Friday, April 04, 2008

अहो मला माझ्या बहिणीकडे पोंचवा!

सोबतीचे सभासद श्री. शंकर वासुदेव लिमये यानी साप्ताहिक सभेत सांगितलेली एक सत्य घटना (त्यांच्याच शब्दांत) -
दि. ७ मार्च २००८ ला ११-३० चे सुमारास आपले एक सभासद श्री. दि. म. संत यांचा मला फोन आला कीं वाकोला पोलीस स्टेशनवर ’आपले नाव वसंत दत्तात्रेय’ लिमये एवढेच सांगणारे ८२ वर्षांचे एक गृहस्थ एका रिक्षावाल्याने काल रात्रीपासून आणून सोडले आहेत. त्यांचा पत्ता पोलिसाना हवा आहे. ते तुमचे कोणी नातेवाईक आहेत का? मी म्हटले ’नाही, पण लिमये कुलवृत्तांतात पाह्तो.’ सुदैवाने पुस्तक मिळाले. पण ते २००१ सालचे! त्यात त्या नावाचे १०-१२ निघाले! काही मृत होते तर काही हयात पण कमी वयाचे. एक मात्र वय जुळणारे निघाले. त्यांची जी महिती मिळाली ती वाकोला पोलिस स्टेशनचे सब-इन्सपेक्टर विजय म्हामोणकर यांना फोन करून कळवली. ते गृहस्थ पुण्यात भास्करभुवन, शुक्रवार पेठ येथे राहतात व प्रभात टॉकीज येथे ऑपरेटर होते. योगायोग असा की माझे मामेभाऊ श्री. भिडे हे प्रभात टॉकीज मध्ये मॅनेजर आहेत. मी लगेच त्याना फोन केला. भिडे म्हणाले कीं त्यांची बहीण पुण्यात राहते तिला कळवतो. मी म्हटले की ही माहिती तूं म्हामुणकरांना स्वत:च कळव. श्री. लिमये पोलिस-स्टेशनवर पोचल्यापासून उपाशीच होते. काही खायला दिले तर म्हणत की माझी बहीण जेवल्याशिवाय मी कसा जेवू? ती अधू आहे. बहिणीचा पत्ता आठवत नव्हता. रिक्षात मरोळ येथे बसले व मला शुक्रवारात जायचे आहे असे म्हणत राहिले. २-३ तास फिरवल्यावर रिक्शावाल्याने वाकोला पोलिस-स्तेशनला आणले होते त्याला आता २४ तास झाले होते. म्हामुणकरांनी पुण्याला बंडगार्डन पोलिस स्टेशनला शुक्रवारात तपास करण्यास सांगितले तेव्हा घराला कुलूप दिसले व शेजाऱ्यांकडून कळले कीं पत्नी वारल्यापासून ते सैरभैर झाले आहेत व आता तेथे नसतात. मी फोनवरून लिमयांशी बोलण्याचा व त्यांची आठवण जागी करण्याचा प्रयत्न केला पण ’आपल्याला जायचे आहे ना?’ एवढेच ते बोलले! मग मी पुन्हा कुलवृत्तांतावरून इतर नातेवाइक पाहिले तर एक बहीण सावंतवाडीला, भाऊ व दुसरी बहीण अंधेरीला राहतात अशी माहिती दिली होती. मी तेथे तपास केला तर भाऊ केव्हाच वारले व बहीण जागा सोडून गेली असे कळले. तेव्हा डेड एन्ड आला. पोलिसांनी निराश्रित वृद्धांना आसरा देणाऱ्या वृद्धाश्रमांची माहिती मिळवून जरूर तर लिमयांना तेथे पाठवण्याची तयारी केली होती. तेवढ्यांत श्री. भिडे यांचेकडून कळले की सावंतवाडीची बहीण श्रीमती इंदु काळे आता मुंबईत खेरवाडी येथे राहते. ही माहिती मात्र वाकोला पोलिस-स्तेशनला पुरेशी झाली. श्रीमती काळे यांचा पत्ता शोधून त्यांना बोलावून घेऊन अखेर श्री. लिमये आजोबांना त्यांच्या स्वाधीन केले गेले. बहिण भेटेपर्यंत जेवणहि न सुचणाऱ्या थोरल्या भावाला ती भेटली व या करुण कहाणीचा शेवट गोड झाला.
कुलवृत्तांताचा असाहि एक उपयोग!

7 comments:

Kamini Phadnis Kembhavi said...

व्यथित करणारी गोष्ट आहे खरोखर. अजुनच सल बोचायला लागला आमच्या परदेशी असण्याचा :(

HAREKRISHNAJI said...

आपला उपक्रम चांगला आहे

U2ISolutions said...

kharach.....apan hi goshta amhalahi sangitalit, tyabaddhal apale dhanyavaad

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

आपणा सर्वांना सोबतीतर्फे व श्री. शंकरराव लिमये यांचे वतीने धन्यवाद. आपल्या कॉमेंट्स मी सोबतीच्या बुधवारच्या सभेत वाचून दाखवीन.माझेतर्फेहि पुन्हा धन्यवाद.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

हा ब्लॉग काही तांत्रिक कारणामुळे बंद झाला होता. आता परत सुरू झाला आहे. पुढील पोस्ट लवकरच ब्लॉगवर टाकीन.

Ketan Khairnar said...

खरोखर आपण ह्या माध्यमाच्या सहाय्याने चांगले काम करत आहात

Anonymous said...

hemnasobatichya sabhasadantarfe aple abhar manato.mazi ek kavita 13 april roji dili ahe. tachi adyap wat pahato ahe.Parantu aaj ha spot sapadat navata mhanun dusra spot suru kele www.krishnap1933mumbaipoets.blogspot.com asa tyacha address ahe.Google through asaluane marathi bhashet lihita ale nahi .Hindi ha 1 ch option hota to ghetala ahe
aplala-krishnakumar pradhan