Thursday, April 29, 2010

आय़् ए एस् च्या परिक्षेत विचारलेल्या कांही प्रश्नांची उत्तरें

[ मूळ इंग्रजीत झालेल्या या परिक्षेत कांही वाक्ये, हेतू साधण्यासाठी भाषांतरीत केलेली नाहीत .]
प्रश्न : सिमेंटच्या फरशीवर न फोडता कच्चे अंडे कसे टाकाल ?
उत्तर : सिमेंटच्या फरशा फार कठीण असतात .

प्रश्न : जर आठ माणसांना एक भिंत बांधायला दहा तास लागले तर ती भिंत बांधायला चार माणसांना किती वेळ लागेल ?
उत्तर : कांहीच वेळ लागणार नाही . ती आधीच बांधून झाली आहे .

प्रश्न : जर तुमच्या एका हातात तीन सफरचंदे व चार संत्री असतील आणि दुसर्‍या हातात चार सफरचंदे व तीन संत्री असतील तर तुमच्याकडे काय असेल ?
उत्तर : फार मोठे हात .

प्रश्न : How can you lift an elephant with one arm ?
उत्तर : प्रश्नच कुठे येतो ! एक हात असलेला हत्ती सापडणारच नाही .

प्रश्न : कोणीही आठ दिवस झोपेशिवाय कसा राहू शकेल ?
उत्तर : यांत काय अवघड ? तो रात्री झोपतो .

प्रश्न : जर तुम्ही लाल रंगाचा दगड निळ्या समुद्रांत फेकला तर काय होईल ?
उत्तर : अगदी सोप्पं आहे . तो भिजेल आणि बुडून समुद्राच्या तळाला जाईल .

प्रश्न : अर्ध्या सफरचंदासारखे दुसरे काय दिसते ?
उत्तर : त्याचा दुसरा अर्धा भाग .

प्रश्न : तुम्ही breakfast ला काय कधीच खाऊ शकणार नाही ?
उत्तर : Dinner [रात्रीचे जेवण] .

प्रश्न : चाकाचा शोध लागला तेव्हा काय झाले ?
उत्तर : It caused a revolution .

प्रश्न : Bay of Bengal is in which state ?
उत्तर : Liquid [द्रव स्थितीत ] .

आता थोडेसे मौखिक चांचणी बद्दल –interview .

प्रश्न : मी जर तुमच्या बहिणीबरोबर पळून गेलो तर तुम्ही काय कराल ?
उत्तर : माझ्या बहिणीकरिता तुमच्यापेक्षा सरस जोडीदार मिळवणे मला शक्यच होणार नाही , सर .

उमेदवाराकरिता परीक्षकाने कॉफी मागवली . कॉफी आली .
प्रश्न : व्हॉट इज बिफोर यू ?
उत्तर : टी .
[ इंग्रजी मुळाक्षरांत U च्या अगोदर T येतो ]

वरील उत्तरे देणार्‍या सर्वांची IAS , IFS वा IPS करिता निवड झाली होती .

Tuesday, April 20, 2010

तिमिर, दीप आणि प्रकाश

सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद व भाषा व्यासंगी लेखक व कवी श्री. प्रभाकर भिडे
यांची एक अर्थपूर्ण कविता.


निरोप द्याया काळोखाला
दीप लाविता प्रकाश उजळे ।
हे तर घडते सदैव नेमे ॥
शुभ कार्याला दिवा हवा जरी
मृत्यूनंतर दिवा लावती ।
अर्थ असे की दुःखा विसरुनी
पुढील जीवना सामोरे व्हा ॥
शृंगाराला अर्थ येतसे
दीप मालवुनी सार्थक मीलन ।
म्हणुनी लावुया अर्थ नवा ॥
फुंकर मारुनि दीप विझविला
प्रकाशमय जग सारे झाले ॥

--- कवि: प्रभाकर भिडे

Thursday, April 15, 2010

कवयित्री विद्या




कवयित्री सौ. विद्या पेठे

कै. मोरेश्वर पटवर्धन एक कविताप्रेमी गृहस्थ होते. कवितेसाठी त्यानी अनेक उपक्रम राबविले. नवीन कवीना उत्तेजन देण्यासाठी ‘रसिका’, ‘गाणी मनातली आणि गळ्यातली’ असे कवितासंग्रह काढले. कवी, गीतकार, गायक संगीतकार यांची सविस्तर माहिती त्यानी प्रसिद्ध केली.

कै. मोरेश्वर पटवर्धन यानी कवितेसाठी दिलेल्या योगदानाची स्मृति कायम रहावी यासाठी त्यांच्या कुटुंबियानी दरवर्षी कवींना पुरस्कार देण्यासाठी योग्य आर्थिक तरतूद केली व विले पारल्यातील लोकमान्य सेवा संघाकडे ही जबाबदारी सोपविली.

या पुरस्कारासाठी आलेल्या काव्यसंग्रहांच्या कवींची निवड करण्यासाठी संत वाड.मयाचे अभ्यासक व त्यावर विपुल लेखन करणारे श्री.. वामनराव देशपांडे व श्रीमती शुभा सापते याना नियुक्त केले होते. त्यानी अनेक कवितासंग्रहांतून सौ विद्या पेठे यांच्या ‘चांदण’ व डॉ. उर्मिला चाकूरकर यांचा ‘पलाशपंख’ या दोन कवितासंग्रहाना पारितोषिक विभागून देण्याची शिफारस केली.

‘चांदण’ या कवितासंग्रहाच्या कवयित्री सौ. विद्या पेठे या सोबतीच्या ज्येष्ठ सभासद आहेत. सोबतीच्या अनेक वाड.मयीन, सांगीतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. सोबतीच्या या ज्येष्ठ कवयित्रीला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सोबतीला आनंद होत आहेत. सोबतीतर्फे त्यांच हार्दिक अभिनंदन.

या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम २८ मार्च रोजी मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

परीक्षक शुभा सापते यानी पुरस्कारासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या ‘कवितेचे परीक्षण ही खरोखरच कठीण गो्ष्ट आहे. मनाची संवेदना कवितेला जन्म देते. श्रीमती विद्या पेठे यांचा कवितासंग्रह ‘चांदण’ वाचल्यानंतर चांदण्याच्या शीतलतेचा अनुभव येतो. दुसरे परीक्षक श्री. वामनराव देषपांडे म्हणाले की कै. मोरेश्वर पटवर्धन यांच्याशी त्यांचा ४२ वर्षांचा स्नेह होता. कै. पटवर्धन यांचे कवितेवर निस्सीम प्रेम होते. नवकवीना व्यासपीठ मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान होते.

पारितोषिक विजेत्या सौ. विद्या पेठे यानी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद द्विगुणित झाल्याचे सांगितले. त्यांच्या कविता आवडल्याचे त्यांचे गुरुजन, रसिक व विद्यार्थी यानी आवर्जून त्याना कळविले. त्याबद्दल त्यानी सर्वांचे आभार मानले. त्या पुढे म्हणाल्या ‘जीवनातील अनेक प्रसंग, व्यक्ति, आठवणी कवितेला विषय पुरवितात आणि त्यानंतर कविता कागदावर उतरतात. नंतर त्यानी त्यांच्या ‘चांदण’ या कवितासंग्रहातल्या काही कविता सादर केल्या. श्रोत्यांची त्याना दाद मिळाली.

दुसर्‍या पारितोषिक विजेत्या डॉ. उर्मिला चाकूरकर यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मातोश्रीनी पारितोषिक स्वीकारले. डॉ. चाकूरकर यांच्या वहिनीनी ‘पलाशपंख’ या कवितासंग्रहातील काही कविता सादर केल्या.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. स्नेहलता देशमुख यानी स्त्री आणि पुरुषाला अनुक्रमे रातराणी आणि गुलाब यांची उपमा दिली व दोन्ही आनंद देतात म्हणून त्यांचॆ जीवनात व काव्यात मोठे महत्व आहे. कवि मनातला आशय व भावना कवितारुपाने व्यक्त करतो. कवयित्री मनातून घडत असते. कविता हृदयातून येत असते म्हणून वाचकांना ती भावते.

आभारप्रदर्शनानंतर कार्यक्रम समाप्त झाला.

गाणारी संवादिनी





गाणारी संवादिनी

दि. ३ फ़ेब्रुवारी होळीनिमित्त गोखले सभागृहात लोकमान्य सेवा संघ व सोबती यांच्या संयुक्त विद्यमाने पं. तुळशीदास बोरकर यांच्या संवादिनी वादनाचा कार्यक्रम झाला.

प्रथम लोकमान्य सेवा संघाचे उपाध्यक्ष श्री वि.वि. मेहेंदळे यानी प्रास्ताविक केले व सोबतीचे अध्यक्ष श्री. मुकुंद पेठे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देउन पं. बोरकर व त्यांच्या साथीदारांचे स्वागत करण्यात आले. श्री. विजय पंतवैद्य यानी पं. बोरकर यांचा यथोचित शब्दात परिचय करून दिला. देशातच नव्हे तर परदेशातही पं. बोरकरांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत व गाणार्‍या संवादिनीवरील यशस्वी कलाकार म्हणून ते सर्वाना सुपरिचित आहेत. नंतर पं. बोरकरांच्या संवादिनी वादनास प्रारंभ झाला.

राग वटदीपने प्ररंभ झाल्यावर , मर्मबंधातली ठेव ही, चांद माझा हासरा, नाथ हा माझा, स्वकुल तारकासुता, नरवर कृष्णासमान, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, प्रेमसेवा शरण इत्यादि नाट्यगीते व भक्तीगीते सादर करुन बहार आणली. मध्यंतरानंतर त्यांच्या गुरुनी बांधलेली तिलक देस रागातली बंदिश वाजविली. नंतर आणखी काही नाट्यगीते वाजवून बोला अमृत बोला या अवीट गाण्याच्या वादनाने कार्यक्रमाची सांगता केली.
संवादिनीवरील या बहारदार गाण्यानी श्रोत्यांचे कान तृप्त झाले.

