Friday, September 25, 2009

विद्यार्थी गौरव
सोबतीचा ‘ विद्यार्थी गौरव ’ हा एक महत्वाचा समारंभ दरवर्षी साजरा होतो. या वर्षी हा कार्यक्रम दि. १६ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. ‘ विद्यार्थी सहाय्य निधी ’ असा कायम स्वरूपी निधी सोबतीने निर्माण केला आहे व त्यावरील व्याजातून विद्यार्थी गौरव समारंभात विद्यार्थ्याना पारितोषिके दिली जातात. दर वर्षी अनेक सोबती सभासद व सोबतीचे हितचिंतक या निधीसाठी देणग्या देत असतात.
पारितोषिके देण्यासाठी विद्यार्थी निवडताना सामाजिक दृष्टी ठेवली जाते. पार्ल्यात काही अशा शाळा अहेत ज्यांमध्ये आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिकत असतात. त्याना आर्थिक मदत व्हावी, उत्तेजन मिळावे व त्यांचे कौतुक व्हावे हा यामागे हेतू असतो. विद्यार्थी निवडताना हा निकष प्रामुख्याने विचारात घेतला जातो.
या समारंभाचे अध्यक्षस्थान हेतुपूर्वक एका बुद्धिवान महाविद्यालयीन विद्यार्थिनी कुमारी अनुजा जोशी हिला देण्यात आले होते. दहावीपर्यंतच्या परीक्षांमध्ये पहिल्या तीन विद्यार्थी/विद्यार्थिनीना अध्यक्षांच्या हस्ते रोख पारितोषिके देण्यात आली. आपल्या पाल्यांचे कौतुक पहाण्यासाठी काही विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये पार्ल्यातील उत्कर्ष मंडळातील मूक कर्णबधीर शाळेतील एक विद्यार्थिनीही होती.
या समारंभात सोबती सभासदांच्या नातवंडांचेही कौतुक केले जाते. ठरलेल्या निकषांप्रमाणे ज्या नातवंडानी चांगले यश संपादन केले होते त्यानाही पारितोषिके देण्यात आली.
काही विद्यार्थी/विद्यार्थिनीनी कविता, गीते, नाट्यप्रवेश सादर केले व आपल्यातील कलागुणांचा परिचय करुन दिला.
समारंभाची अध्यक्श या नात्याने कुमारी अनुजा जोशी हिने पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व यापुढेही हे विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे तर इतर बाबतीतही चमकतील अशी आशा व्यक्त केली. तिने पुढे सांगितले की केवळ डॉक्टर, इंजिनीयर होण्याच्या मागे न लागता मुलानी मातृभाषा व इतर भाषांचाही अभ्यास करावा. शिवाय इतिहास व इतर अनेक कलांचा अभ्यासही त्यानी करावा. सध्याच्या काळात अशा कलानाही महत्व प्राप्त झाले आहे.
कॉफीपानाने समारंभाची सांगता झाली.

Wednesday, September 16, 2009

किस्से आणि कविता

किस्से आणि कविता
दि. ९ सप्टेंबर रोजी श्री गजानन भास्कर मराठे यांचा ‘किस्से व कविता’ हा कार्यक्रम झाला.
श्री मराठे, वय वर्षे ७९, मुंबई येथील BEST या उपक्रमातून सचिव या पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ सेवेत त्याना आलेले अनुभव व भेटलेली नाना प्रकारची माणसे यांवर आधारित त्यानी अनेक रंजक हकिगती व किस्से सांगितले.
एक किस्सा होता ते परदेश प्रवासाला गेले होते त्यावेळचा. प्रवाशांमध्ये एक स्त्री एका पुरुषाबरोबर आली होती परंतु तो तिचा पति नव्हता. पण तिला ओळखणारी एक स्त्री प्रवासी निघालीच आणि तिची फारच पंचाईत झाली.
श्री मराठे सेवानिवृत्तीनंतर बंगाली भाषा शिकले. त्यानी त्या भाषेच्या दोन परिक्षाही दिल्या. त्यासंबन्धी शाळेत जाणार्‍या त्यांच्या नातवांशी होणारे संवाद त्यानी सांगितले ते मजेशीर होते. त्यानी बंगाली भाषेची काही वैशिष्ट्येही सांगितली. बंगाली भाषा समृद्ध व कानाला गोड लागणारी आहे असे त्यानी आवर्जून सांगितले.
लग्नानंतर बरीच वर्षे ते चाळीत रहात होते. परंतु त्यांच्या पत्नीला चाळीत रहाण्याचा कंटाळा आला होता. त्यासंबंधी त्यानी आपली व्यथा ‘येउ कशी कशी मी नांदायला’ या धर्तीची कविता करून ती श्री. मराठे याना ऐकवली. कवितेत धमकी होती माहेरी जाण्याची आणि फ़्लॅट घेईपर्यंत परत न येण्याची. या कवितेला सर्वानी चांगली दाद दिली.
त्यांच्या नात्यातल्या दोन वृद्ध स्त्रियानी प्रथमच विमान प्रवास केला. विमान उशिरा सुटणे याची त्यानी एस.टीशी तुलना केली. हवाई सुंदरीशी झालेला त्यांचा संवाद व त्यानी तिला दिलेला संल्ला असे अनेक मजेशीर किस्से त्यानी सांगितले.
बेस्टमधील एका हरकामी कर्मचार्‍याची हकिगत पु.लंच्या ‘व्यक्ति आणि वल्ली’ यातील नारायण या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीची आठवण करून देणारी होती.
शिपाई म्हणून बेस्ट मध्ये सेवेला सुरुवात करुन पुढे शिक्षण घेउन व मेहेनतीने वरिष्ठ पदापर्यंत तो पोहोचला. पण त्याची एवढीच ओळख नव्हती. कुणाचे काही काम असले आणि त्या नारायणाला सांगितले की तो म्हणे ‘ काळजी नको. काम होईल ’ आणि लागेल त्या लटपटी खटपटी करून तो ते काम करुन देई. याचे कारण त्याचा जनसंपर्क दांडगा होता आणि नवीन संबंध जोडण्यात तो हुशार होता. पासपोर्ट कार्यालय, रुग्णालये, पोलीस खाते, शाळा, महाविद्यालये अशा अनेक ठिकाणी त्याने माणसे जोडली होती. आदबशीर, गोड व आर्जवी वाणी आणि काम होण्यासाठी पडतील ते कष्ट करण्याची तयारी त्यामुळे विशेषत: अधिकारी वर्गात तो लोकप्रिय होता. ही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा लक्षात रहाणारी ठरली.
एकंदरीत हा कार्यक्रम सोबती सभासदाना आगळे समाधान देउन गेला.

Sunday, September 13, 2009

दम मारो दम

जरा गंमत
नवर्‍यानो संभाळा, बायको मारील दम
नवरा बायकोमधील भांडणे किंवा वादविवाद प्रत्येक घरात थोड्याफार फरकाने होतच असतात. काही वेळा रागावलेल्या बायका नवर्‍यांची कडक शब्दात हजेरीही घेतात. नोकरी किंवा व्यवसायातल्या आपल्या नवर्‍याला बायका रागात कसा दम मारू शकतील व त्यांचे वाक्बाण कसे असतील या कल्पनेवर आधारित खालील एक झलक. मात्र बहुतेक नवरे असा दम फारसा गंभीरपणे घेत नाहीत कारण तो प्रेमाचा दम असतो.
जर नवरा.... बायकोने मारलेला दम
असेल तर ---------------------------
पायलट - गेलात उडत
शिक्षक - मला शिकवू नका
धोबी - चांगली धुलाई करीन
तेली - गेलात तेल लावत
न्हावी - बिन पाण्याने करीन
नट - कशाला उगाच नाटक करता ?
वाणी - उगाच पुड्या सोडू नका
डॉक्टर - मला उगाच उपदेशाचे डोस पाजू नका
शिंपी - टाके ढिले करीन
वकील - माझ्यापुढे आर्ग्युमेंट नको
कडधान्य - विकणारा मूग गिळून गप्प बसा
वैद्य - माझ्यापुढे तुमची मात्रा चालणार नाही
तमासगीर - तुमचे तुणतुणे बंद करा
न्यायाधीश - ऑर्डर ऑर्डर
आचारी - माझ्यापुढे तुमची डाळ शिजणार नाही
तेत्रतज्ञ - माझ्या डोळ्यात धूळ फेकू नका
--------------------

Wednesday, September 09, 2009

गणेश वंदना

संगीत गणेशवंदना
दिनांक २ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी निमित्त ‘गणेश वंदना’ हा भक्तीपूर्ण बहारदार संगीत कार्यक्रमाचा आस्वाद सोबती सभासदानी घेतला. हा कार्यक्रम सूरश्री संगीत मंडळाने सादर केला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम अलिकडेच आकाशवाणीवरही सादर झाला होता.
या कार्यक्रमाच्या प्रवर्तक होत्या सोबतीच्या ज्येष्ठ सभासद श्रीमती विद्या पेठे. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील गणेश गीते व मध्यंतरीचे संवाद त्यानीच लिहिले होते. विद्याताई चांगल्या कवयित्रीही आहेत व त्यांचा ‘चांदणे’ हा कविता संग्रहही प्रसिद्ध झाला आहे. त्याना लाभलेली सुरेल आवाजची देणगी, संगीताचा अभ्यास व स्वत:च्या गीताना लावलेल्या सुमधूर चाली यामुळे हा कार्यक्रम सभासदाना आगळा आनंद देऊन गेला. ही गीते लिहीण्यापूर्वी त्यानी गणेशावरील अनेक ग्रंथातून माहिती घेतली होती. अर्थात या कार्यक्रमात इतर भगिनींचाही सहभाग होता. सामुहिकपणे सर्वानी तो सुरेलपणाने सादर केला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्या पेठे रचित गणेशावरील भूपाळीने झाली. गजानन स्तुतीपर अनेक गीते सादर केली गेली. या संगीत कार्यक्रमात सोबतीच्या दुसर्‍या जेष्ठ सभासद श्रीमती नंदा देसाई यांचाही महत्वाचा सहभाग होता. त्यानाही सुरेल आवाजाची देणगी लाभल्याने सोबतीच्या अनेक संगीत कार्यक्रमात विद्याताईंबरोबर त्यांचाही महत्वाचा सहभाग असतो. विशेष म्हणजे तबल्यावर श्री.मुकुंद पेठे व संवादिनीवर श्री.मधुकर देसाई या उत्साही ज्येष्ठ सभासदानी या संगीत कार्यक्रमात साथ केली.
त्यानंतर सोबतीचे एक ज्येष्ठ व हरहुन्नरी सभासद श्री. शंकरराव लिमये यांचा कार्यक्रम झाला. अर्थात विषय होता सार्वजनिक गणेशोत्सव व त्याचे साजरे केले जाणारे स्वरुप. हा कार्यक्रम त्यानी ‘आपण याना पाहिलेत का?’ या मथळ्याच्या कथेच्या स्वरुपात सादर केला.
गेली अनेक वर्षे सार्वजिक गणेशोत्सवांचे स्वरुप बदलत आहे. यामागे भक्तिभावाचा भाग असला तरी त्यात अनेक अनिष्ट गोष्टींचा शिरकाव झाला आहे. जमा केल्या जाणार्‍या हजारो, लाखो रुपयांच्या वर्गण्या,
बर्‍यावाईट कार्यकर्त्यांचा सहभाग, आरास, खाण्यापिण्यावर केला जाणारा खर्च या बाबी गणेशोत्सवाला गालबोट लावतात. अर्थात काही गणेश मंडळे विधायक कार्यही करतात. तीच गोष्ट समुद्रात केले जाणारे गणेश मूर्तींचे विसर्जन ज्यात गणेश मूर्तींची एक प्रकारे विटंबनाच होते. श्री. लिमये यानी आपल्या नेहमीच्या मिष्किल शैलीत हा कार्यक्रम सादर केला.
कार्यवाह श्रीमती शीला निमकर यानी श्री. दा. कृ. सोमण यांच्या मुलाखतीवर आधारित गणपतीसंबंधी अनेक गैरसमजांवर प्रकाश टाकला.

Tuesday, September 08, 2009

आयुर्वेद - पंचकर्म

आयुर्वेद - पंचकर्म
सोबतीच्या अनेक साप्ताहिक कार्यक्रमांत तज्ञ डॉक्टरांची विविध विषयांवर माहितीपूर्ण भाषणे आयोजित केली जातात. दि. १९ ऑगस्ट रोजी आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांचे पंचकर्माचे महत्व सांगणारे भाषण झाले. तज्ञ डॉक्टर होत्या डॉ. श्रीमती मोहिनी गाडे, LCEH, आयुर्वेद विषेतज्ञ.
सुरुवातीला त्यानी सांगितले की पंचकर्म ही आयुर्वेदातील एक महत्वाची रोगनिवारक/रोगप्रतिबंधक क्रिया आहे. या क्रियेमुळे मानवी शरीरात उद्भवणारी (toxins) विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात आणि विषारी द्रव्यांमुळे होणार्‍या अनेक व्याधीना प्रतिबंध होऊ शकतो. पंचकर्मामध्ये खालील महत्वाच्या पांच क्रिया असतात.
बस्ती: वनौषधीयुक्त तेलाने किंवा काढ्याने देण्यात येणारा एनिमा.
विरेचन : सकाळीच तीन ते पांच दिवस तुपाचे प्राशन व नंतर शरीर मालिश व वाफेचे स्नान. शेवटच्या दिवशी रेचक दिले जाते.
वमन : प्रथम विरेचनप्रमाणेच क्रिया. शेवटच्या दिवशी वमनक्रिया (वांती) केली जाते.
नस्य: वनौषधी तेल किंवा पावडर नाकामध्ये घातली जाते.
रक्तमोचन : नसांमधील दूषित रक्त जळवा लावून काढले जाते.
शिवाय रोग्यांच्या वैयक्तिक आवश्यकतेनुसार आयुर्वेद पद्धतीने मालिश व बाष्पस्नान, शिरोधारा, उत्तरबस्ती, नेत्रतर्पण, औषधी वनस्पती पानांचे धूम्रपान, पिंडस्वेदन, कटीबस्ती, हृदयबस्ती, जानुबस्ती अशा आयुर्वेदिक पद्धतीच्या क्रियाही रोगनिवारणाला सहाय्यभूत होतात. रोग झाल्यानंतर महागडे इलाज करण्यापेक्षा लोकानी पंचकर्म करून घेतल्यास तो एक व्याधिमुक्त जीवनाकडे जाण्याचा मार्ग ठरु शकेल.