Thursday, January 21, 2010

पुल - साठवणीतल्या आठवणी

महाराष्ट्र सारस्वताचे आराध्य दैवत पु.ल. देशपांडे हे पूर्ण नांव न घेता पुल म्हटले की मराठी माणूस पुलकित होतो. त्यांच्या लेखणीचा संचार वाङमयाच्या प्रत्येक प्रांतात झाला. वाङमयाव्यतिरिक्त, संगीत, चित्रपट, नाटक यांतले त्यांचे योगदान अद्वितीय आहे. सोबत उत्तम अभिनय व वक्तृत्व यांचीही जोड मिळाल्याने मराठी समाज जीवनासाठी एक अमूल्य ठेवा ते ठेवून गेले. त्यामुळे त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंची गोडी पुनः पुन्हा चाखली तरी ती अवीटच असते. त्यांचे दातृत्व तर ‘ दाता भवती वानवा ’ असेच आहे.

या सार्‍याना उजाळा देण्यासाठी सोबतीच्या उत्साही सभासदानी ‘ पुल - एक साठवण ’ हा कार्यक्रम आयोजित केला व पुलंचे अनेक वाङमयीन पैलू सादर केले व सभाससाना काव्य, शास्त्र, विनोद यांचा आगळा आनंद दिला.

पुल एक उत्तम पेटी वादक होते. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी त्यांचे ध्वनिमुद्रित पेटीवादन ऐकवून कार्यक्रमाची वातावरण निर्मिती केली गेली. त्यानंतर त्यानी संगीतबद्ध केलेली अनेक ध्वनिमुद्रित चित्रपट गीतेही ऐकविण्यात आली. संगीतकार पुल ही आठवण ताजी झाली.

‘व्यक्ती आणि वल्ली’ या त्यांच्या पुस्तकातील ‘ अंतू बर्वा ’ हे शब्दचित्र सौ. रेखा चिटणीस यानी आवश्यक तेथे कोकणस्थ ब्राह्मणी ठसक्यात सादर केले.

नंतर पुलंच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातील एक प्रवेश सादर करण्यात आला. श्री. विजय पंतवैद्य, श्री. प्रभाकर देवधर, सौ. उषा देवधर, सौ. रेखा चिटणीस, सौ. ठोसर यानी हा प्रवेश उत्तम वठविला.

पुलंच्या ‘बटाट्याची चाळ’ मधील वजन कमी करण्यासाठी अनेक रहिवाश्यानी केलेल्या डाएट संबंधीच्या भन्नाट सूचनांवर आधारित विनोदी लेख ढंगदारपणे साद्रर करण्यात आला आणि ‘बटाट्याची चाळ’ मधील त्यांच्या एकपात्री प्रयोगाची आठवण ताजी झाली.

पुल दोन अर्थाने ‘कोट्याधीश’ होते - एक त्यानी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक देणग्या सामाजिक व शैक्षणिक संस्थाना दिल्या व त्याही कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर राहून. दुसरे म्हणजे त्यांची शाब्दिक कोट्या करण्याची अपूर्व हातोटी. श्री. विजय पंतवैद्य यानी पुलंच्या अनेक शाब्दिक कोट्या ऐकवून ‘कोट्याधीश’ पुलंची आठवण करून दिली.

पुलंचे अफाट कर्तृत्व मोजक्या वेळात उलगडून दाखविणे खरोखरच कठीण आहे. तरीही हा कार्यक्रम पुलंच्या आठवणीना उजाळा देउन गेला.

Wednesday, January 20, 2010

जगातील सर्वांत मोठे फूल




जगातील सर्वांत मोठ्या फुलाचे हे फोटो एका मित्राकडून मला मिळाले. आपल्यालाही ते आवडतील. हे फूल ४० वर्षांतून एकदांच तीन दिवस फुलते. मेक्सिकोमधील व्हेराक्रुझ मध्ये २००९ सालीं फुललेल्या फुलाचे हे फोटो आहेत. याची उंची दोन मीटर व वजन ७५ किलो आहे!

Monday, January 18, 2010

कांही महान व्यक्तींच्या पूर्वायुष्यांत ….
रेडियोवर बातम्या सांगण्याच्या जागेकरिता आलेला त्याचा अर्ज त्याच्या आवाजामुळे नाकारला गेला. त्याला असेही सांगितले गेले की त्याच्या विचित्र लांब नांवामुळे त्याला कधीच प्रसिद्धी लाभणार नाही .
तो अर्जदार होता अमिताभ बच्चन !

हा एका गरीब बापाच्या सात मुलांपैकी पाचवा मुलगा . एका लहानशा गावात वृत्तपत्रे विकून, कुटुंबाला तो थोडाफार हातभार लावी . त्याच्या शाळेतही , फार चुणचुणित असा काही तो नव्हता. धर्म आणि अग्नीबाण यांबद्दल मात्र त्याला बरेच कुतुहल होते . त्याने तयार केलेला पहिला अग्नीबाण सोडल्यानंतर लगेचच कोसळला . त्याने तयार केलेले क्षेपणास्त्र इतक्या वेळा अपयशी ठरले की तो एक उपहासाचा विषयच झाला . पण याच व्यक्तीने भारताच्या अवकाश भरारीचा मार्ग एकहाती रेखाटला .
हे आहेत आपले पूर्व राष्ट्रपती अबुल पाकिर जैनुद्दिन अब्दुल कलाम .

१९६२ मध्ये , चार संगितकारांच्या एका चमूने ’डेक्का रेकॉर्डिंग कंपनी ’ च्या अधिकार्‍यांसमोर , त्यांच्या ध्वनीमुद्रणाची पहिली चांचणी दिली . डेक्काच्या अधिकार्‍यांवर त्यांच्या संगिताची छाप पडली नाही . त्या संगीतकारांना नकार देतांना डेक्काचा एक अधिकारी म्हणाला ,”आम्हाला यांचा आवाज कांही भावला नाही. गिटार या वाद्याची आता पिछेहाट होतेय.”
हीच चौकडी कालांतराने ’ द बीटल्स ’ म्हणून प्रसिद्धिच्या शिखरावर पोहोचली .

१९४४ साली, नॉर्मन जीन बेकर या मॉडेल होण्याचे स्वप्न पाहणार्‍या युवतीला , एम्मेलिन स्नाइव्हली या ’ब्ल्यू बुक मॉडेलिंग एजन्सी ’ च्या डायरेक्टर , तिला नकार देतांना म्हणतात, ’तू सेक्रेटरी व्हायचे ठरवावे किंवा लग्न करून मोकळे व्हावे . तेच तुझ्या दृष्टीने योग्य होईल.’
ही युवती नंतर मेरिलिन मन्‍रो म्हणून प्रसिद्धीस आली.

१९६४ मध्ये , ग्रॅंड ओल्ड ‍ऑपेराचे मॅनेजर जिमी डेन्नी यानी कंपनीत गायक म्हणून नोकरीवर असलेल्या माणसाला काढून टाकताना असाही उपदेश केला ,’मुला, तुझी कोणत्याही दृष्टीने प्रगती होताना मला दिसत नाही. तू परत ट्रक ड्रायव्हर होणेच उत्तम !’
हा गायक होता एल्‍व्हिस्‍ प्रिस्ली .

एका सद्‍गृहस्थाने १८७६ साली दूरस्थांशी संभाषण करण्याच्या यंत्राचा शोध लावला . या शोधाला पाठबळ द्यायला तेव्हा कोणीच पुढे येईना . मात्र , प्रेसिडेंट रुदरफोर्ड हायेस्‍ यांना प्रत्यक्षिक दखविल्यानंतर ते म्हणाले ,’हा शोध आश्चर्यकारक आहे .पण हे उपकरण आपल्याकडे असावे हे कोणाला कधी वाटेल , कोण जाणे !’
ते अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या संशोधकाशी बोलत होते.

१९४० मध्ये , आणखी एका युवा संशोधकाने ( त्याचे नांव चेस्टर कार्लसन्‍ ) त्याची कल्पना जवळ जवळ वीस कंपन्यां पर्यंत पोहोचवली. यांत कांही अमेरिकेंतील सर्वांत मोठ्या कंपन्याही होत्या. त्या सर्वांनी त्याला परतीची वाट दाखवली.
सात वर्षांच्या प्रदीर्घ कालाच्या नकारांनंतर , त्याने न्यू यॉर्क मधील हॅलॉइड ह्या छोट्या कंपनीला आपल्या electrostatic paper-copying process या शोधाचे हक्क विकले .
हीच हॅलॉइड कंपनी पुढे झेरॉक्स कॉर्पोरेशन म्हणून प्रसिद्धीस आली .

एकूण बाविस मुलांपैकी विसावी असलेल्या मुलीला तिच्या वयाच्या चौथ्या वर्षी डबल न्युमोनिया व स्कार्लेट फिव्हर यांनी गाठले . त्यांमुळे तिचा डावा पाय लुळा पडला. चालण्याकरिता leg brace वापरणे तिला आवश्यक झाले . वयाच्या नवव्या वर्षी, ब्रेसच्या आधाराशिवाय चालायचे तिने ठरविले . तेराव्या वर्षी तिने धावपटू होण्याचे ठरविले . पण ज्या ज्या शर्यतींत ती भाग घेई , त्या प्रत्येकीत तिला अपयश येई . पण ती अखंड प्रयत्न करीत राहिली . अखेर असा एक काळ सुरू झाला की ती प्रत्येक शर्यत जींकू लागली .
ही विल्मा रुडॉल्फ्‍ , जिने ऑलिम्पिक शर्यतींत तीन सुवर्ण पदके मिळविली.

साधी सोप्पी प्रमेये सुद्धा सोडविता येत नाहित व गणिताकडे लक्ष नाही म्हणून एक शालेय शिक्षिका त्याचा नेहमीच उद्धार करी . ’ तू आयुष्यांत कांहिच करू शकणार नाही .’ ती त्याला म्हणे. त्याची आई मात्र त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, त्याला गणिताचे पाठ देत राहिली .
हा मुलगा म्हणजे आल्बर्ट आइनस्टाइन .

जो कधीच पराभुत झाला नाही तो जेता नव्हे . जेता तो की ज्याने कधीच माघार घेतली नाही .

Tuesday, January 12, 2010

परमात्म्याबरोबर एक मुलाखत

मी देवाची मुलाखत घेतल्याचे मला स्वप्न पडले .
“ तुला माझी मुलाखत घ्यायची आहे तर ? ” देवाने विचारले .
“ जर तुला वेळ असेल तर .” मी म्हणालो .
देवाने स्मितहास्य केले , म्हणाला “ अरे माझ्याकडे अमर्याद वेळ आहे .
…. कोणते प्रश्न विचारायचे तुझ्या मनांत आहे ? ”
“ मानवाच्या कोणत्या वागणुकीबद्दल तुला जास्त आश्चर्य वाटते ? ” मी विचारले .
देव म्हणाला, “ त्यांना बाल्यावस्थेचा लवकरच कंटाळा येतो आणि प्रौढावस्थेत जायची ते घाई करतात . नंतर परत बाल्यावस्थेत यायला आतूर होतात …..
“ पैशांच्या हव्यासापायी आपले आरोग्य ते हरवून बसतात व नंतर निरोगी होण्याच्या प्रयत्नांत जमविलेला पैसा गमावतात…..
“ भविष्याच्या चिंतेमुळे त्यांना वर्तमानाचा विसर पडतो….. तो इतका की ते धड वर्तमानांत नसतात ना भविष्यकाळांत .
“ ते असे जगणे जगतात की त्यांना मरणाचा जणू विसरच पडला आहे . पण मृत्यू असा येतो की जणू ते कधी जगलेच नाहित. ”
देवाने माझा हात हातांत घेतला आणि कांही वेळ आम्ही नि:शब्द राहिलो .
नंतर मीच विचारले ,“ जगाचा पालनकर्ता म्हणून तुझ्या प्रजेने कोणती जीवनमुल्ये अंगी बाणवावित ? ”
“ दुसर्‍याला , आपल्यावर प्रेम करायला कोणीही भाग पाडू शकत नाही हे त्यांनी शिकावे. स्वत:वर प्रेम करणे एव्हडेच ते करू शकतात ……
“ आपली अन्याशी तुलना करू नये हे त्यांनी शिकावे …..
“ क्षमा करण्याची संवय त्यांनी लावून घ्यावी…..
“ ज्याच्यावर ते प्रेम करतात त्यांच्या जखमा चिघळवायला कांही क्षण पुरतात पण या जखमा बुजण्याकरिता खूप वेळ सुद्धा अपुरा पडेल हे त्यांनी ध्यानांत घ्यावे …..
“ श्रीमंत माणूस तो नव्हे की ज्याच्याकडे खूप कांही आहे . श्रीमंत तोच की ज्याच्या गरजा अत्यंत कमी आहेत , हे त्यांनी शिकावे. …..
“ दुसर्‍यावर प्रेम करणारे लोक आहेत पण ते प्रेम कसे व्यक्त करावे हे त्यांना अजून कळलेले नाही हे त्यांनी शिकावे …..
“ दोन व्यक्तींना एकच वस्तू वेगवेगळी दिसू शकते हे त्यांनी शिकावे…..
“ केवळ एकमेकांना क्षमा करून भागत नाही . त्यांनी स्वत:लाही माफ करणे आवश्यक आहे हे त्यांनी शिकावे .”
“ मला वेळ दिल्याबद्दल मी तुझा अत्यंत आभारी आहे ” , मी नम्रपणे म्हणालो, ”तुझ्या प्रजेने आणखी कांही जाणावे असे तुला वाटते काय .”
देव हंसला आणि म्हणाला –
“ फक्त एव्हडेच लक्षांत ठेव की मी आहे , सदैव आहे !”

Saturday, January 09, 2010

मी माझा – कविता : चंद्रशेखर गोखले

नेहमीच डोक्याने विचार करू नये
कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा .

मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
वाळलेलं पानसुद्धा गळताना
तन्मयतेनं पाहणारा .

माझ्या हंसण्यावर जाऊ नका
माझ्या रुसण्यावर जाऊ नका
जरी तुमच्यात असलो तरी
माझ्या असण्यावर जाऊ नका .

Monday, January 04, 2010

स्त्रिया शिकून नोकरी-व्यवसायात उतरून नेटका संसार करण्याचा प्रयत्नही
करू लागल्या. पण पुरुष संस्कृतीचा पगडा अजूनही आहे. स्त्रीला आपल्या
इच्छा आणि आवडीना नवर्‍याकडून कसा प्रतिसाद मिळतो त्याचे चित्रण
खालील कविता करते. थोड्याफार फरकाने अनेक घरात हे घडत असते.
सोबतीच्या कवि संमेलनातील सौ.जयश्री तांबोळी यांची स्वरचित कविता.

एक रविवार घरोघरीचा

उद्याचा रविवार मजेत घालवू, दोघानीही केला ठराव,
ती उठली उजाडताच, तो पेपर चाळीत अंथरुणात ।
तिने केली फिल्टर कॉफ़ी, त्याला गरमागरम चहा
नाश्त्याला करते उपमा, त्याला हवा मसाला डोसा ॥

तिने केली भरली वांगी, उंदियो आणायला गेला दुकानात
ती करणार मटार पुलाव, त्याला पाहिजे मसाले भात ।
टी.व्ही. वरील सिनेमा पाहू आले तिच्या मनात
पेपरात डोके घालून तो पसरला आरामात. ॥

आवरून ती बाहेर आली, केला ऑन टी.व्ही.
हातातल्या रिमोटने मॅच त्याने केली सुरु ।
दिवस दिवस मॅच पहातोस, जणू आहे क्रिकेटर
अन तू मोठी कलाकार, त्याने चिडून दिले उत्तर ॥

सुट्टीत जाउ माथेरानला, मांडला तिने प्रस्ताव
छे, तिथे फिरावे लागते चालत, नाही वाहनाला वाव,
त्यापेक्षा गोव्याला जाउ, मस्त समुद्रावरील वारा,
नको उन्हाचा ताप, तेथील फ्लॅटच आपला बरा ॥

एकाही विषयावर नाही होत एकमत,
तरी आपण एकत्र कसे, बसली ती विचार करत ।
धुसफुसत सरला दिवस, सोमवारपासून पायाला चाक,
जी. जी. एम.सी. म्हणत तिने पुसले डोळे आणि नाक ॥

(जी.जी. एम.सी.. = घरोघरी मातीच्या चुली)

-- कवयित्री: सौ. जयश्री तांबोळी

कांही देखण्या पुष्परचना