त्यांच्या संवादिनी वादनाचे कौतुक करताना कार्याध्यक्षा श्रीमती विद्या पेठे म्हणाल्या
‘आज पं. बोरकरांच्या संवादिनी वादनाने होळीच्या कार्यक्रमात सप्तरंग भरले. जसे गाणारे व्हायोलिन तशी ही गाणारी संवादिनी आहे. त्यानी श्रोत्यांच्या मर्मबंधातली ठेव अचूक ओळखून विविध नाट्यगीते सादर केली त्यामुळे या होळीत रंग खेळायला नरवर कृष्ण आला. त्याच्याबरोबर स्वकुल तारका सुता रुक्मीणीही आली. अजुन रात्र झाली नाही तरी हसरा चांद उगवला आणि अशी ही प्रेमसेवा केल्यानंतर आम्ही सारे श्रोते तुम्हाला अगदी शरणागत आलो आहोत. हे सारे तुमचे वादन अमृताहुनी गोड झाले.‘

त्यानंतर कार्यवाह श्री. अरविंद वाकणकर यानी आभार प्रदर्शन केले.

Wednesday, April 14, 2010

भोजनांते उचितं उष्मोदकं पेयं

‘भोजनांते तक्रं’ - भोजनाच्या शेवटी ताकाचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे हे डॉक्टर/वैद्य यांचेही मत आहे. परंतु भोजनाच्या शेवटी जर कुणी थंडगार पाणी किंवा शीतपेय पीत असेल तर ते हृदयाच्या आरोग्याला प्रतिकूल आहे.

चिनी किंवा जपानी लोक भोजनामध्ये गरम चहा पिणे पसंत करतात. त्यांच्या हृदयाचे आरोग्य भारतीयांच्या तुलनेत अधिक चांगले आहे हे सर्वाना माहीत आहे.

या अनुषंगाने भोजनाच्या शेवटी ज्याना थंड पाणी पिणे आवडते त्यानी या सवयीचा फेरविचार करावा. चवदार, चटकदार भोजनानंतर थंडगार पेय किंवा पाणी पिण्याने गळा थंडगार होतो आणि माणूस उल्हसितही होतो. पण त्याबरोबर नकळत आरोग्यावर दुष्परिणामही होत असतात. कारण थंड पाणी किंवा पेय तेलकट पदार्थातील घटक अधिक घन (घट्ट) बनवते. त्यामुळे पचनक्रिया मंदावते. एकदा या चिकट पदार्थाची आम्लाबरोबर प्रतिक्रिया झाली की त्याचे विघटन होऊन तो जड अन्नापेक्षाही जलद रीतीने आतड्यामध्ये शोषला जातो. यामुळे कदाचित कॅन्सरही उद्भवू शकतो. म्हणून भोजनाचे शेवटी गरम चहा, गरम सूप किंवा किंवा गरम पाणी पिणे हिताचे ठरेल.

तळलेले फ्रेंच पद्धतीचे पदार्थ आणि बर्गर हे हृदयाच्या आरोग्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत या मताप्रत अनेक तज्ञ आले आहेत.

वरील निष्कर्ष अनेक निरीक्षणे व शास्त्रीय अभ्यासाने काढलेले आहेत. तेव्हा आपण भोजनाच्या शेवटी थंड पेय किंवा थंड पाणी पीत असाल तर आपण आपली सवय बदलू शकता. शेवटी निर्णय तुमचा, फायदाही तुमचा.

(एका हितचिंतकाकडून आलेल्या ई मेलच्या आधारे)

-- म.ना. काळे
********

Wednesday, April 07, 2010

बाणभट्टाची कादंबरी




सौ. सुनिता जयंत खरे या संस्कृत हा विषय घेउन एम.ए. ला मुंबई विद्यापीठात प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. आज निवृत्तीनंतरही त्यांचे संस्कृतचे वाचन व मनन चालूच आहे.

सम्राट हर्षवर्धनाने ज्याला ‘वश्यवाणी कविचक्रवर्ती’ हे बिरुद बहाल केले होते तो वर्णनसम्राट बाणभट्ट आणि त्याची अजरामर गद्य कलाकृति ‘कादंबरी’ ह्यावर ‘सोबती’मध्ये सौ. सुनिता खरे यानी २४ मार्च २०१० रोजी यानी रसग्रहणात्मक व्याख्यान दिले. कादंबरीबाबत अभ्यासकांकडून घेतले जाणारे आक्षेप म्हणजे भाषा अत्यंत क्लिष्ट आहे इत्यादिबाबत त्यानी सविस्तर विवेचन केले. कादंबरी या साहित्यकृतीवरूनच गद्य पद्यापक्षा सरस असू शकते याचा प्रत्यय रसिकाना आला आणि ‘गद्यं कवीनां निकषं वदन्ति’ ही उक्ती अस्तित्वात येउन गद्यलेखक बाणभट्ट हा महाकवी गणला गेला ह्याबाबतचे त्यांचे विश्लेषण मार्मिक व रसाळ होते
--------