Sunday, September 12, 2010

श्री. म. ना. काळे यांचे दु:खद निधन.




’सोबती’च्या वाचकांस कळवण्यास अतिशय खेद होतो कीं सोबतीचे ज्येष्ठ व उत्साही सभासद व या ब्लॉगचे सहसंचालक श्री. म. ना. काळे यांचे शनिवारी सकाळी सहा वाजतां निधन झाले. घरींच पडल्यामुळे त्यांच्या डोक्यावर मार बसला व मेंदूत रक्तस्राव झाला. लीलावती इस्पितळ व नंतर पार्ल्यातील गावडे इस्पितळात बरेच दिवस उपचार होऊनहि ते कोमातून बाहेर आलेच नाहीत.
’सोबती’त ते अनेक उपक्रमांमध्ये सहभागी असत. त्यांचा स्वभाव मृदु व अजातशत्रु होता. हा ब्लॉग मी सुरू केला व मग कार्यकारी मंडळाकडे सुपूर्द केला. तेव्हां त्यानी ते काम श्री. काळे यांचेकडे सोपवले. वयाची सत्तरी उलटेपर्यंत संगणकाशी काही संबंध न आलेल्या श्री. काळे यांनी त्यानंतर या क्षेत्रात प्रवेश केला होता. ब्लॉगवर मराठीतून लिहिण्यासाठी व इतर कामे करण्यासाठी माझेकडे अनेकवार येऊन त्यानी सर्व समजावून घेतले व मी दीर्घकाळ अमेरिकेत गेल्यावर त्यानी हा ब्लॉग हौसेने व इतर कामांतून वेळ काढून चालवला होता. कमीजास्त अडचण पडल्यास माझ्याशी अमेरिकेत संपर्क साधत असत. त्यांचे हे उत्तम काम आपण वाचकांनी पाहिलेले आहेच. त्यांच्या निधनाचे वृत्त या ब्लॉगवर लिहिण्याची वेळ माझ्यावर येईल असे वाटले नव्हते. ईश्वरेच्छा!
’सोबती’च्या दि. १५ सप्टेंबरच्या साप्ताहिक सभेत त्याना श्रद्धांजली वाहिली जाईल. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सर्व सहभागी आहोत.
प्र. के. फडणीस

2 comments:

Narendra prabhu said...

दारच्या ब्लॉगर्स मेळाव्यात भेट झाली होती. ज्येष्ठ नागरिक असूनही ब्लॉगसारख्या आधुनीक संपर्क साधनाचा वापर करून समाजाशी नाळ जोडली होती. जेष्ठ नागरिक संघटनेच्या दु:खात मी सहभागी आहे. मृतात्म्यास शांती लाभो.

सुभाष इनामदार...culturalpune.blogspot.com said...

अशीच माणसे समाज जागवतात..त्यांना ना काही अपेक्षा..
काळेंच्या जाण्याने मराठी ब्लॉगची ओळख सांगणारे आणि स्वतः शिकून त्याला आपलेसे करणारे खंदे तरुण कार्यकर्ते हरपले..
त्यांच्या स्मृतिस वंदन..