Thursday, December 03, 2009

रम्य ही स्वर्गाहुन लंका

रम्य ही स्वर्गाहुनी लंका

वारंवार कानावर पडणारे हे गीत लंकेचे यथार्थ वर्णन करते. ‘लंकेत सोन्याच्या विटा’ असेही वर्णन तिचे केले जायचे. पण श्रीलंकेचे वर्णन सागरातील पाचूचे बेट असे करणेच सार्थ होईल. शिवाय भारताच्या टोकाशी जवळच असलेल्या लंकेला पौराणिक पार्श्वभूमीही आहे. अशा वैशिट्यपूर्ण श्रीलंकेला सोबतीच्या एक सभासद सौ. जयश्री तांबोळी यानी गेल्या सप्टेंबरमध्ये भेट दिली. त्या भेटीला त्यानी खालीलप्रमाणे शब्दरूप दिले आहे.

बर्‍याच वर्षांपासून भारताच्या टोकाशी असलेल्या मोदकाच्या आकाराच्या श्रीलंकेला भेट द्यायचा विचार होता. रावणाच्या सोन्याची लंका पहाण्याचा योग मात्र आला तो सप्टेंबर २००९ मध्ये. त्यापूर्वी राजकीय संघर्षामुळे वातावरण असुरक्षित होते. आता मात्र वातावरण निवळले असून मोठ्या प्रमाणावर जगभरातून अनेक पर्यटक श्रीलंकेला भेट देत आहेत.

आमचा प्रवास, तेथील निवास, स्थलदर्शन ही जबाबदारी सुप्रसिद्ध Cox & King या पर्यटन कंपनीने घेतली होती. श्रीलंकन एअरवेजच्या विमानाने पहाटे कोलंबोला पोहोचलो. विमानतळावर आमच्यासाठी गाडी तयार होती. कोलंबोहून कॅंन्डी शहराकडे जाताना Pinnavela Elephant Orphanage आहे. हे जगातील एकमेव हत्तींचे अनाथालय. तेथे हत्तीच्या लहान पिलाना मोठ्या बाटलीतून दूध पाजतात. हत्तीचे पिल्लू एका मिनीटात बाटली रिकामी करते. मोठ्या हत्तीना चारा, धान्य खावयास देतात. सकाळ, संध्याकाळ जवळच असलेल्या महाओया नदीमध्ये हत्तींची आंघोळ होते. हे अनाथालय सरकार चालवते.

कॅन्डी शहरात टेंपल ऑफ़ टूथ रेलिक पाहिले. गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर त्यांचे काही दात काढले गेले. चीन, जपान, श्रीलंका येथील बुद्ध स्तूपांत ते ठेवले कारण त्या दांतात दैवी शक्ती आहे असा समज आहे. आतमध्ये (चांदीच्या) मोठ्या चंबूत बुद्धाचा दांत ठेवला आहे. खोलीबाहेर मोठमोठे हस्तीदंत ठेवले आहेत. बुद्धाला कमळ अर्पण करतात. जवळच मोठे सरोवर आहे. रात्री तेथील प्रेक्षागृहात सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले. पूजा नृत्य, कोब्रा नृत्य, मयूर नृत्य, रावण नृत्य पाहिले. शेवटी पेटलेल्या कोळश्यांवरून काही कलाकार चालत गेले. तसेच चटईएवढ्या अग्निशय्येवरील करामतीला जोरदार टाळ्या मिळाल्या.

सिगीरीया हा सिंहाच्या आकाराचा पहाड आहे. या सिंहगिरीवर हजारो वर्षांपूर्वी कश्यप नावाच्या राजाने किल्ला बांधला. आता त्या किल्ल्यावर चढण्यासाठी लोखंडी अर्धवर्तुळाकार जिना केला आहे. काही पायर्‍या चढून गेल्यावर कातळाच्या खाचेत, दगडी भिंतीवर त्या काळात चितारलेली अप्सरांची रंगीत चित्रे आहेत. वरती जाताना गेरूच्या रंगाची गुळगुळीत मिरर वॉल आहे. सात-आठशे पायर्‍या चढून गेल्यावर राजवाडा आहे. पूर्वी तेथे १२८ खोल्या, मोठा स्विमिंग पूल, अँफी थिएटर होते. आता फक्त भिंतींचे अवशेष शिल्लक आहेत. पूर्वी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी मोठ्या अजस्र सिंहाचा पुतळा होता. त्याच्या जबड्यातून प्रवेश करीत. आता तेथे सिंह नाही. फक्त त्याच्या दोन्ही पायांचे पंजे शिल्लक आहेत. तेथून २० कि.मी. अंतरावर डांबुल्ला ही दगडात कोरलेली पांच लेणी आहेत. भिंतीवर, छतावर रंगीत चित्रे आहेत. पांचही लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या स्थितीतील दगडी मूर्ती आहेत. पायथ्याशी गोल्डन टेंपल नावाचे वस्तुसंग्रहालय आहे. प्रवेशदाराशी पिवळ्या प्लॅस्टरमधील प्रचंड बुद्ध्मूर्ती व समोर सोनेरी स्तूप आहे.

बुवारा एलिया ह्या हिलस्टेशनवर वर्षभर थंडी असते. नारळाच्या बागा, भातशेती, डोंगर, धबधबे. चहाचे मळे असे विपुल निसर्ग सौदर्य आहे. श्रीलंकेला पाचूचे बेट म्हणतात. तेथून अशोक वाटिका जवळ आहे. रावणाने अशोक वनात सीतेला ठेवले होते. तेथे सीतेचे मंदीर आहे. ज्या झाडाखाली सीता बसत असे त्या झाडांच्या फांद्यांना लोक वस्त्र बांधून पूजा करतात. हनुमानाचे भलेमोठे पाउल तेथे दाखवतात. रावणाने सीतेला पळविले तेव्हा तिचे अश्रू पडल्याने तेथे असंख्य धबधबे आहेत असे मानतात.

कोलंबो शहरात फ़ोर्ट भागात सरकारी कार्यालये आहेत. गंगा रामय्या टेंपल हे बुद्धाचे मंदीर आहे. फ़ोर्टच्या बाहेर पेट्टा ह्या बाजारपेठेत सर्व काही मिळते, सुती कपडे, मसाल्याचे पदार्थ इत्यादि. श्रीलंकेत रत्नपुरा भागात रत्नांच्या हजारो खाणी आहेत. कोलंबो, बेंटोटा, निगोंबो हे येथील बीच प्रसिद्ध आहेत. असा हा वैशिट्यपूर्ण डोळ्यांचे पारणे फेडणारा श्रीलंका देश.

---- लेखन: सौ. जयश्री तांबोळी

No comments: