श्री नारायण जुवेकर, वय ८०, सोबतीचे ज्येष्ठ सभासद व कार्यकर्ते. सोबतीचे सिद्धहस्त कवी. जीवनाच्या अनेक पैलूंवर भाष्य करणा-या त्यांच्या कवितांची संख्या शेकड्यात आहे. त्यांच्या कवितांचा एक संग्रह ‘जीवन आनंदे भरले’ प्रकाशित झाला आहे व दुसरा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. खाली दिलेली त्यांची एक कविता सुखी संसाराची गुरुकिल्ली ठरावी अशी आहे.
एक सेफ़्टी वाल्व हवा
चिंतेमुळेच वाढती रोग नकळत त्याने शरीरभोग -
त्यावरती हमखास दवा एक सेफ़्टी वाल्व हवा ।१।
मनी कोंडला राग अनावर उच्च रवाने बोललात जर -
नाहक त्याने रक्त तापुनी रक्तदाब वाढेल तत्क्षणी -
उपाय त्यावर ध्यानी ठेवा एक सेफ़्टी वाल्व हवा ।२।
साधे घरचे रुचकर अन्न तयास मानी जणुं पक्वान्न-
प्रसन्न चित्ते सारे खावे हांसत हांसत वाखाणावे -
अशी निर्मिण्या मस्त हवा, एक सेफ़्टी वाल्व हवा ।३।
संसार साथीला समान माना गोंजाराव्या मुक्या भावना -
एकचि तुमचा तो साथीदार सुखदु:खाचे झेले वार -
संसारी सांधण्या प्रणयदुवा एक सेफ़्टी वाल्व हवा । ४ ।
उपदेशाच्या सवयी सोडा गप्प ऐकत मैत्री जोडा -
शेजा-यांच्या सौख्यावरती नकोच शेरे, नकोच पुस्ती -
सहज टाळण्या हेवा दावा , एक सेफ़्टी वाल्व हवा । ५ ।
जीवन अपुले सुसह्य करण्या दुस-याचे हो शिका ऐकण्या -
कौतुकमिश्रित बोल असावे आनंदी हासरे रहावे -
स्वास्थ्य राखण्या असे बुवा, एक सेफ़्टी वाल्व हवा ।६ ।
प्रेम असावी निरंतरी छंद असावा काहीतरी -
कर्तव्याची नित्य नवी सौंदर्याची जाण हवी -
विनोदलहरी पसरू द्या कशास चिंता, काय उद्या ! -
शिकण्याला हा मंत्र नवा, एक सेफ़्टी वाल्व हवा ।७।
कवी: नारायण जुवेकर
Tuesday, February 10, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment