Thursday, April 15, 2010

कवयित्री विद्या




कवयित्री सौ. विद्या पेठे

कै. मोरेश्वर पटवर्धन एक कविताप्रेमी गृहस्थ होते. कवितेसाठी त्यानी अनेक उपक्रम राबविले. नवीन कवीना उत्तेजन देण्यासाठी ‘रसिका’, ‘गाणी मनातली आणि गळ्यातली’ असे कवितासंग्रह काढले. कवी, गीतकार, गायक संगीतकार यांची सविस्तर माहिती त्यानी प्रसिद्ध केली.

कै. मोरेश्वर पटवर्धन यानी कवितेसाठी दिलेल्या योगदानाची स्मृति कायम रहावी यासाठी त्यांच्या कुटुंबियानी दरवर्षी कवींना पुरस्कार देण्यासाठी योग्य आर्थिक तरतूद केली व विले पारल्यातील लोकमान्य सेवा संघाकडे ही जबाबदारी सोपविली.

या पुरस्कारासाठी आलेल्या काव्यसंग्रहांच्या कवींची निवड करण्यासाठी संत वाड.मयाचे अभ्यासक व त्यावर विपुल लेखन करणारे श्री.. वामनराव देशपांडे व श्रीमती शुभा सापते याना नियुक्त केले होते. त्यानी अनेक कवितासंग्रहांतून सौ विद्या पेठे यांच्या ‘चांदण’ व डॉ. उर्मिला चाकूरकर यांचा ‘पलाशपंख’ या दोन कवितासंग्रहाना पारितोषिक विभागून देण्याची शिफारस केली.

‘चांदण’ या कवितासंग्रहाच्या कवयित्री सौ. विद्या पेठे या सोबतीच्या ज्येष्ठ सभासद आहेत. सोबतीच्या अनेक वाड.मयीन, सांगीतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. सोबतीच्या या ज्येष्ठ कवयित्रीला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सोबतीला आनंद होत आहेत. सोबतीतर्फे त्यांच हार्दिक अभिनंदन.

या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम २८ मार्च रोजी मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

परीक्षक शुभा सापते यानी पुरस्कारासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या ‘कवितेचे परीक्षण ही खरोखरच कठीण गो्ष्ट आहे. मनाची संवेदना कवितेला जन्म देते. श्रीमती विद्या पेठे यांचा कवितासंग्रह ‘चांदण’ वाचल्यानंतर चांदण्याच्या शीतलतेचा अनुभव येतो. दुसरे परीक्षक श्री. वामनराव देषपांडे म्हणाले की कै. मोरेश्वर पटवर्धन यांच्याशी त्यांचा ४२ वर्षांचा स्नेह होता. कै. पटवर्धन यांचे कवितेवर निस्सीम प्रेम होते. नवकवीना व्यासपीठ मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान होते.

पारितोषिक विजेत्या सौ. विद्या पेठे यानी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद द्विगुणित झाल्याचे सांगितले. त्यांच्या कविता आवडल्याचे त्यांचे गुरुजन, रसिक व विद्यार्थी यानी आवर्जून त्याना कळविले. त्याबद्दल त्यानी सर्वांचे आभार मानले. त्या पुढे म्हणाल्या ‘जीवनातील अनेक प्रसंग, व्यक्ति, आठवणी कवितेला विषय पुरवितात आणि त्यानंतर कविता कागदावर उतरतात. नंतर त्यानी त्यांच्या ‘चांदण’ या कवितासंग्रहातल्या काही कविता सादर केल्या. श्रोत्यांची त्याना दाद मिळाली.

दुसर्‍या पारितोषिक विजेत्या डॉ. उर्मिला चाकूरकर यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मातोश्रीनी पारितोषिक स्वीकारले. डॉ. चाकूरकर यांच्या वहिनीनी ‘पलाशपंख’ या कवितासंग्रहातील काही कविता सादर केल्या.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. स्नेहलता देशमुख यानी स्त्री आणि पुरुषाला अनुक्रमे रातराणी आणि गुलाब यांची उपमा दिली व दोन्ही आनंद देतात म्हणून त्यांचॆ जीवनात व काव्यात मोठे महत्व आहे. कवि मनातला आशय व भावना कवितारुपाने व्यक्त करतो. कवयित्री मनातून घडत असते. कविता हृदयातून येत असते म्हणून वाचकांना ती भावते.

आभारप्रदर्शनानंतर कार्यक्रम समाप्त झाला.

No comments: