Friday, May 02, 2008

आज अचानक आठवते मज ..


श्री. श्रीनिवास जुवेकर हे ’सोबती’चे जुने आणि जाणिते सभासद. संस्थेच्या स्थापनेपासून बरीच वर्षेपर्यंत कार्यरत होते. आता वय झाल्यामुळे उपस्थिति असत नाही. रॉयवादी विचारवंत, वृत्तपत्रलेखक, कवि, असे अनेक पैलू असलेले हे व्यक्तिमत्व आहे. ’सांजसरी’ हा १९९५ ते २००५ या काळात वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखांचा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. त्यांची २००७ साली प्रसिद्ध झालेली एक कविता त्यानी माझ्याकडे हौसेने पाठवली ती आज देत आहे. त्यानी शब्दबद्ध केलेला अनुभव अनेकांनी घेतला असेल.
आज अचानक आठवते मज …..
आज अचानक आठवते मज गावामधले घर माडीचे
सभोवताली शीतल छाया चहुबाजूला बांद्ग चिऱ्यांचे
घरापुढिल ती उंच टेकडी सांजसकाळी हासत चढणे
गावामध्ये स्वैर हिंडुनी दिवेलागणिस घरी परतणे
सायंकाळी मायमाउली देवांपाशी लावि निरांजन
तुळशीपाशी आजी-आत्या स्तोत्रे म्हणती पणती लावुन
पाणी भरणे काम आमुचे ’शुभंकरोती’ कधी न चुकले
शाळेमध्ये धुळ-पाटी अन बसावयाला एक कांबळे
दोन खणांची होती शाळा चार इयत्ता तिथे खरोखर
चहुबाजूला पहात गुरुजी, संथा देती छडीबरोबर
तरुणपणी मग पोटासाठी गावोगावी स्थिरावलो
बालपणीच्या रम्य स्मृतीना गोंजारित मी जीवन जगलो
निवृत्त जाहलो धकाधकीतुन संध्याछाया ये दारी
गाव एकदा पाहुन यावे ओढ लागली मना परी
घर माडीचे तगून होते थकल्या माझ्या शरिरासम ते
आढ्यावरती किती वाघळे उंदिर फिरती जमिनीवर ते
सुरकुतलेली जुनी ’कुळे’ ती, मी येताक्षणि हास्य फुले
आपुलकीने त्यांच्या, माझे क्षणात सारे घर भरले
त्यांच्यासाठी सदैव होते विशाल माझे घर उघडे
माणुसकीचे असे गिरवले बालपणीचे सहज धडे
डोळे भरुनी पुन्हा पाहिलीं जुनीं देवळे आणि स्थळे
शेते अमुची नसतानाही त्यात पाहिली हसरी कुळे
वास्तव्य संपता माझे तेथिल पुन्हा धावले मदतीला
सामानहि सारे घेउन आले एस. टी. वरती सर्व मला
नसता कुठली नाती-गोती प्रेमे त्यांच्या गहिवरलो
’पुन्हा लवकरी याहो दादा’ शब्द ऐकुनी गदगदलो
मनात म्हटले, ’कसला येतो पुन्हा गड्यानो मी आता
निरोप घ्यावा हा शेवटचा’ कंठ फुटेना हे म्हणता.

2 comments:

sachin patil said...

मनात म्हटले, ’कसला येतो पुन्हा गड्यानो मी आता
निरोप घ्यावा हा शेवटचा’ कंठ फुटेना हे म्हणता.
व्वा व्वा जुन्या आठवणींच्या हिदोळ्यांवर मन अजुनी झुलते....शेवटी आठवणीनां नाजुकपणे सांभाळणारे मनचं....!

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

आजच मला श्री. जुवेकर यांचा फोन आला होता. त्यांच्या नातवाच्या मदतीने त्यांना अखेर ’सोबती’चा ब्लॉग पाहता आला. त्याचा आनंद त्यानी भरभरून घेतलेला दिसत होता. आता त्याना पुन्हा फोन करून तुमची टिप्पणी पण जरूर पहावयास सांगेन. धन्यवाद.