Tuesday, May 25, 2010

गगनभेदीकार अनिल थत्ते

दिनांक ५ मे रोजी सोबतीच्या सभासदाना एक मनोरंजक तितकाच राजकारण व पत्रकारिता यांच्यातील Inside Story आणि त्यामागील सुरस कथा सांगून चकित करणार्‍या कार्यक्रमाचा आनंद घेता आला.

वक्ते होते ‘गगनभेदी’ कार अनिल थत्ते. गगनभेदी हे साप्ताहिक त्यानी पंधरा वर्षे चालविले आणि ते वाचकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले. याचे कारण कोणतीही बातमी खोलात जाऊन सनसनाटी निर्माण करणारे लिखाण करण्यात त्यांचा हातखंडा होता.

पण गगनभेदी बंद केले तरी ते थोडेच स्वस्थ बसणार! उत्तम वक्तृत्वाची जोड मिळाल्यामुळे त्यानी राजकारण व पत्रकारिता यांच्या मागचे लोकाना फारसे माहीत नसणारे सत्य लोकांपुढे मांडण्यास त्यानी सुरुवात केली आणि श्रोत्यांचा त्याना उदंड प्रतिसाद मिळू लागला.

राजकारण हे वरवर चढाओढीचे वाटले तरी त्याच्यामागे विश्वास बसणार नाही अशा युत्या-प्रयुक्त्या, आर्थिक व्यवहार, स्वपक्षीय व प्रतिपक्ष यांच्याशी विधिनिषेध न बाळगता केलेल्या खेळी, वरवर निःपक्ष भासविणारे पत्रकार, स्तंभलेखक आणि संपादकांच्यामागे असलेली धनशक्ती, पैसे देऊन हवे तसे वृत्त छापून आणणे, महत्वाच्या राजकारण्यांचा प्रचार करण्यासाठी पळवाट काढून मोठे लेख छापणे अशा अनेक अपप्रवृत्तींवर त्यानी परखडपणे प्रकाश टाकला. उच्च विद्या बिभूषित डॉक्टर्सही जाहीरातींद्वारे व्यवसाय करीत आहेत त्यामागच्या क्लुप्त्याही त्यानी सांगितल्या.

अलिकडे स्वामी, बुवा व तथाकथित धार्मिक नेते यांचीही चलती आहे. त्यांची प्रवचने व इतर कार्यक्रम
धंदेवाईक पद्धतीने योजून लाखोंची कमाई करणारे व्यावसायिक आहेत असेही त्यानी सांगितले. तसेच ज्योतिषाचा धंदाही जोरात चालू आहेत. मार्केटिंग पद्धतीने एकाद्याला ज्योतिषी बनवून लाखो रुपये कमविणार्‍या लोकांचीही त्यानी उदाहरणे दिली. समाजात अनेक पातळींवर चालणारा भ्रष्टाचार, नीती-अनीती याचा विधिनिषेध न बाळगता केवळ सत्ता, संपत्ति कमावणे हा आजचा अनेकांचा धंदा झाला आहे.

त्यांचे भाषण ऐकून अनेक आश्चर्यकारक बाबी त्यानी श्रोत्यांसमोर मांडल्या ज्या कुणला फारशा माहित नव्हत्या. अशा अनेक गोष्टींचा त्यानी पर्दाफाश त्यानी केला व ‘दिसते तसे नसते’ हे अनेक उदाहरणानी स्पष्ट केले.

श्री. अनिल थत्ते यानी सोबतीकडून मानधन घेतले नाहीच पण सोबतीला १,१११ रुपयांची भरघोस देणगीही दिली.

No comments: