Sunday, July 26, 2009

श्री.कृष्णकुमार प्रधान यांच्या कविता

आपल्या ‘सोबती’मधील एक ज्येष्ठ सभासद श्री.कृष्णकुमार प्रधान यांचा कविता करण्याचा छंद सर्वश्रुत आहे. विशेष म्हणजे आपल्या या काव्यामधून त्यांना ‘अक्षर-आस्वाद’ या साहित्यिक उपक्रमाविषयी काहीं विशिष्ठ माहिती रसिकांपर्यंत पोहोचवायची आहे. पहा तरी, काय सांगायचंय त्यांना..?

अक्षर-आस्वाद

चार डोई जमूनिया
घेऊ काव्याचा आनंद
बुडू डोहीं आनंदाच्या
क्षण सुखामध्यें धुंद

या पार्ल्यात सुंदर
प्रतिमासी तिसरा रविवार
भरणार कविकथाकारांचा दरबार
सर्वांचा एक अक्षर-आस्वाद
सुंदर एक आस्वाद
---------x---------

ह्याच श्री.प्रधान यांनी आतांपर्यंत अनेक भावपूर्ण कविता रचून सोबतीच्या कार्यक्रमात व इतर ठिकाणीही सादर केलेल्या आहेत. नुकतीच त्यांच्या कवीमनात उमललेली एक ह्ळुवार काव्यकलिका येथे प्रसिद्ध करण्याचा मोह आवरत नाही. तुम्ही बघाच, पहिल्या पावसाकडे पाहून कवीमनात जसे गतकाळातील स्मृतींचे मळभ दाटून आले, तसाच अनुभव.. तुम्हालाही येतो कां?

पावसाळ्याच्या प्रारंभी..

कुंद ही हवा
सुखवितो गारवा
वृद्धांना आम्हा
छळितो दमा

नाहीतर बघा
तरूणपणी माझ्या
असतो मी कसा
शांत झोपलेला

ऊब दुलईची
हवीहवीशी कशी
मनांत उरती
फक्त त्या स्मृती

---------x---------

कविमनातील ही भावुक स्पंदने.. तुमच्या मनापर्यंत पोहोचली तर, लगेच आपला अभिप्राय द्यायलाही विसरू नका बरं का ? आपला अभिप्राय त्यांच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू !

Saturday, July 25, 2009

दि. ७ जुलै’०९ रोजी सोबती कलावंतांचा जो ‘कला-गुण-दर्शनाचा ’ कार्यक्रम झाला, त्यात श्रीमती विजया भा. लेले यांनी एक स्वरचित कविता सादर केली होती.."काळे, काळे मेघ बरसती, शुभ्र अशा जलधारा.." ती त्यांची कविता एक साधी ,सोपी काव्यरचना म्हणून रसिकांना फ़ारच आवडली. पुन:प्रत्ययाचा आनंद मिळविण्यासाठी आज तीच संपूर्ण कविता आपणासमोर ठेवीत आहे.
-पाऊस-
काळे काळे मेघ बरसती, शुभ्र अशा जलधारा l
चिंब चिंब भिजला सुकलेला, आसमंत सारा ll धृ ll
गडगड गडगड मेघ गर्जना, धडकी भरवीते l
लखलख लखलख चमकुनि चपला, डोळे दिपवीते ll १ ll
मृदगंधाने सृष्टीचराचर वेडावुन जाते l
ओल्याओल्या भूमीमधुनी हिरवळ अंकुरते ll २ ll
तलाव भरती, भरती विहिरी,पूर नदीला येतो l
तीरावरचा, आजुबाजुचा परिसर जलमय होतो ll ३ ll
बागेमध्ये फुलें उमलतिल, सुगंध पसरेल l
अवनीवरती आनंदाला, उधाण येईल ll ४ ll
___________

Friday, July 17, 2009

‘धम्माल कार्यक्रम’ -‘विविध-कला-गुण-दर्शनाचा’.(भाग-१)

बुधवार, दिनांक ०८ जुलै २००९ रोजी ‘सोबती’सभासदांचा एक ‘धम्माल कार्यक्रम’ सादर झाला -‘विविध-कला-गुण-दर्शनाचा’. आमच्या एक ‘कलाप्रेमी’ सभासद सौ. सुनंदा गोखले यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘ज्यांना यात भाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नावें कळवावीत’ या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन चक्क २७ ‘कलावंतांनी‘ नावें नोंदविली. आम्हा ‘सोबतीं’साठी ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे असे मला वाटते. प्रस्तावनेत अधिक वेळ न घालविता आतां या कार्यक्रमाकडेच वळतो..!

कार्यक्रमाची सुरुवात ’सरस्वती-वंदना’ या नृत्य-गायनाने झाली. ‘सरस्वतीच्या वंदुनि चरणा, मागूया शुभ आशीर्वचना..’सौ. सुनंदा गोखले यांनी स्वतः रचलेल्या, व स्वरबद्ध केलेल्या या श्रवणीय गीताला नृत्याविष्काराने अधिकच प्रेक्षणीय बनविले ते सोबतीच्याच हौशी स्त्री-कलावंतांनी ! सौ.अनिता पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नृत्यामध्ये त्यांच्याबरोबरच सौ. वैजयंती साठे, सौ. नीलिमा ठोसर व श्रीमती कल्पना भट, यांनी उत्तम साथ दिली. सौ. नंदा देसाई यांच्या सुस्वर कंठातून आलेल्या या ‘सरस्वती-वंदनाला’ वाद्यांची साथ मिळाली ती सुद्धां तितकीच मोलाची.. कारण हार्मोनियमवर होते सर्वपरिचित श्री. मधुकर देसाई, व तबल्यावर श्री. प्रकाश जांभेकर !

त्या नंतर, कविता करण्याचा छंद मनापासून जोपासणा~या एक ज्येष्ठ सभासद श्रीमती विजया लेले यांनी, नुकत्याच सुरु झालेल्या वर्षा ऋतूचे औचित्य साधून, स्वरचित काव्यपंक्तीतूनच ‘वरुणराजाचे स्वागत’ केले. ‘काळे काळे मेघ बरसती,शुभ्र अशा जलधारा..चिंबचिंब भिजला, सुकलेला आसमंत सारा..! वा:, बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती, आणि नाडकर्णी सभागृहात आम्ही सारे ‘सोबती’.. जणू काव्यधारांमध्ये न्हाऊन निघत होतो.

"आतां आपल्यासमोर सादर होतंय..‘संगीत वेड्यांचा बाजार’ या नाटकातील एका प्रवेशाचे नाट्यवाचन! त्यासाठी रंगमंचावर येत आहेत..श्री. प्रदीप प्रधान आणि श्रीमती रेखा चिटणीस.." सूत्रसंचालिका सौ. सुनंदा गोखले यांनी घोषणा केली आणि पाठोपाठ नव्यानेच ‘सोबती’त दाखल झालेले हे ‘रंगप्रेमी’ सभासद व्यासपीठावर आले..त्यांच्या मंचावरील येण्यातच इतका आत्मविश्वास होता की ‘आतां नक्कीच काही ‘विशेष’ पहायला मिळणार’ या उत्सुकतेने श्रोत्यांच्या माना उंचावल्या. आणि... वाचक हो, खरोखरंच परफ़ॉर्मन्स इतका उत्तम झाला, की दोघांच्याही संवादातील शब्दफ़ेकीला आणि ‘व्हॉईस प्रोजेक्शन’ला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. श्री.प्रधान यांनी प्रवेशांतर्गत नाट्यगीतेही तितक्याच तयारीने म्हटली, तथापि त्यांनी तबला पेटीची साथही घेतली असती तर ती गाणी अधिक बहारदार व श्रवणीय झाली असती असे वाटते !

त्यानंतर, सोबतीच्या एक नवीन सभासद, ‘कृष्णमूर्ती’ व ‘पारंपारिक’ ज्योतिष पद्धतींच्या अभ्यासक सौ. वृंदा डोंगरे यांनी त्यांचे ‘भविष्यकथनातील उल्लेखनीय अनुभव’ सांगितले. दैनंदिन आयुष्य जगत असतांना, पुढच्या क्षणाला..आज, उद्या, महिनाभरात काय होणार..? , मला इन्टरव्ह्यूचा कॉल कधी येणार..?, माझी हरवलेली वस्तू कधी सांपडणार..? अशा अनेक काळज्या प्रत्येकाला असतातच! पण त्यांचीही अचूक उत्तरे शोधण्यासाठी ‘रूलिंग प्लॅनेट’चा कसा उपयोग होतो या संबंधी त्यांचे उत्कंठापूर्ण भाषण चालू असतांना, ‘एकदा भेटायलाच हवं यांना..नंबर घ्यायला हवा..!’ अशी ‘कुजबूज’ श्रोत्यांमधून ऐकू येत होती..कारण भविष्यात डोकावून पहायला, कोणाला आवडत नाही ?

काहीं माणसं अशी असतात की, त्यांचे प्रश्न कधी संपतच नाहीत! अशा लोकांची ‘खोड’ जिरविण्यासाठी एक खुसखुशीत, विनोदी एकपात्री घेऊन त्यानंतर व्यासपीठावर आल्या त्या, सोबतीच्या आणखी एक नवीन सभासद, श्रीमती अनिता नागले ! त्यांच्या कार्यक्रमाचं नांवच मुळी होतं ‘कौन बनेगा ‘प्रश्नपती’?
एक ‘प्रश्नखोर’ व्यक्ती, रस्त्याने घाईघाईने चाललेल्या, आपल्याशी विशेष ओळखही नसलेल्या व्यक्तीला भेटते, आणि तिला ‘काय..कसें..कधीं.. कुठे..केव्हां..’असल्या निरर्थक प्रश्नांचा सपाटा लाऊन भंडावून सोडते..शेवटी प्रश्न विचारण्यात बराच वेळ गेला म्हणून ती ‘प्रश्नखोर’ व्यक्ती जेव्हां स्वत:च भानावर येते व घाईघाईने जायला लागते.. तॆव्हां मात्र ती संधी साधून, आतांपर्यंत तिच्या प्रश्नांना उत्तरे देवून वैतागलेली व्यक्ती तिच्यासारखेच सगळे प्रश्न विचारून तिला कशी अद्दल घडवते, त्याचं मोठं
खुमासदार चित्रण सौ.नागले यांनी सादर केले.दोन भिन्न व्यक्तींचे संवाद रंगविताना त्यांनी प्रत्येकीची बोलण्याची ढब आणि हावभाव यातही जो वेगळेपणा दाखविला,त्यालाही श्रोत्यांनी मनापासून दाद दिली.

या कार्यक्रमानंतर श्री. माधव बागुल यांनी ‘शीळवादनाचा’ एक अभिनव कार्यक्रम सादर केला. सोबतीचे हे एक ज्येष्ठ सभासद, अभंग आणि भावगीतांत नित्य रमणारे, पण आज त्यांनी शिळेवर तीन गाणी सादर केली, तीही त्यातील ताना-मुरक्यांसकट ! शीळही अशी वाजविली की ‘गाणे कुठचे?’ ते सांगावे नाही लागले!
जीवनात ही घडी.., सांग तू,माझा होशिल कां..,य़ा दोन गाण्यांनंतर त्यांनी दादरा तालावर घुमवलेली ‘ये जिंदगी उसीकी है’ ची धून सुद्धां जोरदार टाळ्या घेवून गेली.

"आतां यानंतर प्रशांत दळवी लिखित ‘चारचौघी’ नाटकाची एक ‘झलक’ सादर करण्यासाठी आपणासमोर येत आहेत.. सौ.रेखा चिटणीस! ‘माहीम महिला मंडळातर्फे आयोजित केलेल्या ‘नाट्यवाचन’स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या, पु.ल.देशपांडे लिखित ‘आम्ही लटिके ना बोलू’ मधील भूमिकेबद्दल कौतुकास पात्र ठरलेल्या या गुणी कलावंत नव्यानेच ‘सोबती’च्या सभासद झालेल्या आहेत.." असे निवेदन सुरू असतांनाच एकीकडे रंगमंचावर नाट्यवाचनाला आवश्यक ती ‘रंगमंच-व्यवस्था’ ही केली जात होती. कार्यक्रम सुरू झाला..आणि खरोखरंच, एकंदर ‘नाट्याविष्कार’ पाहिल्यानंतर त्या किती समर्थ ‘अभिनेत्री’आहेत याचीही तात्काळ प्रचिती आली. ‘चारचौघी’मधील ‘विद्या’ची भूमिका त्यांनी इतकी समरसून वठविली की नाटक संपल्यावर टाळ्यांच्या कडकडात अवघे सभागॄह दणाणून गेले. या कार्यक्रमानिमित्ताने ‘सौ.रेखा चिटणीस’ या नांवाची ‘सोबती’कलावंतांच्या यादीत एक मोलाची भर पडली पडली एवढे नक्की !

त्यानंतर सादर झाला... ‘भाऊबंदकी’ नाटकातील एक जबरदस्त प्रवेश!
नाट्यवाचन करणारे कलावंत होते, रामशास्त्री: श्री.शंकरराव लिमये, राघोबादादा:श्री. विजय पंतवैद्य आणि आनंदीबाईच्या भूमिकेत सौ. विजया भालेराव!
"नारायणरावाच्या खुनाबद्दल राघोबादादास देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही" हा रामशास्त्री बाणा, म्हणजे तर या नाटकाचा कणा ! डोक्यावर पगडी,कानात भिकबाळी, कपाळी गंध,खांद्यावर उपरणं, गळ्यात रुद्राक्ष, आणि हातात (न्याय)दंड..वा:, शंकररावांचा हा ‘रामशास्त्री’ लक्ष वेधून घेणारा होता खास ! नाट्यक्षेत्रात मुरलेल्या यातील तीनही कलावंतांनी हे ‘नाट्यवाचन’ अगदी सहजपणे रंगविले आणि रसिकांची वाहवा मिळविली.

असा कार्यक्रम ऐन रंगात आला होता. ब~याच कलावंतांचे ‘गुण-दर्शन’ व्हायचे अजून होतेच बाकी.. एकीकडे सभेची वेळही संपत आलेली..‘काय करावे?’प्रश्न होता! पण कार्यवाह श्रीमती. सुनिता कुलकर्णी आणि सुनंदा गोखले यांनी आपसात चर्चा करून एक चांगला निर्णय घेतला व तो लगेच जाहीरही करून टाकला.. "श्रोतेहो, हा कार्यक्रम आतां आपल्याला वेळेअभावी आटोपता घ्यावा लागतोय..अजून बरेच कार्यक्रम शिल्लक आहेत, त्यासाठी आपण बुधवार दि.०७ ऑगस्ट ही तारीख राखून ठेवीत आहोत. तथापि आजच्या भागातील शेवटच्या कार्यक्रमाचा आस्वाद मात्र आपल्याला घ्यायचाय,आणि तो कार्यक्रम आहे.. सुगम संगीताचा ! टाळ्यांनी स्वागत करूया..

सर्वप्रथम आपणासमोर येत आहेत, श्रीमती. प्रज्ञा काशीकर ! त्यांच्या गीताच्या मूळ गायिका आहेत माणिक वर्मा आणि बोल आहेत..कसा कळावा शब्दांना, तुझा नि माझा एकपणा..! त्या नंतर आपल्यासमोर येतील श्रीमती शीला निमकर.आणि त्या सादर करतील एक भावगीत..राधा ही बावरी ! कार्यक्रम सुरू झाला.दोन्ही भगिनींनी आपली गाणी अगदी भावपूर्ण आणि सुरेल आवाजात सादर केली. त्यांना पेटी आणि तबल्यावर अनुभवी साथ लाभली तीही अनुक्रमे श्री. मधुकर देसाई आणि प्रकाश जांभेकर या निष्णात वादक कलावंतांची !
त्यानंतर व्यासपीठावर आले ते ‘फ़ेस्कॉम’च्या वार्षिक संमेलनामध्ये ‘सुगम संगीत’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणारे, सोबतीचे सर्वपरिचित सदस्य, पंडित श्री. अरविंद वाकणकर ! त्यांनी दोन नाट्यगीते सादर केली. पहिले गीत ‘रागिणी मुखचंद्रमा..’ आणि दुसरे गीत होते ‘भैरवी’ मध्ये गायिलेले ‘कां रे ऐसी माया, कान्हा लाविली मला..?’ त्यांनाही पेटी आणि तबल्यावर अनुभवी साथ केली अनुक्रमे श्री. मधुकर देसाई आणि प्रकाश जांभेकर या जाणकार वादक कलावंतांनी !
शेवटी सोबतीचे अध्यक्ष श्री.मुकुंद पेठे आणि ज्येष्ठ सभासद प्राध्यापक श्री. येवलेकर यांनी उत्स्फ़ूर्तपणे व्यासपीठावर येऊन कार्यक्रमाचे कौतुक केले, त्यामुळे सुमारे दोन तास रंगलेल्या-‘विविध-कला-गुण-दर्शनच्या’पहिल्या भागाची सांगताही समाधानकारक झाली.

Tuesday, July 14, 2009

अमेरिकेचे ग्रीन कार्ड - भाग २

अमेरिकन सरकारने आता National Visa Centre नावाचे नवीन ऑफिस उघडले आहे. तेथेच immigrant visa चे काम होते. मुला/मुलीने स्पॉन्सरिंग साठी पेपर्स भरले आणि फी भरली कीं NVC कडून पत्र किंवा ई-मेल येते कीं तुमचा केस नंबर अमुक आहे. आता पुढील कागदपत्रांचा अध्याय सुरू होतो. आई आणि वडील दोघांनाहि जन्मतारखेचा सरकारी दाखला पाठवावा लागतो. आपल्या पिढीला असा दाखला कधी लागलेला नसल्याने तो बहुधा नसतोच! त्यामुळे पुन्हा जेथे जन्म झाला असेल तेथील ग्रामपंचायत, म्युनिसिपालिटी किंवा कॉर्पोरेशन कडून मिळवावा लागतो. तो मिळाला तर ठीकच. नाहीतर पुन्हा दाखला देता येत नसल्याचे (कारणासह)नकारात्मक पत्र, मराठीत असल्यास, इंग्रजी भाषांतर करून घेऊन, मग आपल्या जन्माच्या वेळी उपस्थित असलेल्या नातेवाइकाकडून प्रतिज्ञापत्र करून घ्यावे लागते. त्यात त्या व्यक्तीचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, वय वगैरे उल्लेख असून, जन्माच्यावेळी स्वत: उपस्थित असल्याचे स्पष्ट म्हणावे लागते. ज्येष्ठ नागरिकाला असे प्रतिज्ञापत्र करू शकेल अशी नातेवाइक व्यक्ति हयात असल्यास त्याचे नशीबच म्हणावे. सुदैवाने,माझ्या मामांनी व पत्नीच्या बाबतीत तिच्या मावशीने तसे प्रतिज्ञापत्र केले.
त्याशिवाय school leaving certificate हि लागते. ते आपण कित्येक वर्षांपूर्वी घेतलेले असते पण बहुधा सापडत नाहीच. मग? आपल्या शाळेकडून पुन्हा मिळवा! तेहि सुखासुखी मिळत नाही. आमच्या शाळांनी पुन्हा आम्हाला ’मूळ सर्टिफिकेट हरवल्या’चे प्रतिज्ञापत्र करावयास लावले. पत्नीच्या बाबतीत तर पार्ले टिळक विद्यालयाने, सर्टिफिकेट हरवल्याची पोलिसांत तक्रार करून तसा पोलिस ऑफिसचा दाखला आणावयास लावला!
याचे शिवाय आणखी दोन सर्टिफिकिटे मिळवावी लागतात तीं म्हणजे पोलिस दाखले. एक दाखला पासपोर्ट ऑफिसकडून मिळवावा लागतो. पासपोर्ट ऑफिसचा त्यासाठी application form (on their web-site), मिळतो तो भरून तेथे दिला व सोबत आपल्या पत्त्याचे दोन पुरावे, (इलेक्ट्रिक बिल, रेशन कार्ड वगैरे) दिले व फी भरली की त्यांचा दाखला लवकर व सुलभपणे मिळतो. एजंट्ची गरज लागत नाही. हा दाखला पासपोर्ट दिला त्या तारखेपर्यंतच्या काळासाठी असतो. पासपोर्ट दिल्याच्या तारखेपासून पुढच्या काळासाठी मात्र खुद्द पोलिसांचा दाखला लागतो. त्यासाठी तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनला भेट द्यावी व त्यांच्या पद्धतीप्रमाणे मिळवावा. मुंबईसाठी तो शिवाजी टर्मिनस जवळील C.I.D. Office मधून मिळतो. त्यासाठीहि वास्तव्याचा पुरावा लागतो. फी रु. १०० पडते व ती पोलिस कमिशनरच्या नावाने डिमांड ड्राफ्टने द्यावी लागते! फोटोच्या दोन प्रतीहि लागतात. फॉर्म तेथेच मिळतो. तो भरून द्यावयाचा. २-३ आठवडे लागतात. मुंबईबाहेरच्यांनी स्थानिक पोलिस-स्टेशनला प्रथम भेटावे.
हे सर्व कागद, मूळ, प्रती नव्हे, शिवाय पुन्हा एकदां विवाह-दाखला किंवा प्रतिज्ञापत्रे, दोघांसाठी स्वतंत्र, आपल्या मुला/मुलीतर्फे NVCकडे पाठवले गेले की मग NVC आपल्याला मुंबई कॉन्सुलेटकडे मुलाखत ठरवून देते. तसे पत्र कॉन्सुलेतकडूनहि येते. तेथे जाण्यापूर्वी आणखी एक काम उरते ते म्हणजे वैद्यकीय तपासणीचा अहवाल. ही तपासणी ठराविक हॉस्पिटलमध्येच व्हावी लागते. मुंबईमध्ये लीलावती व ब्रीच कॅंडी ही दोन मान्यताप्राप्त आहेत. त्याबद्दलच्या सूचना कॉन्सुलेटकडून मिळतात.

तेव्हा तुमच्या मुला/मुलीच्या मनात तुमच्यासाठी ग्रीन कार्ड करून घेण्याचा विचार येत असला आणि तुम्हालाहि तो पुढेमागे मान्य होणार असला तर प्रथम तुमचा विवाह-दाखला व दोघांचाहि जन्मदाखला/स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेट आहे कीं नाही हे पाहून घ्या व नसलीं तर वर वर्णन केलेली कारवाई वाट न पाहतां सुरू करा. त्याला पर्याय नाही! तसे केलेत तर आयत्या वेळी धावाधाव करावी लागणार नाही.
आपण दिलेली सर्व मूळ कागदपत्रे आपणाला कॉन्सुलेटकडून मुलाखतीचे वेळी परत मिळतात. मात्र मूळ कागदपत्रे पाठवताना त्यांचेबरोबर एक-एक झेरॉक्स पाठवावी लागते व एकेक प्रत गॅझेटेड ऑफिसरकडून सही करून घेऊन, खबरदारी म्हणून स्वत:कडे ठेवावी. विवाह-नोंदणी ऑफिस किंवा जन्ममृत्यू ऑफिसकडून नकारात्मक पत्र घ्यावे लागले तर त्याच्या दोन प्रती तेव्हांच शक्य झाल्यास मागाव्या म्हणजे एक मूळ प्रत आपल्यापाशी राहते.
Immigrant Visa घेऊन मी ५ जूनला अमेरिकेत आलो. काल ११ जुलैला आमची ग्रीन कार्डे मेलने आलीं. आपली सर्व कागदपत्रे व्यवस्थित असली तर immigration visa आणि Green Card मिळण्यास अडचण येत नाही असा मला अनुभव आला.
मी दिलेल्या माहितीचा आपणास उपयोग झाला तर मला आनंद होईल. आणखी काही खुलासा हवा असला तर pkphadnis@yahoo.com वर ई-मेल करा.

Wednesday, July 08, 2009

गुढग्याचे विकार (osteoarthritis) आणि हाडांचा ठिसूळपणा (osteoporosis)
डॉ. संजय लोंढे - M.S.(Orth.), D.Orth., F.C.P.S.(Orth.), D.N.B.(Orth.)
F.R.C.S(UK), F.R.C.S(Ireland), M.Ch.(Orth.) Liverpool.
डॉ. संजय लोंढे, मुंबईतील एक प्रथितयश ऑर्थोपेडिक सर्जन यांच्याकडे या वैद्यक शाखेचे सखोल ज्ञान व परदेशातील व मुंबईतील रुग्णालयांमध्ये घेतलेला प्रदीर्घ अनुभव आहे.
५ जुलै २००९ रोजी विले पार्ले येथील सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. संजय लोंढे यांचे माहितीपूर्ण भाषण झाले. सोबत उपयुक्त अशा स्लाईड्स दाखविल्यामुळे व विषय विशेषत: ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित असल्याने भाषण खूपच उद्बोधक झाले.
प्रथम त्यानी गुढगेदुखीसंबंधी (Osteoarthritis) माहिती दिली. हा आवाक्यात आणता येण्यासारखा विकार असून योग्य इलाज, औषधोपचार व आवश्यक तेथे शस्रक्रिया करून या आजाराच्या त्रासापासून बर्‍याच प्रमाणात सुटका होते. गुढगेदुखीचे प्रमाण वाढत असले तरी त्याच्यावरील उपाययोजनांमध्येही क्रांतिकारक बदल झाले आहेत व गुढगेदुखीचा आजार खूपच आटोक्यात आला आहे व बर्‍याच प्रमाणात तो सुसह्य झाला आहे. गुढग्याच्या आतील रचना व त्यात होणार्‍या बदलांमुळे उद्भवणारी गुढगेदुखी याची त्यानी सविस्तर माहिती दिली.
वयोमान किंवा इतर कारणांनी येणारी स्थूलता व स्नायूंचा कमकुवतपणा यामुळे हा आजार उद्भवतो. या बाबतीत ढोबळमानाने तीन प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतात. (१) सर्वसाधरण सोपे उपाय: वजन कमी करणे, नियमित व्यायाम करणे व फिजीयोथेरापी ज्यामध्ये गुढग्याच्या आजूबाजूचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. (२) सांध्याला बळकटी आणणारी औषधे घेतल्यास हा त्रास बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो. गुढग्यामध्ये इंजेक्शन, पायाच्या हाडावर शस्त्रक्रिया करून गुढग्यावर पडणारा भार संतुलित करणे हेही उपाय फायदेशीर ठरतात. (३) दुर्बिणीद्वारे गुढग्याची तपासणी व 0rthroscopic washout - debridement हा उपाय केला जातो. परंतु हा उपाय गुढगेदुखीच्या प्राथमिक अवस्थेत उपयुक्त ठरतो. मात्र या उपायानी गुढगेदुखी आटोक्यात आली नाही व ती अधिक वेदनामय होऊ लागली तर अन्तिम उपाय म्हणून संपूर्ण सांधा बदलण्याची (Total Knee Replacement) शस्त्रक्रिया आवश्यक ठरते.मात्र ही उपाययोजना बरीच खर्चिक आहे. परंतु ती केल्यास गुढगे जवळजवळ पूर्ववत होतात व पंधरा ते वीस वर्षांपर्यंत कृत्रीम सांधा टिकू शकतो व रोगी सर्वसाधारण जीवन जगू शकतो.
नंतर डॉ. लोंढे यानी Osteoporosis या व्याधीसंबंधी माहिती दिली. या व्याधीमुळे हाडे ठिसूळ होऊ लागतात व योग्य काळजी न घेतल्यास हाडे कमकुवत होणे व अपघातामुळे फ़्रॅक्चर होणे या समस्या उद्भवतात. ४० ते ४५ वयाच्या स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. योग्य काळजी घेणे, संतुलित आहार व नियमित आवश्यक व्यायाम यांद्वारे ही व्याधी आटोक्यात राहू शकते. संतु्लित आहारामध्ये रोज १००० ते १५०० mg. कॅल्शियमची आवश्यकता असते व दूध, दही, ताक, लोणी, चीज, कोबी, मासे यातून ते मिळते. त्याबरोबर प्रथिने (proteins) यांचे प्रमाणही चांगले असावे लागते. शिवाय धूम्रपान, मद्यपान या व्यसनांपासून दूर रहाणेही आवश्यक असते.
वरील उपायांव्यतिरिक्त अनेक प्रकारची औषधे, इंजेक्शन्स इ. उपायही उपलब्ध आहेत.
अनेक सभासदानी डॉक्टराना शंका विचारल्या व डॉक्टरानी त्याना समर्पक व सविस्तर उत्तरे दिली.
एका उच्च विद्याविभूषीत, अनुभवी व निष्णात सर्जनच्या भाषणाने या विषयावरच्या अनेक पैलूंचा सभासदाना परिचय झाला व उतार वयामध्ये होणार्‍या या व्याधीसंबंधीची भीतीही कमी झाली.

Sunday, July 05, 2009

स्वातंत्र्यदिनाचे दारूकाम












नमस्कार सोबती मित्रानो.
मी सध्या अमेरिकेत आहे हे आपणास माहीत आहेच. ४ जुलै हा USA चा स्वातंत्र्यदिन. त्या दिवशी बर्‍याच शहरांमधून Fireworks Display असतो. शहरातील एखाद्या मध्यवर्ति ठिकाणी ही आतषबाजी रात्री केली जाते. हे दारूकाम अतिशय पाहण्यासारखे असते. मी राहतो आहे त्या सॅन रेमॉन गावातहि ते काल झाले. रात्री ९-३० वाजता साधारण अर्धातास ते झाले. एका छोट्याशा टेकडीवर आमच्या घराच्या जवळच एक पार्क आहे तेथे आम्ही पहायला गेलो होतो. सध्या येथे खरेतर उन्हाळा चालू आहे, शाळांना सुटी आहे. मात्र काल रात्री हवा खूप थंड होती व वाराही सुटला होता त्यामुळे स्वेटर, जॅकेट असा पोषाख केल्याशिवाय बाहेर पडवत नव्हते. आम्ही गेलो होतोच. पण जवळपास सर्व गाव पार्कमध्ये, रस्त्यांवर लोटले होते. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत जत्रा लोटली होती. येथे दारुकाम सुरेख झाले पण मला फोटो काढतां आले नाहीत याची चुटपूट लागली होती. आज सकाळी www.weather.com या साइटवर मला अमेरिकेतल्या अनेक शहरांतील दारुकामाची एक छोटीशी व्हिडिओ दिसली. त्याची website link खाली दिली आहे. ती वापरून तुम्हाला ती व्हिडिओ पाहतां येईल. आपले श्री. डोंगरे यांना पाहतां आली व त्यानी लगेच मला कळवले म्हणून मीहि लगेच आपल्या ब्लॉगवर ती देतो आहे. आपण जरूर पहा व अभिप्राय द्यायला विसरू नका!
http://www.weather.com/multimedia/videoplayer.html?from=email&bcpid=823425597&bclid=877032950&bctid=28524678001
नमुन्यादाखल इंटरनेटवर मिळालेले दोन फोटो सुरवातीला दिले आहेत.