Wednesday, May 27, 2009

`कैलास-मानसरोवर यात्रा- एक अमृतानुभव!’









कैलास









मानसरोवर









मानसरोवर









कैलास









कैलास

कैलास-मानसरोवर यात्रा...- एक अमृतानुभव!

दिनांक १३ मे २००९ रोजी सोबतीच्या साप्ताहिक सभेमध्ये, ‘सोबती’ परिवारामध्ये नव्यानेच दाखल झालेले एक सभासद श्री. प्रभाकर ठोसर यांनी एक विशेष कार्यक्रम सादर केला-‘प्रवास वर्णनाचा’! ‘विशेष’ म्हणण्याचे कारण असे की प्रवास वर्णन प्रभावीपणॆ श्रोत्यांपर्यंत पोचविण्यासाठी संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी दॄक आणि श्राव्य अशा दोन्ही माध्यमांचा सुयोग्य वापर केला.
कार्यक्रमाचे नांव होते ‘कैलास-मानसरोवर यात्रा-एक अमृतानुभव!’ या अनुभवाची ‘प्रचीति’ श्रोत्यांना आणून देत असताना, त्यांच्या ओघवत्या भाषेतील प्रवासवर्णनाबरोबच, एकीकडॆ व्यासपीठावर उभारलेल्या मोठ्या पडद्यावर प्रवासातील क्षणचित्रेही एकामागून एक झळकत होती. अशा एकूण ५८ छायाचित्रांच्या माध्यमातून श्री.ठोसर यांनी ‘कैलास-मानसरोवर’ श्रोत्यांसमोर कसे साकारले त्याचेच हे शब्दांकन !

‘कैलास-मानसरोवर यात्रा’ ही जगातील अत्यंत दुर्गम प्रदेशातील,आणि म्हणूनच अतिशय खडतर अशी यात्रा आहे. पश्चिम-तिबेट प्रांतामध्ये समुद्रसपाटीपासून २२००८ फ़ूट उंच असलेला प्रचंड हिमाच्छादित पर्वत म्हणजेच हा वेदकाळातील मेरू पर्वत.. शिवपार्वतींचे निवासस्थान कैलास पर्वत...! या महाकाय पर्वताच्या पायथ्याशी, परंतू समुद्रसपाटीपासून १५२४० फ़ूट उंचीवरील २०० चौरस मैलांच्या विस्तीर्ण प्रदेशात पसरलेला अथांग जलाशय म्हणजेच ‘मानसरोवर’! महाभारतात व्यासांनी वर्णिलेले ‘बिंदुसार’ म्हणजेच मानसरोवर’..!

‘कैलास-मानसरोवर’ ही ३० दिवसांची ‘पायी-तीर्थयात्रा’ भारत सरकारतर्फ़े नियमितपणे आयोजित केली जाते. खाजगी पर्यटन संस्थांच्या माध्यमातूनही मुंबईपासून १६ दिवसांची परतीची यात्रा (काठमांडू पासून जीपच्या साहाय्याने) उपलब्ध असते. यात्रेत सहभागी होण्यापूर्वी प्रवाशांना तिथल्या प्रचंड उंचीवरील विरळ हवेमुळे उद्भवणा~या शारीरिक आणि मानसिक समस्यांची पूर्णतः जाणीव करून दिली जाते व खबरदारीची उपाय योजना म्हणून योग्य त्या शारीरिक स्वास्थ्य विषयक वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या पूर्ततेनंतरच यात्रेत सहभागी करून घेतले जाते ! भारतीय प्रदेशावरून ही यात्रा नेपाळ मार्गे तिबेटमध्ये जाते. तिबेटच्या पठारी वाळवंटातून कैलासाच्या पायथ्यापर्यंतचा जीपचा प्रवासही रस्त्यातील सततच्या खाचखळग्यांमुळे अक्षरश:सर्वांग घुसळून काढणारा, हाडें खिळखिळीत करणारा आहे! भारतीय नागरिकांना नेपाळसाठी व्हिसा लागत नाही, परंतू तिबेट हे चीनच्या ताब्यात असल्यामुळे, चीनचा व्हिसा मात्र लागतो. यात्रेसाठी दरडोई सुमारे एक लाख रुपये खर्च येतो.
अशी ही एकंदर अडथळ्यांची मालिका असूनही लोक ह्या यात्रेत स्थान मिळविण्यासाठी धडपडत असतात याचे कारण जर कांही असेल तर ते एकच आणि ते म्हणजे ‘अव्यक्ताची आंतरिक ओढ’.. बस्स!
त्या अनामिक ओढीनेच सुरु होते ही यात्रा.. दिव्यत्वाची ‘प्रचीति’ घेण्यासाठी! नेपाळ सीमेपासून जीपमधून तिबेटमध्ये प्रवेश केल्यानंतर ख~या अर्थाने यात्रा सुरू होते. या संपूर्ण प्रवासात अनंत अडचणीं आहेत, शरीर गोठवून टाकणारे थंडगार बोचरे वारे आहेत, दाहक उन्हाचा तापही आहे, पण त्या पार करून तुम्ही येथपर्यंत,एवढ्या उंचीवर आलांत की मग मात्र.. "अरे?, स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो याहून वेगळा काय असणार आहे..? हाच स्वर्ग आहे !" असे म्ह्टल्यावाचून राहवत नाही. कारण संपूर्ण कैलास-मानस परिसर हा ‘केवळ एकमेवाद्वितीय’ अशा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कैलास पर्वतावर प्रत्यक्ष कोणीही जाऊ शकत नाही. त्याचे दूरवरून कडेकडेने दर्शन घेत त्याला प्रदक्षिणा घालावी लागते. संपूर्ण कैलास परिक्रमा तीन दिवसांची असते. ती पायी, याकवर अथवा खेचरावर बसूनच पुरी करावी लागते.परिक्रमेतील हा प्रवास अतिशय खडतर व दमछाक करणारा आहे. परंतू येथे गूढ संवेदना जाणवते,संचारते, व तीच शरीर पुढे ढकलते असा दैवी भास होतो. हा अद्भुतरम्य गिरिराज पूर्व दिशेकडून पाहिले असतां स्पटिकासारखा शुभ्र-स्वच्छ, तर पश्चिमेकडून माणिकासारखा लाल, दक्षिणेकडून नीलमण्यासारखा तेजस्वी, तर उत्तर दिशेकडून सुवर्णराशीसारखा झळाळत असताना पाहून डोळ्यांचे पारणे फ़िटते. कैलास पर्वताच्याच शिखरावरून अवतरते ती पवित्र गंगा नदी ! महर्षि वेदव्यास, भृगु, वसिष्ठ, पराशर आदि देवर्षींच्या तप:साधनेने पावन झालेल्या या पुण्यभूमीत पाऊल टाकल्यानंतर, एखाद्या ध्यानस्थ ऋषीप्रमाणॆ भासणा~या कैलास-पर्वताचे दर्शन होताच, तात्काळ गळून पडतात त्या बेगडी मानवी प्रतिष्ठा.. ! जळून जातात दंभ-अहंकाराच्या भ्रामक कल्पना..! विरून जाते ‘स्वत्त्वाची जाणीव’..! नतमस्तक होतो आपणा त्या कैलासरूपी भगवद्दर्शनाने, हात नकळत जोडले जातात आणि ओठांतून शब्द येतात....
कैलासराणा शिवचंद्रमौळी, फ़णिंद्र माथा भृकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधो भवदु:ख हारी, तुजवीण शंभो,मज कोण तारी..!
आपण उभे असतो एका विस्तीर्ण ,सुमारे २०० चौरस मैलांच्या भूप्रदेशावर, समुद्रसपाटीपासून १५००० फ़ूट उंचीवर! समोर महकाय कैलास पर्वत,आणि त्याच्या पायथ्याशी विसावलेला अतिविशाल जलनिधी- हेच ते मानसरोवर ! कैलास पर्वतावरचे बर्फ़ वितळून त्याचे पाणी मानसरोवरामध्ये येते. हिवाळ्यात हे सरोवर पूर्णपणे गोठून त्याचे तपमान -५०अंश इतके खाली येते! सभोवताली सर्वदूर, अतुलनीय..अनुपम सृष्टीसौंदर्य, बर्फ़ाच्छादित गिरिशिखरे, वर आकाशात सूर्यकिरणांची सप्तरंगी उधळण, हे सर्व पाहिले की वाटते "खरंच, हे जग किती सुंदर आहे..!

श्री.ठोसर यांनी सुमारे दीडतासात अशी ‘पुण्ययात्रा’ घडविल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी सोबतीचेच सभासद श्री. विश्वास गोरे व श्री.त्रिविक्रम जोगळेकर यांनी सुद्धा, ते ‘मानसरोवर’ यात्रेला गेले होते त्या वेळचे अनुभव सांगितले. एकंदर सर्वच कार्यक्रम श्रोत्यांना खूप आवडला.

Wednesday, May 20, 2009

घडविले त्यानी ‘जीवन’

घडविले त्यानी ‘जीवन ’
एक मुलाखत
प्रत्येकजण आपल्या वाट्याला आलेले जीवन जगतच असतो. पण काहीजण मात्र जीवन घडवतात. याचे एक उदाहरण म्हणजे विले पार्ले (पू) स्टेशनजवळील ‘जीवन रेस्टॉरंट’ चे मालक श्री. वासुदेव विठ्ठल जोगळेकर. पण सारे परिचित त्याना आपुलकीने आप्पा म्हणतात. आजचे ‘जीवन रेस्टॉरंट’ त्यानी उभे केले, जिद्दीने, अपार कष्टाने, प्रामाणिकपणे आणि नेकीने. मराठी माणसाने धंदा सुरु केला म्हणजे तो धंद्यात पडला असे म्हटले जाते. पण आप्पानी या धंद्यात प्रवेश केला आणि आज ते यशस्वीपणे आपल्या व्यवसायात ठामपणे उभे आहेत. गेली पंचावन वर्षे ‘जीवन’ खवय्यांचे आश्रयस्थान झाले आहे. या यशस्वी व्यावसायिकाची मुलाखत सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद श्री. शंकरराव लिमये यानी घेतली. त्यावर आधारित खालील वृत्तांत.
आप्पांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील जांभुळपाडा. त्याना दोन भाउ व तीन बहिणी. वडील शेतकरी. दुर्दैवाने आप्पा पाच वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरवले. भाता शिवाय उत्पन्न नाही. मग सार्‍या भावानी मुंबईची वाट धरली. विवाहित बहिणीचा आधार होता. दोन मोठे भाउ सरकारी नोकरीला लागले. आप्पा गिरगावातल्या हायस्कूलमध्ये शिकले. मात्र नोकरीच्या मागे न लागता काही व्यवसाय करावा हा त्यांचा ठाम विचार होता. पण व्यवसाय म्हटला की त्याला थोडेफार भांडवल हवे. सरकारी नोकरदार भावांची मदत मर्यादित होती. मग आप्पानी थोडे दिवस पार्ल्यातील साठे यांच्या सुप्रसिद्ध विजय स्टोअर्स
मध्ये नोकरी धरली व तिथे काट्यापासून गल्ल्यापर्यंत सर्व कामे केली. नकळतपणे व्यवसायातील अनेक पैलूंचा अनुभव त्याना मिळाला. मात्र व्यवसाय कोणता करावा हे नक्की झाले नव्हते.एके दिवशी त्याना कळले की पार्ले स्टेशनजवळ एक हॉटेल विकायचे होते. मामांच्या मदतीने ते हॉटेल विकत घेण्याचे धाडस त्यानी केले. पहिली दोन वर्षे हॉटेल तोट्यात गेले पण आप्पानी धीर सोडला नाही. उलट तोटा झाला तरी हॉटेल व्यवसायातील खाचाखोचा त्याना समजल्या आणि आवश्यक त्या बदलासह हॉटेल चांगले चालू लागले.सुरुवातीच्या २० बाय १० च्या जागेत सुरु झालेले आता ‘हॉटेल जीवन’ ४००० चौ.फूट जागेत दिमाखाने उभे आहे. वास्तविक शेजारीच ‘रामकृष्ण’ हे हॉटेल होते. त्यामुळे स्पर्धा अपरिहार्य होती. पण हॉटेल व्यवसायात काळाप्रमाणे बदलावेच लागते. त्यानुसार बदल करून शेजारी प्रस्थापित हॉटेल असूनही ‘जीवन’ ला गिर्‍हाईक मिळू लागले. मराठी पद्धतीच्या पदार्थांबरोबरच लोकांच्या बदलत्या चवीप्रमाणे दाक्षिणात्य, पंजाबी, चायनीज पद्धतीचे पदार्थही जीवनमध्ये मिळू लागले. मग ‘जीवन’ ने मागे वळून पाहिले नाही. विशेष म्हणजे आप्पांचे शेजारच्या ‘रामकृष्ण’ हॉटेलच्या मालकाशी उत्तम संबंध आहेत. व्यवसायामुळे आर्थिक सुस्थिती आली तरी आप्पांची सामाजिक दृष्टी हरवली नाही. बाबुराव परांजपे यांच्या स्मरणार्थ रोगनिदान केंद्र म.न.पा.च्या मोकळ्या प्लॉटवर उभे करण्याचा संकल्प संबंधितानी सोडला होता. परंतु सदर प्लॉट म.न.पा. हस्तांतरित करीत नव्हती. आप्पानी आपले वजन खर्च करून तो प्लॉट रोगनिदान केंद्रासाठी मिळवून दिला व एक सामाजिक उपक्रम म्हणून हे अद्ययावत रोगनिदान केंद्र कार्यान्वित झाले आहे. पार्ल्यातील एक प्रसिद्ध कॅटरर कै. बापू पंडित हे आप्पांचे परिचित होते. ते एक सामाजिक दृष्टी असलेले दानशूर गृहस्थ. प्राप्तीतला बराचसा वाटा ते उदारहस्ते अनेक संस्थाना देत.वयापरत्वे त्यानी व्यवसाय बंद करण्याचे ठरविले. पण स्वस्थ बसणे बापूंच्या स्वभावात नव्हते. मग त्यानी वृद्धाश्रम काढण्याचा निर्णय घेतला. प्रथम जमीन खरेदीसाठी मोठी रक्कम मोजल्यावर वृद्धाश्रम उभा करण्यासाठी अधिक पैशांची आवश्यकता होती. म्हणून बापूनी पार्ल्यातील अनेक परिचितांकडून मुदत ठेवीवर व्याजाने पैसे घेतले व अखेर वृद्धाश्रम चालू झाला. आप्पानी वृद्धाश्रमाच्या उभारणीत आपला वाटा उचललाच व शिवाय मुदत ठेवी परत करण्यासंबंधी अडचण निर्माण झाली असता आप्पानी ही जबाबदारी पत्करली व आवश्यक त्या पैशांची तरतूद करून सर्व ठेवी व्याजासह परत केल्या. बापू पंडितानी त्याना वृद्धाश्रमाचे विश्वस्त म्हणून नेमले. मध्यंतरी दोन वर्षांपूर्वी बापूंचे निधन झाले. परंतु आप्पांच्या मार्गदर्शनाखाली व मदतीने वृद्धाश्रम व्यवस्थित चालू आहे. विशेष म्हणजे काही ठेवीदारानी आपल्या ठेवी वृद्धाश्रमाला देणगी म्हणून दिल्या. आप्पांचा मुलगा बी.ई.(इलेक्ट्रॉनिक्स) असूनही नोकरी न करता आप्पांच्या बरोबरीने व्यवसायात आपले योगदान देत आहे. हॉटेलव्यतिरिक्त त्यांचा कॅटरिंगचाही व्यवसाय आहे. जीवन उपहारगृह सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत उघडे असते. नोकरवर्ग दोन पाळ्यांमधे काम करतो. आप्पांचे नोकरांशी सौहार्दाचे संबध आहेत.
अनेक सामाजिक संस्थाना त्यानी मदतीचा हात दिला आहे. टिळक विद्यालयाला त्यांचे भरीव सहाय्य झाले आहे.
त्यानी सांगितले की हॉटेल व्यवसाय फायद्याचा असला तरी कमीत कमी बारा तास काम करणे आवश्यक असते. हा व्यवसाय मेहेनतीचा आहे आणि अथक मेहनत करणारा यात यशस्वी होऊ शकतो.समारोपाच्या वेळी त्यानी ‘सोबती’ला देणगीही दिली. शिवाय सर्व उपस्थित सोबती सभासदाना चविष्ट अल्पोपहार दिला. या मुलाखतीद्वारे श्री. आप्पा जोगळेकर या यशस्वी उद्योजकाचे आणि त्यांच्यातल्या माणसाचे ‘जीवन’ दर्शन झाले.

Tuesday, May 19, 2009

ऑरोरा बोरिआलिस










मागे आपण रंगीत हिमनग पाहिलेत. आज जे फोटो आपल्याला दिसताहेत ते आकाशांतील रंग आहेत. यांना ऑरोरा बॉरिआलिस असें म्हणतात. आकाशाच्या उत्तरध्रुवाजवळच्या भागांत कित्येक दिवसांची दीर्घ रात्र चालू असताना सूर्य क्षितिजाच्या खालीं असताना हे दिसतात. अजब आहे ना निसर्गाचे रंगकाम?

Monday, May 11, 2009

न्याय वैद्यक शास्त्र (Forensic Medicine)

न्याय वैद्यक शास्त्र हे वैद्यक शास्त्राचे महत्वाचे अंग आहे. या क्षेत्रात तज्ञ डॉक्टर्स फारच कमी आहेत कारण त्याचे स्वरूप व्यवसायापेक्षा संशोधनाचे आहे. दिनांक ८ एप्रील रोजी महाराष्ट्रातील एक ख्यातनाम विदुषी डॉ.सौ. वसुधा आपटे यांचे न्याय वैद्यक शास्त्र या विषयावर उद्-बोधक व्याख्यान झाले.
नैसर्गिक मृत्युसंबंधी कोणतेही कायदेशीर प्रश्न निर्माण होत नाहीत. मात्र अपघात, खून किंवा तत्सम अनैसर्गिक किंवा संशयास्पद मृत्यूच्या बाबतीत मात्र, मृत्यु अपघात किंवा खून इ. कारणाने झाला असेल तर न्यायवैद्यक शास्त्राची मदत उपयुक्त ठरते. रक्त, हाडे, केस, विस्केरा इ. अवयवांचे शास्त्रोक्त रीत्या तपास करून मृत्यूचे कारण निश्चित करता येते व त्यामागे खुनासारखे गंभीर प्रकरण असेल तर गुन्हेगाराचा छडा लावण्यासाठी या शास्त्राचा फारच उपयोग होतो. त्यामुळे शासनाने न्यायवैद्यक शास्त्राच्या प्रयोगशाळा अनेक ठिकाणी स्थापन केल्या आहेत. डॉ.सौ.आपटे यांचे या बाबतीतील योगदान प्रसंशनीय आहे. त्या एम.डी. आहेतच व शिवाय एल.एल.बी. ही कायद्याची पदवीही त्यानी घेतल्यामुळे अनेक प्रकरणात कायदेशीर पैलूही त्याना तपासता येतात. कायद्याची पदवी घेतलेले डॉक्टर्स भारतात फारच थोडे आहेत. गुन्हेगारीसंबंधी न्यायालयीन प्रकरणात त्याना तज्ञ म्हणून साक्ष देण्यासाठी बोलावले जाते.डॉ.सौ. आपटे यानी या शास्त्रासंबंधी विपुल लिखाण केले आहे. आकाशवाणी, दूरदर्शन यावरही त्यांचे माहितीपूर्ण कार्यक्रम झाले आहेत. नोकरीच्या काळात इंग्रजीत लेखन केल्यावर निवृत्तीनंतर त्यानी मराठीत न्यायवैद्यक शास्त्रावर १३१ लेखांची मालिका पूर्ण केली. शिवाय कवितालेखन, गायन, पाककला इत्यादीतही त्याना रस आहे. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेतली गेली आहे व त्यासाठी त्याना एकूण चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामुळे महाराष्ट्र मेडीको लिगल असोसीएशन व इंडीयन ऍकॅडमी ऑफ़ फ़ोरेन्सिक मेडीसीन या संस्थांच्या अध्यक्षपदांवर त्यांची निवड झाली ही त्यांच्या ज्ञानाची पावतीच म्हटली पाहीजे. वैद्यक शास्त्राच्या एका महत्वाच्या पैलूची सोबती सभासदाना माहिती झाली. सभासदांच्या अनेक प्रश्नाना त्यानी समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे हा कार्यक्रम उद्-बोधक ठरला.

Friday, May 08, 2009

हिमनगरंग














अहो हे कसले फोटो आहेत?
नक्कीच तुम्हाला नवल वाटले असेल.
हे सर्व हिमनगांचे फोटो आहेत. य़ांच्यावर हे रंग कोठून आले? समुद्राच्या तळाला असलेल्या मातीतून हे आले म्हणे! असेल असेल. आपण या अनोख्या रंगशोभेचा आनंद लुटूंया.

Tuesday, May 05, 2009

‘वाल्मिकी रामायणातील अरण्यकांड’






‘वाल्मिकी रामायणातील अरण्यकांड’
सोबतीचे एक ज्येष्ठ व व्यासंगी सभासद श्री. प्र.के.फ़डणीस यांनी आजवर रामायणावरील साहित्याचे विपुल वाचन केले आहे. विशेष म्हणजे आपण जे वाचतो त्यावर त्यांचे मननही चालू असते आणि ते मनन श्रोत्यांच्या...नुसते कानापर्यंतच नव्हे, तर मनापर्यंत जावे या हेतूने ते मधून मधून व्याख्य़ानेही देत असतात.
‘वाल्मिकी रामायणातील अरण्य़कांड’ या विषयावर, ‘सोबती’ने दिनांक २२ एप्रिल २००९ रोजी त्यांच्याच भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. श्री. फ़डणीस यांनी भाषणामध्ये आवश्यक त्या ठिकाणी स्थळ-काळाचे संदर्भ देवून अतिशय मुद्देसूदपणाने आपले विचार मांडले.
वनवासात असताना प्रभू रामचंद्र व सीता यांची प्रथम ‘विराध’ नावाच्या दैत्याशी गांठ पडली व तेथपासून पुढे अकरा वर्षेपर्यंत अनेक स्थळांना भेटी देत देत, ऋषीमुनींच्या भेटी घेत घेत ते ‘पंचवटी’ या ठिकाणी आले. त्या काळी ‘खर’ आणि ‘दूषण’या दैत्यांची जेथे अनिर्बंध सत्ता होती त्या पंचवटीतच राक्षसकन्या शूर्पणखेचे नाक कापण्याचा प्रसंग घडलेला आहे.
वास्तविक प्रभू रामचन्द्रांजवळ तपःप्रभाव, शस्त्रप्रभाव असूनही त्यांनी केवळ शूर्पणखेलाच लक्ष्य बनविले खरे, परंतू त्या कॄत्यामागे केवळ तेथील प्रस्थापित राक्षसी सत्तेला आव्हान देण्य़ाचाच त्यांचा हेतू होता व तो तात्काळ सफ़लही झाला ! कारण त्याचाच परिणाम म्हणून पुढे रावणाने, ‘शूर्पणखेची मानहानी’ हा समस्त दैत्यकुळाचा अपमान समजून त्याचा बदला घेण्य़ासाठी म्हणून सीतेचे अपहरण केले..!
वास्तविक रावण हा सुद्धा थोर तपस्वी, पुण्यबल होता. पुण्याचं कवच होतं त्याच्याभोवती ! सीतेविषयी त्याच्या मनात बेलगाम वासनाविकारही नसावा असे दिसते. कारण त्याच वेळी सीतेशी असभ्य वर्तन करणॆ सहजशक्य असूनही, तसे काहींही न करता त्याने केवळ तिचे अपहरण करून तिला लंकेमध्ये नेवून ठेवले! अर्थात रामांबरोबर युद्ध करण्याची वेळ आलीच तर त्यावेळी युद्धभूमीसुद्धा आपल्या खास परिचयाची असावी, जेणॆकरून युद्ध जिंकणे सहज शक्य होईल या कूटनीतीनेच त्याने सीतेला लंकेमध्ये नेले असावे, असा एक तर्कसंगत व अभ्यासपूर्ण द्रष्टीकोन श्री. फ़डणीस यांनी मांडला व तो खरोखरच श्रोत्यांना नव्याने विचार करायला लावणारा होता.
सुमारे सव्वा तासाच्या भाषणानंतर, श्री. फ़डणीस यांनी श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Sunday, May 03, 2009

ज्येष्ट नागरिकांसाठी संगणक प्रशिक्षण








दि. ३ मे २००९ रोजीं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व FESCOM च्या मुंबई शाखेतर्फे एक अनोखा कार्यक्रम आखण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था अनेक प्रकारचे समाजकार्य करते व अनेक उपक्रम राबवते. त्यांत एक म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचे वाढते महत्व लक्षात घेऊन त्याच्या प्रसारासाठी अनेक प्रकारचे कोर्सेस शिकवले जातात. त्यांत अगदी प्राथमिक पातळीपासून उच्च दर्जाचेहि मान्यताप्राप्त अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. हे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी आवश्यक अशी सर्व तांत्रिक साधनसामुग्री व कुशल आणि प्रशिक्षित शिक्षकवर्गहि त्यांचेपाशी आहे. साधारणपणे अशा संस्थांच्या नजरेसमोर ज्येष्ठ नागरिक नसतात. FESCOM ही ज्येष्ठ नागरिकांच्या महाराष्ट्रभरच्या शेकडो संघटनांची शिखर संघटना आहे. तिच्या मुंबई शाखेच्या पुढाकाराने हा संगणक प्रशिक्षणाचा एक दिवसाचा कार्यक्रम खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आखला होता. त्यात मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांना आपले प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन FESCOM MUMBAI ने केले होते. त्याला बर्‍यापैकी प्रतिसाद मिळाला. ’सोबती’ संघटनेतर्फे श्री. डोंगरे, श्री. पंतवैद्य, श्री.फडणीस व श्रीमती पेंढारकर हे चार सभासद या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जवळजवळ २०-२२ सहभागी होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे श्री. काळे व मार्केटिंग ऑफिसर श्री. विक्रम वासुदेव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. FESCOM तर्फे श्री. अवंधे यानी सर्वांचे स्वागत केले.
कार्यक्रमामध्ये सहभागी व्यक्तींना एकत्रितपणे, संगणक कसा वापरावा याबद्दल प्राथमिक स्वरूपाची व ज्येष्ठ नागरिकांसाठी विषेशेकरून उपयुक्त अशी माहिती पद्धतशीरपणे दिली गेली. सर्वांसमोर एकेक कॉंप्यूटर व मॉनिटर असल्यामुळे जे दाखवले जाईल त्याचे प्रात्यक्षिक प्रत्येकाला स्वत:च करून पाहतां येत होते. त्यांच्या शंका व अडचणी प्रशिक्षक मंडळी आत्मीयतेने दूर करत होते. आपण काहीतरी नवीन शिकतो आहोत याचा या ज्येष्ठ नागरिकानी मनसोक्त आनंद घेतला.
कार्यक्रमाअखेर सहभागींपैकी अनेकांनी आपल्या समाधानाला व आनंदाला शब्दरूप दिले. श्री. फडणीस यांनी सूचना केली कीं अशा प्रकारचे पण थोडे विस्तृत अभ्यासक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी, दादर, पार्ले, बोरिवली वगैरे ठिकाणी योजिले तर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळेल. ज्येष्ठ नागरिकांच्या विशिष्ट गरजा नजरेसमोर ठेवूनच अभ्यासक्रम आखण्याचे त्यानी आवाहन केले. प्रतिष्ठानच्या प्रशिक्षकवर्गाने याबद्दल विचार करण्याचे आश्वासन दिले.
सकाळी १० वाजता नाश्ता करून सुरवात झालेला कार्यक्रम संध्याकाळी चहापानानंतर संपला व संयोजकांना वारंवार धन्यवाद देऊन सहभागी ज्येष्ठ नागरिक आजचा दिवस सत्कारणी या आनंदात घरोघर गेले.