संगीत गणेशवंदना
दिनांक २ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी निमित्त ‘गणेश वंदना’ हा भक्तीपूर्ण बहारदार संगीत कार्यक्रमाचा आस्वाद सोबती सभासदानी घेतला. हा कार्यक्रम सूरश्री संगीत मंडळाने सादर केला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम अलिकडेच आकाशवाणीवरही सादर झाला होता.
या कार्यक्रमाच्या प्रवर्तक होत्या सोबतीच्या ज्येष्ठ सभासद श्रीमती विद्या पेठे. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील गणेश गीते व मध्यंतरीचे संवाद त्यानीच लिहिले होते. विद्याताई चांगल्या कवयित्रीही आहेत व त्यांचा ‘चांदणे’ हा कविता संग्रहही प्रसिद्ध झाला आहे. त्याना लाभलेली सुरेल आवाजची देणगी, संगीताचा अभ्यास व स्वत:च्या गीताना लावलेल्या सुमधूर चाली यामुळे हा कार्यक्रम सभासदाना आगळा आनंद देऊन गेला. ही गीते लिहीण्यापूर्वी त्यानी गणेशावरील अनेक ग्रंथातून माहिती घेतली होती. अर्थात या कार्यक्रमात इतर भगिनींचाही सहभाग होता. सामुहिकपणे सर्वानी तो सुरेलपणाने सादर केला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्या पेठे रचित गणेशावरील भूपाळीने झाली. गजानन स्तुतीपर अनेक गीते सादर केली गेली. या संगीत कार्यक्रमात सोबतीच्या दुसर्या जेष्ठ सभासद श्रीमती नंदा देसाई यांचाही महत्वाचा सहभाग होता. त्यानाही सुरेल आवाजाची देणगी लाभल्याने सोबतीच्या अनेक संगीत कार्यक्रमात विद्याताईंबरोबर त्यांचाही महत्वाचा सहभाग असतो. विशेष म्हणजे तबल्यावर श्री.मुकुंद पेठे व संवादिनीवर श्री.मधुकर देसाई या उत्साही ज्येष्ठ सभासदानी या संगीत कार्यक्रमात साथ केली.
त्यानंतर सोबतीचे एक ज्येष्ठ व हरहुन्नरी सभासद श्री. शंकरराव लिमये यांचा कार्यक्रम झाला. अर्थात विषय होता सार्वजनिक गणेशोत्सव व त्याचे साजरे केले जाणारे स्वरुप. हा कार्यक्रम त्यानी ‘आपण याना पाहिलेत का?’ या मथळ्याच्या कथेच्या स्वरुपात सादर केला.
गेली अनेक वर्षे सार्वजिक गणेशोत्सवांचे स्वरुप बदलत आहे. यामागे भक्तिभावाचा भाग असला तरी त्यात अनेक अनिष्ट गोष्टींचा शिरकाव झाला आहे. जमा केल्या जाणार्या हजारो, लाखो रुपयांच्या वर्गण्या,
बर्यावाईट कार्यकर्त्यांचा सहभाग, आरास, खाण्यापिण्यावर केला जाणारा खर्च या बाबी गणेशोत्सवाला गालबोट लावतात. अर्थात काही गणेश मंडळे विधायक कार्यही करतात. तीच गोष्ट समुद्रात केले जाणारे गणेश मूर्तींचे विसर्जन ज्यात गणेश मूर्तींची एक प्रकारे विटंबनाच होते. श्री. लिमये यानी आपल्या नेहमीच्या मिष्किल शैलीत हा कार्यक्रम सादर केला.
कार्यवाह श्रीमती शीला निमकर यानी श्री. दा. कृ. सोमण यांच्या मुलाखतीवर आधारित गणपतीसंबंधी अनेक गैरसमजांवर प्रकाश टाकला.
Wednesday, September 09, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment