गुरुवायूर हे प्रसिद्ध तीर्थस्थळ कोचीन पासून सुमारे ९० किलोमिटर अंतरावर आहे. येथे श्री कृष्णाचें ( गुरुवायुरप्पन् ) देऊळ आहे . देवळांत प्रवेश करतांना , पुरुषांना ’मुंडू’ म्हणजे श्वेत लुंगी परिधान करावी लागते. कमरेच्या वरील भागांत कांही वस्त्र नसावें . खांद्यावर शर्ट ठेवला तर चालतो . महिलांना साडी अथवा ड्रेस चालतो. पाहिजे असल्यास मुंडू रु. १० भाड्यानें मिळते . रोज प्रचंड संख्येने , लोक दर्शनाला येतात. वरिष्ठ नागरिकांकरिता वेगळी रांग असते. शबरीमलयला जाणारे भक्त,
अय्याप्पाच्या दर्शनाला जाताना प्रथम येथे येतात . पाणी काढलेल्या जुन्या नारळाचा एक डोळा उघडून त्यांत तूप भरतात व वात लावतात. असे नारळ , कांही मोबदल्यांत तयार करून देणारे अनेक जण येथे दिसले. शबरीमलयच्या पायथ्याशी वात पेटवितात. या भक्तांचा वेष काळा असतो. कपाळावर जसें गंध लावतात तसे सर्व ठिकाणी बाहेरून गंध लावलेल्या , या भक्तांना शबरीमलयकडे नेणार्या मोटारी व बसेस् सहज ओळखू येतात. देवळांत सांजवेळेला वाती लावलेल्या हज्जारों दिव्यांची आरास दररोज करतात. हे सर्व दिवे लावण्याचे काम फक्त १० मिनिटांत करतात. या वेळेत फक्त देवळाचा सेवक वर्ग आवारांत असतो. संपूर्ण देऊळ याने उजळून निघते. फार विलोभनीय दृष्य असते. देवळाच्या आवाराबाहेर एक भव्य, कायम स्वरुपाचा मंडप आहे . नृत्याचा पहिला प्रयोग (अरंगेत्रम् ), बर्याच मुलींचे पालक येथे योजतात व त्याचें चित्रीकरण करून ठेवतात. दर्शनार्थींकरिता रहाण्याची ,चपला ठेवण्याची , टॉयलेट ब्लॉकची व कार-पार्किंगची शुल्क घेऊन सोय आहे.
देवळाचे ६४ हत्ती आहेत. कांही अंतरावर असलेल्या प्रचंड हत्तीशाळेंत त्यांचें वास्तव्य असते. प्रतीव्यक्ती व कॅमेरा ( स्थिर / चल ) वापरण्याकरिता शुल्क देऊन हे स्थळ १ ते १.५ तासांत पाहाता येते. त्यामुळे, तेथील रोजच्या प्रचंड खर्चाची – खाणे-पिणे, माहूत, साफसफाई , औषधोपचार , शिक्षण इत्यादि – कल्पना येते. या हत्तीशाळेतला देवळाचा प्रमुख हत्ती केशवन् – जीवनकाल १९०४ ते १९७६ – हा प्रख्यात होता व गजराज पदवीने सन्मानित होता. एकादशीच्या दिवशी उपवास करून , देवळाच्या दिशेने बसून व सोंड वर करून नमस्कार करीत त्याने प्राण सोडला. Taxi-dermi करून , त्याला मरणोत्तर जतन करून ठेवले आहे. त्याच्या प्रत्येक मृत्युदिनी हयात असलेले सर्व हत्ती त्याच्यापुढे रांकेत उभे रहातात व सद्याचा प्रमूख हत्ती - याचेही नांव केशवन् आहे –त्याला हार घालतो. केरळमधील या धर्म-स्थळावर लोकांची अतिशय श्रद्धा आहे .’पाताळंजना’ शीळेपासून कोरलेली गुरुवायूरप्पन्ची मूर्ती अद्वितीय आहे . ती सुमारे ५००० वर्षे इतकी जुनी आहे व या स्थानाला भूलोकीचें वैकुंठ असे समजतात.
एक आख्यायिका अशी – आदि शंकराचार्य आकाशमार्गे शृंगेरीला जात असता, गुरुवायूरवर असताना, तेथील भव्यतेला व भूतबळीच्या मिरवणुकीला पाहून हंसले व गुरुवायूरप्पन्ला प्रणिपात न करताच पुढे जाण्याच्या प्रयत्नांत असता, एकाएकी, देवळाच्या नैऋत्य भागांत कोसळले. सांवरून पहातात तर काय ! साक्षात गुरुवायुरप्पन् राजशाही थाटांत समोर उभे. आपल्या एकाएकी कोसळण्याचें कारण आचार्यांना क्षणार्धांत समजलें. त्यांनी देवाला साष्टांग नमस्कार घातला व तेथल्या तेथे गोविंद-अष्टकम् रचून स्तुती केली. आचार्य खाली पडताना मांडवाला एक भोक पडले. ते भोक , भक्त आस्थेने पहातात.
दुसरी आख्यायिका अशी – मंजुळा ही एक सत्शील दासी होती. ती रोज गुरुवायुरप्पनला हार घेउन जात असे. एके दिवशी तिला जायला उशीर झाला व देवळाचे दरवाजे बंद झाले. तिने, त्या दिवशी , हार एका वटवृक्षाखाली असलेल्या शिळेवरच ठेवला. दुसर्या दिवशीं जेव्हा देवावरलें निर्माल्य काढलें तेव्हा १ हार मात्र मूर्तीला चिकटून राहिला. तोच हार मंजुळाने आदल्या दिवशी वटवृक्षाखालील शिळेवर ठेवला होता. ही कथा सर्वांना कळल्यानंतरच , तो हार मूर्तीवरून खाली आला. या वटवृक्षाला नंतर मंजुळाळ असे नांव मिळालें. देवळाच्या उत्सवांत, येथुनच हत्तींची शर्यत सुरू करतात.
क्रमश: >>> कुमारकोम व अलेप्पी देवलाकडे
देवळासमोरील मंडपांत अरंगेत्रम् सुरू आहे
Friday, December 25, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment