Monday, May 17, 2010

हृदयस्वास्थ्य आणि हृदयविकार

अचानक आणि अनाहूत हृदयविकाराचा झटका येण्याची भीति, वयोवृद्धाना - विशेषत: स्त्रीवर्गाला अधिक असते हे आपण सर्वानीच ध्यानात घ्यायला पाहिजे. अलिकडे अंजियोग्राफी, अँजियोप्लास्टी आणि बायपास सर्जरी हे शब्दप्रयोग आपण बरेच वेळा ऐकतो-करतो. पण हृदयविकारामध्ये हृदयाच्या स्नायूचा विकार वेगळा आणि हृदयाच्या झडपांचा विकार वेगळा.
हृदयाच्या स्नायूच्या विकारासंदर्भात याआधी उल्लेखिलेले तीनही शब्दप्रयोग वापरलेले असतात. हे तीनही शब्दप्रयोग हृदयाच्या स्नायूंच्या रक्तपुरवठ्याच्या संदर्भात वापरले जातात. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करण्यासाठी फक्त एक आणि एकच रोहिणी असते. त्या रोहिणीला आपण हृदय-रोहिणी म्हणू. इंग्रजीत कॉरोनरी आर्टरी म्हटले जाते. या हृदय-रोहिणीच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या शाखा हृदयाच्या स्नायूंना शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात. त्यात कमतरता निर्माण झाल्यास अगदी स्वाभाविकपणे हृदयस्पंदनात बिघाड जाणवू लागतो. स्वास्थ्यपूर्ण हृदयाच्या कार्यात हृदयाच्या स्नायूंचे जेव्हढे महत्व, तेव्हढेच महत्व हृदयाच्या झडपांच्या कार्याचे असते. म्हणून हृदय विकारासंदर्भात विचार करताना हृदयाच्या स्नायूंच्या विकाराराप्रमाणेच हृदयाच्या झडपांच्या विकारासंदर्भात पहावे लागते. हृदयविकाराच्या लक्षणांचा अभ्यास म्हणजे ह्र्द्स्पंदनाचा विचार जसे ई.सी.जी. चा प्रथम उपयोग होत असला तरी हृदयाच्या कार्यासंदर्भातील अभ्यास करताना, एलेक्ट्रोकार्डियोग्राम (ई.सी.जी.) बरोबर इकोकार्डियोग्रामद्वारे अभ्यास करावा लागतो. त्याद्वारे रक्तप्रवाह एकदिशा मार्गाने, हृदयाच्या एका कप्प्यातून दुसर्‍या कप्प्यामध्ये सुरळितपणे होतो किंवा नाही हे तपासून पाहिले जाते. इलेक्ट्रोकार्डियोग्राम प्रमाणेच हा इकोकार्डियोग्राम सुद्धा कोणत्याही प्रकारची इजा न करताच काढता येतो. हृद्रोगाच्या स्पष्ट रोगनिदानासाठी हे सर्व करण्याची नितांत आवश्यकता असते.

रुधिराभिसरणाबाबतची माहिती जगात सर्वप्रथम भारतीयांना होती हे सिद्ध करता येईल एवढा पुरावा उपलब्ध आहे. मात्र पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या आधारे पाहू गेले तर, ती माहिती ब्रिटिश शास्त्रज्ञ विल्यम हार्वे याने सर्वप्रथम सप्रयोग दाखवून दिली आहे असे नमूद केलेले दिसेल. इसवी सन १८५० च्या आधी अनेक शतके आयुर्वेदात चरक या आयुर्वेदाचार्यापासून ती माहिती ज्ञात होती. शुश्रुताच्या रक्तसंचार सिद्धांतामध्ये दिलेले वर्णन पुरेसे बोलके आहे.

चतु:प्रकोष्ठ हृदयम वामदक्षिण भागत: ।
तस्यार्धो दक्षिणौ कोष्ठौ गृहीत्वा शुद्ध शोणतम ॥
रस रसति इति रस: ।
अह: अह: गच्छति इति रस: ॥

हृ म्हणजे आहरण करणे, द म्हणजे देणे आणि य म्हणजे नियमन करणे ही बृहदारण्य उपनिषदात दिलेली हृदय या शब्दाची व्युत्पत्ति, रुधिराभिसरणाची कल्पना भारतात ख्रिस्तपूर्व अनेक शतके माहित असावी हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे.
खालीं दिलेल्या तीन आकृत्यांद्वारे चारही कप्प्यातून होणारा हृदयातील एकदिशा रक्तप्रवाह समजून घेण्यासारखा आहे.


No comments: