मी देवाची मुलाखत घेतल्याचे मला स्वप्न पडले .
“ तुला माझी मुलाखत घ्यायची आहे तर ? ” देवाने विचारले .
“ जर तुला वेळ असेल तर .” मी म्हणालो .
देवाने स्मितहास्य केले , म्हणाला “ अरे माझ्याकडे अमर्याद वेळ आहे .
…. कोणते प्रश्न विचारायचे तुझ्या मनांत आहे ? ”
“ मानवाच्या कोणत्या वागणुकीबद्दल तुला जास्त आश्चर्य वाटते ? ” मी विचारले .
देव म्हणाला, “ त्यांना बाल्यावस्थेचा लवकरच कंटाळा येतो आणि प्रौढावस्थेत जायची ते घाई करतात . नंतर परत बाल्यावस्थेत यायला आतूर होतात …..
“ पैशांच्या हव्यासापायी आपले आरोग्य ते हरवून बसतात व नंतर निरोगी होण्याच्या प्रयत्नांत जमविलेला पैसा गमावतात…..
“ भविष्याच्या चिंतेमुळे त्यांना वर्तमानाचा विसर पडतो….. तो इतका की ते धड वर्तमानांत नसतात ना भविष्यकाळांत .
“ ते असे जगणे जगतात की त्यांना मरणाचा जणू विसरच पडला आहे . पण मृत्यू असा येतो की जणू ते कधी जगलेच नाहित. ”
देवाने माझा हात हातांत घेतला आणि कांही वेळ आम्ही नि:शब्द राहिलो .
नंतर मीच विचारले ,“ जगाचा पालनकर्ता म्हणून तुझ्या प्रजेने कोणती जीवनमुल्ये अंगी बाणवावित ? ”
“ दुसर्याला , आपल्यावर प्रेम करायला कोणीही भाग पाडू शकत नाही हे त्यांनी शिकावे. स्वत:वर प्रेम करणे एव्हडेच ते करू शकतात ……
“ आपली अन्याशी तुलना करू नये हे त्यांनी शिकावे …..
“ क्षमा करण्याची संवय त्यांनी लावून घ्यावी…..
“ ज्याच्यावर ते प्रेम करतात त्यांच्या जखमा चिघळवायला कांही क्षण पुरतात पण या जखमा बुजण्याकरिता खूप वेळ सुद्धा अपुरा पडेल हे त्यांनी ध्यानांत घ्यावे …..
“ श्रीमंत माणूस तो नव्हे की ज्याच्याकडे खूप कांही आहे . श्रीमंत तोच की ज्याच्या गरजा अत्यंत कमी आहेत , हे त्यांनी शिकावे. …..
“ दुसर्यावर प्रेम करणारे लोक आहेत पण ते प्रेम कसे व्यक्त करावे हे त्यांना अजून कळलेले नाही हे त्यांनी शिकावे …..
“ दोन व्यक्तींना एकच वस्तू वेगवेगळी दिसू शकते हे त्यांनी शिकावे…..
“ केवळ एकमेकांना क्षमा करून भागत नाही . त्यांनी स्वत:लाही माफ करणे आवश्यक आहे हे त्यांनी शिकावे .”
“ मला वेळ दिल्याबद्दल मी तुझा अत्यंत आभारी आहे ” , मी नम्रपणे म्हणालो, ”तुझ्या प्रजेने आणखी कांही जाणावे असे तुला वाटते काय .”
देव हंसला आणि म्हणाला –
“ फक्त एव्हडेच लक्षांत ठेव की मी आहे , सदैव आहे !”
Tuesday, January 12, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Khupach Chhan..!!
- sadanand
Post a Comment