Sunday, April 26, 2009

कीं घेतले व्रत ...




’सोबती’चे ज्येष्ठ सभासद श्री. दि. म. संत .

श्री. दि. म. संत यांची प्रकाशित पुस्तके

की घेतले व्रत ............
सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद श्री. दि.म. संत सदा कार्यरत राहणारी ८२ वर्षीय व्यक्ती. बालपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते बालस्वयंसेवक होते. तरुणपणी नोकरी संभाळून संघाचे काम निष्ठेने केले. १९४८ साली गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली. त्याविरुद्ध झालेल्या सत्याग्रहात त्याना चार महिन्यांचा तुरुंगवासही घडला.
कामावरची निष्ठा हा त्यांचा स्थायीभाव. सेवानिवृत्त झाल्यावर ते थोडेच स्वस्थ बसणार! बावीस वर्षांपूर्वी आयुर्विमा महामंडळातून सेवानिवृत्त झाल्यावर विले पार्ले येथील गेली सत्याऐशी वर्षे अखंडितपणे कार्यरत असलेल्या लोकमान्य सेवा संघ येथे त्यानी आपले समाजकार्य सुरू केले. त्यांचे कार्यक्षेत्र म्हणजे वृद्धाश्रम, देहदान, नेत्रदान व त्वचादान यासंबंधी माहिती पुरविणे. लोकमान्य सेवा संघाने एक सामाजिक उपक्रम म्हणून जांभूळपाडा (जि.रायगड) येथे एका वद्धाश्रमाची स्थापना केली. तेथील सर्व जागा भरल्याने अनेक गरजू वृद्धाना तेथे प्रवेश मिळविणे कठीण होत असे. यातून काहीतरी मार्ग निघावा असे श्री. संत याना प्रकर्षाने जाणवले. म्हणून वृद्धाश्रमाची गरज असलेल्या ज्येष्ठ नागरिकाना महाराष्ट्रातील इतर वृद्धाश्रमांची माहिती व्हावी या हेतूने त्यांचे संकलन करण्याचा उपक्रम त्यानी हाती घेतला. त्यासाठी त्यानी महाराष्ट्रातील १०० वृद्धाश्रमाना प्रत्यक्ष स्वखर्चाने भेटी दिल्या व १८० वद्धाश्रमांशी पत्रव्यवहार केला, पाठपुरावा केला. महाराष्ट्रातील या सर्व वृद्धाश्रमांची माहिती त्यानी संकलित केली व त्याची एक पुस्तिका लोकमान्य सेवा संघाने प्रकाशित केली असून अल्प किंमतीला ती उपलब्ध असते. त्यामुळे पैसे देऊन रहाण्याची सोय असलेल्या वृद्धाश्रमांपासून निराधार स्त्री पुरुषाना शेवटपर्यंत आधार देणार्‍या, आजारी वृद्धाना नि:शुल्क शेवटपर्यंत संभाळणार्‍या वृद्धाश्रमांची माहिती या पुस्तिकेत उपलब्ध आहे. श्री संत यांचेकडे चौकशी करायला येणार्‍याना ते ती पुस्तिका देतातच पण सर्व महितीही आस्थेने पुरवितात जेणेकरून संबंधिताना निर्णय घेणे सोपे जाते.
श्री. संत यांचे दुसरे कार्य म्हणजे देहदान, नेत्रदान व त्वचादान यासंबंधी महिती पुरविणे. त्यासाठी आवश्यक फ़ॉर्म्स ते भरून देण्याची ते विनंति करतात. आतापर्यंत अनेक व्यक्तीनी देहदान/नेत्रदान यासाठी नावे नोंदविली आहेत. प्रत्यक्ष देहदान/नेत्रदान केलेल्या व्यक्तींची माहीती त्यांचेकडे आहे. प्रत्यक्ष मृत्युसमयी/मृत्यूनंतर नेत्रदाते/देहदाते यांच्या घरी जाऊन ते नातेवाईकाना त्यासंबंधी ते मार्गदर्शन करतात जेणेकरून पुढील कार्यवाही सुलभ होते.
चौफेर वाचन व लेखनही ते करतात. ‘ आस्तिकता व नास्तिकता - दोन्हीही अंधश्रद्धा ’ आणि ’वृद्धाश्रम काळाची गरज’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता वृद्धाश्रम हे काळाची गरज ठरू लागले आहेत हे मत त्यानी ऐकलेल्या/पाहिलेल्या अनुभवावरून ठामपणे आपल्या पुस्तकात मांडले आहे. आता समाजही हा बदल स्वीकरू लागला आहे. ’राजकीय पक्षनिष्ठा - मानसिक गुलामी’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर आहे.
त्यांच्या या समाजसेवेची दखलही घेतली गेली आहे. विले पार्ले येथील स्वा. सावरकर केंद्राने त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. इतर निरनिराळ्या पाच संस्थानीही त्याना पुरस्काराने गौरविले आहे.
श्री संत हे प्रसिद्ध तत्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांच्या तत्वज्ञानाचे चाहते आहेत. लोकमान्य सेवा संघात अनेक कार्यक्रम/उपक्रम नेहमी होत असतात व लोकमान्य सेवा संघाच्या ’टिळक मंदीर‘ या वास्तूला रोज शेकडो लोक भेट देत असतात. त्यावेळी ते जे. कृष्णमूर्ती यांच्या व इतर उपयुक्त पुस्तकांची विक्री करतात.
असे हे श्री. संतांचे साधेसुधे कार्यरत व्यक्तिमत्व. उतार वयात येणार्‍या व्याधींची पर्वा न करता त्यांचे हे कार्य अखंडितपणे चालू असते. त्याना त्यांच्या कार्यात सदैव यथाशक्ति साथ देणार्‍या त्यांच्या पत्नीचे अलिकडेच निधन झाले. प्रसंगी पदरमोड करून नि:स्वार्थीपणे समाजासाठी काहीतरी करावे हा एकच विचार त्यामागे आहे. व्रतस्थ माणूसच असे काम निरपेक्ष बुद्धीने करू शकतो. त्यांचे हे अनोखे कार्य पहाता त्यानी आपले ‘ संत ’ हे आडनाव सार्थ केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Wednesday, April 22, 2009

होली आयी रे ....

होली आयी रे..रंग लायी रे...
मंगळवार दि.१० मार्च’०९ रोजी "लोकमान्य सेवा संघ" आणि "सोबती ज्येष्ठ नागरिक संघटना" यांच्या संयुक्त विद्यमाने लो.से. संघाच्या गोखले सभागृहात श्रीमती शुभदा मराठे यांच्या गायनाचा दर्जेदार कार्यक्रम झाला.
सर्वप्रथम सोबतीच्या कार्यवाह श्रीमती सुनीता कुलकर्णी यांनी कलावंतांचा परिचय करून दिल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
श्रीमती शुभदा मराठे यांनी सुरुवातीला ४५ मिनिटे आपल्या सुमधूर व स्वच्छ आवाजात "श्री" राग आळविला. त्यानंतर त्यांनी मोकळ्या आवाजात सादर केलेल्या "सोहोनी" रागामधील "रंग ना डालो श्यामजी" या ठुमरीने कार्यक्रमात रंग भरायला सुरुवात झाली. होरी, झूला, भजने आणि होळीगीते अशा विविध गायनी कळांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला. "जो भजे हरीको सदा" या पंडीतजींच्या सुप्रसिद्ध भैरवीने सुमारे अडीच तास रंगलेल्या या कार्यक्रमाची सांगता झाली.
श्रीमती शुभदा मराठे यांना श्री. विलास खरगोणकर यांनी तबल्यावर उत्तम साथ केली तर पार्ल्यातीलच एक ख्यातनाम कलाकार श्री. दत्ता जोगदंडे यांच्या
संवादिनीवरील साथीमुळॆ कार्यक्रम अत्यंत श्रवणीय झाला.
-----------------------------------------------------------------------------------------------------

Tuesday, April 14, 2009

सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद व सिद्धहस्त कवी
श्री. नारायण जुवेकर यांची एक भावपूर्ण कविता.

जीवनसंध्या
उष्म झळा मावळता - तगमगही थांबली
थंड झुळुक घेउन ये - सांज चोरपावली
चढण उभी संपताच - भव्य लागले पठार
वृक्षाना स्पर्श करीत - साथ देई बघ समीर
संकटांशी झुंज देत - कर्तव्ये केली पार
सामाजिक दृष्टि दिली - ‍ ज्ञान देत लेकरांस
स्वार्थाचे जीवनात - करुनिया उच्चाटन
त्यातुन मग दोघांनी - जपले हे साधेपण
मोत्यासम शब्दमणी - पांचूसम आठवणी
गुंफियले हार किती - जन्मभरी दोघानी
संपले आता पठार ! - दीर्घ लागला उतार
दोघानी हात धरुनी - सहज करु हाही पार
हात ढिले होतील का - व्यर्थ असे भीति मनीं
आधारही दोघाना - होतील या आठवणी

कवी : नारायण जुवेकर

Wednesday, April 08, 2009

सारे रोखठोक - पुणेरी पाट्या

‘ पुणे तिथे काय उणे ’ असे म्हटले जाते आणि ते बर्‍याच अंशी खरेही आहे. विद्येचे माहेरघर व सर्व बाजूनी झपाट्याने
वाढणारे, आधुनिकतेकडे वाटचाल करणारे म्हणून आजची पुण्याची ओळख आहे. मात्र पन्नास-पाउणशे वर्षांपूर्वींचे पुणे
निराळे होते. त्या अनुषंगाने पुण्यासंबंधी अनेक सुरस कथा अजूनही सांगितल्या जातात किंवा वाचनात येतात.
रोखठोकपणा (पण काहीसा विक्षिप्तपणाकडे झुकणारा) हे पुण्याचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. उदा. खालील रोखठोक
पुणेरी पाट्या:
-----------------------------------
पत्ता विचारायचे पैसे पडतील
पत्ता १० कि.मी. पर्यंत असेल तर ५० पैसे
१० कि.मी. च्या वर असेल तर १ रुपया
असे का लिहिले हे विचारण्याचे २ रुपये पडतील.
------------------------------
बाहेरच्या लोकानी लिफ्ट वापरू नये
अडकल्यास सोसायटी जबाबदार नाही
------------------------------
सेल्समन किंवा सेल्सगर्ल यानी बेल दाबू नये
अन्यथा सामान जप्त केले जाईल
-------------------------------
इतरानी आवारात वाहने लावू नयेत
लावल्यास टायरमधील हवा सोडून देण्यात येईल
-------------------------------
जिन्यावर चढ उतार करताना पाय आपटू नयेत
-----------------------------------
बेल वाजविल्यानंतर तीन मिनिटात दार उघडले नाही तर
पुन्हा बेल न वाजविता फुटावे
=====================================
अशा विविध प्रकारच्या मजेशीर पाट्या अनेकानी ऐकल्या/वाचल्या असतील.
(संकलक : म.ना. काळे)