व्याख्यात्या - डॉ. गीता भागवत –पीएचडी
अल्प परिचय
डॉ. श्रीमती गीता भागवत महाराष्ट्र शासनाच्या सहायक संचालक (अनुवाद व शब्दावली) या पदावर कार्यरत होत्या. काही वर्षांपूर्वी त्यानी या पदावरून स्वेच्छानिवृत्ति घेतली. त्यानंतर त्यानी भाषाविषयक परिसंवाद, व्याख्याने यात सहभाग घेतला. त्यांचे दोन भाषाविषयक ग्रंथ व एक कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे. वाड.मयविषयक नियतकालिकातून व वृत्तपत्रातून लिखाण केले आहे आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम, भाषणे व मुलाखतीही झाल्या आहेत.
कथाकथन आणि विचारमंथन
सोबतीच्या साप्ताहिक सभेत सोबतीच्या सभासद डॉ. भागवत याचे दिनांक १२ नोव्हेंबर रोजी भाषण झाले. विषय होता मतिमंद मुले आणि समाज.‘रीडर्स डायजेस्ट‘ एप्रील २००६ च्या अंकात ‘सिस्टर्स कीपर्स‘ या मथळ्याची एक लेखवजा भावपूर्ण कथा आली होती. कथेचा विषय होता जेफ व त्याची मतिमंद बहीण मॉली. एके दिवशी चॊपन्न वर्षाच्या जेफ़ला घरात एक कागदाचे पुडके मिळाले. त्यातले कागदपत्र चाळताना त्याला शोध लागला की त्याच्या धाकट्या तीन वर्षाच्या बहिणीला एका मतिमंद निवासी संस्थेत पाठविले गेले होते. कागदपत्रांच्या आधारे त्याने बहिणीचा शोध घेतला आणि तिच्या जीवनात तिला अनोखा आनंद दिला. त्याने तिला अधून मधून घरी आणून तिला प्रेमळ आधार व दिलासा दिला.
यावर आणखी शोध घेताना त्याच्या लक्षात आले की १९५० सालापासून अशा हजारो मुली अमेरिकेतल्या अनेक सरकारी निवासी संस्थात रहात होत्या. त्यावेळी आईवडलाना असे सांगितले जायचे की अशा मतिमंद मुलाना सर्वसाधारण मुलांच्या सहवासात ठेवू नये. त्यामुळे संस्थेत पाठविलेल्या मुलांचा कुटुंबांशी संपर्क रहात नसे व आईवडील आपल्या मतिमंद मुलांची माहिती दडवून ठेवीत व संस्थानी ती माहिती इतराना देवू नये असा गोपनीयतेचा कायदा अमेरिकेत होता. जेफने तो कायदा बदलून घेण्यासाठी अथक परिश्रम केले.
आपल्या देशाचा विचार करता मतिमंद मुलांच्या अनेक निवासी संस्था महाराष्ट्रात आहेत. मतिमंदांसाठी असलेल्या विशेष शाळेत अठरा वर्षांपर्यंतच त्याना शिक्षण घेता येते. त्यानंतर मात्र प्रश्न निर्माण होतो. त्यांच्यासाठी अनिवासी संस्थाही आहेत जिथे त्याना छोटे व्यवसाय शिकविले जातात व विरंगुळा देण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून त्यांच्या जीवनात पोकळी व नैराश्य येउ नये.
आपल्या अशा मतिमंद मुलाना आईवडील शक्यतो मतिमंदांच्या संस्थेत दाखल न करता घरीच त्यांचा संभाळ करतात व त्यांच्या कुवतीप्रमाणे शिक्षणही देतात. मात्र खरा प्रश्न उद्भवतो तो आईवडील थकल्यानंतर किंवा त्यांच्या निधनानंतर. पुढची पिढी अशा मतिमंदाना संभाळायला तयार नसते त्याला मानसिकतेबरोबर आर्थिक, सामाजिक इत्यादि कारणेही आहेत. मग अशा मतिमंदाना त्यांच्यासाठीच्या शाळेतच पाठविले जाते. पण मुले मोठी झाल्यावर पुन्हा प्रश्न उभा रहातोच. मतिमंद मूल घरात, शेजारी व समाजातही अडचणीचे वाटते.
‘सोबतीच्या‘ ज्येष्ठ नागरिकाना या बाबतीत बरेच काही करता येईल असा विचार समारोप करताना डॉ. गीता भागवत यानी मांडला व अनेक ‘सोबती‘ सभासदानी त्याला प्रतिसाद दिला.
हा एक ज्वलंत सामाजिक प्रश्न आहे व प्रत्येकाला विचार करायला लावणारा आहे.
Thursday, January 01, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment