Tuesday, June 30, 2009

अमेरिकेचे ग्रीन कार्ड

मी व माझी पत्नी यांनी हल्लीच अमेरिकन ग्रीन कार्ड करून घेतले. त्यासाठी कराव्या लागणार्‍या दीर्घ खटपटीची माहिती मी लिहितो आहे. माझ्यासारखे जे इतर ज्येष्ठ नागरिक यासाठी प्रयत्नशील वा इच्छुक असतील त्यांना याचा उपयोग होईल असे वाटते.
आपला मुलगा वा मुलगी अमेरिकन नागरिक झालीं असतील तर त्याना आपल्या आईवडिलांसाठी Permenent Resident होण्याची परवानगी मिळवतां येते. त्यालाच green card किंवा Immigrant Visa म्हणतात.
मुला/मुलीपाशी त्यांचे स्वत:चे birth certificate असते. त्यावर आईचे नाव असते त्यामुळे आईसाठी परवानगी मागणे सोपे पण वडिलांसाठी मात्र प्रथम काय लागत असेल तर आईवडिलांच्या विवाहाचा दाखला! त्याशिवाय त्यांना वडिल म्हणून कायदेशीर मान्यता नाही! येथूनच सर्व खटपटीला सुरवात होते!
आपल्या पिढीच्या विवाहांचे वेळी विवाहाची नोंद होण्यास नुकतीच सुरवात झाली होती. नवरा-नवरी व उपाध्येबुवा यांच्या सहीने एक अर्ज भरून पाठवावा लागे. पण त्याची सरकारी शिक्का असलेली प्रत मिळाल्यावर ती आपण काळजीपूर्वक जतन करून ठेवलेली बहुधा नसतेच! कारण आपल्याला त्याची कधी गरज पडत नाही. आमचे असेच झाले होते!
आपला विवाह जिथे रजिस्टर केला असेल तेथून दाखल्याची नवीन प्रत मिळाली तर ठीकच पण नाही तर काय? बहुधा ती मिळत नाहीच. त्याला पर्याय एकच. ’आमचेकडे तुमच्या विवाहाची नोंद नाही (किंवा जे कारण असेल ते) त्यामुळे दाखला देतां येत नाहीं’ असे पत्र Registrar of Marriages' कडून मिळविणे. हे पत्र इंग्रजीमध्ये असेल तर ठीक पण मराठीत असेल तर त्याचे इंग्रजी भाषांतर करून घ्यावे लागेल एवढेच नव्हे तर भाषांतर करणाराने ’मी english and marathi' दोन्ही भाषा शिकलो आहे(डिग्रीचा उल्लेख करून) व हे भाषांतर मुळाबरहुकूम बरोबर केले आहे’ असे स्वत:च्या सहीने लिहून द्यावे लागते! (हे सोपस्कार इंग्रजींत नसलेल्या कोणत्याही कागदपत्रासाठी करावे लागतात.)
त्यानंतर, आपल्या विवाहाचे वेळी उपस्थित असलेल्या व त्यावेळी adult असलेल्या एक-दोन व्यक्तींकडून प्रतिज्ञापत्र करून घेणे. त्यामध्ये आपल्याशी असलेले नाते वा मैत्री याचा स्पष्ट उल्लेख, स्वत:चे नाव, वय, शिक्षण, पत्ता, व्यवसाय इत्यादि माहिती हवी. विवाहाचे वेळी स्वत: उपस्थित असल्याचा निश्चित उल्लेख हवा. वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार करून रु.१०० चे फ्रॅंकिंग करून नोटरीसमोर सही व्हावी लागते.
विवाहाचा दाखला व तो नसल्यास वरीलप्रमाणे रजिस्ट्रारचे पत्र, भाषांतर, दोन प्रतिज्ञापत्रे असे सर्व कागद मुला/मुलीकडे पाठवावे. मूळ कागदच लागतात. इथल्याप्रमाणे gazetted officer च्या सहीच्या प्रती चालत नाहीत. प्रतिज्ञापत्रे करतानाच एक-दोन जादा प्रती बनवून नोटरीकडून ’true copy' सर्टिफिकेट करून घावे. (त्या प्रती पुढे लागतातच!) या कागदांच्या आधारे मुला/मुलीला आई व वडील या दोघांसाठी sponcering ची कार्यवाही सुरू करतां येते. त्यानी दोघांसाठी Sponcership चे papers submit केले कीं पहिला अध्याय संपला!

Monday, June 29, 2009

ज्ञान आणि मनोरंजन
Woman includes man
Women's problems : MEN tal anxiety
MEN tal breakdown
MEN tal cramps
MEN o - pause
Therefore all women's problems begin with MEN.
Marriage is the only war where a person sleeps with enemy.
How the word N E W S is formed : North, East, West, South.
मरणाची भीती आपल्याला जगण्यापासून दूर ठेवते - मरणापासून नव्हे.
लग्नानंतर पती-पत्नी एकाच नाण्याच्या दोन बाजू बनतात. ते एकमेकासमोर येत नाहीत
तरीही एकत्र रहातात.
खालील वाक्ये उलटी वाचा :
रामाला भाला मारा
चीमा काय कामाची
९ या आकड्याचे वैशिष्ट्य :
९ या आकड्याला कोणत्याही आकड्याने/संख्येने गुणले तरी येणार्‍या
अंकांची बेरीज ९ येते: उदा: ९ x ८ = ७२: : ७ + २ = ९
९ x २४८५७ = २२३७१३ : २+२+३+७+१+३=१८ : १+८=९.
तुम्ही लग्न अवश्य करा. जर तुम्हाला चांगली बायको मिळाली तर तुम्ही सुखी व्हाल.
नाहीतर तुम्ही तत्वज्ञानी व्हाल. : सॉक्रेटीस.
यासंबंधी सॉक्रटीसची एक गोष्ट : सॉक्रेटीसची बायको फार कजाग व भांडखोर हो्ती. एकदा तिने संतापून
तोंडाचा पट्टा चालू केला. सॉक्रेटीस शांतपणे ऐकत होता. ती अधिकच
रागावली व तिने सॉक्रेटीसच्य़ा डोक्यावर पाण्याची बाद्ली ओतली. तरीही
तो शांतच होता. मग म्हणाला " गडगडाट झाल्यावर पाऊस पडणारच !".

ज्येष्ठानो: आधा करो खाना, पानी करो दुगुना
कसरत करो तिगुना और हसी करो चौगुना.

Tuesday, June 23, 2009

तीस वर्षांची अखंड वाटचाल
सोबतीचा वर्धापन दिन
सोबतीचा ३०वा वर्धापन दिन दि. ९ जून २००९ रोजी उत्साहात साजरा झाला.
प्रारंभी श्रीमती नंदा देसाई, वैजयंती साठे, श्री.विजय पंतवैद्य व श्री.विश्वास डोंगरे यानी आपल्या सुस्वर आवाजात स्वागत गीत सादर केले.
सोबतीचे अध्यक्ष श्री. मुकुंद पेठे हे परदेशी गेले असल्याने उपाध्यक्ष श्री. सुरेश निमकर यानी समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध नाट्य अभिनेते/गायक श्री रामदास कामत यांचे हार्दिक स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला व उपस्थित सोबती सभासद यांचे स्वागत केले. गोव्यात जन्मलेलेल श्री. रामदास कामत हे पदवीधर आहेत. त्यांचा नाट्य प्रवास वयाच्या सातव्या वर्षापासून सुरु झाला. वडिलांच्या उत्तेजनामुळे त्यानी नाटकात काम करणे सुरु केले व संगीताची जाण असल्याने नाट्य गायनातही त्यानी चमक दाखविली. वडील बंधूंकडून त्यानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. त्यांचा नाटक व नाट्यसंगीत असा अखंडित प्रवास अजूनही वयाच्या अठ्ठ्यातराव्या वर्षीही चालू आहे. अनेक नाटकांत भूमिका व गायन यामु्ळे त्यांचे नाव कलाक्षेत्रात सर्वश्रुत झाले. या कलागुणांमुळे त्यांच्याकडे अनेक पुरस्कार चालत आले. सर्वात मानाच्या ‘ विष्णुदास भावे ’ पुरस्काराने ते सन्मानित झाले.बीड येथे होणार्‍या नाट्यसम्मेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे. ही त्यांच्या नाट्य/संगीत सेवेची ही पावतीच म्हणावी लागेल.त्यानंतर श्रीमती सुनीता क्षीरसागर यानी सोबतीच्या कार्याचा आढावा घेतला.सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले सोबतीचे अध्यक्ष श्री.मुकुंद पेठे व पुण्याहून श्री द.पां. बापट यांच्या शुभ संदेशांचे वाचन श्रीमती. सुनंदा गोखले यानी केले.ज्येष्ठांचा सत्कार हा वर्धापन दिनाचा महत्वाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे श्री रामदास कामत याच्या हस्ते संपन्न झाला. त्यात सहस्रचंद्रदर्शन प्राप्त झालेले, वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केलेले सभासद व विवाहाची पन्नास वर्षे पुरी केलेले सभासद पती-पत्नी यांचा गुलाब पुष्प, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती सुनीता क्षीरसागर यानी उत्सवमूर्तींचा परिचय करून दिला
.
प्रमुख पाहुणे श्री.रामदास कामत यानी भाषणाच्या सुरुवातीला सोबतीचा ३०वा वर्धापन दिन साजरा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला व सोबतीची ही वाटचाल कौतुकास्पद आहे असे उद्गार काढले. ते पुढे म्हणाले की सुरुवातीला उत्साहात संस्था स्थापन होतात पण हळूहळू कार्यकर्त्यांच्या अभावी अनेक संस्था बंद पडतात. आज संस्थांमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा अभाव आहे. मात्र सोबतीची ही तीस वर्षांची वाटचाल आनंददायी आहे कारण या संस्थेत उत्साहाने, निरलसपणे काम करणारे कार्यकर्ते आहेत. सामाजिक बांधिलकीचा विचारही सोबतीमध्ये आहे कारण अनेक गरजू वृद्ध, विद्यार्थी, सेवाभावी संस्था याना सोबती यथाशक्ती आर्थिक मदतीचा हातही देते. आज आयुर्मर्यादा वाढली आहे. वयाचा विचार न करत बसता सदा कार्यरत राहून आयुष्य जगावे. ‘संध्याछाया भिवविती हृदया’ हे विसरुन, आनंदी जीवन जगून ‘संध्याछाया रमविती हृदया’ असे जीवन जगावे. स्नेहाचे इंद्रधनुष्य गुंफावे. शासन ज्येष्ठांकडे फारसे लक्ष देत नाही. तेव्हा आपल्या हाती आहे तितके आनंदी रहावे. आज कुटुंबे विभक्त होत आहेत, अनेक ज्येष्ठांची मुले परदेशात आहेत व त्याना एकाकी आयुष्य जगावे लागत आहे. म्हणून ज्येष्ठांचे प्रश्न शासनाकडे मांडले गेले पाहिजेत.
गोमंतकात फोंड्याजवळ एक वृद्धाश्रम आहे पण त्याचे नाव ‘स्नेहमंदीर’ ठेवले आहे. अनेक ज्येष्ठ तेथे परस्पर स्नेहभावाने आनंदी जीवन जगतात.
संगीत नाटके आता फारशी चालत नाहीत. तरीही नाट्यसम्मेलनाचा अध्यक्श म्हणून यथाशक्ती मार्गदर्शन अवश्य करीन. सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद व प्रसिद्ध नाट्य समीक्षक श्री. शि.मो. घैसास यांचा त्यानी गौरवपूर्ण उल्लेख केला.
शेवटी श्री. कामत यानी समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करून बहुमान दिल्याबद्दल सोबतीचे आभार मानले.
या प्रसंगी सोबतीचे सभासद श्री. स.प. लिमये, श्री पंडितराव व श्री भास्कर जोगळेकर यानी आपले विचार मांडले.
त्यानंतर भाग्यशाली सोडत काढण्यात आली व तीन नशिबवान सभासदाना बक्षिसे देण्यात आली.
कार्याध्यक्श श्री म.ह. देसाई यानी प्रमुख पाहुणे, निमंत्रित, लोकमान्य सेवा संघ, वास्तुशोभा, कॅटरर्स व ज्यानी समारंभ यशस्वी करण्यासाठी योगदान दिले त्या सर्वांचे आभार मानले.
शेवटी अल्पोपहाराने त्या दिवसाच्या समारंभाची सांगता झाली.
सोबतीचा ३०वा वर्धापन समारंभ : भाग २




वाचक हो ! मंगळवार दिनांक ०९ जून २००९ रोजी संपन्न झालेल्या ‘सोबतीच्या ३०व्या वर्धापन दिनाचे इतिवृत्त आपण वाचलेच असेल. त्याच्या दुस~या दिवशी म्हणजे बुधवार दि.१० जून रोजी वर्धापन सोहोळ्याचे निमित्ताने ‘नाडकर्णी सभागृहात’ एक विशेष कार्यक्रम झाला.

‘आम्ही सोबती, स्वप्न आमुचे आनंदे जगण्याचे...! सोबतीच्या या अर्थपूर्ण शीर्षकगीताचे स्वर मनात घोळवीतच सारे सोबती आजच्या साप्ताहिक सभेला आले होते. सुरुवातीला ‘पारितोषिक वितरणाचा’ कार्यक्रम झाला. दिनांक १८ मार्च ’०९ रोजी सोबती सभासदांसाठी ज्या विविध स्पर्धांचे आयोजन केले होते, त्या स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या ‘विजयी वीरांना’ आजच्या या कार्यक्रमात उपाध्यक्ष श्री. सुरेश निमकर यांचे हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर सुरु झाला तो.. आम्ही सर्व रसिक ज्याची अतिशय उत्कंठेने वाट पहात होतो तो ‘हास्यरंजन’ हा कार्यक्रम ! सुप्रसिद्ध कलाकार श्रीमती उज्वला कुळकर्णी यांनी हा कार्यक्रम अतिशय तयारीने पेश केला. हे मुद्दाम सांगण्याचे कारण.. एकीकडे नोकरी-व्यवसाय करीत असतांना, आतांपर्यंत त्यांनी हास्यरंजनचे १५०० हून अधिक प्रयोग केले आहेत. परदेशातही अनेकदा त्यांनी ‘हास्यरंजन’ केलेले आहे. या त्यांच्या अंगभूत कला गुणांचा महाराष्ट्र सरकारनेही वेळोवेळी सन्मान केलेला आहे.
सोबतीमधील आपल्या ‘हास्यरंजन’ कार्यक्रमामध्ये त्यानी अनेक विनोदी किस्से, कविता, चारोळ्या सादर केल्या. मराठी भाषेच्या लवचिकतेमुळे निर्माण होणारे शाब्दिक विनोद, गावांकडे घेतले जाणारे लांबलचक पण तरीही नमुनेदार उखाणे, ‘इरसाल व रोखठोक भाषाशैली’ हीच खासियत असलेल्या (आणि म्हणूनच लोकांचे लक्ष वेधून घेणा~या...!)खास ‘पुणेरी पाट्या’, प्रेमाविष्काराच्या विविध छटा यांद्वारे त्यानी श्रोत्यांचे चांगलेच मनोरंजन केले.
‘बालपणीचा काळ सुखाचा’ खरा, पण हल्लीच्या स्पर्धात्मक वातावरणामुळे, तो कसा हरवून जातो, शाळकरी मुलांच्या मानसिक विकासाकडॆ पालकांकडून दुर्लक्ष झाल्यामुळे,हळूहळू ती जास्तच ‘बिनधास्त’ कशी होतात व त्यांच्या भविष्याची चिंता पालकांनाच कशी सतावू लागते याचे वास्तव चित्रण त्यांनी ‘दहा रुपयांत दहावी ’ या छोट्याशा कथेतून विनोदी अंगाने व तरीही प्रभावीपणाने केले.

परंतू...ही एक कथा सोडली तर श्रीमती. कुलकर्णी यांच्या दोन तासांच्या वक्तृत्वामध्ये, केवळ विनोदनिर्मितीसाठी वारंवार विषयांतर झाल्यामुळे कुठचाही विशिष्ठ असा विषय दिसला नाही ! त्यापेक्षा त्यांनी दोन तीनच कथा पण विनोदी अंगाने, खुलवून, रंगवून सांगितल्या असत्या तर त्या अधिक ‘मनोरंजक’ ठरल्या असत्या आणि ख~या अर्थाने श्रोत्यांचे ‘हास्यरंजन’ही करून गेल्या असत्या असे म्हणावेसे वाटते ! थोडक्यात, ‘हास्यकल्लोळ’ जरी फ़ारसा अनुभवाला आला नाही तरी एकंदर कार्यक्रम, ‘हंशा आणि टाळ्या’ मिळविणारा असल्यामुळे आमचा ‘सोबती’वर्धापन दिन: भाग २ सुद्धां आनंदात साजरा झाला.










Saturday, June 20, 2009

दक्षिण गोलार्ध ते उत्तर गोलार्ध
ICICI बॅंकेतील एक वरिष्ठ अधिकारी श्री. निरंजन लिमये यांची साउथ आफ़्रिका व रशिया या देशांत बदली झाली होती. त्यांचेबरोबर त्यांची पत्नी सौ.ललिता (M.Sc.) याही तेथे गेल्या होत्या. भौगोलिक, सांस्कृतिक व अनेक दृष्टीने भिन्न असलेल्या या देशांतील त्यांच्या अनुभवावर आधारित असे सौ. ललिता लिमये यांचे भाषण ऐकण्याचा योग सोबती सभासदाना दिनांक ३ जून २००९ आला. साउथ अफ़्रिकेत त्यांचा मुकाम जोहान्स्बर्ग या शहरात होता. प्रथम त्यानी साउथ अफ़्रिकेच्या जडणघडणीची माहिती दिली.
साउथ आफ़्रिका हे आत्यंतिक वर्णद्वेषाचे माहेरघर होते. तेथील मूळ रहिवासी कृष्णवर्णीय लोक. जगाशी फारसा संबंध नसल्याने ते मागासलेले होते. साम्राज्यवादी ब्रिटीशानी हा प्रदेश काबीज केला. निसर्ग संपन्नता, हिर्‍यांच्या खाणी, विपुल खनिजे, सुपीक जमीन, विस्तीर्ण जंगले यांचा पुरेपूर फायदा उठवून ब्रिटीशानी तेथे आपले बस्तान बसवले व स्वतःच्या निराळ्या वसाहती निर्माण केल्या. मात्र तेथील गरीब, अशिक्षित कृष्णवर्णीय लोकांचा त्यानी अमानुष छळ केला व त्यांच्यामधील मनुष्य शक्तीचा फायदा घेउन स्वतः संपन्न झाले पण काळ्या लोकाना चार हात दूरच ठेवले. १८९२ तो १९१४ पर्यंत गांधीजी आफ़्रिकेत होते व भारतीय व काळे म्हणून भारतीयांचीही ब्रिटीशांच्या छळातून सुटका झाली नाही. मात्र गांधीजीनी गोर्‍यांच्या जुलुमाला कडाडून विरोध केला आणि तेथील कृष्णवर्णीय लोक व अफ़्रिकास्थित भारतीय याना वर्णभेदाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. हळूहळू कृष्णवर्णीयांमध्येही जागृती होऊ लागली. तरीही जराही विरोध झाला की विरोधकाना रोबेन आयलंड या ठिकाणी बंदीत ठेऊन त्यांचा विरोध मोडून काढला जात असे.
गांधीजींपासून प्रेरणा घेतलेले नेल्सन मंडेला यानी पुढाकार घेउन ब्रिटीशाना उघड उघड विरोध करायला सुरुवात केली. परिणामी त्याना एकूण २७ वर्षांचा तुरुंगवास घडला. त्यांच्या सुटकेनंतर हळूहळू सत्तांतर सुरु झाले व नेल्सन मंडेला साउथ आफ़्रिकेचे पहिले अध्यक्ष झाले. मात्र गांधीजींच्या शिकवणीचा त्यांच्यावर प्रभाव असल्याने त्यानी हे स्थित्यंतर रक्तरंजित होऊ दिले नाही.
मात्र स्वतःच्या फायद्यासठी का होईना ब्रिटीशानी अनेक शहरे निर्माण केली, स्वतःसाठी निराळ्या वसाहती निर्माण केल्या, मोठ्या रस्त्यानी शहरे जोडली. आधुनिक शाळा, बागा, हॉस्पिटल्स, थिएटर्स, दुकाने बांधली. पण गोर्‍या लोकांखेरीज इतराना त्यांत मज्जाव असे.मात्र साउथ अफ़्रिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे सारे बदलले आहे व साउथ अफ़्रिकेला जगात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
जोहान्सबर्ग शहर आधुनिक साधनानी सज्ज आहे. उत्कृष्ट रस्त्यांचे जाळे आहे. रस्त्यांचे दुभाजक गुलाबांच्या फुलानी सजविलेले आहेत. वाहतुकीचे नियम सर्वजण पाळतात. कुठेही नळावरचे पाणी पिण्यायोग्य स्वच्छ असते. शहराची रचना सुंदर आहे. हवेचे प्रदूषण नाही. रस्त्यांच्या दोन्ही बाजूना लावलेल्या हिरव्यागार वृक्षांमुळे सारा परिसर नयनरम्य झाला आहे. सार्वजनिक वाहतुकीचे एकमेव साधन कॉम्बी व्हॅन. आपल्याकडील बेस्ट सारख्या बसेस तुरळक प्रमाणात धावतात.घरे खूप मोठी. काळ्या बायका घरकामासाठी मिळतात. नोकरवर्ग कमी मोबदल्यात मिळतो. उत्कृष्ट भाजीपाला व फळे मुबलक मिळतात. जोहान्सबर्गचे हवामानही सुंदर आहे. उन्हाळ्यात पाउस पडतो त्यामुळे उन्हाळा सुसह्य होतो. थंडी कडक असते.
सध्याचे राज्य काळ्या लोकांचे आहे. तिथे गोरे लोक फक्त ९ टक्के आहेत. उद्योगधंदे, राजकारण यात काळे व भारतीय यांचे वर्चस्व आहे. देशाचे सरासरी जीवनमान ४० वर्षे आहे. एड्स या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे व ही मोठी चिंतेची बाब आहे.
रशिया - मुक्काम मास्को
रशिया म्हटले की आठवते झार राजांची जुलमी राजवट, लेनिन, बोल्शेविक संघटना व विशेषेकरून स्टॅलीन. दुर्दैवाने रशियाचा इतिहास रक्तरंजित आहे. धर्माच्या संकल्पनेला विरोध व सत्तेच्या विरोधकांची कत्तल यामुळे बळींची संख्या कोटीत जाते. लेनिनने KGB नावाची गुप्त संघटना स्थापन केली होती आणि त्यामुळे जनतेला हाल सोसावे लागले. आज त्या संघटनेचे नवे नाव FSB असे आहे. पूर्वीप्रमाणे आता रशिया एकसंघ नाही व सध्याचे त्याचे चित्र खूपच निराळे आहे. महागाई फार आहे. स्त्रियाना महत्व आहेच व बरीचशी कामे त्याच करतात. बागा, जंगले, तळी खूप आहेत. लोक स्वच्छतेबद्दल बेफ़िकिर असतात पण सरकार ते काम करते. रस्ते चांगले राखले जातात. ९X९ लेनचे प्रशस्त रस्ते आहेत. रशियात साधनसंपत्ती खूप आहे. ट्राम, ट्रेन, बसेस या वाहनांमुळे सार्वजनिक वाहतूक चांगली आहे. शिवाय उत्तम भुयारी रेल्वेमार्गही आहेत. नद्या व नद्यांचे काठ सुंदर राखले आहेत. रशियामध्ये परकीयांकडे पासपोर्ट असणे अत्यावश्यक असते. लिफ़्टमध्ये गुप्तता पाळली जाते व आपल्याला बटन दाबता येत नाही. ट्रेनमधून प्रवास केला तर प्रवासी वाचनात दंग असलेले दिसतात. इतरांशी फारसे बोलत नाहीत. घरी यायचे निमंत्रण नसते. पाळीव कुत्रे सर्रास आढळतात. आंघोळीची पद्धत अभावानेच आहे. व्होडका दारू सर्रास प्याली जाते पण त्याचा वास भयानक असतो. भोजनामध्ये विविधता नाही. आर्थिक सुरक्षा नाही त्यामुळे लोक खर्चिक होतात. स्विमिंग, बॅलेट,स्केटिंग यांचे वर्ग चालतात. रशियन माणूस क्वचितच हसतो. मात्र ओळख झाल्यावर कोणतीही मदत करायला तयार असतो. अनेक पाकिस्तानी, बंगलादेशी रशियन मुलींशी लग्न करतात. शिक्षणाचे प्रमाण खूप आहे. मास्को स्टेट युनिव्हर्सिटीची ३७ मजल्यांची इमारत आहे. टूरिझम फारसे नाही. रेड स्क्वेअर येथे म्युझीयममध्ये लेनीनचे प्रेत ठेवले आहे. ६०० वर्षांचे जुने चर्च आहे. रशियन सर्कस चांगली असते. कला देशाबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली जाते. पासपोर्ट दाखविल्याशिवाय क्रेडिट कार्डाचे पैसे काढता येत नाहीत. मात्र अमेरिकन मॅकडोनाल्ड ब्रेड तेथे मिळतो. रशियात लोकशाही नावालाच आहे. सारा कारभार सध्याचे अध्यक्ष पुतिन चालवतात. रशियामध्ये तेल व खनिज साठे भरपूर प्रमाणात असल्याने प्राप्तीचे ते मोठे स्रोत आहेत.
प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित हे भाषण खूपच माहितीपूर्ण ठरले.

Friday, June 19, 2009

अमेरिकेत




















मित्रानो, मी ५ जूनला अमेरिकेत सान-फ्रान्सिस्को जवळ सान रेमॉन गावी मुलाकडे आलो आहे. हे गाव फार मोठे नाही पण छान आहे. येथे वसंत ऋतु संपून ग्रीष्म सुरू झाला आहे तरी थोडी थंडी कालपरवांपर्यंत होती. मी राहतो आहे त्या भागात बहुतेक छोटी-मोठी स्वतंत्र घरे आहेत. प्रत्येकाच्या दोन किंवा जास्त गाड्या असतात. घराला गॅरेज असते पण गाड्या बाहेर आणि गॅरेजमध्ये अनन्वित सामान अशी परिस्थिति असते. माझा रोज फिरायला जाण्याचा कार्यक्रम असतो. सर्व घरांपुढच्या व बाजूच्या मोकळ्या जागेत अनेक फुलझाडे, वृक्ष व सुशोभीकरण केलेले असते. त्यात खूप कलात्मकता असते. सध्या फुलाना बहर असल्यामुळे फारच शोभा दिसते. मी सहज काढलेले परिसराचे काही फोटो येथे पहा.

Thursday, June 04, 2009

सौ. इंद्रायणी सावकार
काव्य शास्त्र विनोद गुंफणारी चतुरस्र लेखिका
एक मुलाखत
दिनांक १३ मे रोजी सौ. सुजाता जोग यानी प्रथितयश लेखिका सौ. इंद्रायणी सावकार यांची मुलाखत घेउन या उच्च विद्या विभूषित चतुरस्र लेखिकेचा वाङमयीन जीवनपट सोबती सभासदांपुढे उलगडून दाखविला.
सौ. इंद्रायणी सावकार यांची शैक्षणिक कारकीर्द दैदिप्यमान अशीच आहे. मॅट्रीकमध्ये संस्कृतची मानाची जगन्नाथ शंकरशेट व इंग्रजीची दादाभाई नौरोजी पारितोषिके त्यानी मिळविली.पुणे विद्यापीठात संस्कृत (ऑ) मिळवून त्या सर्वप्रथम आल्या. युनिव्हर्सिटी ऑफ़ पॅरीस (Sorbonne) यानी त्याना डी.लिट देऊन त्यांचा सन्मान केला. सध्या त्या दैनिक ‘सामना’च्या उपसंपादिका आहेत.
विनोदी लघुकथा लेखन त्यांच्या वाङमयीन कारकिर्दीचे वैशिष्ट्य. वाङमयाचे इतर प्रकारही त्यानी यशस्वीपणे हाताळले आहेत. २० कादंबर्‍या, १६ लघुकथा संग्रह इतर मराठी-इंग्रजी वाङमयीन लिखाण याची संख्या ५० च्या वर आहे. इंग्रजी/मराठी नियतकालिकांत लिखाण, आकाशवाणीवर विविध विषयांवरील भाषणे, संस्कृत वृत्तनिवेदिका, दूरदर्शवर मराठी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन याही भूमिका त्यानी पार पाडल्या आहेत.
अनेक ऋषीमुनींच्या कथांचा समावेश असलेले ‘Stories of Sages' हे पुस्तक त्यानी परदेशस्थ भारतीय मुलांना आपल्या पौराणिक संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून लिहिले आहे व परदेशात त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) हे त्यांचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
मुलाखतीत आपल्या वाङमयीन प्रवासाबद्दल बोलताना त्यानी सांगितले की समाजात अवती भवती वावरणारी माणसे व ऐकलेले अनुभव व प्रसंग यानी त्यांच्या कथा कादंबर्‍याना विषय पुरविले आहेत. प्राय: विनोदी कथाना वाचकांची पसंती मिळाल्याने त्याना अधिकाधिक लिहिण्याची स्फूर्ती मिळाली व त्यांच्या इतर साहित्यालाही दाद मिळू लागली. त्यांच्या लेखणीने अनेक विषयात लीलया संचार केला आहे. ओळखीच्या, नात्यातल्या अनेक माणसानी त्यांच्या लिखाणाला विषय पुरविले आहेत. थोडक्यात, त्यांच्या मते डोळसपणे पाहिले, अंगी लिखाणाची आवड व कौशल्य असले तर लिहायला विषय मिळतात व वाचकांचा त्याला प्रतिसादही मिळतो. शिवाय त्या एक उत्तम गृहिणीही आहेत. शिवण, भरतकला, पाककला यातही त्या पारंगत आहेत.
सोबतीच्या काही सभासदानी विचारलेल्या प्रश्नाना त्यानी समर्पक उत्तर दिल्याने मुलाखत रंगतदार झाली.
एका उच्च विद्या विभूषित, चतुरस्र अशा या लेखिकेच्या मुलाखतीने सोबतीच्या सभासदाना त्यांच्या वाङमयीन कारकिर्दीचे जवळून दर्शन झाले.