Friday, August 28, 2009

कीर्तनरंग

कीर्तनरंग
सोबतीचे कार्याध्यक्ष श्री. विश्वास डोंगरे हे कीर्तनकारही आहेत. मात्र हा त्यांचा व्यवसाय नाही. नोकरी संभाळून त्यानी हा छंद जोपासला. त्यांच्या कीर्तनाचा लाभ बाहेरच्या अनेक भक्तानी घेतला. प्रसंगानुसार सोबतीच्या साप्ताहिक सभेत त्यांच्या कीर्तनाचा लाभ सोबतीच्या सभासदानाही होतो. कीर्तनात ते अनेक संस्कृत-मराठी सुभाषिते, म्हणी, कविता, अभंग यांची पखरण करून कीर्तनात रंग आणतात.चांगल्या आवाजाची देणगी लाभल्यामुळे त्यांचे कथन, गायन श्रवणीय होते.
श्रावण महिन्याच्या निमित्ताने त्यानी दि. १२ ऑगस्ट रोजी कीर्तन सादर केले. गीतेचे तत्वज्ञान प्राकृत भाषेत आणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर हा कीर्तनाचा विषय होता. त्यांची भावंडे व माता पिता याना अनेक दिव्यांतून जावे लागले. संन्यास घेतल्यानंतर गृहस्थधर्माकडे परत आलेले त्यांचे माता पिता व मुले यांच्यावर समाजाने बहिष्कार घातला व ते समाजाच्या निंदेचा विषय ठरले. समाजाने सर्वांची प्रत्येक ठिकाणी अडवणूक करुन त्यांचे जगणे असह्य करण्याचा प्रयत्न केला. पण ज्ञानेश्वर व इतरांची ईश्वरभक्ती व श्रद्धा इतकी प्रखर होती की ते सर्वजण त्यातून अधिक तेजाने तळपून बाहेर आले. ज्ञानेश्वर तर ज्ञानेश्वरी लिहून संतपदाला पोहोचले.
ज्ञानेश्वरांवरील अपार बंधुप्रेमापोटी त्यांची बहीण मुक्क्ताईने त्यांच्यासाठी मांडे करायचे ठरविले. पण भाजायला खापर नव्हते. तेव्हा ज्ञानेश्वर कुंभाराकडे खापर आणण्यासाठी गेले. त्या दयाळू कुंभाराने खापर दिले. ज्ञानेश्वर ते उपरण्यात बांधून घराकडे चालले होते. वाटेत त्याना दुष्टकर्मा विसोबाने पाहिले व ते खापर त्याने फोडून टाकले. ज्ञानेश्वर रिक्त हस्ताने घरी परत आले. मुक्ताईला त्यानी सर्व हकिगत सांगितली. आता त्यांचा जठराग्नि जागृत झाला होता व त्याने त्यांचे सर्व शरीर व्यापले. त्यानी मुक्ताईला सांगितले ‘ मुक्ते, माझ्या पाठीवर अग्नि पेटला आहे. त्यावर ते मांडे भाज’. मुक्ताईने भाजायला सुरुवात केली. इतक्यात विसोबा तिथे हजर झाला. तो पुढे आला तेव्हा मुक्ताईने त्याला सांगितले ‘विसोबा दूर हो, तू जन्माने जरी ब्राह्मण असलास तरी वृत्तीने आणि आचरणाने खेचर आहेस.’ या सार्‍या प्रकाराने तो हबकला आणि त्याला कळून चुकले की ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांच्यात दैवी शक्ति आहे. मनातून तो शरमिंदा झाला आणि त्याने ज्ञानेश्वरांचे पाय धरले आणि म्हणाला ‘ज्ञानेश्वरा मला पश्चाताप झाला आहे. मी तुमचा नाहक छळ केला. मला क्षमा करा’. असे हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे. म्हणून शेकडो वर्षांनंतरही त्यांचे मराठी मनातले स्थान अढळ राहिले आहे.

Monday, August 24, 2009

म्यूर वुड - एक National Monument

प्रवेशद्वार


डॉ. म्यूरचा लाकडी पुतळा

>


रेडवुड झाडाचा छेद















झाडांच्या मध्ये थोडेसे आकाश

म्यूरवुड

गोल्डन गेट ब्रिज पाशी बराच वेळ घालवून नंतर आम्ही पुलावरून उत्तर दिशेला जाणार्‍या रस्ता नं.१०१ ने ३०-४० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या म्यूर वुड या ठिकाणाला भेट दिली. हे एक National Monument आहे. डोंगरांच्या विळख्यात असलेले हे एक अतिशय निसर्गरम्य स्थळ आहे. हा एक शेकडो-कदाचित हजारो- वर्षां पासून अस्तित्वात असलेला जंगल विभाग आहे. येथे रेडवुड जातीचे अनेक मोठमोठे वृक्ष आहेत. यांतून फिरण्यासाठी आवश्यक तेवढीच तोड करून बाकीचे जंगल जसेच्या तसे राखलेले आहे. Red Wood -Sequoia या जातीचेच बहुतेक वृक्ष येथे आहेत. हे झाड सरळसोट खूप उंच वाढते व शेकडो-हजारो वर्षे जगते! उंची २५० ते ४०० फूटहि होते. खूप जुन्या झाडांचा घेरहि मोठा होतो. नवलाची गोष्ट म्हणजे उंचीच्या मानाने या झाडाचीं मुळें फार खोलवर जात नाहीत तर जमिनीलगतच दूरदूर पसरतात. तरीहि हीं झाडे वार्‍या-वादळाला यशस्वीपणे तोंड देऊन दीर्घकाळ जगतात.
हे वैशिष्ट्यपूर्ण जंगल नीटपणे जतन व्हावे म्हणून एका निसर्गप्रेमी व्यक्तीने (विल्यम केंट) विकत घेऊन या झाडांची होऊं घातलेली कत्तल थांबवली व मग हे जंगल केंद्र सरकारच्या ताब्यात दिले जाऊन त्याचे राखीव National Monument झाले. याबद्दलची माहिती देणारा फलक येथे लावलेला आहे. (फोटो पहा). डॉ. म्यूर हा एक विख्यात निसर्गप्रेमी होऊन गेला. त्याचे उचित स्मारक म्हणून त्याचे नाव या राखीव जंगलाला दिले आहे. येथील वृक्षराजी घनदाट आहे व संध्याकाळची वेळ झाल्यामुळे फोटो काढणे अवघड होते. फोटो काढण्यास मात्र मुक्तद्वार होते. जमले तसे फोटो काढले. येथे एक छोटे Coffee Shop होते. तेथे लाकडात कोरलेला डॉ, म्यूरचा पुतळा होता. इतरहि काही पुतळे होते. Red Wood मध्ये कोरीव काम सुरेख होते व लाकडाचे रंगहि मोहक दिसतात. अनेक लहनमोठ्या कोरीव वस्तू विक्रीसाठी होत्या मात्र त्यांच्या किंमती खूपच वाटल्या. जंगलाचे व इतर काही फोटो पहावयास दिले आहेत. पण म्युरवुडचे सौंदर्य वर्णन करणे वा फोटोत पकडणे सोपे थोडेच आहे? ज्याला जमेल त्याने अवश्य पहावे. सूचना : कोणत्याही फोटोवर क्लिक केले तर फोटो मोठा होईल.

Saturday, August 22, 2009

सभासदांचे विविध कार्यक्रम भाग - २
बुधवार दि. ५ ऑगस्ट २००९ रोजी सभासदानी आपले विविध कार्यक्रम सादर केले.
श्रीमती जयश्री तांबोळी यानी आचार्य अत्रे यांच्या विडंबन कविता सादर केल्या. श्रीमती विद्या पेठे यानी पु.ल. देशपांडे यांच्या घरच्या मैफलीत कानडी हेलातल्या मराठी बोलणार्‍या बाईची नक्कल ठसक्यात सादर केली. अर्थात हे पात्र पु.लं च्या लेखणीतून उतरल्यामुळे त्यात अधिकच रंगत आली.
सोबतीच्या अनेक कार्यक्रमात संगीताला नेहमीच प्राधान्य असते व सोबतीमध्ये सुस्वर आवाज लाभलेले अनेक सभासद आहेत. राखी पौर्णिमेवरचे एक गीत श्रीमती विद्या पेठे, श्रीमती नंदा देसाई व श्रीमती सुनिता क्षीरसागर यानी एकत्रितपणे गाउन बहार आणली. श्रावणात घननीळा, केतकीच्या बनी, अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, हृदयी जागा तू अनुरागा, राधा ही बावरी ही सदा बहार गाणी श्रीमती विद्या पेठे, नंदा देसाई व सुनिती क्षीरसागर यानी आपल्या सुमधुर आवाजात सादर केली. तबल्यावर श्री. मुकुंद पेठे व पेटीवर श्री. मधुकर देसाई साथीला होते.
श्री. विश्वास डोंगरे हे कीर्तनकारही आहेत. विठुरायानी नेहमी कंबरेवर हात का ठेवलेले असतात यावर पंढरीनाथ दप्तरदार यानी लिहिलेला अभंग सादर केला व आपल्या नेहमीच्या ढंगात दुसरी अनेक उदाहरणे देउन या विषयावर सुंदर विवेचन केले. या सर्वाचे सार म्हणजे अनन्य भक्तिभाव हेच आहे.
श्री सुरेश निमकर यानी ’ हास्यस्फोट ’ हा अनेक विनोदी किस्से व विनोद यानी ठासून भरलेला कार्यक्रम सादर केला. पुणेरी पाट्या, बायका यांवर आधारित अनेक विनोद सांगून त्यानी श्रोत्यांचे चांगले मनोरंजन केले.

सोबतीची नवीन कार्यकारिणी

सोबतीची नवी कार्यकारिणी
नव्या कार्यकारिणीने २००९-२०११ या दोन वर्षांकरिता दि. ५ ऑगस्ट २००९ रोजी कार्यभार स्वीकारला.
सोबतीची नवीन कार्यकारिणी दर दोन वर्षानी निवडणूक प्रक्रियेने निवडून येते. यावेळी अध्यक्ष व कार्यकारिणीवरील आठ सभासद या जागांसाठी निवडणूक घेणे आवश्यक झाले नाही कारण सदर जागांसाठी जेवढ्या जागा तेवढ्याच उमेदवारांचे अर्ज आले होते. मात्र उपाध्यक्श या एका पदासाठी दोन उमेदवार - श्री सुरेश निमकर व श्री नंदकुमार फडणीस हे असल्याने निवडणूक घेण्यात आली व श्री सुरेश निमकर हे उपाध्यक्षपदी निवडून आले.
नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष : श्री. मुकुंद पेठे
उपाध्यक्ष:श्री.सुरेश निमकर
कार्याध्यक्ष:श्री.विश्वास डोंगरे
कार्यवाह: श्रीमती शीला निमकर
कार्यवाह: श्री.अरविंद वाकणकर
कोषाध्यक्ष: श्रीमती वैजयंती साठे
कार्यकारिणी सदस्य
श्रीमती विद्या पेठे
श्रीमती सुनंदा गोखले
श्रीमती रेखा चिटणीस
श्रीमती जयश्री तांबोळी

Monday, August 17, 2009

गोल्डन गेट ब्रिज - सान-फ्रान्सिस्को



पुलावर जाण्याचा उत्तरदिशेचा मार्ग






मी सध्या अमेरिकेत सान फ्रान्सिस्कोच्या जवळच्या एका शहरात आहे. शनिवार दि. १५ ऑगस्टला आम्ही येथील गोल्डनगेट या प्रख्यात पुलाच्या सान्निध्यात फिरलो. पॅसिफिक महासागरांतून सानफ्रान्सिस्को बंदरांत शिरण्यासाठी एक-दीड मैल रुंद अशी मोठी वाट आहे. आंत अतिशय विस्तीर्ण असा उपसमुद्र आहे. त्याच्या पश्चिम बाजूस सानफ्रान्सिस्को व पूर्व बाजूस ओकलॅंड अशीं मोठीं बंदरे आहेत. ओकलॅंड बंदरावर कंटेनर चढवण्या-उतरवण्याच्या न्हावा-शेवा बंदरासारख्या उत्तम सोयी आहेत. सानफ्रान्सिस्को या जुन्या बंदराची परिस्थिति थोडीफार मुंबईबंदरासारखी झाली आहे. तेथे फारशीं जहाजे येत नाहीत! San Francisco Bay च्या मुख्य प्रवेश-वाटेवर गोल्डन-गेट हा विख्यात पूल आहे. याला Suspension Bridge असे म्हणतात. दीर्घकाळपर्यंत या प्रकारचा हा जगातला जास्तीतजास्त मोठा (4200 Ft.) Span होता. पुलावर दोन्ही दिशांना ४-४ लेन आहेत. गाड्यांचा प्रवाह अखंड चालू असतो. हा पूल सरकारी मालकीचा नाही. स्वतंत्र कंपनी स्थापन करून कर्ज उभारून हा बांधला गेला. ही मालक कंपनी शहरांत येणार्‍या वाहनांकडून टोल वसुली करते व नफा कमावते पण पूल अतिशय उत्तम स्थितीत राखलेला आहे. दोन्ही बाजूंना पादचारी मार्गहि आहेत. प्रेक्षकांचीहि कमतरता नसते पण सर्व बाजूंनी पाहतां येण्याच्या उत्तम सोयी केलेल्या आहेत. फोटो काढण्यास मुक्तद्वार आहे.
पुलाच्या दक्षिणेला शहर भिडलेले आहे. उत्तरेला वस्ती जरा दूर आहे व डोंगरभाग आहे. तेथे दीर्घकाळपर्यंत एक किल्ला व लांब पल्ल्याच्या तोफा होत्या. मात्र पूल झाल्यावर येथे शत्रूची जहाजे कधी आलीच नाहीत. आता तोफा नाहीत व फौजहि नाही. नं. १०१ हा मोठा रस्ता शहराच्या दक्षिणेकडून येऊन या पुलावरून उत्तरेला दूरवर जातो.
पुलाचे फोटो व फिल्म आपण पहावी. काही माहिती-फलकांचे फोटोहि मुद्दाम दिले आहेत. सर्व सानफ्रान्सिस्को बंदराचाहि एक देखावा आहे. (तो मोठा दिसण्यासाठी त्यावर क्लिक करावे.)

Friday, August 14, 2009

blank post

मित्रहो,
काही तांत्रिक अडचणीमुळे हा ब्लॉग उघडतां येत नव्हता. त्यासाठी मी एक प्रयोग म्हणून एक कोरा लेख लिहिला. त्यानंतर ब्लॉग परत दिसूं लागला! काय कारण होते परमेश्वर जाणे! मात्र कोरा लेख पाहून वाचक बुचकळ्यांत पडतील म्हणून हा खुलासा लिहिला आहे. ब्लॉग यापुढे पूर्वीसारखाच चालू राहील. रसिक वाचकांचा लोभ असावा ही विनंति.
प्र. के. फडणीस

Thursday, August 06, 2009

एवढे लक्षात ठेवा

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥
ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजाना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।
जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥
चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥
विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥
दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥
...... कविवर्य : विंदा करंदीकर