Friday, August 28, 2009

कीर्तनरंग

कीर्तनरंग
सोबतीचे कार्याध्यक्ष श्री. विश्वास डोंगरे हे कीर्तनकारही आहेत. मात्र हा त्यांचा व्यवसाय नाही. नोकरी संभाळून त्यानी हा छंद जोपासला. त्यांच्या कीर्तनाचा लाभ बाहेरच्या अनेक भक्तानी घेतला. प्रसंगानुसार सोबतीच्या साप्ताहिक सभेत त्यांच्या कीर्तनाचा लाभ सोबतीच्या सभासदानाही होतो. कीर्तनात ते अनेक संस्कृत-मराठी सुभाषिते, म्हणी, कविता, अभंग यांची पखरण करून कीर्तनात रंग आणतात.चांगल्या आवाजाची देणगी लाभल्यामुळे त्यांचे कथन, गायन श्रवणीय होते.
श्रावण महिन्याच्या निमित्ताने त्यानी दि. १२ ऑगस्ट रोजी कीर्तन सादर केले. गीतेचे तत्वज्ञान प्राकृत भाषेत आणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर हा कीर्तनाचा विषय होता. त्यांची भावंडे व माता पिता याना अनेक दिव्यांतून जावे लागले. संन्यास घेतल्यानंतर गृहस्थधर्माकडे परत आलेले त्यांचे माता पिता व मुले यांच्यावर समाजाने बहिष्कार घातला व ते समाजाच्या निंदेचा विषय ठरले. समाजाने सर्वांची प्रत्येक ठिकाणी अडवणूक करुन त्यांचे जगणे असह्य करण्याचा प्रयत्न केला. पण ज्ञानेश्वर व इतरांची ईश्वरभक्ती व श्रद्धा इतकी प्रखर होती की ते सर्वजण त्यातून अधिक तेजाने तळपून बाहेर आले. ज्ञानेश्वर तर ज्ञानेश्वरी लिहून संतपदाला पोहोचले.
ज्ञानेश्वरांवरील अपार बंधुप्रेमापोटी त्यांची बहीण मुक्क्ताईने त्यांच्यासाठी मांडे करायचे ठरविले. पण भाजायला खापर नव्हते. तेव्हा ज्ञानेश्वर कुंभाराकडे खापर आणण्यासाठी गेले. त्या दयाळू कुंभाराने खापर दिले. ज्ञानेश्वर ते उपरण्यात बांधून घराकडे चालले होते. वाटेत त्याना दुष्टकर्मा विसोबाने पाहिले व ते खापर त्याने फोडून टाकले. ज्ञानेश्वर रिक्त हस्ताने घरी परत आले. मुक्ताईला त्यानी सर्व हकिगत सांगितली. आता त्यांचा जठराग्नि जागृत झाला होता व त्याने त्यांचे सर्व शरीर व्यापले. त्यानी मुक्ताईला सांगितले ‘ मुक्ते, माझ्या पाठीवर अग्नि पेटला आहे. त्यावर ते मांडे भाज’. मुक्ताईने भाजायला सुरुवात केली. इतक्यात विसोबा तिथे हजर झाला. तो पुढे आला तेव्हा मुक्ताईने त्याला सांगितले ‘विसोबा दूर हो, तू जन्माने जरी ब्राह्मण असलास तरी वृत्तीने आणि आचरणाने खेचर आहेस.’ या सार्‍या प्रकाराने तो हबकला आणि त्याला कळून चुकले की ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांच्यात दैवी शक्ति आहे. मनातून तो शरमिंदा झाला आणि त्याने ज्ञानेश्वरांचे पाय धरले आणि म्हणाला ‘ज्ञानेश्वरा मला पश्चाताप झाला आहे. मी तुमचा नाहक छळ केला. मला क्षमा करा’. असे हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे. म्हणून शेकडो वर्षांनंतरही त्यांचे मराठी मनातले स्थान अढळ राहिले आहे.

No comments: