Sunday, December 27, 2009

चतुरस्र अभिनेता सुनील शेंडे - मुलाखत

नाटक, टी.व्ही. मालिका व चित्रपट य तिन्ही क्षेत्रातील एक यशस्वी अभिनेते श्री. सुनील शेंडे यांची सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद श्री. शंकरराव लिमये यानी मुलाखत घेतली.

श्री शेंडे उच्च विद्याविभूषित आहेत - M.Sc., D.B.M. शिवाय ते पार्लेकरही आहेत.

या व्यवसायात कसे आलात या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की अभिनयाचा वारसा त्यांच्या आई वडिलांकडून मिळाला. वयाच्या सहाव्या वर्षी त्यानी सोसायटीत झालेल्या नाटकात पहिली भूमिका केली. नंतर त्यानी गुरुदक्षिणा या नाटकात कृष्णाची भूमिका केली. अभिनयाचा त्यांचा प्रवास असा सुरु झाला.
हा व्यवसाय निवडताना प्रथम वडिलांचा विरोध होता कारण चंदेरी झगमगाटात अभिनेता वाहवत जाण्याचा धोका असतो. मात्र उच्च विद्याबिभूषित आपला हा मुलगा वाहवणार नाही याची खात्री पटल्यावर त्यांचा विरोध मावळला. श्री. शेंडे यांच्या मते या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नशिबाचा भागही महत्वाचा असतो. त्यात शिरल्यावर संघर्ष किंवा धडपड आवश्यक असते. मात्र ते म्हणाले ‘मला मिळालेले यश हे माझ्या अभिनय गुणांमुळे मिळाले. मी कुणाकडे काम मागायला गेलो नाही’.

‘शांती’ या मालिकेत त्यांची भूमिका महत्वाची होती व ती विशेष गाजली. ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ या नाटकात त्यानी प्रमुख भूमिका केली होती. इतर अनेक नाटकातही त्यानी प्रमुख भूमिका केल्या आहेत. त्यांची ‘सर्कस’ या मालिकेतील भूमिकाही महत्वाची होती.

त्यांचे अभिनय गुण पाहून त्याना काही हिंदी मालिका व चित्रपटातही भूमिका मिळाल्या. त्यांच्या मते जर मराठी अभिनेत्यानी अभ्यासपूर्वक हिंदीचे उच्चार सुधारले तर हिंदीतही मराठी अभिनेते यशस्वी होऊ शकतात.

ते पुढे म्हणाले की केवळ मनोरंजन करणार्‍या भूमिका स्वीकरण्यापेक्षा समाज प्रबोधन करणार्‍या किंवा काही संदेश देणार्‍या भूमिका स्वीकरण्याकडे त्यांचा कल असतो.

नाटक, टी.व्ही. मालिका व चित्रपट यांपैकी कोणते क्षेत्र त्याना आवडते या प्रश्नावर त्यानी नाटकाला प्राथमिकता दर्शविली. नोकरी, संसार व व्यवसायानिमित्त होणारे दौरे ही कसरत त्यानी कशी केली यावर ते म्हणाले की आई वडिलानी केलेल्या संस्कारानी त्याना व्यसने व अनिष्ट गोष्टींपासून दूर ठेवले.

त्यांच्या मते भूमिकांमध्ये विविधता असावी, ठराविक साच्याच्या नसाव्यात. या विचाराने त्यानी सकारात्मक व काही नकारात्मक भूमिकाही स्वीकारल्या पण त्याही विचारपूर्वक. प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करावा लागतो. मात्र ती यशस्वी होईलच याची नेहमीच खात्री नसते कारण या व्यवसायात अनेक प्रश्न गुंतलेले असतात. एकादे वेळी विपरीत अनुभवही येतात. काही वेळा अपरिहार्यपणे थोडीफार तडजोडही करावी लागते.

श्री. शेंडे यानी असेही सांगितले की ते कुटुंबवत्सल गृहस्थ आहेत व त्यामुळे ताण तणावांपासून मुक्त आहेत. ते पुढे म्हणाले की ते फाजील अपेक्षा ठेवीत नाहीत कारण अपेक्षा पुरी झाली नाही तर अपेक्षा भंगाचे दु:ख पदरी पडते.

त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास दीर्घ आहे. हिंदी/मराठी टीव्ही. मालिका, चित्रपट व नाटक मिळून २०० च्या वर त्यानी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या बहुतेक भूमिका भारदस्त व्यक्तिमत्वाच्या किंवा गंभीर स्वरुपाच्या असतात आणि त्यानी त्या विचारपूर्वक निवडलेल्या असतात.

या मुलाखतीचा शेवट त्यानी त्यांच्या ‘ आनंदाचा पाउस आता पडावा ’ या कवितेने केला.

No comments: