Monday, December 21, 2009

कवि सम्मेलन-सोबती सभासदांचे

दि. २ डिसेंबर रोजी सोबती सभासदांच्या स्वरचित कवितांचा कार्यक्रम झाला. अनेक सभासदानी त्यात उत्साहाने भाग घेतला. विविध प्रकारच्या कविता सादर केल्या गेल्या - काही गंभीर वळणाच्या, काही विचार प्रवर्तक तर एकादी कविता सभासदाना हसवूनही गेली. त्यातील काही निवडक कविता सोबतीच्या ब्लॉगवर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील. प्रथम प्रा. सी.भा. दातार यांची एक कविता.

अभिनय क्षेत्रात स्त्रिया गेली अनेक वर्षे आघाडीवर आहेत. मात्र तबलावादनासारख्या क्षेत्रात एकादीच महिला पूर्वी आढळत असे. १९८७ साली अंधेरी येथील एका संस्थेत पं.झाकीर हुसेन यांच्या शिष्या कु. अनुराधा पाल यांच्या तबला वादनाचा कार्यक्रम झाला. त्या षोडषर्षीय युवतीने आपल्या तबला वादनाने सर्वाना मंत्रमुग्ध केले. सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद व संस्कृतचे व्यासंगी निवृत्त प्राध्यापक सी.भा. दातार यानी त्या तबला वादक युवतीचे कौतुक त्यांच्या खालील कवितेत शब्दरूप केले आहे.

नाही अबला, ही तर सबला

अबला कोणी वाजवी तबला, ऐकून तज्ञा खेद वाटला ।
कुणी उठावे काही करावे, नेम कशाचा काही न उरला ।।
हिरवा कुडता हिरवी ओढणी, कळी उमलती हिरव्या पानी ।
भुरभुरणार्‍या बटा आवरी, नाजुक तिच्या करांगुलीनी ।।
सुंदर खाशी सुबक ठेंगणी, वेल चवळीची तुस्स कोवळी ।
मंद मंदशी हसत लाजली, मऊ मेणाची जणू बाहुली ॥
परंतु जेव्हा तिने घेतला पुढ्यात डग्गा आणि तबला ।
चकित जाहले मन श्रोत्यांचे, कुणी म्हणावे हिजला अबला ।।
तबल्यावरती चाट उमलली, अन डग्ग्यावर थापही घुमली ।
तेव्हा कळले ही न बाहुली, तिची जात अन कुळी वेगळी ॥
सुरु जाहला मंद लेहरा, परि आक्रमक तिचा मोहरा ।
थक्कित झाल्या सार्‍या नजरा, तरी निरागस तिचा चेहरा ।।
डोळ्यांवरची झोप उडाली, अंग सावरुनि सभा बैसली ।
लयतालाच्या खेळामध्ये, अवघी मैफल पुरी रंगली ॥
बघता बघता वेग वाढला, लयतालाचा विलास फुलला ।
लवचिक अचपळ जरी ही चपला, आज मोदिते नभोमंडळा ॥
हिला पाहता वाटे पळभर, नागिणीची ही सतेज सळसळ ।
खळखळणारी सविता अवखळ, अग्निशिखा की उजळे उज्ज्वल ॥
कर कोमल परि बोल रोकडे, सहज वाजवी मुष्कील मुखडे ।
लीलावती ही जणु लीलया, हसत सोडवी गणिती कोडे ॥
भगिनीना संतोष जाहला, अन पुरुषांचा तोरा गळला ।
गुण न मानिती भेद कोठला, सत्याचा या प्रत्यय आला ॥
तांडव गिरिजेने मांडावे, तिचे त्यावरी वादन चाले ।
अबले हाती तबला मर्दन, पुरुषायित ते जणू वाटले ॥
बघता बघता कलाक सरला, तिच्या वादनी कसा न कळला ।
रोमांचक तो अनुभव विरळा, ठेव सुखाची देउन गेला ॥


------ कवि: प्रा. सी.भा. दातार

No comments: