अबोल समाजसेवा - बोलक्या पत्रांद्वारे
चंद्रकांत परांजपे, सोबतीचे एक ७७ वर्षीय ज्येष्ठ सभासद. शिक्षण: द्विपदवीधर - बी.एस्सी व बी.ए. निर्वाहासाठी भारत सरकारच्या महालेखाकार (महाराष्ट्र - A.G's office) कार्यालयात एकूण ३८ वर्षे सेवा करून १९९० मध्ये ते निवॄत्त झाले.
मात्र त्यांची एवढीच ओळख नाही. शासनाच्या सेवेत असल्याने राजकारणाच्या विषयांपासून दूर राहून त्यानी एक आगळी
समाजसेवा केली, अजूनही करीत आहेत. ती म्हणजे पत्रव्यवहाराद्वारे अनेक सार्वजनिक हितांच्या बाबींवर संबंधितांशी पत्रव्यवहार करणे. आवश्यक तेथे त्यानी उच्चपदस्थांपर्यंत पाठपुरावाही केला. परिणामी अनेक लोकहिताचे निर्णय संबंधितानी घेतले, अनेक बाबीत सुधारणाही अंमलात आल्या. सर्व पत्रव्यवहार बहुतेक इंग्रजीत, स्वहस्ताक्षरात आणि स्वखर्चाने.
त्यांचे उल्लेखनीय कार्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे केंद्र शासनाकडून सेल्युलर जेल, अंदमान येथे प्रसारित केले गेलेले
पो्स्टाचे तिकिट. त्यासाठी त्यानी अनेक शासकीय स्तरांवर पत्रव्यवहार केला - अगदी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत. महत्प्रयासाने त्यात त्याना यश आले. विशेष म्हणजे त्यावेळी ते अंदमानमध्ये डेप्युटेशनवर होते व सदर तिकिटाच्या वितरणाचा सोहळा पहायला ते जातीने उपस्थित होते. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या ३००व्या राज्यारोहण समारंभ स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट रायगडावरून वितरित केले गेले. त्यामागे श्री. परांजपे यांचे प्रयत्न होते.
पत्रलेखनाद्वारे त्यानी अनेक सार्वजनिक हिताच्या बाबी साध्य करून घेतल्या. अशी लहानमोठी अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी काही उल्लेखनीय म्हणजे :
१) सन १९५७ मध्ये मुंबई विश्वविद्यालयाने शंभर वर्षे पूर्ण केली. पण त्याचे बोधचिन्ह बदलले गेले नव्हते. १९५४ पासु्न श्री. परांजपे यानी त्यासंबंधी पत्रव्यवहार केला व मुंबई विश्वविद्यालयाला ‘ शीलवृत्त फला विद्या ’ हे भारतीय बोधचिन्ह दिले गेले.
२) मुंबईतील ‘बेस्ट’ या वाह्तुकीचे अनेक मार्ग अक्षर विल्हेवारीने दाखविले जात. त्यांच्या सूचनेवरून ते क्रमांकात बदलले गेले.
३) अंदमानमध्ये असताना काही कारणाने रु. १०० व रु. १० च्या दरम्यान चलनी नोटा असाव्यात अशी त्याना कल्पना सुचली. त्यानुसार त्यानी संबंधित खात्याशी पत्रव्यवहार व प्रयत्न केले व त्यांची सुचना मान्य होऊन रु. २० व रु. ५० च्या चलनी नोटा चलनात जारी करण्यात आल्या.
४) रु.२० च्या वर देणे घेणे यासाठी रेव्हिन्यू स्टँप लावावे लागत. ही मर्यादा वाढवावी ही त्यांची सूचना २००४ मध्ये मान्य झाली.
त्यानी पत्रव्यवहाराद्वारे घेतलेल्या विषयांची यादी केली तर अनेक पाने भरतील. समाधानाची बाब म्हणजे त्यांच्या विधायक सूचनांना अनेक स्तरांवर दाद मिळाली व त्यातून सार्वजनिक हिताच्या अनेक बाबींवर निर्णय घेतले गेले.
या कार्यासाठी त्याना काही पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. ‘ निष्काम कर्मयोग ’ हे त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे. अविवाहित असल्याने त्याना स्वतःच्या संसाराचे पाश नाहीत पण अनेक नातेवाईकाना त्यांचा आधार आहे. त्यांच्या या निर्व्याज व सुस्वभावी वृत्तीमुळे सार्यांचा प्रेम व आदर त्यानी संपादन केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते निष्ठावंत स्वयंसेवक आहेत.
समाजासाठी काही करण्याची आवड असलेल्या सर्वानाच एकाद्या संस्थेतर्फे कार्य करण्याची संधी मिळतेच असे नाही.परंतु
शासनाच्या नोकरीतील बंधने पाळून पत्रव्यवहाराद्वारे अनेक सार्वजनिक हिताच्या बाबींवर अनुकूल निर्णय प्राप्त करून घेण्यात ते यशस्वी झाले. सेवानिवृत्तीला अठरा वर्षे झाल्यावरही त्यांचे हे पत्रव्यवहाराचे व्रत अखंड चालू आहे.
श्री. चंद्रकांत परांजपे यांची ही अबोल समाजसेवा आगळी आणि कौतुकास्पद म्हणावी लागेल.
Monday, March 23, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
I admire Shri Paranjape for what he has been doing for our nation in his limited field. Hats off! Has he or anyone close to him written his heroic deeds in a book form? Please reply.
Mangesh Nabar
ही माहिती खूपच सुरस आणि प्रेरणादायक आहे!
‘ शीलवृत्त फला विद्या ’ ह्या मुंबई विद्यापीठाच्या बोधचिन्हाचा अर्थ समजू शकेल काय?
Post a Comment