प्रिय वाचक,
माझ्या इतर ब्लॉगवरच्या लिखाणामुळे ह्या ब्लॉगकडे काही दिवस जरा दुर्लक्ष झाले होते. तरीहि हा ब्लॉग वाचला जातो आहे असे दिसते. आपले ’सोबती’वर प्रेम असेच राहू द्यावे.
सोबती गेली काही वर्षे एक प्रथा पाळत आहे. सोबतीचा दर बुधवारी सायंकाळी एक साप्ताहिक कार्यक्रम असतो. त्यातील शेवटचा बुधवार राखीव असतो. त्या दिवशी त्या महिन्यात ज्या सभासदांचे वाढदिवस येतात त्या सर्वांचा सामुदायिक वाढदिवस साजरा केला जातो. आम्हा समवयस्काना आपला वाढदिवस नेमाने साजरा करण्याची पूर्वापार सवय नसल्यामुळे या कार्यक्रमाचे आकर्षण असते. सर्व वाढदिवसाच्या मानकर्यांना स्टेजवर बसवले जाते. क्रमाने एकेकाचे नाव घेऊन त्याला पुष्प्गुच्छ दिला जातो. त्यानंतर त्या सभासदाने स्वत:बद्दल काही माहिती सांगावी, काही आठवणी सांगाव्या, किंवा इतर काहीहि बोलावे अशी अपेक्षा असते. बहुतेक सभासद, इतर वेळी श्रोत्याचेच काम करणारेहि, या निमित्ताने थोडेफार बोलतात व वाढदिवस साजरा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करतात. कित्येक सभासद स्वत: करत असलेल्या सामाजिक वा शैक्षणिक वा इतर कार्याबद्दल या निमित्ताने इतरांना माहिती देतात. कोणी कथा कविता वाचतात. परस्पर परिचय वाढतो. असा हा आनंदसोहळा दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी पार पडतो. हे सभासद थोडीफार वर्गणी जमा करून सर्वाना काही खानपानहि देतात. या निमित्ताने सभासद ’सोबती’ला लहानमोठ्या देणग्या देतात. सोबतीचा खर्चाचा भार थोडाफार हलका होतो!
बुधवार दि. २८ मे २००८ रोजी असाच सोहळा पार पडला. त्यावेळी सांगितल्या गेलेल्या काही कथा पुढील पोस्टमध्ये आपणास वाचावयास मिळतील. आतुरतेने वाट पहालच! धन्यवाद.
Thursday, May 29, 2008
Saturday, May 17, 2008
श्रीमती शैलजा लिमये यांचे अबोल समाजकार्य
आमचे एक सभासद श्री. शंकरराव लिमये यांच्या पत्नी श्रीमती लिमये यांचे एक अबोल समाजकार्य गेली अनेक वर्षे चालू आहे. मुलामुलींसाठी वा इतरांसाठी कपडे शिवून झाल्यावर काही तुकडे उरतातच. त्यातून दुपटी, गोधड्या शिवण्याचे कार्य़ जगभरच्या महिला करतात व उत्कृष्ठ कलाकृतिही त्यातून निर्माण होत असतात. श्रीमती लिमये अश तुकड्यातून, स्वत:च्या व इतरांकडच्याहि, लहान मुलामुलींसाठी कपडे, गोधड्या शिवून त्या गरीब वा अनाथ मुलांना वाटतात. श्री. लिमये वेळोवेळी उरलेल्या तुकड्यांची मागणी सोबती सभासदांकडे करतात व या व इतरहि मार्गानी श्रीमती लिमयांच्या कार्याला हातभार लावतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी असे कपडे वरोरा येथील डॉ. विकास आमटे यांच्या महारोगी सेवा समितीकडे पाठवले. त्यांचेकडून श्रीमती लिमये यांना आलेले आभारप्रदर्शक पत्र आज छापले आहे. हौसेतून व कलोपासनेतूनहि समाजसेवा साधता येते याचे हे उदाहरण इतरांस प्रेरणा देऊ शकेल.
(पत्र वाचण्यासाठी त्यावर क्लिक करा.)
Wednesday, May 14, 2008
प्रेमगीत
आज पुन्हा एकदा श्री. प्रधान यांची कविता वाचा. वय ज्येष्ठ झाले तरी मन तरुण असू शकते याचा प्रत्यय वाचकांस जरूर येईल.
हृदयात माझ्या खोल
प्रीतीचे तुझिया बोल
लेवुनी शृंगार साज
लपले आहेत आज ॥
ऐकण्या तयांचे गान
लावशील जरा कान
पाहुनी लवलेली मान
धडधडे हृदय मम सान ॥
सुगंधी तुझा गजरा
रुळतां माझ्या छातीवरी
थरथर उठे शरीरी
मोह न मजला आवरी ॥
म्हणुनी लिहितो गीत
वाचुनी ठेव मनात
स्फुरेल त्या त्या काळी
गाईं या गोड ओळी ॥
कृष्णकुमार प्रधान
Sunday, May 11, 2008
तरीहि आम्ही श्रेष्ट आहोत
सूचना : कविता वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा.
श्री. बाळ सितूत हे सोबतीचे आणखी एक ज्येष्ठ सभासद. सोबतीचे पूर्वीचे कार्यवाह. उत्साही कार्यकर्ते. कार्यक्रमाना त्यांची उपस्थिति अजूनहि सपत्नीक असते. त्यांची ओळख अनेकांना वर्तमानपत्रातील त्यांच्या सतत पत्रलेखनामुळे असेल. कवि हीहि त्यांची आणखी एक ओळख. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे हल्लीच त्यांच्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध झाला. त्यांचा एक कथासंग्रहही प्रसिद्ध झालेला आहे. एअर इंडियामधून अधिकारपदावरून काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यांची एक कविता आज वाचावयास मिळेल.
Friday, May 09, 2008
विडंबन गीत
’सोबती’मध्ये कवि-कवयित्री खूप. मी कविता करणारा नाही. तरीहि एक विडंबन गीत येथे टाकण्याचा मोह आवरत नाही. क्षमस्व.
माझे जेवण गाणे .........गाणे.
व्यथा असो आनंद असूं दे
उपास किंवा उत्सव असुदे
भूक असो अथवा न असूंदे
खात पुढे मज जाणे ....... माझे ...
कधी जेवतो हॉटेलातुन
कधि ऑफिसच्या कॅंटीनातुन
कधि ’खोक्या’तुन, कधि ढाब्यातुन
पोट भरुन मज घेणे ........ माझे ....
या मित्रानो माझ्या मागे
चवीपरीने खाऊ संगे
तुमच्यापरि माझ्याहि खिशातुन
खुळखुळते हे ’नाणे’ ......... नाणे ..... माझे जेवण गाणे .... गाणे.
Friday, May 02, 2008
आज अचानक आठवते मज ..
श्री. श्रीनिवास जुवेकर हे ’सोबती’चे जुने आणि जाणिते सभासद. संस्थेच्या स्थापनेपासून बरीच वर्षेपर्यंत कार्यरत होते. आता वय झाल्यामुळे उपस्थिति असत नाही. रॉयवादी विचारवंत, वृत्तपत्रलेखक, कवि, असे अनेक पैलू असलेले हे व्यक्तिमत्व आहे. ’सांजसरी’ हा १९९५ ते २००५ या काळात वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखांचा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. त्यांची २००७ साली प्रसिद्ध झालेली एक कविता त्यानी माझ्याकडे हौसेने पाठवली ती आज देत आहे. त्यानी शब्दबद्ध केलेला अनुभव अनेकांनी घेतला असेल.
आज अचानक आठवते मज …..
आज अचानक आठवते मज गावामधले घर माडीचे
सभोवताली शीतल छाया चहुबाजूला बांद्ग चिऱ्यांचे
घरापुढिल ती उंच टेकडी सांजसकाळी हासत चढणे
गावामध्ये स्वैर हिंडुनी दिवेलागणिस घरी परतणे
सायंकाळी मायमाउली देवांपाशी लावि निरांजन
तुळशीपाशी आजी-आत्या स्तोत्रे म्हणती पणती लावुन
पाणी भरणे काम आमुचे ’शुभंकरोती’ कधी न चुकले
शाळेमध्ये धुळ-पाटी अन बसावयाला एक कांबळे
दोन खणांची होती शाळा चार इयत्ता तिथे खरोखर
चहुबाजूला पहात गुरुजी, संथा देती छडीबरोबर
तरुणपणी मग पोटासाठी गावोगावी स्थिरावलो
बालपणीच्या रम्य स्मृतीना गोंजारित मी जीवन जगलो
निवृत्त जाहलो धकाधकीतुन संध्याछाया ये दारी
गाव एकदा पाहुन यावे ओढ लागली मना परी
घर माडीचे तगून होते थकल्या माझ्या शरिरासम ते
आढ्यावरती किती वाघळे उंदिर फिरती जमिनीवर ते
सुरकुतलेली जुनी ’कुळे’ ती, मी येताक्षणि हास्य फुले
आपुलकीने त्यांच्या, माझे क्षणात सारे घर भरले
त्यांच्यासाठी सदैव होते विशाल माझे घर उघडे
माणुसकीचे असे गिरवले बालपणीचे सहज धडे
डोळे भरुनी पुन्हा पाहिलीं जुनीं देवळे आणि स्थळे
शेते अमुची नसतानाही त्यात पाहिली हसरी कुळे
वास्तव्य संपता माझे तेथिल पुन्हा धावले मदतीला
सामानहि सारे घेउन आले एस. टी. वरती सर्व मला
नसता कुठली नाती-गोती प्रेमे त्यांच्या गहिवरलो
’पुन्हा लवकरी याहो दादा’ शब्द ऐकुनी गदगदलो
मनात म्हटले, ’कसला येतो पुन्हा गड्यानो मी आता
निरोप घ्यावा हा शेवटचा’ कंठ फुटेना हे म्हणता.

Subscribe to:
Posts (Atom)