म्हणजे मराठीतील ही सर्वनामे ( हिन्दीत सुद्धा ) ’ क ’ म्हणजे इंग्रजीतील k या उच्चाराने सुरू होतात . तर इंग्रजीतील हेच शब्द ’ w ’ ने सुरू होतात . दोन्हीचे एकत्रीकरणाने असे म्हणता येईल की हा शोध म्हणजेच ज्ञानमार्गातील हा शब्द म्हणजे KNOW . आणखी एक विशेष म्हणजे K ने सुरवात व W ने शेवट होणारा हा एकमेव शब्द आहे .
कदाचित भारतीय माणूस असे गर्वाने म्हणेल , पहा – ज्ञानमार्गाची सुरवात आमच्याच ’ क ’ ने ( K ) होते . तेव्हा आम्हीच या मार्गात श्रेष्ठ . पण त्यावर पाश्चिमात्य असेही म्हणू शकतील की तुम्ही फक्त आरंभशूर आहात – शेवटपर्यंत आम्हीच पोचतो . आणि किंचित उपहासाने असेही म्हणतील – “ We are not worried , whether quest for knowledge starts with a K or W – we just believe in WorK – W or K .
* इत्यलम *

No comments: