Friday, July 17, 2009

‘धम्माल कार्यक्रम’ -‘विविध-कला-गुण-दर्शनाचा’.(भाग-१)

बुधवार, दिनांक ०८ जुलै २००९ रोजी ‘सोबती’सभासदांचा एक ‘धम्माल कार्यक्रम’ सादर झाला -‘विविध-कला-गुण-दर्शनाचा’. आमच्या एक ‘कलाप्रेमी’ सभासद सौ. सुनंदा गोखले यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘ज्यांना यात भाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नावें कळवावीत’ या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन चक्क २७ ‘कलावंतांनी‘ नावें नोंदविली. आम्हा ‘सोबतीं’साठी ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे असे मला वाटते. प्रस्तावनेत अधिक वेळ न घालविता आतां या कार्यक्रमाकडेच वळतो..!

कार्यक्रमाची सुरुवात ’सरस्वती-वंदना’ या नृत्य-गायनाने झाली. ‘सरस्वतीच्या वंदुनि चरणा, मागूया शुभ आशीर्वचना..’सौ. सुनंदा गोखले यांनी स्वतः रचलेल्या, व स्वरबद्ध केलेल्या या श्रवणीय गीताला नृत्याविष्काराने अधिकच प्रेक्षणीय बनविले ते सोबतीच्याच हौशी स्त्री-कलावंतांनी ! सौ.अनिता पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नृत्यामध्ये त्यांच्याबरोबरच सौ. वैजयंती साठे, सौ. नीलिमा ठोसर व श्रीमती कल्पना भट, यांनी उत्तम साथ दिली. सौ. नंदा देसाई यांच्या सुस्वर कंठातून आलेल्या या ‘सरस्वती-वंदनाला’ वाद्यांची साथ मिळाली ती सुद्धां तितकीच मोलाची.. कारण हार्मोनियमवर होते सर्वपरिचित श्री. मधुकर देसाई, व तबल्यावर श्री. प्रकाश जांभेकर !

त्या नंतर, कविता करण्याचा छंद मनापासून जोपासणा~या एक ज्येष्ठ सभासद श्रीमती विजया लेले यांनी, नुकत्याच सुरु झालेल्या वर्षा ऋतूचे औचित्य साधून, स्वरचित काव्यपंक्तीतूनच ‘वरुणराजाचे स्वागत’ केले. ‘काळे काळे मेघ बरसती,शुभ्र अशा जलधारा..चिंबचिंब भिजला, सुकलेला आसमंत सारा..! वा:, बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती, आणि नाडकर्णी सभागृहात आम्ही सारे ‘सोबती’.. जणू काव्यधारांमध्ये न्हाऊन निघत होतो.

"आतां आपल्यासमोर सादर होतंय..‘संगीत वेड्यांचा बाजार’ या नाटकातील एका प्रवेशाचे नाट्यवाचन! त्यासाठी रंगमंचावर येत आहेत..श्री. प्रदीप प्रधान आणि श्रीमती रेखा चिटणीस.." सूत्रसंचालिका सौ. सुनंदा गोखले यांनी घोषणा केली आणि पाठोपाठ नव्यानेच ‘सोबती’त दाखल झालेले हे ‘रंगप्रेमी’ सभासद व्यासपीठावर आले..त्यांच्या मंचावरील येण्यातच इतका आत्मविश्वास होता की ‘आतां नक्कीच काही ‘विशेष’ पहायला मिळणार’ या उत्सुकतेने श्रोत्यांच्या माना उंचावल्या. आणि... वाचक हो, खरोखरंच परफ़ॉर्मन्स इतका उत्तम झाला, की दोघांच्याही संवादातील शब्दफ़ेकीला आणि ‘व्हॉईस प्रोजेक्शन’ला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. श्री.प्रधान यांनी प्रवेशांतर्गत नाट्यगीतेही तितक्याच तयारीने म्हटली, तथापि त्यांनी तबला पेटीची साथही घेतली असती तर ती गाणी अधिक बहारदार व श्रवणीय झाली असती असे वाटते !

त्यानंतर, सोबतीच्या एक नवीन सभासद, ‘कृष्णमूर्ती’ व ‘पारंपारिक’ ज्योतिष पद्धतींच्या अभ्यासक सौ. वृंदा डोंगरे यांनी त्यांचे ‘भविष्यकथनातील उल्लेखनीय अनुभव’ सांगितले. दैनंदिन आयुष्य जगत असतांना, पुढच्या क्षणाला..आज, उद्या, महिनाभरात काय होणार..? , मला इन्टरव्ह्यूचा कॉल कधी येणार..?, माझी हरवलेली वस्तू कधी सांपडणार..? अशा अनेक काळज्या प्रत्येकाला असतातच! पण त्यांचीही अचूक उत्तरे शोधण्यासाठी ‘रूलिंग प्लॅनेट’चा कसा उपयोग होतो या संबंधी त्यांचे उत्कंठापूर्ण भाषण चालू असतांना, ‘एकदा भेटायलाच हवं यांना..नंबर घ्यायला हवा..!’ अशी ‘कुजबूज’ श्रोत्यांमधून ऐकू येत होती..कारण भविष्यात डोकावून पहायला, कोणाला आवडत नाही ?

काहीं माणसं अशी असतात की, त्यांचे प्रश्न कधी संपतच नाहीत! अशा लोकांची ‘खोड’ जिरविण्यासाठी एक खुसखुशीत, विनोदी एकपात्री घेऊन त्यानंतर व्यासपीठावर आल्या त्या, सोबतीच्या आणखी एक नवीन सभासद, श्रीमती अनिता नागले ! त्यांच्या कार्यक्रमाचं नांवच मुळी होतं ‘कौन बनेगा ‘प्रश्नपती’?
एक ‘प्रश्नखोर’ व्यक्ती, रस्त्याने घाईघाईने चाललेल्या, आपल्याशी विशेष ओळखही नसलेल्या व्यक्तीला भेटते, आणि तिला ‘काय..कसें..कधीं.. कुठे..केव्हां..’असल्या निरर्थक प्रश्नांचा सपाटा लाऊन भंडावून सोडते..शेवटी प्रश्न विचारण्यात बराच वेळ गेला म्हणून ती ‘प्रश्नखोर’ व्यक्ती जेव्हां स्वत:च भानावर येते व घाईघाईने जायला लागते.. तॆव्हां मात्र ती संधी साधून, आतांपर्यंत तिच्या प्रश्नांना उत्तरे देवून वैतागलेली व्यक्ती तिच्यासारखेच सगळे प्रश्न विचारून तिला कशी अद्दल घडवते, त्याचं मोठं
खुमासदार चित्रण सौ.नागले यांनी सादर केले.दोन भिन्न व्यक्तींचे संवाद रंगविताना त्यांनी प्रत्येकीची बोलण्याची ढब आणि हावभाव यातही जो वेगळेपणा दाखविला,त्यालाही श्रोत्यांनी मनापासून दाद दिली.

या कार्यक्रमानंतर श्री. माधव बागुल यांनी ‘शीळवादनाचा’ एक अभिनव कार्यक्रम सादर केला. सोबतीचे हे एक ज्येष्ठ सभासद, अभंग आणि भावगीतांत नित्य रमणारे, पण आज त्यांनी शिळेवर तीन गाणी सादर केली, तीही त्यातील ताना-मुरक्यांसकट ! शीळही अशी वाजविली की ‘गाणे कुठचे?’ ते सांगावे नाही लागले!
जीवनात ही घडी.., सांग तू,माझा होशिल कां..,य़ा दोन गाण्यांनंतर त्यांनी दादरा तालावर घुमवलेली ‘ये जिंदगी उसीकी है’ ची धून सुद्धां जोरदार टाळ्या घेवून गेली.

"आतां यानंतर प्रशांत दळवी लिखित ‘चारचौघी’ नाटकाची एक ‘झलक’ सादर करण्यासाठी आपणासमोर येत आहेत.. सौ.रेखा चिटणीस! ‘माहीम महिला मंडळातर्फे आयोजित केलेल्या ‘नाट्यवाचन’स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या, पु.ल.देशपांडे लिखित ‘आम्ही लटिके ना बोलू’ मधील भूमिकेबद्दल कौतुकास पात्र ठरलेल्या या गुणी कलावंत नव्यानेच ‘सोबती’च्या सभासद झालेल्या आहेत.." असे निवेदन सुरू असतांनाच एकीकडे रंगमंचावर नाट्यवाचनाला आवश्यक ती ‘रंगमंच-व्यवस्था’ ही केली जात होती. कार्यक्रम सुरू झाला..आणि खरोखरंच, एकंदर ‘नाट्याविष्कार’ पाहिल्यानंतर त्या किती समर्थ ‘अभिनेत्री’आहेत याचीही तात्काळ प्रचिती आली. ‘चारचौघी’मधील ‘विद्या’ची भूमिका त्यांनी इतकी समरसून वठविली की नाटक संपल्यावर टाळ्यांच्या कडकडात अवघे सभागॄह दणाणून गेले. या कार्यक्रमानिमित्ताने ‘सौ.रेखा चिटणीस’ या नांवाची ‘सोबती’कलावंतांच्या यादीत एक मोलाची भर पडली पडली एवढे नक्की !

त्यानंतर सादर झाला... ‘भाऊबंदकी’ नाटकातील एक जबरदस्त प्रवेश!
नाट्यवाचन करणारे कलावंत होते, रामशास्त्री: श्री.शंकरराव लिमये, राघोबादादा:श्री. विजय पंतवैद्य आणि आनंदीबाईच्या भूमिकेत सौ. विजया भालेराव!
"नारायणरावाच्या खुनाबद्दल राघोबादादास देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही" हा रामशास्त्री बाणा, म्हणजे तर या नाटकाचा कणा ! डोक्यावर पगडी,कानात भिकबाळी, कपाळी गंध,खांद्यावर उपरणं, गळ्यात रुद्राक्ष, आणि हातात (न्याय)दंड..वा:, शंकररावांचा हा ‘रामशास्त्री’ लक्ष वेधून घेणारा होता खास ! नाट्यक्षेत्रात मुरलेल्या यातील तीनही कलावंतांनी हे ‘नाट्यवाचन’ अगदी सहजपणे रंगविले आणि रसिकांची वाहवा मिळविली.

असा कार्यक्रम ऐन रंगात आला होता. ब~याच कलावंतांचे ‘गुण-दर्शन’ व्हायचे अजून होतेच बाकी.. एकीकडे सभेची वेळही संपत आलेली..‘काय करावे?’प्रश्न होता! पण कार्यवाह श्रीमती. सुनिता कुलकर्णी आणि सुनंदा गोखले यांनी आपसात चर्चा करून एक चांगला निर्णय घेतला व तो लगेच जाहीरही करून टाकला.. "श्रोतेहो, हा कार्यक्रम आतां आपल्याला वेळेअभावी आटोपता घ्यावा लागतोय..अजून बरेच कार्यक्रम शिल्लक आहेत, त्यासाठी आपण बुधवार दि.०७ ऑगस्ट ही तारीख राखून ठेवीत आहोत. तथापि आजच्या भागातील शेवटच्या कार्यक्रमाचा आस्वाद मात्र आपल्याला घ्यायचाय,आणि तो कार्यक्रम आहे.. सुगम संगीताचा ! टाळ्यांनी स्वागत करूया..

सर्वप्रथम आपणासमोर येत आहेत, श्रीमती. प्रज्ञा काशीकर ! त्यांच्या गीताच्या मूळ गायिका आहेत माणिक वर्मा आणि बोल आहेत..कसा कळावा शब्दांना, तुझा नि माझा एकपणा..! त्या नंतर आपल्यासमोर येतील श्रीमती शीला निमकर.आणि त्या सादर करतील एक भावगीत..राधा ही बावरी ! कार्यक्रम सुरू झाला.दोन्ही भगिनींनी आपली गाणी अगदी भावपूर्ण आणि सुरेल आवाजात सादर केली. त्यांना पेटी आणि तबल्यावर अनुभवी साथ लाभली तीही अनुक्रमे श्री. मधुकर देसाई आणि प्रकाश जांभेकर या निष्णात वादक कलावंतांची !
त्यानंतर व्यासपीठावर आले ते ‘फ़ेस्कॉम’च्या वार्षिक संमेलनामध्ये ‘सुगम संगीत’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणारे, सोबतीचे सर्वपरिचित सदस्य, पंडित श्री. अरविंद वाकणकर ! त्यांनी दोन नाट्यगीते सादर केली. पहिले गीत ‘रागिणी मुखचंद्रमा..’ आणि दुसरे गीत होते ‘भैरवी’ मध्ये गायिलेले ‘कां रे ऐसी माया, कान्हा लाविली मला..?’ त्यांनाही पेटी आणि तबल्यावर अनुभवी साथ केली अनुक्रमे श्री. मधुकर देसाई आणि प्रकाश जांभेकर या जाणकार वादक कलावंतांनी !
शेवटी सोबतीचे अध्यक्ष श्री.मुकुंद पेठे आणि ज्येष्ठ सभासद प्राध्यापक श्री. येवलेकर यांनी उत्स्फ़ूर्तपणे व्यासपीठावर येऊन कार्यक्रमाचे कौतुक केले, त्यामुळे सुमारे दोन तास रंगलेल्या-‘विविध-कला-गुण-दर्शनच्या’पहिल्या भागाची सांगताही समाधानकारक झाली.

No comments: