Wednesday, May 20, 2009

घडविले त्यानी ‘जीवन’

घडविले त्यानी ‘जीवन ’
एक मुलाखत
प्रत्येकजण आपल्या वाट्याला आलेले जीवन जगतच असतो. पण काहीजण मात्र जीवन घडवतात. याचे एक उदाहरण म्हणजे विले पार्ले (पू) स्टेशनजवळील ‘जीवन रेस्टॉरंट’ चे मालक श्री. वासुदेव विठ्ठल जोगळेकर. पण सारे परिचित त्याना आपुलकीने आप्पा म्हणतात. आजचे ‘जीवन रेस्टॉरंट’ त्यानी उभे केले, जिद्दीने, अपार कष्टाने, प्रामाणिकपणे आणि नेकीने. मराठी माणसाने धंदा सुरु केला म्हणजे तो धंद्यात पडला असे म्हटले जाते. पण आप्पानी या धंद्यात प्रवेश केला आणि आज ते यशस्वीपणे आपल्या व्यवसायात ठामपणे उभे आहेत. गेली पंचावन वर्षे ‘जीवन’ खवय्यांचे आश्रयस्थान झाले आहे. या यशस्वी व्यावसायिकाची मुलाखत सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद श्री. शंकरराव लिमये यानी घेतली. त्यावर आधारित खालील वृत्तांत.
आप्पांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील जांभुळपाडा. त्याना दोन भाउ व तीन बहिणी. वडील शेतकरी. दुर्दैवाने आप्पा पाच वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरवले. भाता शिवाय उत्पन्न नाही. मग सार्‍या भावानी मुंबईची वाट धरली. विवाहित बहिणीचा आधार होता. दोन मोठे भाउ सरकारी नोकरीला लागले. आप्पा गिरगावातल्या हायस्कूलमध्ये शिकले. मात्र नोकरीच्या मागे न लागता काही व्यवसाय करावा हा त्यांचा ठाम विचार होता. पण व्यवसाय म्हटला की त्याला थोडेफार भांडवल हवे. सरकारी नोकरदार भावांची मदत मर्यादित होती. मग आप्पानी थोडे दिवस पार्ल्यातील साठे यांच्या सुप्रसिद्ध विजय स्टोअर्स
मध्ये नोकरी धरली व तिथे काट्यापासून गल्ल्यापर्यंत सर्व कामे केली. नकळतपणे व्यवसायातील अनेक पैलूंचा अनुभव त्याना मिळाला. मात्र व्यवसाय कोणता करावा हे नक्की झाले नव्हते.एके दिवशी त्याना कळले की पार्ले स्टेशनजवळ एक हॉटेल विकायचे होते. मामांच्या मदतीने ते हॉटेल विकत घेण्याचे धाडस त्यानी केले. पहिली दोन वर्षे हॉटेल तोट्यात गेले पण आप्पानी धीर सोडला नाही. उलट तोटा झाला तरी हॉटेल व्यवसायातील खाचाखोचा त्याना समजल्या आणि आवश्यक त्या बदलासह हॉटेल चांगले चालू लागले.सुरुवातीच्या २० बाय १० च्या जागेत सुरु झालेले आता ‘हॉटेल जीवन’ ४००० चौ.फूट जागेत दिमाखाने उभे आहे. वास्तविक शेजारीच ‘रामकृष्ण’ हे हॉटेल होते. त्यामुळे स्पर्धा अपरिहार्य होती. पण हॉटेल व्यवसायात काळाप्रमाणे बदलावेच लागते. त्यानुसार बदल करून शेजारी प्रस्थापित हॉटेल असूनही ‘जीवन’ ला गिर्‍हाईक मिळू लागले. मराठी पद्धतीच्या पदार्थांबरोबरच लोकांच्या बदलत्या चवीप्रमाणे दाक्षिणात्य, पंजाबी, चायनीज पद्धतीचे पदार्थही जीवनमध्ये मिळू लागले. मग ‘जीवन’ ने मागे वळून पाहिले नाही. विशेष म्हणजे आप्पांचे शेजारच्या ‘रामकृष्ण’ हॉटेलच्या मालकाशी उत्तम संबंध आहेत. व्यवसायामुळे आर्थिक सुस्थिती आली तरी आप्पांची सामाजिक दृष्टी हरवली नाही. बाबुराव परांजपे यांच्या स्मरणार्थ रोगनिदान केंद्र म.न.पा.च्या मोकळ्या प्लॉटवर उभे करण्याचा संकल्प संबंधितानी सोडला होता. परंतु सदर प्लॉट म.न.पा. हस्तांतरित करीत नव्हती. आप्पानी आपले वजन खर्च करून तो प्लॉट रोगनिदान केंद्रासाठी मिळवून दिला व एक सामाजिक उपक्रम म्हणून हे अद्ययावत रोगनिदान केंद्र कार्यान्वित झाले आहे. पार्ल्यातील एक प्रसिद्ध कॅटरर कै. बापू पंडित हे आप्पांचे परिचित होते. ते एक सामाजिक दृष्टी असलेले दानशूर गृहस्थ. प्राप्तीतला बराचसा वाटा ते उदारहस्ते अनेक संस्थाना देत.वयापरत्वे त्यानी व्यवसाय बंद करण्याचे ठरविले. पण स्वस्थ बसणे बापूंच्या स्वभावात नव्हते. मग त्यानी वृद्धाश्रम काढण्याचा निर्णय घेतला. प्रथम जमीन खरेदीसाठी मोठी रक्कम मोजल्यावर वृद्धाश्रम उभा करण्यासाठी अधिक पैशांची आवश्यकता होती. म्हणून बापूनी पार्ल्यातील अनेक परिचितांकडून मुदत ठेवीवर व्याजाने पैसे घेतले व अखेर वृद्धाश्रम चालू झाला. आप्पानी वृद्धाश्रमाच्या उभारणीत आपला वाटा उचललाच व शिवाय मुदत ठेवी परत करण्यासंबंधी अडचण निर्माण झाली असता आप्पानी ही जबाबदारी पत्करली व आवश्यक त्या पैशांची तरतूद करून सर्व ठेवी व्याजासह परत केल्या. बापू पंडितानी त्याना वृद्धाश्रमाचे विश्वस्त म्हणून नेमले. मध्यंतरी दोन वर्षांपूर्वी बापूंचे निधन झाले. परंतु आप्पांच्या मार्गदर्शनाखाली व मदतीने वृद्धाश्रम व्यवस्थित चालू आहे. विशेष म्हणजे काही ठेवीदारानी आपल्या ठेवी वृद्धाश्रमाला देणगी म्हणून दिल्या. आप्पांचा मुलगा बी.ई.(इलेक्ट्रॉनिक्स) असूनही नोकरी न करता आप्पांच्या बरोबरीने व्यवसायात आपले योगदान देत आहे. हॉटेलव्यतिरिक्त त्यांचा कॅटरिंगचाही व्यवसाय आहे. जीवन उपहारगृह सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत उघडे असते. नोकरवर्ग दोन पाळ्यांमधे काम करतो. आप्पांचे नोकरांशी सौहार्दाचे संबध आहेत.
अनेक सामाजिक संस्थाना त्यानी मदतीचा हात दिला आहे. टिळक विद्यालयाला त्यांचे भरीव सहाय्य झाले आहे.
त्यानी सांगितले की हॉटेल व्यवसाय फायद्याचा असला तरी कमीत कमी बारा तास काम करणे आवश्यक असते. हा व्यवसाय मेहेनतीचा आहे आणि अथक मेहनत करणारा यात यशस्वी होऊ शकतो.समारोपाच्या वेळी त्यानी ‘सोबती’ला देणगीही दिली. शिवाय सर्व उपस्थित सोबती सभासदाना चविष्ट अल्पोपहार दिला. या मुलाखतीद्वारे श्री. आप्पा जोगळेकर या यशस्वी उद्योजकाचे आणि त्यांच्यातल्या माणसाचे ‘जीवन’ दर्शन झाले.

No comments: