Friday, November 21, 2008

वाचकांस निवेदन

प्रिय वाचक,
’सोबती’ या नावाने मी हा ब्लॉग सुरू केला व त्यावर अद्यापपर्यंत २६ लेख लिहिले. ब्लॉग ’सोबती’ या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मी सुरू केला त्यावेळी उत्साहाच्या भरात मी कार्यकारी मंडळाची रीतसर परवानगी वगैरे घेण्याचा विचारहि केला नाही! मात्र सुरवातीपासून साप्ताहिक सभेमध्ये ब्लॉगबद्दल सविस्तर माहिती देत होतो. वाचकाकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दलही सांगत होतो. ब्लॉग चालवण्याची कल्पना सर्वांना आवडली व उपयुक्तताही पटली होती. कोणाचाही विरोधी सूर नव्हता. जुलै अखेरपर्यंतच्या कार्यक्रमांबद्दल मी लिहीत राहिलो. मात्र मलाच जाणवत होते कीं संस्थेच्या ब्लॉगवर काय लिहिले जावे हे ठरवण्याचे काम कार्यकारी मंडळाने करावे, मी नव्हे. याचे मुख्य कारण हे कीं मी सर्व कार्यक्रमाना उपस्थित असतोच असे नाही. त्यामुळे काही कार्यक्रम दुर्लक्षित राहाणार. तसेच लेखनावर माझ्या वैयक्तिक आवडीनिवडीचा ठसा उमटणार. हे बरॊबर नाही. म्हणून ऑगस्ट महिन्यात मी कार्यकारी मंडळाला कळवले की मी यापुढे लेखन करणार नाही व ब्लॉग चालवावयाचा असल्यास तुम्ही चालक समिती नेमा व मला कळवा. ब्लॉगलेखनाबद्दल सर्व प्रकारचे तांत्रिक सहकार्य अर्थातच मी देऊ केले होते. यानंतर मी या ब्लॉगवर लेखन बंद केले होते. (श्री. मिलिंद रायकर यांच्या व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमाच्या बाबतीत, राहवले नाही म्हणून, अपवाद केला!).
आता कार्यकारी मंडळाने माझ्या सूचनेप्रमाणे एक कमिटी नेमली आहे. या सभासदाना संगणकाचे पुरेसे ज्ञान आहे व ब्लॉग चालवण्याचा उत्साहहि आहे. त्यांचेकडे स्वत:चे संगणकहि आहेत. सुरवातीला त्यांना संवय होईपर्यंत व नंतरहि आवश्यक तेव्हा लागेल ती तांत्रिक मदत (मीहि एक ज्येष्ठ नागरिकच, तेव्हा माझ्या कुवतीप्रमाणे) मी करणार आहे. यापुढचे लेखन, ’सोबती’चे वतीने, त्यांचे असेल, माझे नाही.
एक ज्येष्ठ नागरिक संघटना प्रथमच स्वत:चा ब्लॉग चालवते आहे या उपक्रमाला आपण वाचकांनीच उचलून धरले होते. मला स्वत:ला त्याचा फार आनंद वाटला. काही काळ बंद पडलेला हा ब्लॉग आता पुन्हा वरचेवर तुमच्या भेटीला येईल. पूर्वीसारखेच त्याचे आपण स्वागत करा व प्रतिसाद देत रहा ही माझी ’सोबती’चे वतीने विनंति आहे.
धन्यवाद
प्र. के. फडणीस.

Thursday, October 16, 2008

कोजागिरी कार्यक्रम






श्री. माधव बागुल श्री. मिलिंद रायकर यांचा परिचय करून देताना.

सोबतीच्या साप्ताहिक कार्यक्रमांशिवाय, सोबती दरवर्षी काही खास कार्यक्रम करते. कोजागिरी पौर्णिमा हा त्यातील एक. कोजागिरीच्या जवळच्या बुधवारी नेहेमींच्या साप्ताहिक कार्यक्रमाऐवजी गाण्याबजावण्याचा कार्यक्रम योजिला जातो. प्रथेप्रमाणे या वर्षीहि १५ ऑक्टोबरला असा कार्यक्रम झाला. या वर्षी तरुण व्हायोलिन वादक श्री. मिलिंद रायकर यांनी दीड तासपर्यंत व्हायोलिन वादन सादर केले. कार्यक्रमाला उत्तम उपस्थिति लाभली हे वरील फोटोवरून दिसून येईलच. श्री. रायकर यांनी राग भीमपलास व वसंत तसेच नाट्यगीते व भावगीते वाजवली. श्री. शंतनु किंजवडेकर यांनी त्याना अप्रतिम तबलासाथ केली.
भीमपलास संपल्यावर संस्थेचे सभासद श्री. माधव बागुल यांनी श्री. रायकर यांचा परिचय करून दिला. त्यातील काही भाग असा -
१. वडील श्री. अच्युतराव रायकर हे पहिले गुरु. नंतर पं. वसंत काडणेकर, श्री. बी.एस.मठ यांचेकडे शिक्षण.
२. राष्ट्रीय शिष्यवृत्ति मिळवून पं. डी. के. दातार यांचेपाशी पुढील शिक्षण.
३. आकाशवाणीवर A ग्रेड कलाकार म्हणून मान्यता’
४. हिंदुस्थानी संगीताबरोबरीने पाश्चात्य संगीताचाहि अभ्यास आहे.
५. पं. दातारांच्या परंपरेच्या प्रचार व प्रसारासाठी रायकर व्हायोलिन ऍकॅडमी सुरू केली. सर्व वयांचा शिष्यपरिवार मिळाला.
६. गेली ८/१० वर्षे प्रख्यात गायिका श्रीमती किशोरी आमोणकर यांना भारतात व परदेश दौर्‍यांत साथ करतात.
७. स्वत:चेहि अनेक परदेश दौरे झाले आहेत व चालू आहेत. सी. डी. व कॅसेट प्रकाशित झाल्या आहेत.
८. गुरुवर्य दातारांप्रमाणे गोडवा व रागाची शुद्धता कायम ठेवून गायकी अंगाने वादन करतात. शास्त्रीय संगीताबरोबर नाट्यसंगीत, भावगीत व भक्तिसंगीतहि उत्तम वाजवतात.
९. सर्व भारतभर अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम तसेच खासगी बैठका होतात.

श्री. किंजवडेकरांच्या तबला साथीबरोबर, श्री. रायकरांचे शिष्य श्री. विशाल राव यांनी स्वरमंडलवर व श्री. विनय पोदार यानी तानपुर्‍यावर साथ केली.

अप्रतिम व्हायोलिन वादनानंतर सर्व उपस्थितांना मसाल्याच्या दुधाचा आस्वाद मिळाला व कानांत स्वर ठेवून सभासद घरोघरीं गेले.

Wednesday, August 13, 2008

जुलैमधील वाढदिवस

’सोबती’च्या प्रथेप्रमाणे दि. ३० जुलैला, बुधवारी, ज्या सभासदांचे जन्मदिन जुलै महिन्यात येतात त्यांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित सभासदाना स्टेजवर बसवण्यात आले व एकेकाचे नाव घेऊन त्याना कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे हस्ते छोटासा पुष्प्गुच्छ देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर त्याना आपले मनोगत सांगण्यासाठी थोडा वेळ दिला जातो. बहुतेक सभासद यावेळी स्वत:बद्दल काही माहिती सांगतात, कथा, कविता, गाणी, ऐकवतात, छोटासा करमणुकीचा कार्यक्रमहि करतात. या वेळीहि असेच कार्यक्रम झाले त्यातील काहींचा हा छोटासा वृत्तांत. श्रीमती नंदा देसाई यानी सुरवातीलाच काही सुरेख गाणी ऐकवली. ’आठवण-विस्मरण’ हा त्यांचा विषय होता. त्यातील ’विसरशील खास मला’ हे गाणे छानच झाले. श्री. मधुकर देसाई यानी पेटीवर व त्यांच्या नातवाने तबल्यावर साथ केली. असा हा कौटुंबिक कार्यक्रम झाला. श्री. व. ना. गोडबोले, वय ८८ वर्षे, यानी व्हायोलिनवर ’यमुनाजळि खेळू’ हे जुने गाणे व एक छोटी धून वाजवली. श्री. गोडबोले हे एअरफोर्स व सिव्हिल एव्हिएशन मध्ये नोकरी करून केव्हाच निवृत्त झाले. त्याना चालण्याची आवड आहे व अनेक विक्रम केले आहेत. या आवडीमुळेच पंढरीच्या वारीत भाग घेतला आहे. सर्व गीता तोंडपाठ आहे व रोज त्यातील अनेक श्लोकांची जातायेता उजळणी होते. या वयातहि रोज नित्यनेमाने थोडावेळ तरी व्हायोलिन वाजवण्याचा रिजाझ होतो! त्यांच्या वाजवण्यातून तो अर्थातच जाणवत होता. प्रा. चिं.त्र्यं. येवलेकर यानी एका आठवणीतील कवितेचा परिचय करून दिला व ती वाचली. श्रीमती पटवर्धन यानी एक रूपकात्मक बोधकथा सांगितली. समुद्र्काठच्या एका गावावर येऊ घातलेल्या एका वादळाच्या संकटाची गावकर्‍यांना जाणीव करून देण्यासाठी टेकडीवरील आपल्या कापणीला आलेल्या शेताला स्वत:च आग लावणार्‍या स्वार्थत्यागी म्हातार्‍याची ही कथा बरेच सांगून गेली. श्री. कर्‍हाडकर हे बरीच वर्षे नेमाने वारीला जातात. त्यानी वारीबद्दल खूप माहिती सांगितली. वारीची ठरलेली मुक्कामाची गावे, वारीतील वातावरण, त्याना आलेले बरेवाईट अनुभव त्यानी वर्णन केले. इतरहि उपस्थितांचे मनोगत सांगून झाल्यावर अल्पोपहार होऊन कार्यक्रम संपला. यानिमित्ताने वाढदिवस झालेल्यानी सोबतीला देणग्या दिल्या. सोबतीच्या उत्पन्नात अशा देणग्यांचा महत्वाचा भाग असतो. वाढत्या वयामुळे काही सभासद अशा कार्यक्रमाना येऊ शकत नाहीत. त्यातील काहींची पत्रे मात्र आवर्जून येतात व ती वाचली जातात. श्री. गोडबोले यांच्या घरी झालेल्या त्यांच्या व्हायोलिन वादनाची एक छोटी झलक खालील दोन चित्रफितीत पहावयास मिळेल.

Sunday, July 27, 2008

चांदणं - भाग २

'चांदणं' कवितासंग्रहातील काही कविता या भागामध्ये आपणास वाचावयास मिळतील. कविता आपणास आवडल्या तर श्रीमती विद्या पेठे यांना २६८२७१९८ वर फोन करून जरूर कळवा व कविता ’सोबती’च्या ब्लॉगवर वाचल्याचे अवश्य सांगा! शेजारच्या स्लाइड-शो मध्ये कवितांच्या पानांचे फोटो दिले आहेत. वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा. धन्यवाद.
ब्लॉगसंचालक,
प्र. के. फडणीस.

Thursday, July 24, 2008

चांदणं - भाग १


सोबतीने दि. २ जुलै २००८ रोजी साप्ताहिक सभेत एक अनोखा कार्यक्रम सादर केला. सभासद श्रीमती विद्या पेठे यांच्या कवितांचा संग्रह – चांदणं – त्या दिवशी प्रमुख पाहुण्या डॉ. स्नेहलता देशमुख यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन पेठे कुटुंबाने हौसेने व नेटकेपणाने केले होते. समारंभाचे सूत्रसंचालन डहाणूकर कॉलेजच्या प्राचार्या माधवी पेठे यांनी केले.
सुरवातीला श्री. मुकुंद पेठे यानी मनोगत व्यक्त करताना म्हटले की पत्नीच्या कविता आवडल्या व पुन्हापुन्हा वाचाव्याशा वाटल्या म्हणून संग्रह प्रकाशित करण्यासाठी पडतील ते सर्व कष्ट घेतले.
कवयित्री विद्या पेठे यानी कवितांबद्दल बोलताना म्हटले की मी प्रासंगिक कविता वेळोवेळी लिहिल्या, शिक्षिका असताना नाटिका व त्यांत कविताहि लिहिल्या. पण आतून काही स्फुरावं व कागदावर उमटावं असं होईतो निवृत्तीचा काळ उजाडला. त्यानंतरच माझ्या कविताना बहर आला. निसर्ग व मानवी मनाचीं स्पंदने हे माझ्या काव्याचे मूलस्त्रोत आहेत.
एक सहशिक्षिका श्रीमती वृंदा पेंडसे आस्वादक या भूमिकेतून बोलल्या. त्या म्हणाल्या कीं शाळेत इतिहास-भूगोल शिकवणार्‍या या शिक्षिकेचं संवेदनाशील मन जागृत होतं हेच या कवितांतून दिसून येतं. ’किमया’, ’चौकोनी आकाश’, ’दिवाळी’, व ’फांदी’ या कवितांचे त्यानी मर्म उलगडून दाखवलं. कवयित्रीचं जागृत, विचारप्रवण मन व अन्यायाबद्दलची चीड ’संक्रांत’, ’लोकशाही’ या कवितांतून व्यक्त होतं.
दुसर्‍या वक्त्या होत्या डॉ. चारुशीला ओक. कवितासंग्रहाला त्यांची प्रस्तावना आहे. त्या म्हणाल्या, ’ हा काव्यसंग्रह मी एका रात्रीत वाचून काढला, यातच त्याचं मूल्यमापन आलं. कवयित्रीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. आजच्या वृद्धाश्रमांच्या काळात वृद्ध, एकाकी मनाला दिलासा देणारी कुटुंबाची साथ त्यानी ’संध्याकाळ’ मध्ये रंगवली आहे. त्यांच्या घननिळा श्याम, मल्हार वगैरे गीताना लय-ताल आहे. त्या स्वत: गातात हे त्याचे कारण असावे. माणूस, दु:ख, साथ वगैरे कवितांतून लक्षणीय व वेगळा विचार व्यक्त होतो.’
प्रमुख पाहुण्या डॉ. स्नेहलता देशमुख म्हणाल्या कीं या कवयित्रीचे अनुभव बहुकेंद्री आहेत. बालगीतांबरोबरच अन्यायाची चीड व्यक्त करणार्‍या, मानवी मनाचीं स्पंदने टिपणार्‍या कविताही या संग्रहात आहेत. ’मूठभर मीठ साम्राज्य हादरवतं व दांडी गाव तीर्थक्षेत्र बनतं ’ अशी सुंदर ओळ येथे दिसते. उत्तरोत्तर अशाच चांगल्या कविता लिहिल्या जाव्यात अशा शुभेच्छा त्यानी दिल्या.
प्रकाशन समारंभानंतर यातील काही कवितांचे वाचन, श्री. विजय पंतवैद्य व श्री. मुकुंद पेठे यानी केले व ’वंदन’, ’चांदणं’, ’मल्हार’ या गीतांचे, स्वरचित चालीत, स्वत: श्रीमती विद्या पेठे यानी गायन केले. वंदन या गीताबरोबर नवोदित नृत्यांगना कु. अनुया परांजपे हिने सुंदर नृत्याविष्कार सादर केला.
आभार प्रदर्शनानंतर हा देखणा कार्यक्रम संपला.
पुढील भागामध्ये यातील काही कविता आपणाला वाचावयास मिळतील.

Saturday, July 19, 2008

साप्ताहिक कार्यक्रम




’सोबती’चा २००७-२००८ चा अहवाल हातीं आला आहे. गतवर्षी सोबतीने कोणते साप्ताहिक कार्यक्रम केले त्याचा तपशील अहवालावरून देत आहे. सोबतीच्या कार्यक्रमातील वैविध्य त्यावरून ध्यानी येईल.

Sunday, June 22, 2008

गुंततां हृदय हे - भाग ३

खटल्याच्या कामकाजामध्ये सरकारतर्फे सर्व साक्षीपुरावा पद्धतशीर मांडला गेला. सरकारी वकिलानी सर्व घटनाक्रम खुलासेवार वर्णन केला. आरोपी खिडकीतून आला. त्यावेळी जिचा मृत्यु झाला ती मुलगी, नेहा, घरात एकटीच टी. व्ही. पहात बसलेली होती. आरोपीने नेहाचा गळा दाबला, नेहाने त्याला जोरात ढकलले, आरोपी कॉफी टेबलवर धडकला, त्याची काच फुटून त्याला जखम झाली, त्याचे रक्त तेथे सापडले आहे, आरोपीची व नेहाची पुन्हा झटापट झाली. नेहाने आरोपीच्या हाताला चावा घेतला, मग रागाने आरोपीने नेहाला गोळ्या घातल्या व घरात दरोडा घालून आरोपी फरार झाला. नेहाचे आईबाप घरी आले तेव्हा नेहा जिवंत पण बेशुद्ध होती. डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. नेहाचे हृदयदान व नेत्रदान करण्यात आले. दरोड्यातील ऐवज आरोपीपाशी मिळाला आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट व इतर परिस्थितिजन्य पुरावा सादर केलेला आहे.
हे सर्व ठीक होते पण नेहा शुद्धीवर आलीच नव्हती व पोलीसांना तिचा जबाब मिळालेला नव्हता मग या सर्व घटनाक्रमाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोण होता व हे वर्णन कशाच्या आधारावर केले? तेव्हा स्पष्ट झाले की हे वर्णन मानसीने पोलिसाना दिले होते. मानसी स्वत: घटनास्थळी कधीच नसल्यामुळे तिला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कसे मानावे? आरोपीच्या वकिलानी अर्थातच याला जोरदार आक्षेप घेतला. नेहाच्या हृदयाबरोबर घटनेची पूर्ण व खुलासेवार स्मृतीही मानसीकडे आली आहे हे त्याना अजिबात मान्य नव्हते. स्मृति ही मेंदूत असते, हृदयाचा त्याच्याशी काय संबंध असा त्यांचा रास्त दावा होता. बरे, ज्या व्यक्तीला नेहाचे नेत्र दान केले होते त्या व्यक्तीकडे घटनेची स्मृति गेलेली नव्हती!
सरकारतर्फे डॉ. भावे यानी सांगितले की, स्मृति ही जरी मुख्यत्वे मेंदूमध्ये असते तरी शरीराच्या इतर पेशींमध्येही ती वास करू शकते व अपवादात्मक परिस्थितीत ती स्पष्ट व खुलासेवारहि असू शकते. या केसमध्येही घटनेची सर्व स्मृति नेहाच्या हृदयाबरोबर मानसीकडे आली आहे. याबाबत अमेरिकेतील डॉक्टर ड्यून यांच्याशी त्यानी केलेला पत्रव्यवहार व त्यानी दिलेले निर्वाळे कोर्टाला सादर करण्यात आले.
आरोपीच्या वकिलानी असाहि मुद्दा मांडला की हृदयरोपणाबरोबर दात्याच्या जीवनातील बर्‍यावाईट स्मृति हृदय बसवलेल्या व्यक्तीकडे जातात असे मान्य करावयाचे म्हटले तर त्याचे दुष्परिणाम होतील, लोक हृदयरोपण करून घ्यायलाच तयार होणार नाहीत! समाज एका उपयुक्त शस्त्रक्रियेला विन्मुख होईल!
मानसीने आरोपीचे व घटनेचे केलेले खुलासेवार वर्णन पोलिसाना आरोपीला पकडण्यास उपयुक्त ठरले होते हे उघडच होते पण त्याला प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने केलेल्या वर्णनासमान मानता येईल काय हा न्यायाधीशांपुढे प्रश्न होता. मात्र न्यायाधीशानी या प्रश्नाला बगल देऊन पुरेसा व विश्वसनीय असा circumstancial evidence दाखल झालेला आहे व आरोपीचा गुन्हा शाबीत झाला आहे असे मानण्यास तो पुरेसा आहे तसेच तो विचारात घेतला असतां आरोपी्ला निरपराध ठरवणे शक्य नाही असा निष्कर्ष काढून आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा दिली. नेहाच्या आईवडिलाना अखेर आपल्या मुलीला न्याय मिळाला याचे समाधान मिळाले. मानसीला होणारा त्रासहि यानंतर बंद झाला.
ऍडव्होकेट ठाकूर यांची कथा थोडीफार काटछाट करून आपल्यासमोर ठेवली ती येथे संपली. त्यानी कथेअखेर केलेला खुलासा शब्दश: असा –
‘ह्या कथेतील जो कायद्याचा भाग आहे तो सत्य व कायद्याला धरून आहे. कथेत उल्लेखलेली, परिस्थितिजन्य पुराव्यावरून निर्णय देणारी केसहि सत्य आहे व ती ’ऑल इंडिया रिपोर्टर’मध्ये नमूद केलेली आहे.
एका व्यक्तीच्या रोपण केलेल्या हृदयाने दिलेला कौल, पुरावा म्हणून कोर्टात मान्य केलेली केस अमेरिकेत घडलेली आहे. त्या घटनेला भारतीय वातावरणात बसविणे, भारतीय दंडविधानात व एव्हिडन्स ऍक्ट्मध्ये बसविणे हा भाग काल्पनिक आहे.
ही वैज्ञानिक केस डॉ. पाल पियरसाल यांच्या ‘The Heart’s Code’ या पुस्तकात. तसेच Detroit चे ’Senai Hospital, त्यातील Dr.Dune , Psychoneuro-immunologist यांचे वैद्यकीय मत, cellulay memory ची theory, हेहि याच पुस्तकात उल्लेखलेले आहे.’
संक्षिप्त कथेमध्ये मी डॉ. ड्यून यांचे मत व विवेचन विस्ताराने दिलेले नाही. हृदयरोपण हा तसा अर्वाचीन प्रकार आहे व हृदयाबरोबर मूळ व्यक्तीच्य़ा काही स्मृति, सवयी, खास कलाकौशल्ये नवीन शरीराला मिळतात काय हा सध्यातरी कुतूहलाचा, वादाचा व संशोधनाचा विषय आहे. असे संशोधन चालू आहे असे माझ्या इतरत्र वाचनात आले आहे.

Thursday, June 19, 2008

गुंतता हृदय हे - भाग २

रात्री मानसीबद्दल विचार करत असताना डॉ. भावे, मानसोपचार तज्ञ, यांच्या मनात आले की हृदय दिलेल्या मुलीच्या आइवडलांना भेटावे. हॉस्पिटलमधून मिळालेल्या पत्त्यावर त्यांची गाठ पडली. डॉक्टरांनी सांगितलेल्या दरोड्याच्या घटनेला त्यानी दुजोरा दिला. मानसीची हकीगत ऐकून त्यानाहि वाटले की मानसीच्या मुखातून आपलीच मुलगी बोलते आहे.कारण सर्व हकीगत ती सुसंगत व बिनचूक सांगत होती. विचारांती डॉ. भावे यानी दरोड्याचा तपास करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांची गाठ घेतली. घटनेला कोणी साक्षीदार नसल्यामुळे गुन्हेगार सापडला नव्हता. मात्र इतर तपास व पुरावा पोलिसांनी केला होता. डॉ. भावेंकडून मानसीची हकीगत ऐकून त्याना आश्चर्य वाटले. पाहूयातरी मानसी काय वर्णन करते ते असा विचार करून त्यानी डॉ. भावेना मानसीला घेऊन येण्यास सांगितले. मानसीचे आई-वडील प्रथम तयार होईनात. पण जर मानसीच्या वर्णनामुळे गुन्हेगार पकडला गेला तर बहुधा मानसीचा त्रास बंद होईल या आशेने ते तयार झाले. मानसीने पोलिसांना दरोड्याची सर्व हकीगत सुसंगत सांगितली. पोलिसांनी विचारले की तू चोराचे वर्णन करू शकशील काय? त्यावर तिने जणू तो तिला दिसतोच आहे असे त्याचे सर्व वर्णन केले. पोलिस चित्रकाराने वर्णन ऐकता-ऐकताच भराभर त्याचे चित्र बनवले. ते पाहिल्याबरोबर मानसी ओरडली ’हाच तो! पकडा याला. यानेच मला गोळ्या मारल्या’
चित्र हातात पडल्यावर पोलीस यंत्रणा कामाला लागली व इतर तपासातूनहि ज्याच्यावर संशय होताच त्या गुन्हेगाराला त्यानी त्याच्या गावातून पकडून आणले. सर्व साक्षीपुराव्याची जुळवाजुळव झाल्यावर त्याच्यावर कोर्टात खटला उभा राहिला. तेथे काय झाले ते पुढच्या भागात पहा.

Sunday, June 15, 2008

गुंतता हृदय हे - भाग १


’सोबती’च्या दि. २८ मे २००८ च्या सभेत श्री. जयंत खरे यानी सांगितलेली एक अद्भुतात मोडणारी पण सत्य कथा वाचनीय आहे. ’न्याय अंतरीचा’ या ऍडव्होकेट अंजली ठाकूर यांच्या पुस्तकात ’गुंतता हृदय हे’ या नावाने ही कथा छापलेली आहे. श्री. खरे यानी पुस्तकातील पूर्ण कथा सांगितली ती मी थोडक्यात येथे देणार आहे.
एका मानसी नावाच्या लहान वयाच्या मुलीला बालपणापासून हृदयाचा काही विकार होता व तपासण्या, उपचारांनंतर, हृदयरोपणाशिवाय दुसरा इलाज नाही या निर्णयाला डॉक्टर आले. पालक हवालदिल झाले व योग्य हृदय मिळण्याची वाट पाहत राहिले. अचानक हॉस्पिटल मधून कॉल आला की एका, जवळपास समवयीन, मृत मुलीचे हृदय जुळते आहे तेव्हा तुमच्या मुलीला घेऊन या. त्याप्रमाणे हृदयरोपण करण्यात आले व नशिबाने ते पूर्णपणे यशस्वी झाले. मुलीला नवजीवन मिळाले या आनंदात पालक घरी गेले. हळूहळू तिची प्रकृति सुधारू लागली. मात्र दुसराच एक त्रास लवकरच सुरू झाला. मानसीला टी.व्ही. समोर एकटी सोडून पालक खोलीबाहेर जाऊ लागले की लगेच ती किंचाळू लागे ’मला एकटी सोडू नका, तो येईल, मला मारेल.’ आईवडिलाना कळेना हा काय प्रकार आहे. मुलीला झाले तरी काय? शेवटी मानसोपचार तज्ञाकडे जाणे प्राप्त झाले. बर्‍याच तपासण्या करूनहि त्यालाहि काही उलगडा पडेना. हा आईवडिलांचे लक्ष आपल्यावर गुंतवून ठेवण्याचा प्रकार असावा ही प्रथमची कल्पना पण खरी दिसेना. उपचारांनी सुधारणाहि होईना. मुलीच्या आयुष्यात आलेली नवीन घटना म्हणजे फक्त हृदयरोपण झाले होते. त्याचाच काही संबंध असावा असा डॉक्टरला संशय येऊ लागला. शेवटी स्वस्थ न बसता त्यानी ज्या हॉस्पिटलमध्ये हृदयरोपण झाले होते तेथे संपर्क साधला. प्रथम हृदयदाता व्यक्ति कोण याबद्दल माहिती देण्याचे त्या डॉक्टरांनी साफ नाकारले. तसे करण्यावर कायद्यानेच बंधने आहेत त्यामुळे त्यांचा नाइलाज होता. अखेर मानसोपचारतज्ञाने सर्व हकीगत सांगून पुन्हा विनंति केल्यावर माहिती मिळाली कीं दात्री मुलगी ही घरात टी.व्ही. पहात एकटीच बसलेली असताना अचानक खिडकीतून आलेल्या चोराबरोबर तिची झटापट झाली व अखेर चोराने तिला गोळ्या घातल्या त्या तिच्या पायांना लागून ती गंभीर जखमी झाली. चोर मिळाली ती लूट घेऊन पळाला व आईबापाना घरी आल्यावर ती मुलगी जखमी अवस्थेत दिसल्यावर त्यानी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. प्रयत्न करूनहि तिला वाचवता आले नाही. स्वत:वरचा आघात बाजूला ठेवून आईवडिलानी मोठ्या मनाने हृदय व नेत्रदान करण्यास संमति दिली. त्याप्रमाणे तुमच्या मुलीला तिच्या हृदयाचे रोपण केले गेले. हे ऐकल्यावर मानसोपचार तज्ञाची खात्री झाली की मानसीला होणार्‍या भासांचे हेच कारण आहे. मृत झालेल्या मुलीची झालेल्या भीषण घटनेची स्मृति मानसीकडे कशी आली याचा काही उलगडा होत नव्हता मात्र स्मृति पूर्ण खुलासेवार होती! यानंतर या कथेला वेगळेच वळण लागले. ते पुढील भागात पाहूं.

Monday, June 09, 2008

'सोबती'चा वरधापन दिन - ९ जून २००८







’सोबती’ची स्थापना ९ जून १९७९ ला झाली. या वर्षी सोबतीला २९ वर्षे पुरी झाली. ९ जून २००८ला सोबतीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत.
पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात संध्याकाळी ४-०० पासून हा कार्यक्रम सुरू झाला. सभासदानी स्वत: रचलेले व चाल लावलेले स्वागतगीत म्हटले. कार्याध्यक्ष श्री. मधुकर देसाई यानी पेटीची साथ केली. श्री. विश्वास डोंगरे यानी कार्य्क्रमाचे सूत्रसंचालन केले. माजी मंत्री श्री. राम नाइक हे प्रमुख पाहुणे व सोबतीचे पदाधिकारी स्टेजवर उपस्थित होते. ’सोबती’ अध्यक्ष श्री. पेठे यानी छोटे प्रास्ताविक केल्यानंतर कोषाध्यक्ष श्री. जोग यानी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यवाह श्रीमती सुनीता कुलकर्णी यानी गतवर्षीच्या सोबतीच्या कार्याचा आढावा घेतला. ज्येष्ठ नागरिकांच्या शिखर संघटनेने ’सोबती’चा या वर्षी उत्कृष्ठ संघटना म्हणून निवड केल्याचा त्यानी विशेष उल्लेख केला. ’सोबती’च्या कार्यालयासाठी जागा मिळवण्यासाठी चालवलेल्या खटपटीला जागांच्या वाढत्या किमतींमुळे अद्याप यश मिळालेले नाही त्यामुळे आणखी देणग्या मिळवण्याची आवश्यकता व्यक्त केली. सोबतीच्या वर्षभरातील कार्यक्रमांचा उल्लेख केला.
कार्यवाह श्री. देशपांडे यानी सभासदांकडून आलेल्या पत्रांचे वाचन केले.
’सोबती’च्या रिवाजाप्रमाणे यानंतर गेल्या वर्षभरात वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या, ७५ वर्षे पूर्ण केलेल्या व वैवाहिक जीवनाचीं ५० वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा (जोडीने) सत्कार प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पुष्पगुच्छ, श्रीफल व भेटवस्तू देऊन करण्यात आला. त्याच्या छायाचित्रांचा स्लाइड्शो शेजारच्या स्तंभामध्ये पहावयास मिळेल. श्री. राम नाइक यांचेहि ७५वे वर्ष चालू असल्यामुळे त्यांचाहि या सोहळ्यात समावेश करण्यात आला. सत्कार झालेल्यांचे वतीने श्री. शंकर लिमये यानी स्वरचित कविता गाऊन व श्रीमती विद्या पेठे यानी छोटेसे भाषण करून आनंद व कृतज्ञता व्यक्त केली.
त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. राम नाइक यांचे भाषण झाले. ’सोबती’ ही जुनी ज्येष्ठ नागरिक संघटना असल्यामुळे ज्येष्ठांच्या समोरील प्रश्न सोडवण्यामध्ये तिने पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले. विशेषेकरून त्यानी ज्येष्ठाना मेडिकल इन्शुरन्स देण्यास इन्शुरन्स कंपन्या तयार नसतात याचा उल्लेख केला व याबाबतीत राष्ट्रपातळीवर प्रयत्न आवश्य्क असल्याचे निदर्शनास आणले. ज्येष्ठानी जास्तीतजास्त काळपर्यंत कार्यरत राहाणे शरीरस्वास्थ्यासाठीहि उपयुक्त ठरते असे म्हटले.
वर्धापन दिनानिमित्त बर्‍याच सभासदांनी संस्थेला लहानमोठ्या देणग्या दिल्या. त्यांची यादी श्री. डोंगरे यानी वाचून दाखवली.
aaryaadhyaksh श्री. मधुकर देसाई यांनी आभारप्रदर्शन केले व कार्यक्रम संपला. सर्व उपस्थित सभासदांना व सन्माननीय पाहुण्यांना यानंतर अल्पोपहार देण्यात आला. सभासदांनी थोडावेळ एकमेकांशी गप्पाटप्पा करून मग घराची वाट धरली.

Monday, June 02, 2008

माझ्या लग्नाची कहाणी - भाग २

‘अहो पण झाले तरी काय?’ असे पुन्हा माझ्या वडिलानी विचारल्यावर मामानी सर्व प्रकार सांगितला.
’आम्ही निक्षून विचारल्यावर वासंती म्हणाली की मुलगा डावरा आहे. डावरी माणसे बावळट असतात, कमी बुद्धीची असतात, हेकट व तापट असतात, थोडक्यांत तीं सगळ्या बाबतीत ’डावीच’ असतात तेव्हा मला नको. आम्ही म्हटले तो डावरा आहे हे तुला काय माहीत? तेव्हा ती म्हणाली की त्याने चहाचा कप डाव्या हाताने उचलला तेव्हाच मी ओळखले. आम्हाला काही पटेना तेव्हा खरं काय ते पाहण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. तेव्हा हा जेवत होता, चांगला उजव्या हाताने! मी आनंदलो. वासंतीचा उगाच गैरसमज झाला असे मनाशी म्हटले. त्याला उगाचच दोन पत्ते विचारले. मात्र त्याने ते माझ्या डायरीत डाव्या हातानेच लिहिले! म्हणजे वासंतीचे निरीक्षण चुकीचे नव्हते! मी परत गेलो.
मग दोन दिवस मी व तिच्या वडिलांनी तिला समजावले. वडिलांनी पुष्कळ उदाहरणे देऊन डावरी माणसे उलट खूप हुशार, मनमिळाऊ व मेहेनती असतात असे म्हटले. अब्राहॅम लिंकन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ डावरींच आहेत. डावर्‍यांच अक्षर खूप चांगलं असतं, याचंहि आहे. क्रिकेटमध्ये तर डाव्या हाताने खेळणार्‍यांना खूप महत्व असते. ते मॅचेस जिंकून देतात. विनू मांकड सारखे एका हाताने बॅटिग व दुसर्‍या हाताने बोलिंग करणार्‍याचे केवढे कौतुक होते, वगैरे अनेक गोष्टी सांगितल्या. हा मुलगा अर्धा डावरा आहे. तो जेवतॊ उजव्या हाताने पण लिहितो डाव्या हाताने तेव्हा त्याच्याकडे दोघांचे गुण आहेत असं बरंच काही सांगितल्यावर तिची समजूत पटली व आता तिने मान्य केले आहे.’
माझा जीव भांड्यात पडला! अखेर आमचे लग्न झाले. अंतर्पाटाआडून ती माझ्या पायांकडे निरखून पाहात होती, बहुधा मी पायानेहि डावरा आहे की काय हे पहात असावी! आमच्या लग्नाला ४५ वर्षे झाली. ही कथा आठवून आम्ही अजूनहि हसतॊ.एकमेकाना डावरी माणसे दाखवतो. बिल क्लिंटन भारतात आला तेव्हा तोहि डावरा आहे हे मी बायकोला दाखवले व डावरेपणाची फुशारकी मारलीच.
मला माझ्या डावरेपणाचा रास्त अभिमान आहे! मात्र हल्लीच एका रिक्षावाल्याला, सकाळीच, डाव्या हाताने भाडे देऊ लागलो तर तो म्हणाला ’साहब, सुबहके बोहनीके टाइम हम बाये हाथसे पैसा नही लेंगे!’ झगडा झाला, ’दोनों हाथ मेरेहि हैं और मुझे प्यारे है, पैसा चाहे तो लेऒ नहीतॊ जाओ’ वगैरे म्हटल्यावर मुकाट्याने त्याने ’मनसेवाला दिखता है’ पुटपुटत पैसे घेतले.
माझ्या नातवंडाना मी नेहेमी अनेक गोष्टी सांगतो त्यात ही त्यांची आवडती गोष्ट आहे. ही आमच्याच लग्नाची गोष्ट आहे हे मात्र त्याना माहीत नाही. पण मला वाटते माझ्या एका हुशार नातीला तशी शंका नक्की आहे! माझा डावरेपणा तिला ठाऊकच आहे कारण तिला फटका देताना माझा डावा हातच पुढे येतो!
’सोबती’मध्ये कथा ऐकल्यावर मी श्री. फडणीस यांचेकडे कथा लिहून मागण्यासाठी फोन केला. फोन श्रीमती फडणीसांनी घेतला. कथा लिहून द्यायला सांगते म्हणाल्या. मी विचारले ’कथा ’सोबती’च्या ब्लॉगवर लिहायला तुमची हरकत नाहीना?’ त्या हसल्या आणि म्हणाल्या ’खुशाल लिहा पण चहाचा कप उचलताना पाहून हे डावरे आहेत हे मी ओळखले एवढाच कथाभाग खरा आहे बाकी सर्व यांचीच रचना आहे.’
मी म्हटले वा फारच छान.

माझ्या लग्नाची कहाणी - भाग १

’सोबती’च्या दि. २८ मे च्या सभेत वाढदिवस समारंभात सोबती सभासद श्री. मधुकर राजाराम फडणीस यानी आपल्या लग्नाची मजेदार कहाणी सांगितली. ती जवळपास त्यांच्याच शब्दात ऐका.
रोज रात्री झोपताना आयुष्यातील आनंदी घटना आठवण्याची माझी सवय आहे. त्यात माझ्या लग्नाची आठवण नेहमीच येते. त्याचे असे झाले. माझे शिक्षण पुरे होऊन नोकरी सुरू झाली व लग्नाचे वय झालेच होते तेव्हा रीतीप्रमाणे माझ्यासाठी वधूसंशोधन सुरू झाले. बर्‍याच मुली पाहून झाल्या पण काही जमत नव्हते. शेवटी एका मुलीच्या मामाच्या मध्यस्थीने ती मुलगी पाहिली. ते मामा मला ओळखणारे, माझे व मुलीचे वडील एका शाळेत शिकलेले, तेव्हा जमायला तशी हरकत नव्हती. रिवाजाप्रमाणे आम्ही चार-पाच जण मुलगी पहावयास गेलो. कांदेपोहे खाऊन झाले व मुलीने चहाचे कप आणले. स्मितहास्य करीत तिने सर्वांसमोर ट्रे फिरवला. माझ्यापुढे धरताना हळूच हसून पाहून घेतले. नजरा एकमेकांना भिडल्या. मी कप उचलला मात्र, अन ती चपापून मागे सरली! काय झाले मला कळेना. मी जरासा भांबावलो.
आम्ही घरी आलो. दोनतीन दिवस मामांचाही पत्ता नाही. मी जरासा बेचैन होतो. तिसर्‍या दिवशी ते मामा आले पण न हसता-बोलता मी जेवत होतो तेथेच माझ्यापुढे बसून गंभीरपणे पाहत राहिले. जेवणानंतर त्यानी माझ्याकडे दोनतीन माणसांची चौकशी करून त्यांचे पत्ते विचारले, ते मी त्यांच्या डायरीत लिहून दिले. लग्नाबद्दल अवाक्षरहि न बोलता ते निघून गेले. मला काही कळेना!
परत दोन दिवसानी मामा आले ते हसतच व लग्न पक्के झाल्याचे सांगत! मधल्या चार-पाच दिवसात झालेले रामायण त्यानी आम्हाला सांगितले ते असे –
तुम्ही मुलगी पाहून गेल्यावर वासंती ( माहेरचे नाव) खूप अपसेट होती. दोन दिवस बेचैन होती. कुणाशी बोलत नव्हती. आम्ही विचारले की मुलगा तुला पसंत नाही का? तर त्यावरही ती काही स्पष्ट बोलेना! अगदी खनपटीलाच बसल्यावर तिने मौन सोडले व तिने जे सांगितले त्यासाठीच मी दोन दिवसांपूर्वी तुमच्याकडे येऊन गेलो. त्यानंतर मी तिला भेटल्यावर मात्र सर्व उलगडा झाला व आता लग्न पक्के!
ते अजूनहि जास्त काही सांगेनात त्यामुळे अडचण काय होती व कशी दूर झाली आम्हाला कळेना. मी म्हटले, चला पसंती आहेना? कळेल पुढेमागे काय झाले होते! काय घाई आहे?
असे झाले तरी काय होते? त्यासाठी कथेचा पुढील भाग वाचा!

Thursday, May 29, 2008

मासिक वाढदिवस सोहळा

प्रिय वाचक,
माझ्या इतर ब्लॉगवरच्या लिखाणामुळे ह्या ब्लॉगकडे काही दिवस जरा दुर्लक्ष झाले होते. तरीहि हा ब्लॉग वाचला जातो आहे असे दिसते. आपले ’सोबती’वर प्रेम असेच राहू द्यावे.
सोबती गेली काही वर्षे एक प्रथा पाळत आहे. सोबतीचा दर बुधवारी सायंकाळी एक साप्ताहिक कार्यक्रम असतो. त्यातील शेवटचा बुधवार राखीव असतो. त्या दिवशी त्या महिन्यात ज्या सभासदांचे वाढदिवस येतात त्या सर्वांचा सामुदायिक वाढदिवस साजरा केला जातो. आम्हा समवयस्काना आपला वाढदिवस नेमाने साजरा करण्याची पूर्वापार सवय नसल्यामुळे या कार्यक्रमाचे आकर्षण असते. सर्व वाढदिवसाच्या मानकर्‍यांना स्टेजवर बसवले जाते. क्रमाने एकेकाचे नाव घेऊन त्याला पुष्प्गुच्छ दिला जातो. त्यानंतर त्या सभासदाने स्वत:बद्दल काही माहिती सांगावी, काही आठवणी सांगाव्या, किंवा इतर काहीहि बोलावे अशी अपेक्षा असते. बहुतेक सभासद, इतर वेळी श्रोत्याचेच काम करणारेहि, या निमित्ताने थोडेफार बोलतात व वाढदिवस साजरा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करतात. कित्येक सभासद स्वत: करत असलेल्या सामाजिक वा शैक्षणिक वा इतर कार्याबद्दल या निमित्ताने इतरांना माहिती देतात. कोणी कथा कविता वाचतात. परस्पर परिचय वाढतो. असा हा आनंदसोहळा दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी पार पडतो. हे सभासद थोडीफार वर्गणी जमा करून सर्वाना काही खानपानहि देतात. या निमित्ताने सभासद ’सोबती’ला लहानमोठ्या देणग्या देतात. सोबतीचा खर्चाचा भार थोडाफार हलका होतो!
बुधवार दि. २८ मे २००८ रोजी असाच सोहळा पार पडला. त्यावेळी सांगितल्या गेलेल्या काही कथा पुढील पोस्टमध्ये आपणास वाचावयास मिळतील. आतुरतेने वाट पहालच! धन्यवाद.

Saturday, May 17, 2008

श्रीमती शैलजा लिमये यांचे अबोल समाजकार्य




आमचे एक सभासद श्री. शंकरराव लिमये यांच्या पत्नी श्रीमती लिमये यांचे एक अबोल समाजकार्य गेली अनेक वर्षे चालू आहे. मुलामुलींसाठी वा इतरांसाठी कपडे शिवून झाल्यावर काही तुकडे उरतातच. त्यातून दुपटी, गोधड्या शिवण्याचे कार्य़ जगभरच्या महिला करतात व उत्कृष्ठ कलाकृतिही त्यातून निर्माण होत असतात. श्रीमती लिमये अश तुकड्यातून, स्वत:च्या व इतरांकडच्याहि, लहान मुलामुलींसाठी कपडे, गोधड्या शिवून त्या गरीब वा अनाथ मुलांना वाटतात. श्री. लिमये वेळोवेळी उरलेल्या तुकड्यांची मागणी सोबती सभासदांकडे करतात व या व इतरहि मार्गानी श्रीमती लिमयांच्या कार्याला हातभार लावतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी असे कपडे वरोरा येथील डॉ. विकास आमटे यांच्या महारोगी सेवा समितीकडे पाठवले. त्यांचेकडून श्रीमती लिमये यांना आलेले आभारप्रदर्शक पत्र आज छापले आहे. हौसेतून व कलोपासनेतूनहि समाजसेवा साधता येते याचे हे उदाहरण इतरांस प्रेरणा देऊ शकेल.

(पत्र वाचण्यासाठी त्यावर क्लिक करा.)

Wednesday, May 14, 2008

प्रेमगीत




आज पुन्हा एकदा श्री. प्रधान यांची कविता वाचा. वय ज्येष्ठ झाले तरी मन तरुण असू शकते याचा प्रत्यय वाचकांस जरूर येईल.





प्रेमगीत

हृदयात माझ्या खोल
प्रीतीचे तुझिया बोल
लेवुनी शृंगार साज
लपले आहेत आज ॥

ऐकण्या तयांचे गान
लावशील जरा कान
पाहुनी लवलेली मान
धडधडे हृदय मम सान ॥

सुगंधी तुझा गजरा
रुळतां माझ्या छातीवरी
थरथर उठे शरीरी
मोह न मजला आवरी ॥

म्हणुनी लिहितो गीत
वाचुनी ठेव मनात
स्फुरेल त्या त्या काळी
गाईं या गोड ओळी ॥

कृष्णकुमार प्रधान

Sunday, May 11, 2008

तरीहि आम्ही श्रेष्ट आहोत


सूचना : कविता वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा.










श्री. बाळ सितूत हे सोबतीचे आणखी एक ज्येष्ठ सभासद. सोबतीचे पूर्वीचे कार्यवाह. उत्साही कार्यकर्ते. कार्यक्रमाना त्यांची उपस्थिति अजूनहि सपत्नीक असते. त्यांची ओळख अनेकांना वर्तमानपत्रातील त्यांच्या सतत पत्रलेखनामुळे असेल. कवि हीहि त्यांची आणखी एक ओळख. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे हल्लीच त्यांच्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध झाला. त्यांचा एक कथासंग्रहही प्रसिद्ध झालेला आहे. एअर इंडियामधून अधिकारपदावरून काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यांची एक कविता आज वाचावयास मिळेल.

Friday, May 09, 2008

विडंबन गीत


’सोबती’मध्ये कवि-कवयित्री खूप. मी कविता करणारा नाही. तरीहि एक विडंबन गीत येथे टाकण्याचा मोह आवरत नाही. क्षमस्व.

माझे जेवण गाणे .........गाणे.

व्यथा असो आनंद असूं दे
उपास किंवा उत्सव असुदे
भूक असो अथवा न असूंदे
खात पुढे मज जाणे ....... माझे ...

कधी जेवतो हॉटेलातुन
कधि ऑफिसच्या कॅंटीनातुन
कधि ’खोक्या’तुन, कधि ढाब्यातुन
पोट भरुन मज घेणे ........ माझे ....

या मित्रानो माझ्या मागे
चवीपरीने खाऊ संगे
तुमच्यापरि माझ्याहि खिशातुन
खुळखुळते हे ’नाणे’ ......... नाणे ..... माझे जेवण गाणे .... गाणे.

Friday, May 02, 2008

आज अचानक आठवते मज ..


श्री. श्रीनिवास जुवेकर हे ’सोबती’चे जुने आणि जाणिते सभासद. संस्थेच्या स्थापनेपासून बरीच वर्षेपर्यंत कार्यरत होते. आता वय झाल्यामुळे उपस्थिति असत नाही. रॉयवादी विचारवंत, वृत्तपत्रलेखक, कवि, असे अनेक पैलू असलेले हे व्यक्तिमत्व आहे. ’सांजसरी’ हा १९९५ ते २००५ या काळात वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखांचा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. त्यांची २००७ साली प्रसिद्ध झालेली एक कविता त्यानी माझ्याकडे हौसेने पाठवली ती आज देत आहे. त्यानी शब्दबद्ध केलेला अनुभव अनेकांनी घेतला असेल.
आज अचानक आठवते मज …..
आज अचानक आठवते मज गावामधले घर माडीचे
सभोवताली शीतल छाया चहुबाजूला बांद्ग चिऱ्यांचे
घरापुढिल ती उंच टेकडी सांजसकाळी हासत चढणे
गावामध्ये स्वैर हिंडुनी दिवेलागणिस घरी परतणे
सायंकाळी मायमाउली देवांपाशी लावि निरांजन
तुळशीपाशी आजी-आत्या स्तोत्रे म्हणती पणती लावुन
पाणी भरणे काम आमुचे ’शुभंकरोती’ कधी न चुकले
शाळेमध्ये धुळ-पाटी अन बसावयाला एक कांबळे
दोन खणांची होती शाळा चार इयत्ता तिथे खरोखर
चहुबाजूला पहात गुरुजी, संथा देती छडीबरोबर
तरुणपणी मग पोटासाठी गावोगावी स्थिरावलो
बालपणीच्या रम्य स्मृतीना गोंजारित मी जीवन जगलो
निवृत्त जाहलो धकाधकीतुन संध्याछाया ये दारी
गाव एकदा पाहुन यावे ओढ लागली मना परी
घर माडीचे तगून होते थकल्या माझ्या शरिरासम ते
आढ्यावरती किती वाघळे उंदिर फिरती जमिनीवर ते
सुरकुतलेली जुनी ’कुळे’ ती, मी येताक्षणि हास्य फुले
आपुलकीने त्यांच्या, माझे क्षणात सारे घर भरले
त्यांच्यासाठी सदैव होते विशाल माझे घर उघडे
माणुसकीचे असे गिरवले बालपणीचे सहज धडे
डोळे भरुनी पुन्हा पाहिलीं जुनीं देवळे आणि स्थळे
शेते अमुची नसतानाही त्यात पाहिली हसरी कुळे
वास्तव्य संपता माझे तेथिल पुन्हा धावले मदतीला
सामानहि सारे घेउन आले एस. टी. वरती सर्व मला
नसता कुठली नाती-गोती प्रेमे त्यांच्या गहिवरलो
’पुन्हा लवकरी याहो दादा’ शब्द ऐकुनी गदगदलो
मनात म्हटले, ’कसला येतो पुन्हा गड्यानो मी आता
निरोप घ्यावा हा शेवटचा’ कंठ फुटेना हे म्हणता.

Wednesday, April 30, 2008

विडंबन गीत


आमचे आणखी एक ज्येष्ठ सभासद श्री. प्र. गो. भिडे यांचे शब्दांशी खेळ सदैव चालू असतात. विडंबन कविता रचणे व हौसेने गाऊन दाखवणे हा त्यांचा एक षौक आहे. त्यांची एक इरसाल विडंबन कविता आज येथे ठेवत आहे. सोबती सभासदांच्यात आपल्या प्रतिसादांमुळे खूप उत्साह व आनंद आहे. माझेकडे कविता व इतर साहित्य जमा होते आहे. तेव्हा ब्लॉग पहात रहा.

मतदारास ....

विसरतील खास तुला, निवडणूक होतां
आश्वासन अन वचनेही देति जरी आता ॥ विसरतील ...

निर्वाचित झाल्यावर वृत्ति ती निराळी
आमिष, धनलोभांची पसरलीत जाळी
गुंतता तयात जीव, कोण तुझा त्राता ॥ १ ॥ विसरतील ...

आमदार, खासदार, इथुन तिथुन सारे
खुर्चीच्या मोहातच अडकले बिचारे
जाणतील दु:ख तुझे, व्यर्थचि या बाता ॥ २ ॥ विसरतील ...

अंतरिची व्यथा तुझ्या जाणवेल ज्याला
शोध त्यास सत्वर तूं, दवडिं ना क्षणाला
आणि तया दृष्टिआड करूं नकॊ नाथा ॥ ३ ॥ विसरतील खास तुला

Monday, April 28, 2008

सांच्याला कळवा!















मोलकरणीची समस्या हा खरे तर आमच्या पिढीपेक्षा आमच्या लेकीसुनांचा प्रष्न. या विषयावरचे एक गमतीदार गाणे सौ. सुनंदा गोखले या आमच्या एक सभासद मोठ्या ठसक्यात सादर करतात. ते आमच्या सभासदाना एवढे आवडते की ’सोबती’च्या सर्व सहलींमध्ये करमणुकीच्या कार्यक्रमात हटकून त्याचा समावेश असतो. कविता मुळात त्यांचा भाचा श्री. संजय बर्वे यांची आहे. त्यांच्या सोनचाफा या संग्रहातून त्यांच्या परवानगीने ती येथे देत आहे.

सूचना : कविता वाचण्यासाठी कवितेवर क्लिक करा.

Wednesday, April 23, 2008

रामनवमी

सूचना : कविता वाचण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा.
रामनवमी निमित्त एका कार्यक्रमात रामावर नवीन कविता रचण्याचे आवाहन होते. त्याला प्रतिसाद देताना रचलेली श्री. नारायण जुवेकर यांची कविता त्यांच्याच हस्ताक्षरात देत आहे. (कविता स्वत: टाइप करण्याचे टाळले आहे हे लक्षात येईलच.)

Sunday, April 20, 2008

त्यांचा जयजयकार

’सोबती’चे आणखी एक ज्येष्ठ सभासद श्री. र. पां. कणेकर. यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. वयपरत्वे आता त्यांची सोबती कार्यक्रमाना उपस्थिति नियमित नसते. ’सोबती’चा ब्लॉग सुरू केल्याचे त्यांच्याशी बोललो व कविता मागितली. त्यानी तत्परतेने पाठवून दिलेली कविता वाचकांसमोर ठेवत आहे.

त्यांचा जयजयकार
(समूहगान)

जखडुन होतो तेव्हां लढले
भारतभूचे वीर
दास्यशृंखला तोडायाला
नाही झालि कसूर ॥ करूया त्यांचा जयजयकार ॥१॥
स्वातंत्र्यास्तव लढा पेटला
अर्पण केले प्राण
त्या वीरांच्या बलिदानाने
स्वातंत्र्याची जाण ॥ करूया ..... ॥२॥
शत्रूचे कधि आले घाले
लढले प्राणपणाने
शौर्याला कधि नव्हती सीमा
गाजे जय-हिंदने ॥ करूया ..... ॥३॥
भारतभूच्या शूर जवाना
आम्हाला अभिमान
आहुति सर्वस्वाची करुनी
राष्ट्रासाठी प्राण ॥ करूया ..... ॥४॥
मित्रत्वाचा आव आणुनी
अतिरेकी घुसवले
उत्तर देणे विश्वासघाता
संगिनिने साधले ॥ करूया ..... ॥५॥
गनिमी कावा रचिला रिपुने
व्यापियला भूभाग
मुक्त कराया अपुली सीमा
लढले हिन्द जवान ॥ करूया ..... ॥६॥

Thursday, April 17, 2008

हत्तीच्या दातदुखीची नवलकथा


डॉ. सुभाष भागवत हे सोबतीचे एक मान्यवर सभासद आहेत. पशुवैद्यक विषयातील ते एक ख्यातनाम तज्ञ आहेत. ही नवलकथा त्यानी ’सोबती’च्या एका साप्ताहिक सभेत सांगितली व सर्व सभासद चक्रावूनच गेले. ही कथा वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. डॉ. भागवतांकडून ती आग्रहाने मिळवून त्यांच्याच शब्दात आपल्यासाठी देत आहे. ती आपणाला आवडेलच याची खात्री आहे.

ह्त्तीच्या दातदुखीची नवलकथा
मेळघाटच्या जंगलातील वन विभागाच्या पाळीव हत्तीला झालेली दातदुखी व त्यावरील यशस्वी उपचाराची ही नवलकथा आहे. जंगलामध्ये झाडाच्या बुंध्याशी टकरा घेत खेळणाऱ्या एका तरण्याबांड हत्तीने आपला एक सुळाच तोडून घेतला. तुटलेल्या सुळ्याच्या मध्यभागी असलेल्या पोकळीतून रक्ताची धार लागली. अशिक्षित माहुताने रक्त थांबवण्यासाठी एक लवचिक बारीक फांदी दाताच्या पोकळीत दाबून धरली. रक्त जवळजवळ थांबले. सेमाडोह गावच्या प्राण्यांच्या दवाखान्यात डॉक्टरने दाताच्या पोकळीत कापूस, गॉझ वगैरे भरून रक्तस्राव थांबवला. पण दाताच्या मुळाशी हिरडीला सूज येत राहिली. वेदनांनी हत्ती चिडचिडा बनला. एकाएकी त्याने गावातील सिपना नदीच्या पुलावर उभा असलेला एक ट्रक नदीत उलथून टाकला! आणखी आठ दिवसानी वेदना वाढून हत्तीने अमरावतीकडे येणारी एक एस्टी बसच दोन तास अडवून धरली. जणू सत्याग्रहच केला! वनसंरक्षक साहेबांनी मला हत्तीवर काहीतरी उपचार करा असे सांगितले. नाहीतर हत्तीला मारून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी मी अकोला येथे पंजाबराव कृषि विद्यापीठात पशुविकृतिशास्त्राचा विभागप्रमुख व प्राध्यापक होतो. सर्जरी विभागातील डॉ. मेहेसरे यांना बरोबर घेऊन मी निघालो. तेथे पोचल्यावर हत्तीच्या माहुताने मला विनविले की काही करून याला वेदनामुक्त करा. हत्ती सुजलेल्या जागी हातहि लावू देत नव्हता. आम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तोवर हत्तीने अचानक माहुतालाच सोंडेने उचलून उलटा केला! माहुताने त्याला कसेबसे शांत केले. आम्ही खरेतर घाबरलो. धीर करून जवळ जाऊन सुजेवर हात लावून पाहिले तो सर्व भाग मऊ पडला होता, म्हणजे गळू पिकले होते. डॉ. मेहेसरेंचे मत पडले की हत्तीला ट्रॅन्क्विलाइझर देऊन मग गळू कापावे. हत्तीच्या जाड कातडीमुळे गळू बाहेरून कापून ड्रेन करणे महाकठिण होते व नंतर जखम चिघळण्याची भीति होती. त्यामुळे दुसरा काय उपाय करता येईल याचा मी विचार करत होतो. एकदम एक मजेदार कल्पना मला सुचली. जवळच्या गॅरेजमधून स्कूटरच्या क्लचवायरच्या आतील लवचिक वायर आणवली. स्टोव्हवर उकळत्या पाण्यात ती निर्जंतुक केली. ती वायर दाताच्या पोकळीतून हिरडीपर्यंत घालून गळू फोडण्याचा माझा बेत डॉ. मेहेसरेना पटत नव्हता पण मी पडलो साहेब! माहूत हतीला गोंजारत होता व मी हळूहळू वायर आत ढकलत होतो. वायर दोन फूट आत गेली व अचानक हत्तीने मान हलवली! वायरचे टोक हिरडीला टोचून गळू फुटले! दाताच्या पोकळीतून रक्त व पू जोरात वाहू लागला. दोन लिटर घाण द्राव, कुजलेले कापसाचे बोळे व ड्रेसिंग गॉझ बाहेर वाहून आले. अगदी सहजपणे हत्ती हळूहळू वेदनामुक्त झाला.
आम्ही चहा पीत उभे होतो तेथे शेजारी उभा राहून माझ्या अंगावरून सोंड फिरवून हत्तीने जणू माझे आभार मानले. आम्ही अकोल्याला परत गेलो. त्यानंतर दहा बारा दिवस इतर औषधोपचार होऊन हत्ती पूर्ण बरा झाला असे मागाहून मला अकोल्याला कळले.
कोणतीहि आधुनिक उपकरणे हाताशी नसताना कल्पनाशक्ति व व्यावहारिक शहाणपण याच्या जोरावर मी हत्तीला वेदनामुक्त करू शकलॊ व त्याचा जीवहि वाचला याचे मला अतिशय समाधान वाटले.

Tuesday, April 15, 2008

साद - प्रतिसाद

श्री. नारायण जुवेकर हे आमचे आणखी एक ज्येष्ठ सभासद. हेहि कित्येक वर्षांपासून कविता करीत आहेत व आम्हाला ऐकवीत आहेत. मी त्याना थट्टेने सोबतीचे ’राजकवि’ म्हणतों. त्यांची एक ताजी कविता देतो आहे. (लेखन दिनांक ०२-०४-०८)

साद-प्रतिसाद

काव्याच्या त्या मैफलीसाठी
कविवर्यांना निमंत्रिले ---
निर्विकार ते श्रोते बघुनी
कविवर सारे हादरले ॥ १ ॥

पहिल्या फेरित शृंगाराला
परोपरीने आळविले
परि श्रोत्यांनी मौनामधुनी
हिशेब सारे चुकवीले ॥ २ ॥

दुसऱ्या फेरित मग सर्वांनी
निसर्गकाव्ये रंगविली
निसर्ग हाका ऐकुनि श्रोते

हळुच दाविती करांगुलि ॥ ३ ॥

तिसऱ्या फेरित प्रत्येकाने
घोळुन म्हटली चारोळी ----
साद घालण्यासाठी कोणी
हळुच मारिली आरोळी ॥ ४ ॥
चवथ्या वेळी कविवर्यांनी
शेर मृत्यूचे सुनावले
श्रोत्यांनी मग गाढ झोपुनी
नाट्य त्यातले अनुभवले ॥ ५ ॥
शेवटचे ते शस्त्र म्हणॊनी
गझल शोधिले त्या कविंनी
वडे संपतिल या भीतीने
श्रोते उठले खुर्चितुनी ॥ ६ ॥
अशी पांगली मैफल सारी
कविही सारे बचावले
हात जोडुनी वदले सारे
’आज वड्यांनी वाचवले’ ॥ ७ ॥

Sunday, April 13, 2008

मोतीबिंदु


’सोबती’ चे एक ज्येष्ठ सभासद श्री. कृष्णकुमार प्रधान यांच्या कविता सोबतीच्या सभांमध्ये वेळोवेळी ऐकावयास मिळतात. मोतीबिंदु ही ज्येष्ठ नागरिकांची समस्या. तिच्यावरही निकोप मनाने कविता करता येते हे आपणाला नक्की आवडेल.


मोतीबिंदु


एक बाहुली सोडुन जातां माझा डोळा होई व्याकुळ

नवी बाहुली करी तांबडा, रंग जरि तिचा घननीळ

निसर्गाची अनमोल देणगी, ती तर याला सोडुन गेली

नववधू जणू घरी आणली, ही तर प्लास्टिकची बाहुली

रडत, मुरडत घरी आली ती बाहुली जरी प्लास्टिकची

असेल बनली प्लास्टिकची तरि साथ देवो मज अखेरची.

कृष्ण्कुमार प्रधान.

Ph. - 26172731



Friday, April 04, 2008

अहो मला माझ्या बहिणीकडे पोंचवा!

सोबतीचे सभासद श्री. शंकर वासुदेव लिमये यानी साप्ताहिक सभेत सांगितलेली एक सत्य घटना (त्यांच्याच शब्दांत) -
दि. ७ मार्च २००८ ला ११-३० चे सुमारास आपले एक सभासद श्री. दि. म. संत यांचा मला फोन आला कीं वाकोला पोलीस स्टेशनवर ’आपले नाव वसंत दत्तात्रेय’ लिमये एवढेच सांगणारे ८२ वर्षांचे एक गृहस्थ एका रिक्षावाल्याने काल रात्रीपासून आणून सोडले आहेत. त्यांचा पत्ता पोलिसाना हवा आहे. ते तुमचे कोणी नातेवाईक आहेत का? मी म्हटले ’नाही, पण लिमये कुलवृत्तांतात पाह्तो.’ सुदैवाने पुस्तक मिळाले. पण ते २००१ सालचे! त्यात त्या नावाचे १०-१२ निघाले! काही मृत होते तर काही हयात पण कमी वयाचे. एक मात्र वय जुळणारे निघाले. त्यांची जी महिती मिळाली ती वाकोला पोलिस स्टेशनचे सब-इन्सपेक्टर विजय म्हामोणकर यांना फोन करून कळवली. ते गृहस्थ पुण्यात भास्करभुवन, शुक्रवार पेठ येथे राहतात व प्रभात टॉकीज येथे ऑपरेटर होते. योगायोग असा की माझे मामेभाऊ श्री. भिडे हे प्रभात टॉकीज मध्ये मॅनेजर आहेत. मी लगेच त्याना फोन केला. भिडे म्हणाले कीं त्यांची बहीण पुण्यात राहते तिला कळवतो. मी म्हटले की ही माहिती तूं म्हामुणकरांना स्वत:च कळव. श्री. लिमये पोलिस-स्टेशनवर पोचल्यापासून उपाशीच होते. काही खायला दिले तर म्हणत की माझी बहीण जेवल्याशिवाय मी कसा जेवू? ती अधू आहे. बहिणीचा पत्ता आठवत नव्हता. रिक्षात मरोळ येथे बसले व मला शुक्रवारात जायचे आहे असे म्हणत राहिले. २-३ तास फिरवल्यावर रिक्शावाल्याने वाकोला पोलिस-स्तेशनला आणले होते त्याला आता २४ तास झाले होते. म्हामुणकरांनी पुण्याला बंडगार्डन पोलिस स्टेशनला शुक्रवारात तपास करण्यास सांगितले तेव्हा घराला कुलूप दिसले व शेजाऱ्यांकडून कळले कीं पत्नी वारल्यापासून ते सैरभैर झाले आहेत व आता तेथे नसतात. मी फोनवरून लिमयांशी बोलण्याचा व त्यांची आठवण जागी करण्याचा प्रयत्न केला पण ’आपल्याला जायचे आहे ना?’ एवढेच ते बोलले! मग मी पुन्हा कुलवृत्तांतावरून इतर नातेवाइक पाहिले तर एक बहीण सावंतवाडीला, भाऊ व दुसरी बहीण अंधेरीला राहतात अशी माहिती दिली होती. मी तेथे तपास केला तर भाऊ केव्हाच वारले व बहीण जागा सोडून गेली असे कळले. तेव्हा डेड एन्ड आला. पोलिसांनी निराश्रित वृद्धांना आसरा देणाऱ्या वृद्धाश्रमांची माहिती मिळवून जरूर तर लिमयांना तेथे पाठवण्याची तयारी केली होती. तेवढ्यांत श्री. भिडे यांचेकडून कळले की सावंतवाडीची बहीण श्रीमती इंदु काळे आता मुंबईत खेरवाडी येथे राहते. ही माहिती मात्र वाकोला पोलिस-स्तेशनला पुरेशी झाली. श्रीमती काळे यांचा पत्ता शोधून त्यांना बोलावून घेऊन अखेर श्री. लिमये आजोबांना त्यांच्या स्वाधीन केले गेले. बहिण भेटेपर्यंत जेवणहि न सुचणाऱ्या थोरल्या भावाला ती भेटली व या करुण कहाणीचा शेवट गोड झाला.
कुलवृत्तांताचा असाहि एक उपयोग!

Thursday, April 03, 2008

’सोबती’ ची ओळख

मित्रानो, ’सोबती’ ही विलेपार्ले मुंबई येथील एक खूप जुनी ज्येष्ठ नागरिक संघटना आहे. मी तिचा एक सभासद आहे. आमचे पुष्कळसे सभासद कॉम्प्यूटर, ब्लॉग वगैरे गोष्टींशी अजून तरी अपरिचित आहेत. मात्र अनेकाना साहित्याची, काव्याची, तसेच इतर अनेक विषयांची उत्तम जाण व लेखनक्षमताही आहे. त्यांचे वतीने मी हा ब्लॉग सुरू करीत आहे. यावरील लिखाण बरेचसे इतर सभासदांचे असेल, काही थोडे माझेहि असेल. तुम्हाला आवडले तर जरूर कळवा. आमची दर सप्ताहाला सभा असते त्यावेळी मी तुमच्या प्रतिक्रिया सभेला सांगेन.