विनोदसम्राट पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यांत घडलेले कांही मिश्किल प्रसंग सांगण्याचा हा एक अल्पसा प्रयास –
हौसेसाठी प्रवास करणाऱ्या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं ? असा प्रश्न पुलंना कुणीतरी विचारला .
पुल म्हणाले , “त्यात काय ? सफरचंद म्हणावं .”
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं ,”एअरहोस्टेसला आपण हवाई सुंदरी म्हणतो तर नर्सला दवाई सुंदरी का म्हणू नये ?”
आणि वाढणाऱ्याला वाढपी म्हणतो तर वैमानीकाला उडपी का म्हणू नये ?”
त्याच सुरात पुल खूप दारू पिणाऱ्याला पिताश्री म्हणतात …..
एकदा वसंतराव देशपांडे पुलंना म्हणाले , “ ही मुलगी (सुनिताबाई ) म्हणजे एक रत्न आहे .” ह्यावर पुल लगेच म्हणाले ,
“म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय.” आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित संवयीमुळे पुल एकदा आपल्या पत्नीला म्हणाले , “या घरात मी एकटाच देशपांडे आहे . तू मात्र ’उपदेश’ पांडे आहेस .
एकदा एका भोजन समारंभात पुलंच्या एका बाजूला ना. ग. गोरे तर दुसऱ्या बाजूला भुजंगराव कुलकर्णी बसले होते . पुल म्हणाले , “आफतच आहे . एकीकडे नाग तर दुसरीकडे भुजंग !!!”
एकदा पुलंना एक कूकरी सेट भेट म्हणून मिळाला . तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवित होत्या . सुनिताबाईंचा “सर्व कांही जपून ठेवण्याचा स्वभाव” माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली - “अगं , एवढा सुंदर सेट फुटू नये या भितीने तू तो कधी वापरणारच नाही का ?” त्यावर पुल पटकन म्हणाले , “हो तर ! ! सुनिता मला कधी ऑमलेट सुद्धा करून देत नाही … अंडी फुटतील म्हणून !!!”
एका संगीत कार्यक्रमात , सुधीर गाडगीळ माणिक वर्मा यांची मुलाखत घेत होते . प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून , पुल
ही मुलाखत ऐकत होते . हंसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत , गाडगीळांनी माणिक वर्मा यांना त्यांच्या पतीबद्दल
प्रश्न विचारला , “तुमची अन त्यांची पहिली भेट नेमकी कुठे झाली होती ?” लग्नाला खूप वर्षे होऊनही , माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर द्यायची टाळाटाळ करीत होत्या . ते पाहून , पहिल्या रांगेतील पुल उत्स्फूर्तपणे मोठ्याने म्हणाले – “अरे सुधीर , सारखं सारखं त्यांच्या ’वर्मा’ वर नको रे बोट ठेवूस !”
Wednesday, November 17, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment