Wednesday, April 30, 2008

विडंबन गीत


आमचे आणखी एक ज्येष्ठ सभासद श्री. प्र. गो. भिडे यांचे शब्दांशी खेळ सदैव चालू असतात. विडंबन कविता रचणे व हौसेने गाऊन दाखवणे हा त्यांचा एक षौक आहे. त्यांची एक इरसाल विडंबन कविता आज येथे ठेवत आहे. सोबती सभासदांच्यात आपल्या प्रतिसादांमुळे खूप उत्साह व आनंद आहे. माझेकडे कविता व इतर साहित्य जमा होते आहे. तेव्हा ब्लॉग पहात रहा.

मतदारास ....

विसरतील खास तुला, निवडणूक होतां
आश्वासन अन वचनेही देति जरी आता ॥ विसरतील ...

निर्वाचित झाल्यावर वृत्ति ती निराळी
आमिष, धनलोभांची पसरलीत जाळी
गुंतता तयात जीव, कोण तुझा त्राता ॥ १ ॥ विसरतील ...

आमदार, खासदार, इथुन तिथुन सारे
खुर्चीच्या मोहातच अडकले बिचारे
जाणतील दु:ख तुझे, व्यर्थचि या बाता ॥ २ ॥ विसरतील ...

अंतरिची व्यथा तुझ्या जाणवेल ज्याला
शोध त्यास सत्वर तूं, दवडिं ना क्षणाला
आणि तया दृष्टिआड करूं नकॊ नाथा ॥ ३ ॥ विसरतील खास तुला

1 comment:

sachin patil said...

आता निवडणुका पैशाच्या बळावर लढवल्या जातात.
सर्व समीकरणे बदललीत...सुरवातीला ऊभा राहणारा फ़क्त नवा कोरा एक रुपया (नाणे किंवा नोटा वाटतो )मग निवडुन आल्यावर तो एक रुपया कोरा तुम्ही परत केल्यावर मताची किमंत जी ठरलेली होती ती मतदाराला काही ठीकाणी अदा केली जाते.
म्हणजे एक रुपयावर जुगार लागतो...मग निवडुन आल्यावर टिकीटावर खरी लाँटरी लागते....!