Wednesday, February 25, 2009

विडंबन नाट्यगीत

नच माते करुं कोपा ....
एका नाटकवेड्या मातापित्यांच्या, तीन वडील बहिणी असलेल्या, व्रात्य मुलाचे हे गाणे आहे. ’नच सुंदरि करुं कोपा …’ हे त्याच्या वडिलांचे आवडते गाणे. फार खोड्या केल्यामुळे रागावलेल्या आईला तो म्हणतो ….

नच माते करुं कोपा
मजवरि धरिं अनुकंपा ।
रागाने जळफळती
मागे बघ अप्पा --- ॥

पोरी तुज बहु असती
परि प्रीती मजवरती ।
जाणसि तूं हें चित्तीं
मग कां घालिसि भीती ।
करिं मी दंगामस्ती
परि वाटे तव धास्ती ।
प्रेमा तो मजवरिचा
नेउ नको लोपा …॥ १ ॥

एवढे ऐकल्यावर आईने त्याचा कान धरला व म्हटले, ’मेल्या, यांची नक्कल करतोस काय?’
त्यावर तो म्हणतो, ’थांब थांब, अजून गाणं संपलं नाही, पुढे ऐक.’
आई-वडील विचारांत पडले, पुढल्या अति शृंगारिक कडव्याचें हा काय करणार? मुलाने पुढे चालू केले --

करपाशीं या तनुला
बांधुनि करिं शिक्षेला ।
धरुनीयां कानाला
गुच्चा घे गालाला ।
परि ना धरिं अबोला
सोसेना तो मजला ।
शिक्षा ती अति कठोर
होइल मत्पापा …॥ २ ॥
नच माते करुं कोपा
मजवरि धरिं अनुकंपा ।
हासुनिया बघति अतां
प्रेमाने अप्पा …..॥ ३ ॥

विडंबन कवि : प्र. के. फडणीस

No comments: