Monday, January 18, 2010

कांही महान व्यक्तींच्या पूर्वायुष्यांत ….
रेडियोवर बातम्या सांगण्याच्या जागेकरिता आलेला त्याचा अर्ज त्याच्या आवाजामुळे नाकारला गेला. त्याला असेही सांगितले गेले की त्याच्या विचित्र लांब नांवामुळे त्याला कधीच प्रसिद्धी लाभणार नाही .
तो अर्जदार होता अमिताभ बच्चन !

हा एका गरीब बापाच्या सात मुलांपैकी पाचवा मुलगा . एका लहानशा गावात वृत्तपत्रे विकून, कुटुंबाला तो थोडाफार हातभार लावी . त्याच्या शाळेतही , फार चुणचुणित असा काही तो नव्हता. धर्म आणि अग्नीबाण यांबद्दल मात्र त्याला बरेच कुतुहल होते . त्याने तयार केलेला पहिला अग्नीबाण सोडल्यानंतर लगेचच कोसळला . त्याने तयार केलेले क्षेपणास्त्र इतक्या वेळा अपयशी ठरले की तो एक उपहासाचा विषयच झाला . पण याच व्यक्तीने भारताच्या अवकाश भरारीचा मार्ग एकहाती रेखाटला .
हे आहेत आपले पूर्व राष्ट्रपती अबुल पाकिर जैनुद्दिन अब्दुल कलाम .

१९६२ मध्ये , चार संगितकारांच्या एका चमूने ’डेक्का रेकॉर्डिंग कंपनी ’ च्या अधिकार्‍यांसमोर , त्यांच्या ध्वनीमुद्रणाची पहिली चांचणी दिली . डेक्काच्या अधिकार्‍यांवर त्यांच्या संगिताची छाप पडली नाही . त्या संगीतकारांना नकार देतांना डेक्काचा एक अधिकारी म्हणाला ,”आम्हाला यांचा आवाज कांही भावला नाही. गिटार या वाद्याची आता पिछेहाट होतेय.”
हीच चौकडी कालांतराने ’ द बीटल्स ’ म्हणून प्रसिद्धिच्या शिखरावर पोहोचली .

१९४४ साली, नॉर्मन जीन बेकर या मॉडेल होण्याचे स्वप्न पाहणार्‍या युवतीला , एम्मेलिन स्नाइव्हली या ’ब्ल्यू बुक मॉडेलिंग एजन्सी ’ च्या डायरेक्टर , तिला नकार देतांना म्हणतात, ’तू सेक्रेटरी व्हायचे ठरवावे किंवा लग्न करून मोकळे व्हावे . तेच तुझ्या दृष्टीने योग्य होईल.’
ही युवती नंतर मेरिलिन मन्‍रो म्हणून प्रसिद्धीस आली.

१९६४ मध्ये , ग्रॅंड ओल्ड ‍ऑपेराचे मॅनेजर जिमी डेन्नी यानी कंपनीत गायक म्हणून नोकरीवर असलेल्या माणसाला काढून टाकताना असाही उपदेश केला ,’मुला, तुझी कोणत्याही दृष्टीने प्रगती होताना मला दिसत नाही. तू परत ट्रक ड्रायव्हर होणेच उत्तम !’
हा गायक होता एल्‍व्हिस्‍ प्रिस्ली .

एका सद्‍गृहस्थाने १८७६ साली दूरस्थांशी संभाषण करण्याच्या यंत्राचा शोध लावला . या शोधाला पाठबळ द्यायला तेव्हा कोणीच पुढे येईना . मात्र , प्रेसिडेंट रुदरफोर्ड हायेस्‍ यांना प्रत्यक्षिक दखविल्यानंतर ते म्हणाले ,’हा शोध आश्चर्यकारक आहे .पण हे उपकरण आपल्याकडे असावे हे कोणाला कधी वाटेल , कोण जाणे !’
ते अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या संशोधकाशी बोलत होते.

१९४० मध्ये , आणखी एका युवा संशोधकाने ( त्याचे नांव चेस्टर कार्लसन्‍ ) त्याची कल्पना जवळ जवळ वीस कंपन्यां पर्यंत पोहोचवली. यांत कांही अमेरिकेंतील सर्वांत मोठ्या कंपन्याही होत्या. त्या सर्वांनी त्याला परतीची वाट दाखवली.
सात वर्षांच्या प्रदीर्घ कालाच्या नकारांनंतर , त्याने न्यू यॉर्क मधील हॅलॉइड ह्या छोट्या कंपनीला आपल्या electrostatic paper-copying process या शोधाचे हक्क विकले .
हीच हॅलॉइड कंपनी पुढे झेरॉक्स कॉर्पोरेशन म्हणून प्रसिद्धीस आली .

एकूण बाविस मुलांपैकी विसावी असलेल्या मुलीला तिच्या वयाच्या चौथ्या वर्षी डबल न्युमोनिया व स्कार्लेट फिव्हर यांनी गाठले . त्यांमुळे तिचा डावा पाय लुळा पडला. चालण्याकरिता leg brace वापरणे तिला आवश्यक झाले . वयाच्या नवव्या वर्षी, ब्रेसच्या आधाराशिवाय चालायचे तिने ठरविले . तेराव्या वर्षी तिने धावपटू होण्याचे ठरविले . पण ज्या ज्या शर्यतींत ती भाग घेई , त्या प्रत्येकीत तिला अपयश येई . पण ती अखंड प्रयत्न करीत राहिली . अखेर असा एक काळ सुरू झाला की ती प्रत्येक शर्यत जींकू लागली .
ही विल्मा रुडॉल्फ्‍ , जिने ऑलिम्पिक शर्यतींत तीन सुवर्ण पदके मिळविली.

साधी सोप्पी प्रमेये सुद्धा सोडविता येत नाहित व गणिताकडे लक्ष नाही म्हणून एक शालेय शिक्षिका त्याचा नेहमीच उद्धार करी . ’ तू आयुष्यांत कांहिच करू शकणार नाही .’ ती त्याला म्हणे. त्याची आई मात्र त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, त्याला गणिताचे पाठ देत राहिली .
हा मुलगा म्हणजे आल्बर्ट आइनस्टाइन .

जो कधीच पराभुत झाला नाही तो जेता नव्हे . जेता तो की ज्याने कधीच माघार घेतली नाही .

2 comments:

Anonymous said...

व्वा! खूपच छान..
पोस्ट्ला एखादे नाव का दिले नाहित?
तुमच्या ब्लोगवर खुपच उपयुक्त माहिती मिळते

- सदानंद

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

सुधीर फडके यांची अशीच हकीगत वाचलेली आहे. त्यांचा आवाज माइकला जुळणारा नाही असे त्याना सांगण्यात आले होते! (रेडिओ कीं HMV वर ते आठवत नाही.)