Sunday, May 16, 2010

कविश्रेष्ठ विंदा करंदीकर - भावपूर्ण आदरांजली





अलिकडेच मराठी सारस्वताच्या नभोमंडळातून एक तेजस्वी तारा अंतर्धान पावला. गेली साठ पासष्ट वर्षे मराठी जगताला दिपवून टाकणारा त्यांचा प्रकाश अजूनही चमकतो आहे अणि वर्षानुवर्षे तो तसाच चमकत राहील. कविवर्य विंदा करंदीकर मराठी मनाला चटका लावून गेले. त्यांचे श्रेष्ठत्व वादातीत होते. त्यांचे स्मरण करुन आदरांजली वाहण्यासाठी सोबतीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सोबतीच्या ज्येष्ठ सभासद डॉ. गीता भागवत यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यानी विंदांच्या अनेक वाड.मयीन पैलूंची ओळख करून दिली. शिवाय पार्ल्यातील दोन साहित्यिका श्रीमती चारुशीला ओक व माधवी कुंटे यांचाही या आदरांजली कार्यक्रमात सहभाग होता. त्यानीही विंदांच्या साहित्यातील अनेक उतारे व कविता वाचून दाखविल्या.

विंदाना अनेक पुरस्कार मिळाले. त्यातील महत्वाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार त्यांच्या बहुविध वाड.मयीन कार्यासाठी मिळाला. विंदा केवळ श्रेष्ट कवीच नव्हते तर लघुनिबंध, समीक्षा, विविध ललित लेखन यातही त्यांनी लीलया संचार केला व या सार्‍याची पावती त्याना ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराच्या रूपाने मिळाली. ‘अष्टदर्शने हा त्यांचा ग्रंथ म्हणजे त्यांच्या सर्वसमावेशक प्रतिभेचा आगळा आविष्करच होता. प्रा. येवलेकर यानी विंदांच्या ‘अष्टदर्शने’ या ग्रंथाचे अनेक पैलू उलगडून दाखविले. त्यांचा हा ग्रंथ विशेषत्वाने गाजला. त्यात सात पाश्चिमात्य व एक भारतीय शास्त्रज्ञ व तत्ववेत्ते यांच्यावर अभंगरूपी भाष्य आहे. विशेष म्हणजे यातील एकमेव भारतीय तत्वज्ञ चार्वाक याच्या तत्वज्ञानासंबंधी भाष्य आहे व त्याच्यासंबंधी असलेले गैरसमज दूर करण्याचा त्यानी प्रयत्न केला आहे.

तत्वज्ञान, जीवनाचा अर्थ, जीवनाचे वास्तव ते परखडपणे मांडतात व त्यांच्या चपखल शब्दांनी रसिकांच्या मनाला ते थेट स्पर्श करतात. ‘उद्योग चिंता घालवी’, ‘स्वत:ला जिंकण्यासाठी युद्ध करावे लागते’, ‘एव्हढे लक्षात ठेवा’ हा सार्थ उपदेश, ‘सत्तेने जे मत्त जाहले’, अशा कवितांतून विंदांच्या वहुआयामी प्रतिभेचा आविष्कार प्रकर्षाने समोर येतो. ‘आम्ही द्रव्यदास’, ‘सगळे मिळून मरण्यात मौज आहे व जगण्यात ब्रह्मानंद आहे’ असा वास्तववाद ते मांडतात. ‘माझ्या मना बन दगड’ ही कविता तर सामाजिक, आर्थिक व्यवस्थेचा बळी पडणार्‍या अभागी माणसाच्या अगतिकतेवर केलेले परखड भाष्य आहे पण तोही एक दिवस बंड करुन उठेल असाही आशावाद त्यानी व्यक्त केला आहे. जीवनावर परखड भाष्य करणार्‍या विंदानी ‘झपताल’ ही भावपूर्ण कविताही लिहिली आणि कठीण परिस्थितीतही नेटका संसार करणार्‍या गृहीणीसंबंधी कृतज्ञ भावना ते या कवितेत व्यक्त करतात.

विंदांच्या काही कविता मिष्कीलही आहेत. ‘धोंड्या न्हावी’ ही त्यांच्या गावच्या न्हाव्यावरची कविता मिष्कील आहेच पण उपेक्षित, गरीबीचे जीवन जगणार्‍या माणसाच्या जीवनावरही भाष्य आहे. तसेच विनोदी ढंगाने लिहिलेल्या बालकविताही मुलाना हसवतात.

विंदा, मंगेश पाडगावकर व वसंत बापट यानी एकत्रितपणे कवितावाचनाचे जाहीर कार्यक्रम सुरु केले व त्यांना अफाट लोकप्रियता लाभली. विंदांच्या खणखणीत आवाजातली कविता ऐकणे हा एक आगळा अनुभव असे.

विंदा द्रव्यलोभापासून कोसो दूर होते. रहाणी अत्यंत साधी. मोठेपणाचे प्रदर्शन नाही. जरुरीपेक्षा अधिक पैशाची त्याना हाव नव्हती. म्हणून लाखो रुपयांच्या पुरस्कारांच्या रकमा त्यानी सामाजिक कार्य करणार्‍या संस्थाना सहजपणे देणग्या म्हणून दिल्या. गंमतीची गोष्ट अशी की कोकणी माणसाचा चिकूपणा त्यांच्यातही होता व त्यासंबंधी अनेक कथा प्रचलित आहेत. मार्क्सवादाचा पगडा त्यांच्यावर होता पण पोथीनिष्ट मार्क्सिस्ट ते कधीच नव्हते. पण त्यांच्या अनेक कवितेत सामाजिक, राजकीय व आर्थिक व्यवस्थेचे बळी ठरणार्‍या गोष्टींवर परखड भाष्य असे.

अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र या त्यांच्या ग्रंथामध्ये अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यविषयक तत्वज्ञान त्यानी उलगडून दाखविले आहे. ‘आकाशाचा अर्थ’ व ‘स्पर्शाची पालवी’ हे लघुनिबंध संग्रहही त्यांच्या बहुविध विचारांची साक्ष देतात.

‘देणार्‍याने देत जावे’ या त्यांच्या कवितेप्रमाणे मराठी मनाला ते भरभरून देत राहिले. त्यामुळे त्याना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाल्यावर प्रत्येक मराठी माणूस आनंदित झाला.

त्यानी मरणोत्तर नेत्रदान व देहदान करुन त्यांच्या त्यागी वृत्तीला भव्य उंचीवर नेऊन ठेवले. ते वाचिवीर नव्हते, कृतिवीर होते हेच खरे.

विंदांच्या एक विद्यार्थिनी श्रीमती सुनीता नागले यानी महाविद्यालयात विंदांच्या इंग्रजी शिकविण्यासंबंधी आठवणी सांगितल्या. धड्यातील पात्रे डोळ्यासमोर जिवंत करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. श्री गोविंद जोग यानी ‘माझ्या मना बन दगड’ ही कविता श्री. विश्वास डोंगरे यानी ‘फ़्राइडला कळलेले संक्रमण’ ही कविता सादर केली. श्रीमती भालेराव यानीही विंदांच्या काही कविता सादर केल्या.

सोबतीचे उपाध्यक्ष श्री. सुरेश निमकर यानी तंबी दुराइ यानी लोकसत्तेत लिहिलेल्या लेखाचे वाचन केले. विंदांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते व त्यांचा आत्मा बोलतो आहे अशा कल्पनेवर आधारलेल्या या लेखाने सार्‍याना भारावून टाकले. विंदांच्या स्नुषा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

असे होते विंदा. त्यांच्यासंबंधी लिहावे तेव्हडे थोडेच आहे. पण त्यानी ठेवलेला अमूल्य वाड.मयीन ठेवा सर्वांची वर्षानुवर्षे सोबत करील.

----- संकलक : म.ना. काळे

No comments: