Thursday, October 16, 2008
कोजागिरी कार्यक्रम
श्री. माधव बागुल श्री. मिलिंद रायकर यांचा परिचय करून देताना.
सोबतीच्या साप्ताहिक कार्यक्रमांशिवाय, सोबती दरवर्षी काही खास कार्यक्रम करते. कोजागिरी पौर्णिमा हा त्यातील एक. कोजागिरीच्या जवळच्या बुधवारी नेहेमींच्या साप्ताहिक कार्यक्रमाऐवजी गाण्याबजावण्याचा कार्यक्रम योजिला जातो. प्रथेप्रमाणे या वर्षीहि १५ ऑक्टोबरला असा कार्यक्रम झाला. या वर्षी तरुण व्हायोलिन वादक श्री. मिलिंद रायकर यांनी दीड तासपर्यंत व्हायोलिन वादन सादर केले. कार्यक्रमाला उत्तम उपस्थिति लाभली हे वरील फोटोवरून दिसून येईलच. श्री. रायकर यांनी राग भीमपलास व वसंत तसेच नाट्यगीते व भावगीते वाजवली. श्री. शंतनु किंजवडेकर यांनी त्याना अप्रतिम तबलासाथ केली.
भीमपलास संपल्यावर संस्थेचे सभासद श्री. माधव बागुल यांनी श्री. रायकर यांचा परिचय करून दिला. त्यातील काही भाग असा -
१. वडील श्री. अच्युतराव रायकर हे पहिले गुरु. नंतर पं. वसंत काडणेकर, श्री. बी.एस.मठ यांचेकडे शिक्षण.
२. राष्ट्रीय शिष्यवृत्ति मिळवून पं. डी. के. दातार यांचेपाशी पुढील शिक्षण.
३. आकाशवाणीवर A ग्रेड कलाकार म्हणून मान्यता’
४. हिंदुस्थानी संगीताबरोबरीने पाश्चात्य संगीताचाहि अभ्यास आहे.
५. पं. दातारांच्या परंपरेच्या प्रचार व प्रसारासाठी रायकर व्हायोलिन ऍकॅडमी सुरू केली. सर्व वयांचा शिष्यपरिवार मिळाला.
६. गेली ८/१० वर्षे प्रख्यात गायिका श्रीमती किशोरी आमोणकर यांना भारतात व परदेश दौर्यांत साथ करतात.
७. स्वत:चेहि अनेक परदेश दौरे झाले आहेत व चालू आहेत. सी. डी. व कॅसेट प्रकाशित झाल्या आहेत.
८. गुरुवर्य दातारांप्रमाणे गोडवा व रागाची शुद्धता कायम ठेवून गायकी अंगाने वादन करतात. शास्त्रीय संगीताबरोबर नाट्यसंगीत, भावगीत व भक्तिसंगीतहि उत्तम वाजवतात.
९. सर्व भारतभर अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम तसेच खासगी बैठका होतात.
श्री. किंजवडेकरांच्या तबला साथीबरोबर, श्री. रायकरांचे शिष्य श्री. विशाल राव यांनी स्वरमंडलवर व श्री. विनय पोदार यानी तानपुर्यावर साथ केली.
अप्रतिम व्हायोलिन वादनानंतर सर्व उपस्थितांना मसाल्याच्या दुधाचा आस्वाद मिळाला व कानांत स्वर ठेवून सभासद घरोघरीं गेले.
Subscribe to:
Posts (Atom)