Thursday, April 17, 2008

हत्तीच्या दातदुखीची नवलकथा


डॉ. सुभाष भागवत हे सोबतीचे एक मान्यवर सभासद आहेत. पशुवैद्यक विषयातील ते एक ख्यातनाम तज्ञ आहेत. ही नवलकथा त्यानी ’सोबती’च्या एका साप्ताहिक सभेत सांगितली व सर्व सभासद चक्रावूनच गेले. ही कथा वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. डॉ. भागवतांकडून ती आग्रहाने मिळवून त्यांच्याच शब्दात आपल्यासाठी देत आहे. ती आपणाला आवडेलच याची खात्री आहे.

ह्त्तीच्या दातदुखीची नवलकथा
मेळघाटच्या जंगलातील वन विभागाच्या पाळीव हत्तीला झालेली दातदुखी व त्यावरील यशस्वी उपचाराची ही नवलकथा आहे. जंगलामध्ये झाडाच्या बुंध्याशी टकरा घेत खेळणाऱ्या एका तरण्याबांड हत्तीने आपला एक सुळाच तोडून घेतला. तुटलेल्या सुळ्याच्या मध्यभागी असलेल्या पोकळीतून रक्ताची धार लागली. अशिक्षित माहुताने रक्त थांबवण्यासाठी एक लवचिक बारीक फांदी दाताच्या पोकळीत दाबून धरली. रक्त जवळजवळ थांबले. सेमाडोह गावच्या प्राण्यांच्या दवाखान्यात डॉक्टरने दाताच्या पोकळीत कापूस, गॉझ वगैरे भरून रक्तस्राव थांबवला. पण दाताच्या मुळाशी हिरडीला सूज येत राहिली. वेदनांनी हत्ती चिडचिडा बनला. एकाएकी त्याने गावातील सिपना नदीच्या पुलावर उभा असलेला एक ट्रक नदीत उलथून टाकला! आणखी आठ दिवसानी वेदना वाढून हत्तीने अमरावतीकडे येणारी एक एस्टी बसच दोन तास अडवून धरली. जणू सत्याग्रहच केला! वनसंरक्षक साहेबांनी मला हत्तीवर काहीतरी उपचार करा असे सांगितले. नाहीतर हत्तीला मारून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी मी अकोला येथे पंजाबराव कृषि विद्यापीठात पशुविकृतिशास्त्राचा विभागप्रमुख व प्राध्यापक होतो. सर्जरी विभागातील डॉ. मेहेसरे यांना बरोबर घेऊन मी निघालो. तेथे पोचल्यावर हत्तीच्या माहुताने मला विनविले की काही करून याला वेदनामुक्त करा. हत्ती सुजलेल्या जागी हातहि लावू देत नव्हता. आम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तोवर हत्तीने अचानक माहुतालाच सोंडेने उचलून उलटा केला! माहुताने त्याला कसेबसे शांत केले. आम्ही खरेतर घाबरलो. धीर करून जवळ जाऊन सुजेवर हात लावून पाहिले तो सर्व भाग मऊ पडला होता, म्हणजे गळू पिकले होते. डॉ. मेहेसरेंचे मत पडले की हत्तीला ट्रॅन्क्विलाइझर देऊन मग गळू कापावे. हत्तीच्या जाड कातडीमुळे गळू बाहेरून कापून ड्रेन करणे महाकठिण होते व नंतर जखम चिघळण्याची भीति होती. त्यामुळे दुसरा काय उपाय करता येईल याचा मी विचार करत होतो. एकदम एक मजेदार कल्पना मला सुचली. जवळच्या गॅरेजमधून स्कूटरच्या क्लचवायरच्या आतील लवचिक वायर आणवली. स्टोव्हवर उकळत्या पाण्यात ती निर्जंतुक केली. ती वायर दाताच्या पोकळीतून हिरडीपर्यंत घालून गळू फोडण्याचा माझा बेत डॉ. मेहेसरेना पटत नव्हता पण मी पडलो साहेब! माहूत हतीला गोंजारत होता व मी हळूहळू वायर आत ढकलत होतो. वायर दोन फूट आत गेली व अचानक हत्तीने मान हलवली! वायरचे टोक हिरडीला टोचून गळू फुटले! दाताच्या पोकळीतून रक्त व पू जोरात वाहू लागला. दोन लिटर घाण द्राव, कुजलेले कापसाचे बोळे व ड्रेसिंग गॉझ बाहेर वाहून आले. अगदी सहजपणे हत्ती हळूहळू वेदनामुक्त झाला.
आम्ही चहा पीत उभे होतो तेथे शेजारी उभा राहून माझ्या अंगावरून सोंड फिरवून हत्तीने जणू माझे आभार मानले. आम्ही अकोल्याला परत गेलो. त्यानंतर दहा बारा दिवस इतर औषधोपचार होऊन हत्ती पूर्ण बरा झाला असे मागाहून मला अकोल्याला कळले.
कोणतीहि आधुनिक उपकरणे हाताशी नसताना कल्पनाशक्ति व व्यावहारिक शहाणपण याच्या जोरावर मी हत्तीला वेदनामुक्त करू शकलॊ व त्याचा जीवहि वाचला याचे मला अतिशय समाधान वाटले.

6 comments:

Unknown said...

वा..मस्तच अनुभव आहे!! :)

xetropulsar said...

खरोखरच नवल. हत्तीच्या सुळ्यामधून आरपार दाढेपर्यंत भोक असते हे माहित नव्हतं. .

कोहम said...

wah....agadi khiLavUn ThevaNara anubhav hota.....apalya sanghataNetil lokanche anubhav amachya barobar share kelyabaddal thanks

Nandan said...

हा किस्सा, तसेच आधी प्रसिद्ध झालेल्या कविता आणि किस्से आवडले. हा ब्लॉग सुरु केल्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच. सोबतीला आणि या ब्लॉगच्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.

Unknown said...

vaa mastch anubhav aahe :) aani blog sudha zakas aahe.
ani navin mahiti milali hattichya sulya madhun aarpar pokal asate :)

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

आपणा सर्वाना हा ब्लॉग व ही कथा आवडली हे वाचून आनंद वाटला. ’सोबती’ बाबतच्या आपल्या भावनाही मी सोबती सभासदांपर्यंत जरूर पोचवीन. हा ब्लॉग वाचत रहा व इतरांनाही सांगा. धन्यवाद.