कोचीच्या दक्षिणेला अंदाजे ८० ते १०० कि. मि. अंतरावर, वेंबानाड हे ३० ते ४० फुट खोल असलेले,प्रचंड मोठें व कृत्रिम सरोवर आहे . सरोवरांत बेटे आहेत. एका बाजूनें तीन नद्यांचें पाणी सरोवरात येतें व दुसरीकडून अतिरिक्त पाणी बॅक वॉटर्स द्वारा समुद्रांत वाहून जाते. वेंबानाडचा विस्तार जवळ जवळ १५०० वर्ग किलोमिटर आहे . बाहेरच्या बाजूला शेते व नारळीच्या बागा दिसतात. अनेक पाणपक्षी दिसतात. जगप्रसिद्ध Snake Boat Race ,दर ऑगस्टमध्ये, येथील एका भागांत होते. विजेत्या टीमला नेहरू ट्रॉफी दिली जाते. या सरोवराच्या किनार्यावर एका बाजूला कुमारकोम् वसलें आहे . वेगवेगळ्या कंपन्यांच्या हाउसबोटी येथे तरंगत उभ्या असतात. वेंबानाडच्या दुसर्या बाजूला अलप्पुर्हा आहे . आम्ही कोची-कालटी-गुरुवायूर-कुमारकोम्/अलप्पुर्हा-मुन्नार ह्या प्रवासाचें नियोजन इंटरनेटवर केले होतें. गुरुवायूरहुन कुमारकोम्ला टोयोटा इनोव्हानें दुपारी १ च्या सुमारास आलो. हाउसबोट ’सेंट मेरी ’उभीच होती. आम्ही बोटीवर आलो व बोट लगेच मार्गक्रमण करू लागली . सरोवरांत फारशा लाटा नसतात. बोट संथपणें जाते. पण कांही अनपेक्षित प्रसंग ओढवला तर बोटीवर लाइफ जॅकेट्स् व फ्लोट्स् असतात.
वेलकम् ड्रिंक म्हणून नारळपाणी देण्यांत आलें. नंतर सामिश भोजन झालें. योग्य वेळीं अल्पाहार , फलाहार (केळी, अननस) व चहा झाला. या सर्व वेळेंत, मार्गक्रमण चालूच होतें. मध्यंतरी , बोट अलप्पुर्हाजवळ , एका बेटाच्या कांठाला लागली. तेथे, चहा-कॉफी व कोल्ड ड्रिंक्सचे स्टॉल्स होते . ताजी मासळी विक्रीला होती पण फार महाग होती. उदा., टायगर प्रॉन्स् जे किलोत ४ ते ५ येतात, ९०० रुपये प्रतिकिलो होते. अर्ध्या तासाच्या मुक्कामानंतर परत मार्गस्थ झालो.
सुर्यास्ताच्या सुमारास एका निर्जन ठिकाणीं ,कांठाला लागून, बोटीने नांगर टाकला. बाजूला आणखी एक बोट होती. त्यावरील ठाण्याच्या एका युगुलाशी ओळख झाली. रात्रभर मुक्काम येथेच बोटीवर होणार होता. आम्ही गळानें कांही लहान लहान मासे पकडले व सोडून दिले. काळोख झाल्यानंतर किटकांचा त्रास टाळण्याकरिता , डेक सभोवतीचे सर्व पडदे खालीं सोडून डेक बंदिस्त केला गेला. रात्रीच्या जेवणांत मासे ( कारी मिन ), केरळी पराठा वगैरे पदार्थ होते.
रात्रभर शांत झोप झाल्यानंतर , पहाटेस जाग आली . बोटीचा क्र्यू ( पायलट ,स्वयंपाकी व हरकाम्या मदतनीस ) पडदे वर करणें, एंजिन रुम साफ करणें , न्याहरीची तयारी वगैरे कामांत व्यस्त होता. यथावकाश चहा आला .बोटीने नांगर उचलला व कुमारकोम्च्या दिशेला निघाली. आम्ही, सकाळीं ताडीची सोय करायला सांगितले होतें. त्याप्रमाणें बोट किनार्यावर एके ठिकाणीं लागली. जवळच ताडी मिळाली पण ती चांगल्या प्रतीची नव्हती ,म्हणून क्र्यू ला दिली. परत मार्गक्रमण. न्याहरी आली . आता आम्ही उतरण्याच्या तयारीला लागलो होतो. ९ च्या सुमारास, बोट नियोजित ठिकाणीं, कुमारकोमच्या किनार्याला लागली. आमच्याकरिता तीच टोयोटा इनोव्हा घेऊन, तोच ड्रायव्हर हजर होता. क्र्यू चा निरोप घेऊन आम्ही मुन्नारच्या मार्गाला लागलो.
... क्रमश: >>>> मुन्नार
No comments:
Post a Comment