Thursday, April 15, 2010

गाणारी संवादिनी





गाणारी संवादिनी

दि. ३ फ़ेब्रुवारी होळीनिमित्त गोखले सभागृहात लोकमान्य सेवा संघ व सोबती यांच्या संयुक्त विद्यमाने पं. तुळशीदास बोरकर यांच्या संवादिनी वादनाचा कार्यक्रम झाला.

प्रथम लोकमान्य सेवा संघाचे उपाध्यक्ष श्री वि.वि. मेहेंदळे यानी प्रास्ताविक केले व सोबतीचे अध्यक्ष श्री. मुकुंद पेठे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देउन पं. बोरकर व त्यांच्या साथीदारांचे स्वागत करण्यात आले. श्री. विजय पंतवैद्य यानी पं. बोरकर यांचा यथोचित शब्दात परिचय करून दिला. देशातच नव्हे तर परदेशातही पं. बोरकरांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत व गाणार्‍या संवादिनीवरील यशस्वी कलाकार म्हणून ते सर्वाना सुपरिचित आहेत. नंतर पं. बोरकरांच्या संवादिनी वादनास प्रारंभ झाला.

राग वटदीपने प्ररंभ झाल्यावर , मर्मबंधातली ठेव ही, चांद माझा हासरा, नाथ हा माझा, स्वकुल तारकासुता, नरवर कृष्णासमान, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, प्रेमसेवा शरण इत्यादि नाट्यगीते व भक्तीगीते सादर करुन बहार आणली. मध्यंतरानंतर त्यांच्या गुरुनी बांधलेली तिलक देस रागातली बंदिश वाजविली. नंतर आणखी काही नाट्यगीते वाजवून बोला अमृत बोला या अवीट गाण्याच्या वादनाने कार्यक्रमाची सांगता केली.
संवादिनीवरील या बहारदार गाण्यानी श्रोत्यांचे कान तृप्त झाले.

त्यांच्या संवादिनी वादनाचे कौतुक करताना कार्याध्यक्षा श्रीमती विद्या पेठे म्हणाल्या
‘आज पं. बोरकरांच्या संवादिनी वादनाने होळीच्या कार्यक्रमात सप्तरंग भरले. जसे गाणारे व्हायोलिन तशी ही गाणारी संवादिनी आहे. त्यानी श्रोत्यांच्या मर्मबंधातली ठेव अचूक ओळखून विविध नाट्यगीते सादर केली त्यामुळे या होळीत रंग खेळायला नरवर कृष्ण आला. त्याच्याबरोबर स्वकुल तारका सुता रुक्मीणीही आली. अजुन रात्र झाली नाही तरी हसरा चांद उगवला आणि अशी ही प्रेमसेवा केल्यानंतर आम्ही सारे श्रोते तुम्हाला अगदी शरणागत आलो आहोत. हे सारे तुमचे वादन अमृताहुनी गोड झाले.‘

त्यानंतर कार्यवाह श्री. अरविंद वाकणकर यानी आभार प्रदर्शन केले.

No comments: